Monday, December 10, 2018

संधी

संधी हि नेहेमीच चालून येत असते, परंतू ती जरी चालून आली तरी ती थांबत नाही, तिला पकडावे लागते. जर पकडण्याचे टायमिंग जुळले तर आपण यशस्वी होतो.

आपल्या जीवनातही अनेक प्रसंग असेच येत राहतात, प्रत्येकाला जीवनात एक संधी मिळतेच ज्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण, अदभूत, करण्याची ती प्रेरणा असते. फार थोडे लोक अश्या मिळालेल्या संधीचे सोने करतात, व ते मोठे होतात. यशस्वी लोकांना विचारा, ते हेच सांगतील, काळाची गरज ओळखली, थोडा धोकाही पत्करला,  प्रवाह पार करून गेलो व अजून पुढची प्रगती करण्यासाठी नवीन बळ प्राप्त झाले. बहुसंख्य लोक ही संधी सोडतात म्हणून, उर्वरित आयुष्यात हालअपेष्टा सहन करतात. अयशस्वी लोक मात्र संधीला दूषणे देत राहतात, मात्र एकांतात हे मान्य करतात, मी चुकलो त्यामुळे असा राहिलो.

विधात्याने, मी म्हणतो, भिकाऱ्याला सुद्धा अशीच एक संधी दिलेली असते, परंतू ती कोणती व कशी साधायची हे न समजल्यामुळे त्याला या अवस्थेत उर्वरित आयुष्य काढावे लागते. बऱ्याच वेळेस एखादी संधी हुकली तर विधाता अजून  एखादी संधी पण देतोच, पण त्याचाही उपयोग केव्हा व कसा करायचा हे न उमगल्यामुळे उर्वरित जीवनात ससेहोलपट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीराज चौहान पेक्षा मुहम्मद घोरीला मी जास्त श्रेष्ठ मानतो, कारण पृथ्वीराज चौहानला इतके उदार होण्याची गरज न्हवती, पहिल्या वेळेस तो हरला तेव्हाच त्याला संपवला असता तर पुढचे रामायण घडलेच नसते.

होय, हे सर्व करण्यासाठी भाविष्यकाळाचा वेध घेता आला पाहिजे, उद्याच्या जगाला काय हवंय, हे ज्याला आज समजले, तो उद्याचा राजा होणार. धीरूभाई अंबानी, बिल गेट्स (विलियम हेनरी गेट्स), आपला झुकरबर्ग, असे अनेक आहेत. मानवाच्या प्रगतीतील अनेक वळणे जगाला नवीन दिशेला घेऊन गेली.

आदिमानवाने सर्वात प्रथम आगीचा शोध लावला, व जीवन थोडे सुकर झाले, मग चाकाचा शोध लागला, पुढे शस्त्रांचा शोध लावल्यामुळे स्वबचाव, व शिकार ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. दळणवळण हा विषय अनादिकालापासून मानवासाठी खूप महत्त्वाचा होता व आजही आहे. दोन पायावर चालणे, हि पहिली आणि एकमेव प्रगती शरीरात झाली, उर्वरित जलद प्रवास हा इतर वाहनांच्यामुळे होऊ लागला. घोडा हे वाहन मात्र जवळपास 5000 वर्ष जगात अग्रेसर रहिले, एकोणिसाव्या शतकापर्यंत घोडा हेच प्रमुख वाहन राहिले, ज्याला जेम्स वॉट ने निरूपयोगी ठरवले.

