Friday, February 12, 2021

झोप . !.....

*झोप . !.....*
 
*अतिशय गरजेची वाचा*

शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते..

काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप!

झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच जरुरी आहे. आपल्या मेंदूत एक घडय़ाळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घडय़ाळ वसलेले असते ‘सुप्राकयाझमॅटिक नुक्लियस’ नावाच्या मेंदूच्या छोटय़ाशा भागात. सुप्रा म्हणजे वर आणि कयाझमा म्हणजे क्रॉसिंग. हा भाग डोळ्यातून संवेदना घेऊन येणाऱ्या दोन नसांच्या क्रॉसिंगच्या वर असल्यामुळे डोळ्यांतून आलेल्या प्रकाश संवेदना त्याला लगेच कळतात. संध्याकाळ झाली की हे घडय़ाळ मेलॅटोनीन नावाचा एक दूत मेंदूकडे पाठवते. तो इशारा देतो की, ‘अंधार होतोय, झोपेची वेळ झाली’.

प्रत्यक्ष झोप अडिनोसिन नावाचे रसायन आणते. जशी याची मात्रा वाढते मेंदूत एक प्रकारचा झोपेचा दबाव निर्माण होतो आणि झोप लागते. दिवस उजाडल्यावर प्रकाशाची संवेदना डोळ्यांतून मेंदूकडे जाते. मेलॅटोनिनचे स्रवणे बंद होते. मेंदूला उठण्याचा इशारा मिळतो. मेंदूतील घडय़ाळ आणि झोपेसाठीचा दबाव हे झोप लागण्यासाठीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. झोपेला घालवण्यासाठी लोक कॉफी पितात. कॉफीत कॅफिन असते. अडिनोसिन मेंदूच्या पेशींच्या ज्या खाचांमध्ये स्वत:ला फिट करून झोपेचा दबाव निर्माण करते त्या जागा कॅफिन चक्क  अनधिकृतरित्या बळकावते. त्यामुळे अडिनोसिनने निर्मिलेला झोपेचा दबाव मेंदूला समजत नाही. आपण जागेच राहतो.

आपण झोपतो तेव्हा आपले सारे स्नायू शिथिल होतात. जलचर प्राणी असा झोपला तर त्याला जलसमाधीच मिळायची. एका वेळेस त्यांचा अर्धाच मेंदू झोपतो, बाकी अर्धा शरीराच्या गतिविधी सांभाळतो. पक्षांमध्येही सुरक्षेसाठी हे घडते. पक्षांच्या मेंदूचा जो अर्धा भाग जागा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा डोळाही उघडा असतो. म्हणजे पक्षाचा अर्धा मेंदू संकटावर चक्क ‘डोळा’ ठेवून असतो. आपले पूर्वज दोन भागांत झोपायचे. रात्रीची लांब आणि दुपारची छोटी झोप(nap) आजकाल दुपारची झोप दुर्मिळ झाली. तरीही दर दुपारी आपला जेनेटिक कोड आपल्याला या झोपेशी जोडू पाहतो. जेवणानंतर नवीन गोष्ट लक्षपूर्वक ग्रहण करायची आपली शक्ती कमी होते. जेवणानंतरच्या मीटिंगमध्ये, वर्गांत लोक पेंगतात. ग्रीसमध्ये पूर्वी दुपारी १ ते ४ सारी दुकाने बंद असायची आणि तेव्हा त्या भागातले लोक दीर्घायुषी होते म्हणे. पुण्यातल्या लोकांचे दुपारचे बंद दुकान आणि त्यांची झोप हा चेष्टेचा विषय अनेक वर्षांपासून होता, पण शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच होते.

