Wednesday, January 30, 2019

‘वय स्वप्नांचे ...१६’ 👫


आज मैथिली काकू भेटल्या आणि फारच काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून नेहाला जरा बाजूला घेऊन गेल्या.. “बघ नेहा गैरसमज नको करून घेऊस पण आपण इतके वर्ष आजूबाजूला रहात आहोत म्हणून मला माझी जबाबदारी वाटली. तुझ्या कानावर घालायला हवं म्हणून बोलते.”
नेहाला जरा टेंशनच आलं की काकूंना नक्की काय सांगायचं आहे.
“बोलाना काकू काही हरकत नाही”
“हे बघ सोसायटीमधे बरेच दिवसांपासून चर्चा आहे की..... कसं सांगू मला कळत नाहीये”
“काकू प्लिज सांगा आता नाहीतर विचार करत बसेन मी उगाच.”...
अग तुझी दिव्या आजकाल रोज संध्याकाळी एका मुलाबरोबर फिरताना दिसते.... येत जात पण बरेचदा तीला फोनवर पाहील आहे. परवा मी स्वतः त्याला तीचा हात धरलेला पाहीला, मग मला राहवलं नाही म्हणून तुझ्या कानावर घालत आहे. तू दिवसभर ऑफीसला असतेस आणि सिद्धार्थ पण... त्या पोरीकडे दुर्लक्ष होतंय बहुतेक... बघ मुलीची जात आहे काही वेडंवाकडं झालं तर काय करणार तू ? बरं काकू मी बघते काय प्रकार आहे. आणि हो थँक यू दिव्याबद्दल इतका विचार केल्याबद्दल. एक विनंती आहे, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत दिव्याविषयी कोणी काही बोलताना दिसलं तर ज्या हक्काने आज माझ्या कानावर हीगोष्ट घातलीत त्या हक्काने त्यांना थांबवा. बाकी दिव्याचं कसं करायचं ते मी विचार करते ”
आपल्या लाडक्या लेकीबद्दल कोणीतरी काहीतरी कुजबुजत आहे हे थोडं त्रासदायक होतं नेहासाठी पण ती एकदम शांत राहीली आणि दिव्या घरी यायची वाट पहात बसली. सिद्धार्थ आज उशीरा येणार हे आधीच सांगीतले होते त्याने पण तरी दिव्या हा त्यांचा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय...
तीने लगोलग सिद्धार्थला फोन केला आणि झालेला किस्सा सांगीतला. ती त्याला म्हणाली, “मी बोलते दिव्याशी आणि मग काय ते ठरवू. कोवळं वय आहे पोरगी भरकटायला नको.”
सिद्धार्थ नेहमीच दिव्यासाठी खूप पझेसिव्ह होता. एकदम राग आला त्याला हे सगळं ऐकून.
रागाच्या भरात तो नेहाला म्हणाला, “त्या मैथिली काकूंना म्हणा वय झालं तुमचं स्वतःच्या घरात बघा. माझा माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे. ह्या सोसायटी वाल्याना सारखं काहीतरी गॉसीप पाहीजे. आता काय मित्र नसतात का ह्या वयात? एवढं चर्चा करण्यासारखं काय आहे?रिकामटेकडे लोकं !
त्यांना बघवत नाही ती इतकी सुंदर आहे,हुशार चांगली आहे.... सिद्धार्थ बोलतच होता..
नेहा मधेच त्याला थांबवत म्हणली, “सुंदर,हुशार चांगल्या मुली प्रेमात पडत नाहीत का ? आणि सोसायटीच म्हणशील तर चांगला शेजार राहावा म्हणूनच तर आपण इथे राहतो ना ?