चहा करताना जेम्स ला वाफेचे महत्व समजले, या वाफेचा जेम्स वॉटने कसा उपयोग करायचा हे दाखवून दिल्याने, यांत्रिक युग सुरु झाले, पण त्यालाही काही मर्यादा आल्या, त्यामुळे रेल्वे इंजिनाशिवाय त्याचा फारसा वापर कुठेही झाला नाही. त्याच इंजिनात महत्वाचे फेरबदल करून, रुडॉल्फ डिझेल ने डिझेल इंजिनाचा शोध लावला. या शोधाने जग कोळशातून द्रवरूप इंधनाकडे वळले, जे साठवायला सोपे, कमी जागेत मावू शकले, अश्वशक्ती वाढली, इंजिनाचा आकार छोटा झाला, व वजन कमी झाले. आज दीडशे वर्षानंतरही रुडॉल्फने लावलेल्या इंजिनाच्या शोधात आमूलाग्र बदल झालेला नाही हे विशेष.  या शोधाचे सर्व हक्क ज्याला पेटंट म्हणतो, याची त्या काळात सोय असती व ते त्यांनी त्यावेळी घेतले असते तर आज रुडॉल्फ डिझेल हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणला गेला असता, दुर्दैव याला म्हणतात, हे इंजिन बनवताना आणि विविध प्रयोग करताना, हा जर्मन वैज्ञानिक कर्जबाजारी झाला, व त्याने बोटीतून उडीमारून आत्महत्या केली..... आज आदिवासी सोडले तर डिझेल नावाचे इंधन माहित नसणारा जगात कोणीही नसणार, पण इंधनाला कुणाचे नाव दिले गेले हे मात्र फार थोड्या लोकांना माहित आहे. तात्पर्य काय, शोध लावताना अनेक वेळा यश अपयशाला न घाबरता तोंड देणारा रुडॉल्फ आपला शोध कसा क्रांतिकारक होणार आहे हे पाहण्यासाठी थोडा धीर धरू शकला नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बरेच लोक असेच काहीतरी नाविन्यपूर्ण करताना, यश जवळ येत असता, धीर सोडतात, व अपयशाच्या खाईत लोटले जातात.

सचिन तेंडुलकर नाही का नर्व्हस नाईन्टीचा कित्तेक वेळा शिकार झाला? शेअर मार्केट मध्ये अनेक लोक असेच घाबरून पैसे घालवतात, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. संधी व काळाची वाट पहा, आलेली संधी मात्र सोडू नका.

सौजन्य: विजय लिमये, नागपूर (9326040204)

Monday, December 3, 2018

क्षमाशिल कोण?

🙎 आई की मुलं 👫

आईचा वाढदिवस असतो. घरी खूप पाहुणे येणार असतात. त्यांच्या स्वागतासाठी गडबड चालू असते. काचेच्या वस्तूंनी टेबल सजविलेले असते. आईची गडबड पाहून चार-पाच वर्षांचा मुलगा मदत करायचा प्रयत्न करत असतो; पण काम उरकण्याच्या नादात आई मुलाकडे दुर्लक्ष करीत असते. "जा बागेत जाऊन खेळ,'' आई मुलाला सांगते. मुलगा थोड्या वेळाने बागेतून धावत आई..आई करत घरात घुसतो. नेमकी त्याचवेळी आई हातात काचेच्या ग्लासचा ट्रे घेऊन निघालेली असते. मुलगा आईला धडकतो. ट्रे खाली पडून सर्व वस्तू फुटतात. सर्वत्र काचा होतात.

काम वाढले आणि चांगला सेट फुटला म्हणून आई चिडते. मुलाला खूप बोलते. मुलाला आपली चूक कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. हिरमुसून तो खोलीत जातो.

कामाच्या नादात, पाहुण्यांच्या सरबराईत मुलगा खोलीत जाऊन बसला आहे, तेच आई विसरते.

पाहुणे गेल्यावर स्वतःचे ताट वाढून घेताना तिला मुलाची आठवण येते. माझं बाळ जेवलंच नाही म्हणून ती त्याला शोधू लागते. मुलगा खोलीत झोपलेला असतो. रडून रडून अश्रू गालावर सुकलेले असतात. आईला वाईट वाटते, ती त्याला जवळ घेते. मुलगा झोपेतच हातातील फूल तिच्यापुढे करतो आणि पुटपुटतो "हॅपी बर्थ डे ममा!''

गोष्ट वाचली आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं.

मुलं आपल्यावर किती प्रेम करतात आणि आपण त्यांना नेहमीच किती वाईट बोलतो, हे लक्षात येऊन अपराधी वाटायला लागलं. अनेकदा गोष्ट अगदी क्षुल्लक असते; पण आपण त्याचा बाऊ करतो.