झोपल्यावर आपला मेंदू जास्त क्रियाशील असतो. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेंदूला तयार करायला आणि शिकल्यानंतर ती गोष्ट पक्की लक्षात ठेवायला शांत झोप अत्यावश्यक आहे. दिवसभरात मिळालेली माहिती मेंदूत हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. याची साठवण क्षमता यूएसबी ड्राइव्हसारखी छोटी असते. त्यात जर माहिती जातच राहिली तर नवीन गोष्टी साठवल्याच जाणार नाहीत. इथे झोप आपली अहं भूमिका पार पाडते. गाढ झोपेत मेंदूतल्या विद्युत लहरी कुरिअर सव्‍‌र्हिससारखे काम करतात. हिप्पोकॅम्पसमधल्या मेमरी फाइल्स मुबलक जागा असलेल्या कॉर्टेक्समध्ये पाठवल्या जातात. मगच त्या गोष्टी आपल्या आठवणीत पक्क्या बसतात. आपली एखादी मेमरी फाइल विस्मृतीच्या कप्प्यात गेली असेल, तर आठ तासांच्या शांत झोपेत मेंदू या फाइल्स शोधून परत आणू शकतो. शांत झोपेतून उठल्यावरचा अनुभव सांगतो, ‘‘अरे, काल मला जे आठवत नव्हतं ना ते आत्ता आठवलं पहा!’’ ही आहे झोपेची करामत.

झोप काय देते यापेक्षा ती घेतली नाही तर ती काय घेऊन जाते हे पाहणे जास्त डोळे उघडणारे ठरू शकते. अपुऱ्या झोपेचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या एकाग्रतेवर होतो. तिचा पायाच डळमळतो. अशा व्यक्तीने ड्रायव्हींग केलं तर झोपेच्या दबावामुळे ती व्यक्ती मायक्रोस्लीपमध्ये जाऊ शकते. या स्थितीत काही क्षणासाठी मेंदूच्या सगळ्या संवेदना जातात. अ‍ॅक्सिलरेटर दाबायचा की ब्रेक, व्हील कुणीकडे फिरवायचं याची निर्णयक्षमता ४५ सेकंदासाठी पूर्णपणे जाते. भयानक अपघात घडतात. दारू आणि अपुरी झोप याचं एकत्र येणं तर आणखीनच भयावह. वर्तमानपत्रात रोज दिसणारे अपघातांचे फोटो पाहिल्यावर आणि ड्रायव्हरचा ताबा सुटला हे वाक्य वाचल्यावर अपुरी झोप आपल्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकते हे पुरेपूर पटतं.

अपुरी झोप आपले भावनांवरचे नियमनही घालवते. छोटय़ाशा कारणाने आपण राग, भीती, नैराश्य अशा आदिम भावनांकडे जातो. झोपेपासून वंचित असणाऱ्या माणसाच्या मेंदूत राग, भीती या भावनांच्या पायडलवर विवेकी विचारांचा ब्रेक राहत नाही, कारण मेंदूतल्या जोडण्या विस्कळीत झालेल्या असतात. कित्येक लोक आठवडय़ातले पाच दिवस चार ते पाच तासही झोपत नाहीत. आणि म्हणतात, आम्ही शनिवार, रविवारी ही उरलेली झोप भरून काढतो. पण झोपेचं बँकेसारखं नसतं. कर्ज जमा करायचं आणि मग ते भरत जायचं. दिवसभरात गोळा केलेली माहिती आठवणींच्या कप्प्यात पक्की होण्यासाठी त्या दिवशीची झोप त्याच दिवशी घ्यावी लागते. झोपेच्या योग्य काळ वेळेचे महत्त्व न समजल्यामुळे अपुरी झोप जीवन पद्धत बनली आहे. हीच आपल्याला स्मृतिभ्रंशाकडेही नेते आहे. आठ तासांच्या शांत झोपेत मेंदूत स्वच्छता मोहीम राबवली जाते. दिवसभरात तयार झालेली अमिलॉइडसारखी विषारी प्रथिने एका सिस्टीमद्वारे मेंदूतून दूर केली जातात. ही घातक प्रथिने जर नियमित झोपेद्वारे दूर केली गेली नाहीत तर त्याचे छोटे छोटे गोळे मेंदूच्या विविध भागांत साचतात. अल्झायमर होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