मग जसे ते आपल्या गरजेच्या वेळी धाऊन येतात तसे थोडंफार कधी हक्कही दाखवणार!
मुख्य म्हणजे काकूंचा स्वर काळजीचा होता.दिव्याला नावं ठेवण्याचा नव्हता.. हे वयच आहे भरकटायचं ! पण आपण नशीबवान आहोत की लोकं आपल्याबद्दल आपसांत न बोलता आपल्याशी बोलायला येतात. मला माहीत आहे की दिव्याबद्दल ऐकून तुला त्रास झालाय,मलाही झाला. पण आपल्याला ह्या बद्दल तिच्याशी बोलायला हवं. लोकं काय भोचक आहेत सगळ्यांविषयी बोलतात म्हणून सोडून देऊन चालणार नाही. मी बोलते तिच्याशी मग बघू.”
नेहमीप्रमाणे सात वाजता क्लास संपवून दिव्या घरात आली. नेहाने तीला रोजप्रमाणे उकडलेली अंडी आणि कॉफी दिली. कॉफीचा कप घेऊन दिव्या तिच्या खोलीत जाणार तेवढ्यात नेहा म्हणाली , “दिव्या बसतेस का इथे? एक गम्मत सांगायची होती”..दिव्या बसली डायनींग टेबल पाशी.
“आज ऑफीसहून येतांना कॅबमधे डोळा लागला आणि इतकं मजेशीर स्वप्न पडलं. तुला एक छानसा मुलगा प्रपोज करत होता. मग तू त्याला म्हणालीस मी तुला उद्या उत्तर देईन आणि मला एकदम खाड्कन जाग आली. माझी जेमतेम सोळावं लागलेली लेक प्रेमात वगैरे म्हणजे मला फारच मजा वाटत होती. किती मोठी झालीस गं तू !
आणि मुलगा पण छान होता.पण तुझ्याएवढाच होता. ”
दिव्या एकदम चपापली! आश्चर्याने आईकडे बघायला लागली, “आई तुला काही प्रॉब्लेम नाही मी कोणाच्या प्रेमात पडले तर ?मला एखाद्या मुलाने प्रपोज केलं तर?चालेल तुला ?”
अगं स्वप्न होत ते ! पण खरं जरी असतं तरी हे वयचं आहे तुझं कोणीतरी आवडायचं! कोणालातरी आपण आवडतो हे फार सुखावणार असतं. प्रेम करणं हे माणसाच्या भावना जिवंत असल्याचं लक्षण आहे. ह्या वयात ही भावना मनात नाही आली तर ते नॉर्मल नाही असं म्हणेन मी ! आम्ही पण ह्या वयात होतोच की !
पण दिव्या तुला कोणी आवडलं तर मला आणि तुझ्या बाबाला सांगशील का ? मी माझ्या आई बाबांना सगळं सांगायचे!”
“म्हणजे आई बॉयफ्रेंड होता का तुझा?”
नेहा हसली आणि म्हणाली अगं प्रेमात पडणाऱ्या सगळ्यांचे बॉयफ्रेंड नसतात काही.... त्या वयात कळत तरी होता का प्रेम आणि आकर्षण ह्यातला फरक ?
जस जसं वय वाढत गेलं आवड बदलत गेली. तेव्हा खूप आवडलेला मुलाचं आता नाव विचारशील तरी आठवत नाही. आणि अभ्यास राहीला असताना बाजूला.. आज काय माहीत एवढं शिक्षण घेतलं असतं का?स्वतःच्या पायावर उभी असते का ?
आणि मुख्य म्हणजे तुझा बाबा मिळाला असता का ?
बघ किती काळजी घेतो तो आपली. तुला,मला खुट्ट झालं तरी कासावीस होतो. आयुष्य अशा माणसाबरोबर काढावं ज्याचा जीव गुंतून राहील कायम आपल्या माणसात ! बाकी फक्त चेहरा आवडणं म्हणजे प्रेम नव्हे. नेमकं ह्या वयात असंच व्हायची शक्यता जास्त.कारण आत्ता ना तर स्वभाव समजायचं वय असतं ना शिक्षणाचा ठाव ठिकाणा!