अनेकदा कामे करताना मुले चुका करतात, एखादा निरोप देताना घोळ घालतात; केव्हातरी खोटं बोलतात, त्यांना आवडली म्हणून लोकांची वस्तू उचलून आणतात; अगदी राग आला तर मोठ्यांना उलट मारतातही.

यामध्ये अंतर्यामी हेतू वाईट नसतो; तर त्या त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात. आपल्याला वाटणाऱ्या त्यांच्या वागण्यातल्या चुका असतात. पण खरे तर ते त्यांचे शिकणे असते. आपल्याला त्या चुकांपुरतेच बोलायचे असते, पण आपल्याकडून "वेंधळाच आहेस, आयुष्यात कधी सुधारणार नाहीस, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा जगात सापडणार नाही; जन्माला आला आहेस तेच मला छळायला,' आदी चुकीची वाक्‍ये जातात.

इतकी वाईट वाक्‍ये ऐकूनही थोड्या वेळातच मूल सर्व काही विसरते आणि आपल्याला येऊन बिलगते. गळ्यात हात टाकते- जसे काही घडलेच नाही.

जर घडलेल्या घटनेवरच शांतपणे आपण मुलाशी बोललो तर पुढे अनेक चुका टळतील. मुले खऱ्या अर्थाने शहाणी होतील.

खरंच विचार करू या, आपण जे वाईट शब्द मुलांना बोलतो ते आपण आपले मित्र, मैत्रिणी, बहीण-भाऊ, नवरा-बायको यांना वापरले तर आपले संबंध कायमचे संपतील, नाही का?

तात्पर्य : आपली मुले आपल्यापेक्षा महान आहेत. कारण ती लहान वयातच आपल्याला क्षमा करायला शिकली आहेत._

ही क्षमाशीलता आपण शिकू या का?

Tuesday, November 27, 2018

ब्राह्ममुहूर्त

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे कि ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे.

ब्राह्ममुहूर्त हा ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात. याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.

१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ओक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३)तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरिरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिःसारण व शरिरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते.त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरिरशुद्धी व्हावी यासाठी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.

४) चौथा फायदा म्हणजे आपल्या शरिरात, दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते. या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात. ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे: दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार. या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो. हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरिराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.

६) सहाव्वा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती ची जी केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच याकाळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्तीची केंद्रे तसेच इतर शक्ती केंद्रे, कायम स्वरुपात जागृत होतात.

७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर. त्यासाठी ब्राह्ममुहुर्तावर उठून शरिरशुद्धी केली पाहिजे.

८) या काळात आपण ॐ कार साधना केल्यास सप्तचक्रे जागृत होतात,कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात.
या सिद्धात्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

Thursday, November 22, 2018

देवपूजा कशी करावी?

॥देवपूजा॥

देवपूजा कशी करावी?

षोडशोपचार व पंचोपचार पूजेची माहिती.

षोडशोपचारपूजा ही सोळा उपचारांनी करावयाची असते. त्यामधे कोणते उपचार असतात. ते कसे अर्पण करायचे

याची थोडक्यात माहीती पाहू….

सर्वप्रथम देवपुजेला बसताना काहिगोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

1) पुजेला बसताना कायम धूतवस्त्र (धुतलेले) सोवळे इ. नेसून बसावे.

2) पुजाकरतेवेळी आसनावरती बसावे. जमिनीवर बसू नये. तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.

3) कपाळाला गंध / पिंजर इ. लाऊन बसावे.

4) एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपुजा करावी.

5) देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, मध्येच उठू नये.

6) देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.

7) आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.

8) फ़ुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी.

9) विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे त्याचप्रमाणे नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.

हे नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभेल, घरामध्ये प्रसन्नता येते, वातावरण पवित्र बनते, कुटुंब सुखी होते व आपल्या सद्इच्छा पूर्ण होतात.

षोडशोपचार पूजा – म्हणजे जी पूजा सोळा उपचारांनी केली जाते. सोळा उपचार या प्रमाणे- १) आवाहन. २) आसन ३) पाद्यं. ४) अर्घ्य. ५)आचमन. ६)स्नान. ७) वस्त्र. ८) यज्ञोपवीत ९) गंध. १०) पुष्प. ११) धूप. १२) दीप. १३) नैवेद्य. १४)प्रदक्षिणा. १५) नमस्कार. १६) मंत्रपुष्प.

