*🌹पिशवीभर आनंद!*🌹
शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका माॅलमध्ये एक प्रौढ दांपत्य खरेदीला आले होते.
खरं तर आता दोघेच असतात घरी,
फारशा वस्तू लागत नाहीत पण थोडा वेळ जाईल, कंटाळवाण्या रूटिनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता.
शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे.
सवयीने एक ट्राॅली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली.
त्याचवेळी, त्यांचे लक्ष आजूबाजूच्या खरेदीकरता आलेल्या लोकांवर होते.
त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दांपत्याने.
ते दोघे खरेदीत मश्गुल झाले होते.
आवडलेली एखादी वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत, माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही हे ठरवत होते.
एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असे जाणवले की किंचीत नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते.
ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपले आणि आपसात एकमेकाकडे बघून हसले ज्येष्ठ दांपत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले.
एकेक रूपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावे लागायचे असे ते दिवस होते.
काय वाटले कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान नवरा बायकोकडे चालत गेले.
"नमस्कार, आपण ओळखत नाही एकमेकांना. माझ्याकडे या माॅलचे दोन हजार रुपयांचे एक फ्री कुपन आहे.
त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे, आम्हाला काही खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कुपन दिले तर चालेल का? "
समोरून सहाजिकच प्रश्न आला,
"त्या बदल्यात आम्हाला किती पैसे भरावे लागतील?"
"दोन हजारापर्यंत काहीच नाही,
त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील.
"ज्येष्ठ जोडप्यातल्या नव-याने शंका समाधान केले.
तरूण दांपत्याला आश्चर्य वाटले. त्यातली बायको म्हणाली ,"
आम्हालाच का देताय हे तुमचे कुपन? "
"मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार..
कारण मगासपासून आम्ही तुम्हाला बघतोय, आमचे सुरूवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे!
हे पहा, तुम्हाला फसवायचा, त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला.
या बदल्यात तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईसक्रीम शाॅप आहे तिथे भेटू, चालेल?"
ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला.
तरूण जोडप्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते कुपन घेऊन ते खरेदीकरता वळले ज्येष्ठ जोडपे कॅश काऊंटरच्या दिशेने निघाले.
तरूण जोडप्याची चर्चा सुरू झाली, काय घ्यावे?
त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडलीच होती.
ती दोन हजारात नसती आली, मग कपडे वाळत टाकायचा स्टँड तो ही महाग होता.
बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, "सरळ वाण सामान घेऊन जाऊ.."
त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, "तेवढं आपण दोघे आरामात कमावतो, आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही."
नव-याला लगेच पटली ही कल्पना.
दोघांनी पटपट यादी करायला सुरूवात केली.
मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचे लेखन साहित्य, चाॅकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन, डाव, मसाले असे बरेच काही घेताना ते सतत बेरजा करत होते.
दोघांना मजा आली खरेदी करताना.
कॅश काऊंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आले एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूनी भरून गेली होती.
दोघं आनंदी चेह-याने बाहेर आले.
समोर ते दांपत्य होतेच.
चौघे आईसक्रीम शाॅपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईसक्रीम खाताखाता ज्येष्ठ दांपत्यातला नवरा म्हणाला," पोरांनो, ऐकाल माझे?"
दोघे कान टवकारून ऐकू लागले.
"आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला.
जर महाग गोष्ट घेतली असतीत तर एकच आली असती, पण बघा आज तुमच्या पिशवीत लहानलहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत..
आणि *जन्मभराच्या आठवणीदेखील. आपले आयुष्य असंच आहे एक महागाची मोठी गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे*?
*मोठी ध्येय असावीत पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निसटू देऊ नका*..
साॅरी बरं का, एकदम प्रवचनच दिले मी तुम्हाला" असे म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघालेदेखील.
तरूण जोडप्याला "धन्यवाद" म्हणायचा वेळही न देता.
ते दोघे भानावर आले तेव्हा त्यांना जाणवले ," अरे ते दोघे उतरले बघ.."
बायको म्हणाली पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते.." उतरले ग ते ! साध थँक्यू पण म्हटले नाही आपण..." नवरा म्हणाला.
"आपली परिस्थिती सुधारली ना की *असाच पिशवीभर आनंद देऊ कोणा अपरिचिताला*..आपोआप थँक्यू पोचतील त्यांना, काळजी नको करू." बायकोने नव-याला आश्वस्त केले.
त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण.
तो 'पिशवीभर आनंद' घेऊन आपल्या घराकडे ते आनंदाने निघाले..
✍️अनघा किल्लेदार
पुणे.