प्रेम ही इतकी सुंदर भावना आहे की प्रेमात पडल्यावर प्रेमात पडणारा स्थिरावला पाहीजे उध्वस्त व्हायला नको. हेच कारण आहे की प्रेम करायला,लग्न करायला कायद्याने सुद्धा एक वय निश्चीत केलं आहे. तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला सक्षम झाल्याशिवाय आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेऊन आयुष्यं पणाला लावणं धोकादायक ठरू शकतं ! जे प्रेम तुम्हाला तुमच्या आईवडीलांपासून लपवून कांही करायला लावतं ते कसंकाय तुम्हाला सुख देईल ?
पण मला खात्री आहे दिव्या, स्वप्नात दिसलेली दिव्या कदाचीत माझ्यातल्या तरुण मुलीची घाबरलेली आई असेल. पण प्रत्यक्षात मात्र माझी दिव्या मला आणि तिच्या लाडक्या बाबाला न सांगता कधीच काही करणार नाही. होना ?
अअअं हो आई ...असं म्हणून दिव्या खोलीत निघून गेली.
आईच बोलून झालं होतं. मुलांना नेहमीच जाब विचारून गोष्टी सुधारता येत नाहीत. एका वयानंतर त्यांचं मन काचेच्या भांड्यासारखं असतं.. एक टिचकी त्याला तडा जायला निमित्त ठरू शकते.
रात्री एक वाजला सिद्धार्थला घरी यायला,पण आज त्याला चैन पडत नव्हते. नेहा पण जागी होती.दिव्या झोपून गेली होती..
सिद्धार्थला नेहाने सगळं सविस्तर सांगीतलं आणि म्हणाली, “मैथिली काकूंच्या बोलण्यात तथ्य आहे”
“का दिव्याने कबूल केलं का?”
अरे कबूल करायला ती काय आरोपी आहेका? आई आहे मी तीची...
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली हा चिंतेचा विषय नाहीच आहे माझ्यासाठी.. तिला ते आपल्याशी बोलावसं वाटत नाहीये हा मात्र नक्कीच आहे.मी तिला थोडा वेळ देणार आहे आपण वाट बघू... आपल्या संस्कारांची परीक्षा आहे आता.
तो आठवडा तसाच गेला.. आता दिव्याच आईबाबांशी वागणं थोडं बदललं होतं. ती सतत काहीतरी विचार करत असायची.
आज शनिवार होता बाबा म्हणाला, “आज पिझा ऑर्डर करूया फार दिवस झाले.” एरवी पिझा म्हणल्यावर उड्या मारणारी दिव्या आज नुसतं हम् म्हणाली.
पिझा खाऊन झाला आणि बाबानी चॉकोलेट आईसक्रिम आणलं होतं ते खाता खाता दिव्याला एकदम रडू यायला लागलं..
“काय झालं दिव्या ?”बाबा एकदम कावरा बावरा होऊन बोलला.
दिव्या म्हणाली, “आई बाबा मी नाही म्हणून आले आज कार्तिकला. दोन महीन्यांपासून तो मला विचारत होता.
माझ्या सगळ्या मैत्रीणीना बॉयफ्रेंड आहेत. सगळे मला म्हणत होते की त्याला हो म्हणून टाक. मला आवडायचं तो माझं कौतुक करायचा. मला फोन करायचा.. दिवसभरात झालेलं सगळं त्याला सांगायला आवडायचं मला. माझ्या फ्रेंड्स म्हणाल्या हे प्रेमच आहे.. मलापण वाटत होतं की मला कार्तिक आवडायला लागला आहे. पण त्या दिवशी आईला पडलेलं स्वप्न सांगीतलं तिने मला आणि मी खूप विचार केला...