हे उपचार कसे देवाला अर्पण करावे याची माहिती दिली आहे . तसेच या उपचारां व्यतिरिक्त ज्या गोष्टी पुजेमध्ये येतात त्यापण दिलेल्या आहेत. प्रथम पुजेला बसणार्‍याने आचमन करावे. आचमन म्हणजे – डाव्या हातात पळी घेउन त्याने उजव्या हातावर पाणी ओतणे ते पाणी प्राशन करणे, ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडणे म्हणजे आचमन होय.

तिलक धारण :- कोणत्याही शुभ कार्याला बसताना कपाळी तिलक धारण करावा. स्वत:ला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावयाचे असते

प्रथम कलश पूजन करावे. आपण जे पूजेला पाणी वापरतो त्यामधे पुण्यनद्यांचे आवाहन करावयाचे असते. ज्यांना मंत्र ज्ञात नाही त्यांनी स्मरण करावे. व कलशाला गंध, अक्षता, फ़ूल वहावे.

त्यानंतर शंख पूजन करावे:- शंखामध्ये चंद्र, वरूण, प्रजापती, गंगा, सरस्वती इ. देवतांचे सांनिध्य असते. म्हणून त्याला गंध-फ़ुल वाहून नमस्कार करावा. शंखाला अक्षता वाहू नये.

त्यानंतर घंटेचेपूजन करावे. :- देवतांना बोलावण्यासाठी व राक्षसांना घालवण्यासाठी घंटेचे पूजन करावे. घंटा वाजवावी.

दीप पूजन :- जो प्रज्वलीत दीप किंवा समई आहे ती ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या पूजनाने आपल्याला आरोग्य प्राप्त होते. म्हणून दीपपूजन करावे व नमस्कार करावा.

शुद्धी :- पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेउन तुळसपत्र घेउन सर्व पूजासाहित्य व स्वत:वरती प्रोक्षण करावे. (पाणी शिंपडावे)

ध्यान :- ज्यादेवतेची पूजा करणार त्यादेवतेचे मनात स्मरण करावे. रोजची घरातील देवाची पूजा असेल तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. (अनुक्रमणिकेत कुलदेवतांचे ध्यानमंत्र या विषयात पहावे.)

1) आवाहन :- देवाच नाव घेउन नम्रभावाने देवाला बोलावणे. (देवावरती अक्षता वहाव्या.)

2) आसन :- देवाला बसायला आसन देणे.

3) पाद्य :- देवाचे पाय धूणे .

4) अर्घ्य :- गंध, फ़ूल, नाणे, सुपारी एकत्र घेउन पाण्याबरोबर देवाला देणे.

5) आचमन :- देवाला आचमनासाठी पाणी देणे. (मुर्तीवर पळीने पाणी वहावे.)

6) स्नान :- देवाला पाण्याने स्नान घालावे.

पंचामृत स्नान :- प्रथम पयःस्नान म्हणजे – दुधाने देवाला स्नान घालावे. (नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा.)

दधिस्नान :- देवाला दह्याने स्नान घालावे. (नंतर ………….. नमस्कार करावा.) वरील प्रमाणे.

घृतस्नान :- देवाला तूपाने स्नान घालावे. (नंतर………… नमस्कार करावा.)

मधुस्नान :- देवाला मधाने स्नान घालावे. (नंतर…………. नमस्कार करावा.)

शर्करास्नान :- देवाला साखरेने स्नान घालावे. (नंतर…………. नमस्कार करावा.)

गंधोदकस्नान :- देवाला थोडे गंध-पाणी एकत्र करून त्याने स्नान घालुन शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वहावे. व नमस्कार करावा. उदबत्ती, दिवा ओवाळावा. पंचामृत / दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा. व ज्या देवाची पूजा चालू आहे त्या देवाचे स्तुतीपर मंत्र / श्लोक म्हणून देवावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवाला सुगंधी द्रव्य / अत्तर इ. स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावरती  ठेवावे.