संकटाच्या क्षणी म्हणजे जेव्हा लढा अथवा पळा अशा परिस्थितीशी आपण सामना करतो तेव्हा ‘सिम्पाथेटीक नव्‍‌र्हस सिस्टीम’ उत्तेजित होते. मग हृदय जोरात पळू लागतं, जास्त रक्त जास्त जोराने शरीरात पंप होतं, रक्तदाब वाढतो. या चेतासंस्थेला परत शांत करण्याच्या कामात रोज रात्रीची शांत झोप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर ही शांत झोप ५ ते ६ तासांपेक्षा कमी मिळाली तर ही चेतासंस्था उत्तेजित स्थितीतच राहते. हे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते. शरीराला वाटत राहतं की आपण स्ट्रेसमधून जातो आहोत. मग कॉर्टीसाॅल नावाचे द्रव्य पण हिरिरीने पुढे येते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की हृदयाची गती व रक्तदाब वाढलेलाच राहतो. ही स्ट्रेस हार्मोन्स रक्त  वाहिन्यांनाही हानी पोहोचवतात. साहजिकच हृदयविकार, उच्च रक्तदाब, अर्धागवायू होण्याचा धोका कैकपटीने वाढतो.

जेव्हा शांत झोप कमी होते तेव्हा वजन वाढीस लागतं. विशेषत: पोटाचा घेर. आपली भूक नियंत्रित करणारी दोन हार्मोन्स असतात. लेप्टीन, जे पोट भरल्याचे संकेत देतं. दुसरं घ्रेलिन, जे भूक लागली हे सांगतं. अपुऱ्या झोपेमुळे लेप्टीन कमी होतं आणि घ्रेलिन वाढतं. पोट भरलेलं लेप्टीन सांगत नाही आणि घ्रेलिन सांगत राहतं की, भूक शमलेली नाही. त्यामुळे कमी झोपणाऱ्या माणसाला जेवायचं समाधान मिळतच नाही. जणू अपुऱ्या झोपेचा गुन्हा करणाऱ्याला डबल शिक्षा. जे कमी झोपतात ते दुसऱ्या दिवशी उत्साही नसतात म्हणून ते व्यायाम करत नाहीत आणि खाण्यासाठी जास्त गोड पदार्थ निवडतात. सध्या दिसत असलेल्या लठ्ठपणाचे इतर कारणांसोबतच अपुरी शांत झोप हे पण एक महत्त्वाचे कारण ठरते.

आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते. इन्सुलिन नावाचे हार्मोन लगेच शरीरातल्या पेशींना हाकारून सांगते की, ‘‘तुमच्या झडपा उघडा आणि रक्तातल्या साखरेला आत घ्या. पेशी त्याप्रमाणे ऐकतात आणि रक्तातली साखर प्रमाणात राहाते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातल्या पेशी इन्सुलिनच्या हाकेला ओ देणं कमी करतात. मग त्यांच्या झडपा उघडत नाहीत आणि रक्तातली साखर वाढलेली राहते. म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे येणारा लठ्ठपणा, कमी व्यायाम, जास्त गोड खायची इच्छा, शरीरातल्या पेशींनी इन्सुलिनचे न ऐकणे हे सारे काही आपल्याला रेड कारपेट अंथरून टाईप २ डायबेटिजपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

कुठलाही जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाला की त्याच्याशी लढायला शरीरात एक लढाऊ फौज ‘इम्युन सिस्टीम’ असते. साधारण सात तासांची शांत झोप या सैन्याला अधिक शक्तिशाली बनवते आणि नवीन कुमक तयार करते. कोरोना असो की स्वाइन फ्लू या साथींच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये एक असते ‘पुरेशी झोप घ्या’. कुठल्याही आजाराशी लढायला ‘अंदरसे स्ट्राँग’ बनण्यासाठी ही सूचना फार महत्त्वाची आहे. या फौजेत एक बटालियन असते किलर सेलची. ही कर्करोगाच्या पेशी नामोहरम करून टाकते. हे किलर सेल सतत सज्ज ठेवायला आपल्याला पुरेशी झोप घ्यायलाच पाहिजे.