मग माझ्या लक्षात आलं की मला नक्की माहीत नाही हे प्रेम आहे की आकर्षण.. !
मी कार्तिकला आज नाही म्हणून आले कारण मला त्याचं नाव सोडून दुसरं काहीच माहीत नाही. फ्रेंड्स म्हणल्या की Love is always a gamble मला हे करता आलं नसतं. तुम्हा दोघांपासून काही लपवू नाही शकत मी, मी चुकले!
बाबानी दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले अगदी बरोबर सांगीतलं तुझ्या फ्रेंड्सनी ‘लव्ह इज गॅम्बल’ पण म्हणून ते गॅम्बल खेळायचं केव्हा ह्याचे काही नियम पाळायचे असतात. कारण रिस्क असते गॅम्बल मधे.
जर त्या जुगारात तुम्ही हरलात तर निदान सावरायची शक्ती हवी तुमच्यात. कार्तिक वाईट मुलगा असेल असं नाहीच मुळी. पण हे वय जर तू ह्या सगळ्या गोष्टींमधे घालवलस तर कदाचीत उद्या तुला बऱ्याच गोष्टींशी तडजोड करावी करावी लागेल.
आपली आवड सुद्धा बदलत जाते. बघ ते ‘टेन इयर चॅलेंज’ का काय चालू आहे सध्या ... किती फरक पडतो आपल्या आवडी निवडीत राहणीमानात, विचारांत. आपलाच विश्वास बसत नाही फक्त दहा वर्षांत एवढे बदलू आपण...
आणि मनातलं बोलायला बॉयफ्रेंडच का हवा बेस्टफ्रेंड नाहीका चालणार ?
निसरड्या रस्त्यावरून पाय घसरणारच,पण म्हणून वेळीच आपला मार्ग बदलायला हवा शहाण्या माणसाने.. !
खूप अभ्यास कर खूप अनुभव घे जगाचा आणि मग निवड ना स्वतःसाठी तुला हवा तसा मुलगा. प्रेम करावंच माणसाने पण ते आंधळं वगैरे नसावं.
तुला एक गम्मत सांगू ? इंजिनियरिंगला ला गेलो ना तेव्हा फार मुलींना आवडायचो मी.. मलाही आवडायचं.... एवढं फुटेज कोणाला आवडत नाही ?
पण नुकतीच पीजी ला ॲडमिशन घेतल्यावर सहज एक दिवस जुन्या कॉलेजला गॅदरींगला आलो. तुझी आई स्टेजवर भाषण देत होती..
मला ती पाहताक्षणी आवडली होती! पण तिची सगळी माहिती काढली आणि दोन वर्ष थांबून कॅम्पस इंटरव्यू देऊन आधी हातात नोकरी घेतली मगच आलो मॅडमना विचारायला. तेव्हा तीची फायनल एक्झाम बाकी होती तर बोलली सुद्धा नाही माझ्याशी.. पण ते गॅम्बल जिंकलो शेवटी मी आणि तुझ्या आईने होकार दिला ....त्या दिवशी पहील्यांदा स्वतःचं कौतुक वाटलं.
कॉलेजात त्या मुलींना हो म्हणून मार्केट मधून आऊट झालो नाही म्हणून... ”
आता दिव्याचं रडणं एका मिश्कील हसण्यात बदललं होतं आणि इतक्या लवकर प्रेमाबिमात पडून मार्केट मधून आउट नाही व्हायचं हा बाबाचा गमतीशीर डायलॉग मनापासून आवडला होता तीला.... !
आईच्या गळ्यात पडून मग बोलली ती, “आई बरंच झालं त्या दिवशी तुला माझं स्वप्न पडलं”
नेहा आणि सिद्धार्थ एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होते.
त्यांच्या हातातून निसटत असलेल्या त्यांच्या नाजूक नात्याला त्यांनी अलगद सावरलं होतं !!!