७)वस्त्र :- देवाला कापसाचे वस्त्र वहावे.

८)यज्ञोपवीत :- देवाला जानवे घालावे. व आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.

९)चंदन:- देवाला अनामिकेने चंदन लावावे (अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजुचे बोट.) त्यानंतर देवाला अलंकार असतील  तर घालावे. नसल्यास अक्षता वहाव्या.

परिमलद्रव्य :- हळद, पिंजर, शेंदुर, अबीर यातील उपलब्ध असेल ते देवाला वहावे. (फ़ुलाला अत्तर लाऊन फ़ूल देवाला वहावे.)

१०) पुष्प :- देवाला सुगंधीफ़ुले, हार, गजरे, तुळस, दूर्वा, बेलपत्र वहावे.

११) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळणे.

१२) दीप :- देवाला  येथे शक्यतो शुद्धतुपाचे निरांजन ओवाळावे.

१३) नैवेद्य :- देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा दाखवायचा  असल्यास शक्य झाल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे. व देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे पान ठेउन देवाला नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य देव घेणार (जेवणार) आहेत अशा स्थितीत केळीचे पान ठेवावे. हातधुण्यासाठी,  मुखधुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हनात चार वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे.

तांबूल :- देवाला विडा देणे. (विडा- दोन विड्याची पाने व सुपारी) तसेच सुवर्णपुष्प देणे अशक्य असल्याने एक नाणे ठेवावे.

या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात इ. मुखवास पदार्थ सुद्धा ठेवू शकता.

फ़ल :- देवाला श्रीफ़ल (नारळ) किंवा इतर फ़ळे देणे.    त्यानंतर देवाची आरती करावी.

१४) प्रदक्षिणा करावी. (स्वत:भोवती उजव्या बाजूने फ़िरणे.)

१५) साष्टांग नमस्कार करावा.

१६) मंत्रपुष्पांजली :- दोन्ही हातात फ़ुले घेउन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फ़ुले अर्पण करावी.

प्रार्थना:- हात जोडून मनुष्य स्वभावानुसार या सेवेत काही राहिले असल्यास अनन्यभावाने देवाची प्रार्थना करावी. क्षमा मागावी.  अशाप्रकारे षोडशोपचारपूजा पूर्ण होते.

❇️ पंचोपचार पूजा ❇️

पंचोपचारपूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात, त्याला पंचोपचारपूजा म्हणतात.            
यामधे……..

१)गंध :-देवाला गंध लावावे.

२)पुष्प :- देवाला फ़ुले अर्पण करावी.

३) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळावी.

४)दीप :- देवाला तुपाचे निरांजन ओवाळावे.

५)नैवेद्य :- देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेउन देवाला नैवेद्य दाखवावा.

(पंचोपचार पूजेत हे पाच उपचार असतात.)

गणेश :- जपापुष्प (जास्वंद), चाफ़ा, दूर्वा, शमी, मोगरा, केवडा इ. सुवासिक फ़ुले. (तुळस भाद्रपद महीन्यात फ़क्त गणेशचतुर्थीला वहावी.) डाळींब, सफ़रचंद, सिताफ़ळ श्रीफ़ल (नारळ) इ. फ़ळे गणेशाला प्रिय आहेत.

शंकर :- धोतर्‍याचे फ़ूल, पिवळी व पांढर्‍या रंगाची फ़ुले, बेलपत्र प्राजक्त इ. तसेच बेलफ़ळ, धोतर्‍याचेफ़ळ, शहाळे (कोवळा नारळ) शंकरांना प्रिय आहेत. लाल रंगाचे फ़ूल, हार शंकराला वाहू नये. तसेच महाशिवरात्री व्यतिरिक्त अन्य दिवशी केवडा अर्पण करू नये.

देवी :- चाफ़ा, सायली, जाई-जुई, अष्टर, कृष्णकमळ, सर्व सुवासिक फ़ुले तसेच तुळस, दूर्वा, दवणा व नारळ, महाळुंग, सर्व खावयास योग्य फ़ळे, पंचखाद्य देवीला प्रिय आहेत.

