Monday, July 23, 2018

बॅड पॅच - एक संघर्ष...

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

पैशांची बिकट वाट लागते... नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण
कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी, कलाकार, राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही. मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा रिऍक्ट कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान सहन करत रहायचं का ते स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो. शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!

तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
              
मी गरीब आहे. पैसा नाही, हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे, त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे. पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते...
              
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
             
संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका...
               
स्वतःच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा!

Thursday, July 19, 2018

२४ एकादशींची नावे

आषाढी एकादशी तोंडावर आली आहे. वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

आणि म्हणूनच आज एक वेगळी माहिती आपणां समोर ठेवत आहे.

ख्रिस्ती कालगणने प्रमाणेच हिंदू कालगणनेमध्येसुद्धा एका वर्षामध्ये बारा महिने असतात. तर दर तीन वर्षांतून एकदा अधिक महिना येतो.

या प्रत्येक महिन्यात तीस तिथी असून पंधरा तिथींचा एक पंधरवडा असे दोन पंधरवडे असतात. पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. तर दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष अशी संज्ञा आहे.

प्रतिपदा ते पौर्णिमा अशी शुक्ल पक्षाची रचना असते तर प्रतिपदा ते अमावस्या अशी कृष्ण पक्षाची रचना असते.

एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पक्षांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात, तर संपूर्ण वर्षभरामध्ये २४ एकादश्या येतात. अधिक महिना असल्यास त्याच्या दोन एकादशींचा यात भर पडतो. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र असे नामकरण केलेले आहे.

हि नावे महिन्यानुसार पुढे दिली आहेत.

    चैत्र - कामदा, वरूथिनी
    वैशाख - मोहिनी, अपरा
    ज्येष्ठ - निर्जला, योगिनी
    आषाढ - शयनी, कामिका
    श्रावण - पुत्रदा, अजा
    भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा
    आश्विन - पाशांकुशा, रमा
    कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती
    मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला
    पौष - पुत्रदा, षट्‌तिला
    माघ - जया, विजया
    फाल्गुन - आमलकी, पापमोचनी

अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो.

नित्ययज्ञ

नेहेमीप्रमाणे धावपळ करत मंदार वर्गात पोचला. मिलिंद फडके सरांचा ड्रॉईंग चा तास सुरु झाला होता. त्यांच्या सारख्या दिग्गज चित्रकाराचे मार्गदर्शन मिळवणारी त्याची बॅच लकी होती. मंदार धापा टाकत मागच्या बाकावर बसला.

फडके सर सांगत होते - “जिम कॉलिनस्" ने सांगितलेली ही शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची ही घटना आहे. दोन ब्रिटीश गट उत्तर ध्रुवावर जाण्यास निघाले. शर्यतच होती दोन्ही गटांमध्ये, कोण आधी पोहोचतो ते ! पहिला गट उत्तर ध्रुवावर पोहोचला, आणि ३० दिवसात सर्वजण सुखरूप परत आले. दुसरा गट उत्तर ध्रुवा पर्यंत पोचला तर नाहीच पण दुर्दैवाने त्या गटातील सर्वजण मृत्यू पावले.

“या घटने मागचे कारण शोधतांना असे लक्षात आले – पहिल्या गटाने ठरवले होते रोज २० मैल अंतर कापायचे. थंडी असो, वारा असो, वादळ असो. काहीही असो, रोजचे ठरलेले ध्येय गाठायचे.

दुसरा गट मात्र जमेल तेंव्हा - जमेल तितके अंतर कापत होता. या गटातील एकाची दैनंदिनी मिळाली, त्यात लिहिले होते – आज पुन्हा वादळी वाऱ्यामुळे हलता आले नाही, आम्ही दोन दिवस एकाच जागी थांबून आहोत. आणि त्याच दिवसाची नोंद पहिल्या गटाने केली होती – आजही वादळ होते, त्यामुळे आजचे २० मैल कापायला जास्त कष्ट पडले.” गोष्ट संपली तसे फडके सर वर्गाला म्हणाले, ”या गोष्टीवरून वरून काय कळते?”