सध्या घराघरात दिसणाऱ्या अनेक आजारांच्या मुळाशी अपुरी झोप ही महत्त्वाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव नाही. कारण आपण तिला महत्त्वच देत नाही. आपल्या जगण्याच्या रेटय़ात, रंगीबेरंगी स्क्रीन्सच्या वेडाच्या भरात आपण "झोप" या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करतो आहोत.

 आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या कुठल्याही कामात यश हवे असेल तर एकाग्रता हवी. ती साधण्यासाठी जीवन मोजके असावे. 
म्हणजे मोजकेच शब्द बोलावे, नियमित पावलांनीं चालावे आणि महत्त्वाचे म्हणजे कोणा एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. यात जणू आर्जव आहे. झोप आली असता तिचा मान राखा. तिला महत्त्व द्या. आज एकविसाव्या शतकातले विज्ञानही पुन्हा हेच सांगते आहे.

मॅथ्यूवॉकर ह्या न्यूरोसायण्टिस्टचे असे मत आहे की, ‘आता अशी वेळ आलेली आहे की इतर आजारांसाठी औषधोपचार लिहिताना डॉक्टरांनी झोपेचे पण प्रिस्क्रिप्शन द्यावे. अर्थात ते झोपेच्या गोळ्यांच्या प्रकारात नसावे.’

आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या झोपेच्या गोळ्या झोप लवकर आणतात, परंतु ही झोप नैसर्गिक झोपेसारखी नसते. आपली स्मृती, एकाग्रता, कलात्मकता वाढवणारे जे नैसर्गिक झोपेचे फायदे आहेत तेही झोप पूर्णत: देऊ शकत नाही. चांगली झोप येण्यासाठी आपण खालील गोष्टी नक्कीच करू शकतो-

* झोपेच्या वेळेत फारसा बदल करू नका. कधी उठायचे यासाठी गजर लावण्याऐवजी कधी झोपायला जायचं यासाठी लावा आणि ती वेळ पाळा.

* नियमित व्यायाम करा, पण झोपेच्या आधी दोन-तीन तास नको.

* कॉफी, चहा, चॉकलेट दुपारनंतर नको.

* दारू आणि तत्सम पदार्थ टाळा.

* रात्री उशिरा खूप जड जेवण घेऊ नका.

* झोपायची खोली शांत, पुरेशी थंड आणि अंधारी असावी. बिछाना आणि उशी आरामदायी असावी. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तिथे नसावे.

* झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा.

* खोलीतल्या घडय़ाळ्याचे तोंड तुमच्याकडे नसावे. झोप आली नाही तर आपण सारखे त्याकडे पाहतो आणि मग अरे बापरे इतके वाजले अजून आपल्याला झोप येत नाही, या ताणाने येणारी झोप येत नाही.

* दिवसाचा प्रकाश ही झोपेचे नियमन करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. रोज अर्धा तास तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरा.

* रात्री आठनंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवा. सगळे स्क्रीन्स नाईट मोडवर ठेवा. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप कोणतीही स्क्रीन नको.

* बिछान्यावर पडल्यावर झोप आली नाही तर तिची वाट पाहात पडून राहू नका, अशा वेळी मोठा दिवा लावून काही वाचूही नका. ताण घालवण्यासाठी मंद संगीत ऐकणे सगळ्यात चांगले.

या वर्षीच्या जागतिक झोप दिनाचे (१३ मार्च) ब्रीदवाक्य होते, ‘बेटर स्लीप, बेटर लाइफ, बेटर प्लॅनेट.’ जे कायमस्वरूपी आपल्याला लागू आहे.   अधिक चांगले जग हवे असेल तर सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी.

गेल्या आठ दिवसांतली आपल्या झोपेची पाने जरा चाळून बघा. कशी होती माझी झोप? एकदा का त्यातल्या कमतरता उमजल्या, समजल्या, आपण त्या स्वीकारल्या तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतील. हो अगदी आजपासूनच.

आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी शुभेच्छा !