सूर्य :- सर्व लाल रंगाची फ़ुले, व सर्व खाण्यास योग्य फ़ळे सूर्याला प्रिय आहे

विष्णू :- सर्व सुवासिक फ़ुले, मंजिरीसहीत तुळस,कवठीचाफ़ा, इ. व सर्व खाण्यास योग्य फ़ळे विष्णूला प्रिय होय.

॥ शुभं भवतु ॥

Wednesday, November 14, 2018

श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा संपुर्ण माहिती

नमो सदा श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराज

आपले जीवन क्रूत्यज्ञ करण्यासाठी आम्ही दर वर्षी आपल्या सर्वांचे प्रिय जगद्गुरू श्रीनृसिंहसरस्वती दत्त महाराजांचा चमत्कार श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जाऊन सेवा व दर्शन करतो आपण या लेखात श्रीक्षेत्र गाणगापूर यात्रा बद्दल माहिती पाहूया

गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.

श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||

गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे.

वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयाची राहू तेथे निर्धार
आम्ही असतो याचि ग्रामी । नित्यस्नान अमरजा संगमी
वसो माध्यान्ही मठाधामी । गुप्तरुपे अवधरा ||

प्रत्यक्ष देव गाणगापूरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशिर्वाद प्राप्त करुन घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा-अमरजा संगमावर करुन दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही वेषात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्री गुरुंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे.

चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे. परंतू गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे. हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करुन घेत नाहीत. ‘नित्य जे जन गायन करिती । त्यावर माझी अतिप्रीती’ माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्रीगुरुदत्तांनी सांगितले आहे.

निर्गुण पादुका मठ गाणगापूर

मठी ठेवीतो निर्गुण पादुका । पुरवीतील कामना ऐका
संदेह न धरावा मनात । ही मात आमची सत्य जाणा||

श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरातून निघताना आपल्या पादूका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत. परंतू निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे.

श्रींक्षेत्र गाणगापुर दर्शन

गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्थान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे. तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे.

गाणगापूर येथील पादुका

गाणगापूर येथील श्री दत्तमहाराजांच्या पादुका

भीमा व अमरजा संगमस्थान

भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.

गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –१) षट्कुल तीर्थ, २) नृसिंह तीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा! याबाबत सविस्तर माहिति "श्री गुरु चरित्र" ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ माहिती

(१-२)"षट्कुळ व नृसिंह तिर्थ"
ह्या तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होते. ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळते.

(३) "भागिरथी"
या तीर्थाचे स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते.

(४) "पाप विनाशी"
'तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे', म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं श्रीगुरू महाराजांची भगिनि "रत्नाई" चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.

(५) "कोटि तीर्थ"
ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळते.

 
(६)"रुद्र पाद"
हे तीर्थ "गया" समान आहे. गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होते.

(७)"चक्र तीर्थ"
हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावतिचे चौपट् पुण्य मिळते व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होते.

(८) "मन्मथ तीर्थ"
येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होते.

निर्गुण पादुका

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

"प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥
ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥"

श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे.

झरोक्यातून होणारे मनोहर श्रींचे दर्शन

आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती  निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या  ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी  स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.

श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.

श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.

श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे.

दत्त मंदिर गाणगापूर

आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.

श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात -

“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका ।
अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥
कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥
मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥
संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण ।
मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥
विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥
तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.

श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.

श्रीक्षेत्र गाणगापुर येथील कलेश्वर तिर्थ

श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.

श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.

इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.

श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.

‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥
तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’

असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.

नित्त्यक्रम

श्रीक्षेत्र गाणगापूर येथील नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो – रोज पहाटे तीन वाजता काकड आरती होते. त्यानंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास कर्पुरारती होते. साडेसहा वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत. पादुकांवर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात. साडेबाराच्या सुमारास श्रीदत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्तमंडळी माधुकरी मागावयास जातात.

श्रींची पालखी गाणगापूर

सायंकाळी सहा-साडेसहा वाजता दिवे लागतात. रात्रौ साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत श्रीदत्तप्रभुंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा, आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्रीदत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. याच काळात पालखीसमोर भजनसेवाही होते. त्यानंतर श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपदी, पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो.