Sunday, January 13, 2019

! भांडणशास्त्र !

आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त 'मी' (!) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.

हो हे सुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे जगाच्या शाळेत आपण ते शिकतो. एक भांडण आपलं नियतीशी सुद्धा सुरूच असतं आतल्या आत. पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.

संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सोक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं यावर तो म्हणाला, "जरा जास्त तरी फेकायचेस अंघोळीचं काम झालं असतं"

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं 'स्मृतीचित्रे'  वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धीमत्ता आहे, कौशल्य आहे, हे शिकून झालं असं कधीच नसतं आपण आयुष्यभर शिकतच असतो.

भांडण करताना काही नियम पाळले तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल. मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा, कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे हे आधी पक्कं करा.

सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही. आज आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत म्हणजे 'तू नेहमी ..., तू ... ने सुरु होणारी वाक्ये टाळायची. नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही हा विचार केला तरी संयम येईल.

प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं पुन्हा कधीच नाही, वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.

आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परिक्षेत त्यामुळे हे शिकलंच पाहिजे, यशस्वी व्यक्ती, आपले आदर्श टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात याचे खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं या साठी चरित्रे, आत्मचरित्रे वाचता येतील.

आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे. सतत जिंकणारे, शब्दात पकडणारे काही हरहुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात, यांची स्मरणशक्ती दांडगी असते, शब्दांचे अचूक अर्थ यांना माहित असतात, नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर. हे मात्र जिंकून सुद्धा आतल्या आत हारलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.

एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले, दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला, आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं, ... but i like you.

कधी कधी 'हारके जितने वाले बाजीगर 'असतात ते असे.

जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम, फिर नही आते ... हेच खरं !

असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास...

Tuesday, January 8, 2019

समस्या

एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन ! कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून
राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ? मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता. गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ?? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !! आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !! नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ?? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.

कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.

जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !
त्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात आपण हे नक्की टाळू शकतो,  आणि आनंदी होऊ शकतो.

“बाबा, मोठं व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं?”

मोठ्ठा हो!!

“बाबा, मोठं व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं?” या प्रश्नांचा एका बाबानी दिलेलं उत्तर.

“बेटा ह्याच उत्तर खूप अवघड आहे असं नाही. पण ह्याची उत्तरं अनेक आहेत आणि ह्यातलं उपयोगाचं उत्तर कोणतं हे तू आणि येणारा काळचं ठरवू शकता."

कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं, तर तू १८ वर्ष पूर्ण केल्यावर तू मोठा होतोस म्हणे! म्हणजे तू 'सज्ञान' झालास असं कायदा म्हणतो. अर्थात सरकारला ‘ज्ञान’ याचा अर्थ माहिती आहे का नाही, ते मला माहित नाही. त्यामुळे सज्ञान होणं म्हणजे नक्की कायद्याला काय अपेक्षित आहे हे मला माहित नाही. पण जेव्हा १८ वर्षावरील व्यक्ती सुद्धा व्यसनांच्या मागे लागतात, बेदरकारपणे निर्णय घेतात, अनेक मोहपाशांमध्ये गुंतून जीवन संपवतात, हताश निराश होऊन स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्याचा बेरंग करतात, तेव्हा वाटत की ह्या व्यक्ती खरंच सज्ञान होत्या ? मोठ्या झाल्या होत्या ?   आणि हो, ज्या पातशाह्याना मोठे मोठे राजे चळाचळा कापायचे त्यांचा निप्पात करण्याची शप्पथ तर शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षीच घेतली, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी लिहिली. जगाच्या कोणत्याही कायद्यात 'हे लोक त्या वेळी अज्ञानी होते' असं म्हणायची हिम्मत नाही. त्यामुळेच मोठं होण्याची कायदेशीर व्याख्या मला तर काही पटत नाही.

मोठं होणं म्हणजे लोकांनी तुला भाव देणं, तुझे FAN CLUB होणं किंवा तू CELEBRITY होणं अस असेल, तर एक लक्षात ठेव ज्या दिवशी नवसाला पावणं बंद होतं त्या दिवशी लोक देवालाही विसरायला लागतात आणि त्याला एका झाडाखालच्या छोट्या मंदिरात shift करतात.

हत्ती कितीही मोठा असला तरी लहान मुंगीही त्याला चितपट करते. त्यामुळे नुसती ताकद आली म्हणजे तू मोठा झालास असं नाही. नुसती बुद्धी असली तरी तू मोठा झालास असं नाही. कारण त्याबरोबर येणारा गर्व तुला HANDLE करता येईल की नाही ते सांगणं अवघड आहे. आणि तो तुला कधी छोटा करेल ते माहीत नाही.