🍁🍁🍁🍁🍁🍁

- डॉ प्रकाश ढोकणे नवी मुंबई

Monday, February 8, 2021

उसना उजेड

🌴🍁🌴🍁🌴🌻🌴🍁🌴🍁🌴
              
                  *🌹उसना उजेड 🌹*

      एकदा असे घडले की, एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता... गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद्गृहस्थाला कळलेही नाही... मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदील दिला... आणि तो मित्राला म्हणाला, "बाहेर खूप अंधार पडला आहे... त्यामुळे तू हा कंदील घेऊन जा"...
     यावर तो आंधळा मित्र  म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे... मला अंधार आणि उजेड सारखेच... मला या कंदिलाचा काय उपयोग"…? "हा कंदील तुझ्यासाठी नाहीच... तो डोळस माणसासाठी आहे... या उजेडामुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही, असे "तो सद्गृहस्थ म्हणाला... हे मात्र त्याच्या आंधळ्या मित्राला पटलं... तो कंदील घेऊन चालू लागला...
     मात्र थोड्याच वेळात एक माणूस त्याच्या अंगावर आदळला... संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला... "अरे, अरे, काय चाललंय तुझं?... माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का"?... त्यावर जास्तच आश्चर्यानं तो वाटसरू म्हणाला", अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय... हे तुझ्या लक्षात नाही का आलं"?...
     हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला, "नाही लक्षात आलं, पण मला आज एक गोष्ट मात्र कळली... "उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही"...
    म्हणून "अत् दिप भव", म्हणजेच "स्वयं-प्रकाशित व्हा"...

प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता

#प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता 

एक साधारण पंचाहत्तर ऐंशी वर्षे वयाचे आजोबा पहाटेचा गजर ऐकून उठतात. एकटेच राहत असतात. घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवलेलं जडच्या जड डंबेल दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करतात, पण छे! अवघड असतं त्यांच्यासाठी ते. 

दुसऱ्या दिवशी पण अगदी हाच कार्यक्रम! रोज त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. एके सकाळी कसंतरी ते डंबेल आजोबा दोन्ही हातांनी ओढत घराबाहेरील बागेत घेऊन येतात. एवढं केल्यानेही ते थकून तिथेच बसतात. 

मग दुसऱ्या दिवशीपासून रोजच पहाटे बागेतच ते उचलायचा प्रयत्न! आजुबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होतो हा! बाजूलाच राहणारी म्हातारी खोचकपणे बघत असते. 

रोज लोक त्यांना बघत असतात. कोणी हसतं, कोणाला त्यांची काळजी वाटते तर कोणाला अजुन काही. पण आजोबा सगळ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करून स्वतःचे लक्ष्य हळुहळू साध्य करत असतात!

आजोबांच्या अविरत डंबेल उचलायचा प्रकार पाहून एक दिवस शेजारची म्हातारी काळजीपोटी त्यांच्या मुलीला कळवते. मुलगी लगेचच येऊन बघते. तिला कळतच नाही की या वयात आपले वडील असं का वागत आहेत. ती वडीलांना समजवायचा प्रयत्न करते. पण ते काही मागे हटायला तयार नसतात! त्यांचे प्रयत्न ते सोडत नाहीत कारण इतके दिवस जे डंबेल त्यांना उचलता पण येत नव्हतं ते आता त्यांना त्यांच्या छातीपर्यंत बऱ्यापैकी उचलता यायला लागतं. 

असं करता करता एक दिवस आजोबा ते डंबेल दोन्ही हातांनी व्यवस्थित त्यांच्या डोक्याच्या वर उचलून धरतात! काय खुश होतात म्हणून सांगू! अगदी लहान मुलांसारखी ऊडी मारून आनंद व्यक्त करतात! हे पाहुन आजुबाजूच्या शेजारांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो! तेच शेजारी जे इतके दिवस आजोबांकडे विचित्र नजरेने पाहत असतात. खोचक म्हातारी पण आनंदी दिसते. 