श्रीक्षेत्र गाणगापूरला साजरे होणारे उस्तव
श्रीक्षेत्र गाणगापूरला पुढील उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला (श्रीगुरुपौर्णिमेला) श्रीव्यासपूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी (गणेश चतुर्थीच्या दिवशी) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्रीकल्लेश्र्वर मंदिरात जाते. रात्रौ आठ वाजता परत येते.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव आश्र्विन वद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या वेळेस महाप्रसाद वाटला जातो.

योगिनी दर्शन

नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्ट तीर्थ स्नान करण्यासाठी जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी संगमावर जाते. त्याच रात्री भजनाच्या व नामस्मरणाच्या गजरात ती परत मठात येते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी श्रीदत्तजयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. दुपारी बारा वाजता दत्तजन्म साजरा करण्यात येतो. या उत्सवाला बाहेरगावची माणसे फार मोठ्या प्रमाणावर आलेली असतात. पौष शुद्ध द्वितीयेला श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

माघ वद्य प्रतिपदा हा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्रीमहाराज श्रीशैल्यगमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्र्च मठात येण्यास निघते. हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो.

भक्तांच्या निवासाची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून अत्यंत माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. प. पू. श्रीदत्तात्रेयशास्त्री कवीश्र्वरांच्या हस्ते या धर्मशाळेच्या वास्तूचे पूजन झालेले आहे. श्रीविश्र्वेश्र्वर मठ, श्री दंडवते स्वामीमहाराजांचा मठ, श्रीशंकरगिरी महाराज मठ वगैरे मठांतूनही भक्तांच्या राहण्याची सोय होऊ शकते.

नृसिहासरस्वती शैल्य गमन

श्रीगुरुचरित्र ग्रंथात, गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आलेल्या आहेत. पूर्वावतारात भेटलेल्या रजकाला स्वामींनी या अवतारात श्रीक्षेत्र गाणगापूरला दर्शन देऊन त्याच्या मांडीचा फोड बरा केला. विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. दीपावलीच्या दिवशी ते एकाच वेळी आठ ठिकाणी गेले. नरहरी कवीश्र्वराला परमेश्र्वराचे दर्शन घडविले तर विणकरास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठास पालवी आणली. साठ वर्षांच्या वांझेस पुत्रप्राप्ती घडविली. गरीब भास्कराच्या पाच जणांना पुरेल एवढ्या सिद्धान्नात हजारो लोकांना भोजन घातले. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अशा अनेक लीला सांगता येतील.

मुंबई-चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन (स्थानक) लागते. पुणे-रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशनपूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर ३२७ कि.मी आहे. तेथून पुढे २१ कि.मी श्रीक्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एस. टी. गाड्यांची सतत ये - जा चालूच असते. मणीगिरी तथा मणिचलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे.

अमूल्य अप्राप्य व प्रासादिक
गाणगापूरला संगमस्थानी आढळणारे गरुड सदृश्य पक्षी

इ.स. १४५८ साली, भगवन् श्रीदत्तात्रेयांचा कलियुगातील दुसरा अवतार श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराज, यवन राज्य आल्यानं (कठिण दिवस युगधर्म! म्लेंच्छराज्य क्रूरकर्म! प्रगट असता घडे अधर्म! समस्त म्लेंच्छ येथे येती! - श्रीगुरुचरित्र अ. ५०, ओ. २५८) आणि आपली अपार ख्याती झाल्यानं भक्त-अभक्त सगळेच वरदान मागायला येतील या कारणास्तव (प्रगट झाली बहु ख्याती! आता रहावे गौप्य आम्ही! - श्रीगुरुचरित्र अ.५०, ओ.२५४), अवतारकार्य समाप्तीसाठी पाताळगंगेतून कदलीवनात जायला निघाले.