माझ्या दृष्टीने मोठं व्हायचं म्हणजे समृद्ध व्हायचं, चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभवांनी! वडाच्या झाडासारखं!! ते उभही वाढतं आणि अडवही !! मोठं व्हायचं म्हणजे सक्षम आणि सामर्थ्यवान व्हायचं. अर्थात ह्या सगळ्या तुझ्या बापाच्या व्याख्या झाल्या, मोठं व्हायच्या !! तुझा बाप म्हणून मी तुझ्यापेक्षा मोठा असेनही, पण एक माणूस म्हणून मोठा व्हायला मला कदाचित हा जन्म पण पुरायचा नाही.

शेवटी तुलाच ठरवायचं आहे मोठं व्हायचं म्हणजे काय करायचं ते. कारण मोठं व्ह्यायचे काही नियम किंवा परिपूर्ण व्याख्या नाहीयेत रे बेटा!!

एका विचारवंताचा खूप सुंदर वाक्य आहे “THE FURTHER YOU PROGRESS, LESS TEACHING THERE ARE. THE GREAT PATH IS REALLY NO PATH.”

जेव्हा तुझा मार्ग ठरवायला आणि तो चालायला तू समर्थ होशील तेव्हा तू मोठा झालास असं समज. मग तेव्हा तुझं वय १०० असो नाहीतर तू एखाद्या देशाचा अध्यक्ष असो!! मला माहिती आहे की हे सगळं सांगायला जेवढं सोपं आहे तेवढंच करायला अवघड आहे.

एवढं सगळं सांगूनही माझा मुलगा म्हणून मी तुला एक आशीर्वाद कायम देईन,

"आयुष्यात खूप मोठा हो, सक्षम होत आणि सामर्थ्यवान हो. आणि एकवेळ मोठा झाला नाहीस तरी चालेल, पण स्वतःच्या डोळ्यात स्वतःला पडू देऊ नकोस आणि परिस्थितीपुढे मात्र कधीच छोटा होऊ नकोस!!"

- एक छोट्या बापाचा छोटासा सल्ला

Saturday, January 5, 2019

शिकवण

जर बालपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि चांगले कामं करतील. यामुळे घर-कुटूंब आणि समाजाचे कल्याण होऊ शकते. मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा ते चुकीच्या कामांकडे आकर्षित होतात. एका प्रेरक प्रसंगावरुन जाणून घ्या चांगल्या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात...
- प्राचिन काळात एक संत आपल्या शिष्यासोबत भिक्षा मागण्यासाठी एका घराबाहेर पोहोचले. त्यांनी भिक्षा देण्यासाठी आवाज दिला तर आतून एक लहान मुलगी बाहेर आली आणि म्हणाली की, बाबा आम्ही खुप गरीब आहोत, आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, तुम्ही पुढे जा.
- यानंतर संत मुलीला म्हणाले की, मुली नाही म्हणू नको काहीच नाही तुझ्याकडे तर अंगणातील थोडीशी माती दे.
- मुलीने लगेच अंगणातील मुठभर माती भिक्षा पात्रात टाकली.
- संताने मुलीला आशीर्वाद दिला आणि पुढे गेले.
- काही अंतरावर गेल्यानंतर शिष्याने संताना विचारले की, गुरुजी माती काय घेण्याची वस्तू आहे का? तुम्ही भिक्षा म्हणून माती का घेतली?
- संताने शिष्याला उत्तर दिले की, आज ती मुलगी लहान आहे. आज ती नकार द्यायचे शिकली तर मोठे होऊन कुणालाही दान करणार नाही. आज तिने दानात थोडीशी माती दिली आहे, यामुळे तिच्या मनात दान देण्याची भावना जागृत होईल. उद्या ती मोठी होऊन सामर्थ्यवान बनेल तेव्हा फळ-फूल आणि धन दान करेल.
कथेची शिकवण
या छोट्याशा कथेची शिकवण म्हणजे, मुलांना बालपणापासून चांगले काम शिकवायला हवेत. जर त्यांना बालपणापासून चांगल्या कामांसाठी प्रेरित केले तर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि वाईट गोष्टींपासून दूर राहतील. आपण जेव्हा दान करतो तेव्हा लहान मुलांकडून करुन घ्यायला पाहिजे, यामुळे ते दूस-यांना मदत करणे शिकतील.