मग तो दिवस उजाडतो! आजोबा मुलीच्या घरी नाताळसाठी जातात. सात आठ वर्षांच्या नातीसाठी छानशी भेटवस्तु नेतात. आजोबांना बघुन नात खुश होऊन त्यांच्याजवळ जाते. म्हातारे आजोबा नातीला पटकन उचलुन घेऊन, नाताळसाठी सजवलेल्या उंच झाडाजवळ नेतात आणि नातीला सफाईदारपणे स्वतःच्या डोक्याच्या वर उंच उचलुन धरतात आणि त्यांची नात त्या झाडाच्या टोकावर सुंदरशी चांदणी लावते! आजोबांच्या डोळ्यांत अश्रूंच्या चांदण्या चमकतात!

ते पाहुन आजोबांच्या लेकीला इतके दिवस पडलेल्या कोड्याची उकल होते की आपले म्हातारे वडील इतके दिवस इतकं जड डंबेल कशासाठी उचलत होते ते आणि तिच्याही डोळ्यांत अश्रु येतात!

प्रयन्तांती परमेश्वर म्हणतात ते काही खोटं नाहीये, हो ना!

(वरील वर्णन एका जर्मन भाषेतल्या सुंदर जाहिरातीचं आहे!)

#माझी_जर्मनी_डायरी

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

म्हातारपण काय आहे?

.      _*म्हातारपण काय आहे? समर्थानी*_ 
                   _*केलेले सुंदर वर्णन,*_

_समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._

म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.

_*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_

म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.

म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.
त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.

तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._

कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.

याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.

तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.
मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.

मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.

निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.

           _कारण माऊलीने म्हणल्या प्रमाणे_
    _खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"_ 
                   असं म्हणलं आहे.

विचार करा माऊली म्हणतात की माझ्या प्रार्थनेनं जगातलं दुःख कमी होऊ देत हे खरं मागणं आहे. आणि म्हातारा जर साधनी असेल तर जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.

ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.

                     एक विनम्र चिंतन.

संदर्भ - प. पू. बेलसरे निरुपणे आणि ग्रंथभांडार.

                     ! श्री राम समर्थ !

गुरूंच्या संपर्कात का राहावे !

🟩 गुरूंच्या संपर्कात का राहावे !🟩

एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..

वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे, मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.

गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्या पर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.

थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे;  माझा कोणी मालक नाही;  मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची  नाही.
 वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की. तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.
थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.

कथेतून बोध हाच की,
गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.
वाघ हे आपले अहंकारी मन आहे.
मालक हे गुरू व ईश्वराचे प्रतीक आहे, तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही  अस्तित्वाची लढाई आहे.
कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही, परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवतो....

▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ ▬▬▬▬

Sunday, February 7, 2021

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती

=====
मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे 

1) सतत पॉझीटीव्ह -
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!
उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.
प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.
उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.
आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

2) पॅशन निर्माण करा - 
आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.
पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!
त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!
कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.
त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,
ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!

3) महिन्याला दोन पुस्तके - 
माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.
महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

4) डायरी लिहा - 
दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.
माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.
आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - 
हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं! मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!
‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा - 
तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम - 
मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं! जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - 
तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!
खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.
आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - 
आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा - 
घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.
कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं! कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा -
जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे. आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - 
असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात. यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

13) सुरक्षित अंतर ठेवा - 
जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

14) तीस दिवसांचा प्लान - 
पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.
एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!

।। सर्वे सन्तु निरामयः ।।
=====

सदर लेख सोशल मीडिया वरून कॉपी पेस्ट केला आहे, मूळ लेखकाला सलाम  🙏

Friday, February 5, 2021

काशी येथील अन्नपूर्णा

CP ▶️

 काशी येथील अन्नपूर्णा 

▫️अन्नपूर्णेचे महत्त्व........