संगमस्थानी दिसणारे गरूड स।दृश्य पक्षी

त्यावेळी गाणगापूरातील समस्त जनसमुदाय स्फुंदूनस्फुंदून रडायला लागला. "स्वामी आमुते सोडून! केवी जाता यतिराया!" (श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ.९) अशी आर्त विनवणी त्यांनी श्रीगुरूंना केली. त्यावेळी परमदयाळू श्रीगुरुंनी "आम्ही या ठिकाणीच आहोत!" (आम्ही असतो याचि ग्रामी! नित्य स्नान अमरजासंगमी! वसो मठी सदा प्रेमी! गौप्यरुपे अवधारा! - श्रीगुरुचरित्र अ. ५१, ओ. १४) असं आश्वासन त्या दुःखी जनांना दिलं.

त्याची साक्ष पटविण्यासाठी, श्रीगुरुंनी सांगितलं, "आम्ही वसतो सदा येथे! ऐसे जाणा तुम्ही निरुते! दृष्टी पडती गरुत्मते! खूण तुम्हा सांगेन!" (श्रीगुरुचरित्र अ. ४८, ओ. ३८) अर्थात्, "आम्ही विष्णूअवतार असल्याने त्याची खूण म्हणून आमचं प्रिय वाहन गरुडासारखे दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसतील."

आज ५०० वर्षांनंतरही हे पक्षी गाणगापूरात दिसतात. यावेळेस ३ ऑगस्टच्या गाणगापूर भेटीदरम्यान संगमावर असलेल्या श्रीगुरूंच्या अनुष्ठानस्थानासमोर असलेल्या अश्वत्थ वृक्षावर या पक्षांचं घरटं आढळलं. त्यांचा आवाजही ऐकला. झाडाच्या दाट पानातून तो पक्षी जसा दिसला तसा त्याप्रमाणे त्याचं प्रतिमा घेण्याचा प्रयत्न छायाचित्रात केलेला आहे.  श्रीदत्तप्रभूंनी सांगितलेली गाणगापुरातील आपल्या निरंतर वास्तव्याची ही खूण गवसल्याच्या आनंदात यावेळेस पक्षांचा तो आवाज ध्वनीमुद्रित करायचा राहून गेला. पुढच्या वेळेस करता येईल. या सगळ्याचा मतितार्थ काय तर श्रीगुरुचरित्र हा ग्रंथराज 'कालातीत अक्षरसत्य' असल्याचीच ही खूण आहे. मातृभाषा कानडी असूनही 'श्रीगुरुचरित्र' मराठीत शब्दबद्ध करुन श्री. सरस्वती गंगाधरांनी महाराष्ट्रावर अपार कृपा करुन ठेवली आहे.

गाणगापूर हेच गांव नरसिंहसरस्वती स्वामीं  का निवडले ते लक्षात आले
तालुका अफजलपूर (म्हणजे अफझल खानाचे जहागिरीचे गाव) विजापूर (आदिलशाहीची राजधानी) बिदर (बेरीदशाहीची राजधानी) हैद्राबाद (मूळनाव भागानगर, कुतुबशाहीची राजधानी) या गावांच्या मध्यभागी तथा या सर्व शाह्यांसह मोगलाई व निजामशाही यांच्या सीमा गाणगापूरच्या आजुबाजूला एकमेकाला मिळतात !                   

असे केंद्रस्थान कार्यासाठी निवडून सुमारे ८०० वर्षं या ठीकाणी राहून हिंदू तथा सनातन वैदीक धर्माला ग्लानी येऊ दिली नाही व परकीय आक्रमक शक्तिंपासुन धर्माचे रक्षण केले, सर्वसामान्यांना आधार दिला.

खरंच आपण या कलयुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात करण्यासाठी कलयुगातील एकमेव भगवंत श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चित आपणास आयुआरोग्य, ऐश्वर्य, कन्या - पुत्रप्राप्ती, अक्षय-लक्ष्मी प्राप्ति आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात
आणि नित्य सेवा स्वरूपात श्रीगुरूचरित्र पठण करावे आणि
वर्षातून एकदा तरी आपण श्रीक्षेत्र गाणगापूर जाऊन  श्रीगुरू महाराजांची सेवा, दर्शन, आणि त्रिवेणी संगम व अष्टतिर्थ स्नान करून आपले जीवन धन्य करावे

सौजन्य: पुराणिक बंधू