कोणी सांगितले – “ध्येयाच्या दिशेने एक पाउल जरी टाकले तरी ती प्रगती आहे.”

कोणी सांगितले – “यश मिळणार की अपयश, हे रोजच्या सवयींवर ठरते.”

आणखी कोणी आणखीन काही सांगितले.

शेवटी, फडके सर म्हणाले, “तुम्हाला त्या घटने मागाची कारणे नीटच कळली आहेत! आता पुढचा प्रश्न: तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”

इतका वेळ हिरहिरीने उत्तरे देणारा वर्ग, या प्रश्नाने अंतर्मुख झाला. मंदार विचार करत होता, खरंच आपण रोज ठरलेलं असं काय करतो? सरांनी सांगितलेली Sketching ची practice दुसऱ्या गटासारखी करतो. जमेल त्या दिवशी, जमेल तेंव्हा आणि जमलं तर. मग मंदार ने सरांनाच विचारले – “फडके सर, तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”

“रोज सकाळी ५ स्केचेस् काढल्याशिवाय मी सकाळचा चहा पीत नाही!”

पांढरी शुभ्र दाढी आणि hearing aid मिरवणारे सर अजूनही रोज सराव करतात? आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही रोज सराव करतात! सरांच्या उत्तराने वर्गात शांतता पसरली. तसे सर म्हणाले, “यालाच आजकाल Daily Ritual म्हणतात. रोजचा अभ्यास, रोजचा रियाझ, रोजचे sketching, रोजची practice, रोजची exercise झालीच पाहिजे!”

ज्ञानेश्वर यालाच "नित्ययज्ञ" म्हणतात! जो नित्ययज्ञ करायला चुकला, तो सुखाला मुकला! त्याचे यशापयश, सुख-दु:ख परतंत्राने चालते.

हा लोकू कर्मे बांधिला | तो परतंत्रा भूतला | तो नित्ययज्ञाते चुकला | म्हणोनिया || ३.८४ ||