🙏🕉️🙏

 अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मी दत्तसंप्रदायात असल्यामुळे जेव्हा श्रीदत्ताला नैवेद्य दाखवला जातो ,त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो. मला हे नेहमी कोडं पडायचे की अन्नपूर्णेला एवढे महत्त्व का दिले जाते.शेवटी मी अन्नपूर्णे संबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे. अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकराला ही मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे.
               जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते .म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ते अन्न सुग्रास असले पाहिजे. अन्न  बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. त्यांनी ते अन्न समाधानानी बनवले असले पाहिजे. तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. तिने शुचिर्भूत होऊन अन्न शिजवले पाहिजे.आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते. तिने अन्नपूर्णेची सेवा , उपासना करून, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते.
               मध्यंतरीच्या काळामध्ये मी मुद्दाम अन्नपूर्णेची उपासना केली आणि मग लक्षात आले की नुसती उपासना उपयोगी नाही .तिची प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. म्हणून मी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि कोणताही पूर्वानुभव नसताना सुद्धा ह्या सर्व पाककृती अतिशय छान सराईतासारख्या केल्या गेल्या.जणू अन्नपूर्णादेवीच माझ्या हातातून काम करत होती.       
               आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात .मी पुष्कळ संन्याशीहि असे पाहिले आहेत की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात. खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात. शरीर आहे तिथे वासना असणारच. त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत. मित्रमंडळ जमा करून चिवड्याचा ढीगच्या ढीग फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल. शेवटी जीवन हे आनंद निर्मिती साठीच आहे .छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरला आहे, परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही.
               अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते .अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहाला असते. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो.म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते .उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत. तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो. असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही. आपले सर्व ऋषी-मुनी हे विवाहित दाखवले आहेत आणि सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षय करूनच ते पूर्णत्वाला पोहोचले आहेत. 
म्हणूनच शंकराचार्य म्हणतात--
अन्नपूर्णे सदापूर्णे |
शंकरप्राण वल्लभे |
ज्ञान वैराग्य सिध्यर्थं |
भिक्षांदैहि च पार्वती ||
ग्रूपमधील सर्व अन्नपूर्णाना  समर्पित ...
            संकलन ▫️
    📚     ग्रंथ दर्शन

पापाचा जनक कोण असतो?

एका राजाने आपल्या दरबारात सभासदांना विचारले कि पापाचा जनक कोण असतो? पण उत्तर मिळाले नाही. राजाने आपल्या राजगुरुंकडे मान वळविली. ते परमज्ञानी होते. पण तत्काळ त्यानाही काही उत्तर सुचले नाही. राजाने त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा काळ दिला. बऱ्याच चिंतन-मननानंतर राजगुरुना उत्तर मिळाले नाही. अशाप्रकारे सहा दिवस गेले. राजगुरू घाबरले त्यांनी भीतीपोटी राजधानी सोडली. चालत चालत एका गावात पोहोचले. तेथे एका घराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसले. ते घर एका गणिकेचे (वैश्येचे) होते. राजगुरुंची हि दमलेली अवस्था पाहून तिने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. राजगुरूने तिला आपली सर्व कथा ऐकवली. गणिका म्हणाली," तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. " हे ऐकताच राजगुरू म्हणाले, "तुझ्या सावलीतही पाप वाटते तेंव्हा तुझ्या घरी कसा येवू?" गणिका म्हणाली, " आपली इच्छा! परंतु ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि दारी आलेल्याला तर दक्षिणा दिल्याशिवाय मी जावू देणार नाही!" असे म्हणून तिने राजगुरुना सोन्याच्या दोन मोहोरा दिल्या. मोहोरा पाहून राजगुरू नरम झाले. तिच्या घरी आले, जेंव्हा तिने पाणी दिले तेंव्हा त्यांनी ते नाकारले पण तिने चार मोहोरा दिल्या तेंव्हा त्यांनी पाणीही पिले आणि अश्याच रीतीने जेवणही केले. तेंव्हा गणीकेने राजगुरुना सुनावले, "पापाचा जनक कोण असतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले का?, तर पापाचा जनक आहे लोभ." राजगुरू निरुत्तर झाले पण त्यांना राजाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 

तात्पर्य- कर्म आणि भाग्य यापेक्षा अधिक मिळवण्याची लालसा (लोभ) सदैव पापकर्म घडवीत असते...