Saturday, February 25, 2012

शेअरिंग !!!

ती दोघं.
त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम.
कॉलेजातच ते भेटले. मग प्रेमात पडले.
पण दोघांचे स्वभाव परस्परांहून अत्यंत वेगळे.
ती बोलकी. तो अगदीच घुम्या.
व्यक्त होणं, भरभरून बोलणं त्याला येतच नसे.!
कळायचंच नाही की त्याच्या मनात काय चाललंय

त्यात तिच्या घरच्यांना त्यांचं प्रकरण कळलंच. जातीपातीचे प्रश्न झालेच निर्माण. त्यांचा प्रचंड विरोध. तिला घराबाहेर पडणंही मुश्किल झालं. पण तरी चोरून त्याला भेटायला यायची, फोन करायची. पण हा मात्र तसाच शांत. ढिम्म. तिला कळायचंच नाही की, उद्या निर्णय घ्यायची वेळ आलीच तर हा ठामपणे काही करेल की, असाच डोक्यावर बर्फ ठेवून बसून राहील.
त्यावरून त्यांची खूप भांडणं व्हायची. म्हणजे भडाभडा बोलायची तीच, तो तसाच शांत, अबोल.
ती त्याला पुन:पुन्हा विचारायची, ‘तुझं माझ्यावर प्रेम आहे ना.?’
पण तो फक्त मान डोलवायचा. तिचं समाधान होईल, तिला बरं वाटेल, खात्री वाटेल असं त्याला कधीच काहीच बोलता आलं नाही.
कॉलेज संपलं. तो पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघून गेला. तीदेखील कुठेतरी नोकरी करू लागली. लग्नाचा विषय मागेच पडला.
फोन-ईमेल्स सुरूच होते. पण त्यातही तीच भरभरून काहीबाही लिहायची, बोलायची. तो तेवढय़ास तेवढंच. ती त्याच्या जगाचा भागच नसल्यासारखीच.
भांडणं होतच होती, नकोसं झालं होतं ते नातं.
पण तोडवतही नव्हतं.
एक दिवस ऑफिसला जाताना तिला जबर अपघात झाला. शुद्धीवर आली तर तोंडातून आवाज फुटेना.
डोळ्यातून पाण्याच्या धारा. पण आवाज मात्र नाही.
तिची वाचाच गेली होती.
तिनं आई-वडिलांना सांगितलं, त्याला काही सांगू नका. त्याला जाऊ देत त्याच्या वाटेनं निघून.
त्यानं तिला बरेच फोन केले. ते वाजायचे, पण हिला फोन उचलून बोलणंच शक्य नव्हतं.
मग तिनं त्याला पत्रच लिहिलं, मला फोन करू नकोस, आपलं नातं तुटलं. संपलं सगळं. वर्षभर उलटून गेलं.
एक दिवस तिला एक पाकीट आलं पोस्टानं.
उघडून पाहिलं तर त्यात आमंत्रण पत्रिका, लग्नाची.
‘त्याचं’च लग्न होतं. तिला ते अपेक्षितच होतं.
काही वेळ गेला आणि तो कुणाशी लग्न करतोय हे पाहायचं म्हणून पत्रिका उघडली तर आत तिचंच नाव लिहिलेलं.
तेवढय़ात दाराची बेल वाजली.
दार उघडलं तर समोर तोच.
खाणाखुणांच्या साईन लॅग्वेंजमध्ये तो तिच्याशी बोलू लागला.
म्हणाला, ‘माहितीये मला सगळं. पण तुझा आवाज गेल्यानं आपलं नातं बदलत नाही.
एकमेकांशी बोलायला, शब्दांची गरज असतेच आणि सतत बोलतच रहायला हवं असं काही नाही. मला काहीच फरक पडत नाही, तुला बोलता येत नाही तरी.
कारण तुझ्याशी माझा संवाद केवळ शब्दांवर अवलंबून कधीच नव्हता.!’
सतत ओरडून सांगितलं जगाला म्हणजेच आपलं प्रेम सिद्ध होतं, खरं असतं असं थोडीच आहे.?
शेअरिंग हे शब्दांवर आणि बोलघेवड्या एक्स्प्रेशनवर अवलंबून नसतं.!
न बोलताही जे करता येतं, ते प्रेम.!


--
source: lokmat/oxygen