(ज्ञानेश्वरी)
~~~~~

Wednesday, July 18, 2018

मनाचा आवाज

❄❄❄❄🌼❄❄❄❄
              
   दोन मित्र खूप वर्षानंतर भेटले. आलिशान गाडीतून उतरलेला श्रीमंत मित्र त्याच्या रस्त्यात भेटलेल्या गरीब मित्राला घेऊन पार्कमध्ये गेला. गाडी तिथेच बाहेर पार्क केली. दोघंही पार्कमधल्या बाकड्यावर बसून गप्पा मारत होते. थोड्या वेळानं त्यांना भेळ खायची इच्छा झाली. शाळेतल्या आठवणी जागवत ते ते भेळ खात खात चालू लागले. गप्पा सुरूच होत्या.

    श्रीमंत मित्र म्हणाला, तुझ्या-माझ्यात तर फारच फरक पडला रे आणि खूप अंतरसुद्धा.... आपण दोघंही खरंतर एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो. पण, बघ, मी कुठे पोहचलो आणि तू कुठे राहून गेलास. चालता चालता तो गरीब मित्र अचानक थांबला. त्या श्रीमंत मित्रानं विचारलं काय झालं रे... का थांबलास अचानक..??? तो गरीब मित्र म्हणाला, 'तुला काही आवाज आला का रे...????'

    श्रीमंत मित्रानं पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे पडलेलं पाच रुपयांचं नाणं उचलून तो म्हणाला,'अरे, हे नाणं तर माझ्या खिशातून पडलं होतं. त्याचाच हा आवाज होता.' हे ऐकत ऐकतच गरीब मित्र तिथल्याच एका रोपट्याजवळ गेला. त्या रोपट्याला काटे होते. त्यामध्ये एक फुलपाखरू पंख फडफड करत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. नाजूकपणे त्या फुलपाखराला बाहेर काढत त्या गरीब मित्रानं त्याला आकाशात मुक्तपणे सोडून दिलं.

    श्रीमंत मित्रानं अधीरतेने विचारलं की, तुला त्या फुलपाखराचा आवाज कसा काय ऐकू आला रे..?? त्यावर तो गरीब मित्र अत्यंत नम्रतेने म्हणाला, तुझ्यात आणि माझ्यात हाच तर फरक आहे. 'तुला धनाचा आवाज आला आणी मला मनाचा'.

❄❄❄❄🌼❄❄❄❄

"क्षमा".......!!!

पुण्याच्या आसपासचं गाव.... कुटुंब ठिकठाक ... एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..... साहजीकच सुनेवर सर्व भार .... आधी किरकोळ कुरबुर.... मग बाचाबाची.... त्यानंतर कडाक्याची भांडणं.... सुनेचं म्हणणं.... घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..... काम करुन हातभार लावा संसाराला ..... पण बाबा थकलेले..... शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं..... मुलानेही अडवलं नाही.....

आले पुण्यात....कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना.... भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही....

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो.....

पण ....या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.....!

आता बाबा अट्टल भिकारी झाले.....

झाले कि त्यांना केलं गेलं..... ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली....

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो.... वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं.... वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते.... कुणाचाच आधार नसतो म्हणुन.... तसंच हे म्हातारपण ..... झुकलेलं आणि वाकलेलं.... निष्प्राण वेलीसारखं.... !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही...!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं....नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच.... तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले....

असं बोलुन ते हसायला लागतात....

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं.....

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही... पण हे हसु खोटं आहे तुमचं... तर म्हणायचे... आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं.... हसण्याचं नाटकच केलं ... आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु....???

मी निरुत्तर.... !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय... कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं.... टोपलीत ठेवतं.... वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली.... नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय... सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा....?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो....

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती.... बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं...किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील.... श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील...

नाटक असतं हो सगळं आयुष्यच .... प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.... !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच.... बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली.... शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता... भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.... !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले.... मला जरा बाजुला घेवुन गेले.... म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर .....

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो.... तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते.... पाया पडुन माफी मागायला तयार आहे... बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली.... आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली....?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या...

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु..... !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना.... चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात..... माफ करतो तोच "बाप" असतो.....

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो..... त्यातुन तो किती शिकला माहिती नाही.... बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर...असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी "क्षमा" म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ....

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला *"क्षमा"* करणार नाही.....

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर ...

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत....

डाॕ. अभिजीत सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स
9822267357
abhisoham17@gmail.com
www.sohamtrust.com

Tuesday, July 17, 2018

सुखी आयुष्यातील पाच सूत्रे

मी असा आहे... याचा मला अभिमान आहे... असाच राहिलही... आणि आपण...

पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हण्टल्याबरोबर पळुन जातील!

१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा

- आज दुकानात नौकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”,
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!”
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!”

बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, “ओह! हे असं आहे का?, अरे! हे असं पण असतं का? ओके!” आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात. समजा, एखाद्या दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार, एक उपाय आहे, डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा, आणि वेदनांची तीव्रता कमी होईल,

गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार परेशान करतात, वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!

२) भुतकाळात घुटमळणे बंद करा

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!”
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्ह्णाली!”
अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे!

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीत्यीये!
इत्यादी इत्यादी..

ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, आंबा रसाळ, चवदार म्हणुन चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?

कोणतं फळ चवदार आहे, कुणात औषधी गुणधर्म आहेत, कोणी पाणीदार आहेत, कोणी कोरडी. ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!, कोणी शार्प बिजनेस्मन आहे, कोणी प्रचंड मेहनती आहे, कोणी कलाकार आहे, कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, कोणी शिस्तप्रिय, कोणी यशासाठी भुकेला आहे, कोणी प्रेमासाठी आतुर!

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!
तुम्हाला माहीत्येय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा

आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला दोन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या दोनच गोष्टी सापडतील,

अ) अपुर्ण स्वप्ने,
ब) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो,

आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!

५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते

बघा! किती मजेशीर आहे हे,
- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याचा उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.

आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय मानलं गेलयं.

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अट्रेक्शन! मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या, सगळ्या मित्रमैत्रीणींचं आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, ह्या प्रार्थनेसह धन्यवाद आणि शुभेच्छा!

सौजन्य: 'आपलं मानसशास्त्र' ग्रुप