मनाचे श्लोक - १
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
मनाचे श्लोक - २
मना पापसंकल्प सोडूनी द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व छी छी ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
मनाचे श्लोक - ३
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूची शोधूनी पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां राखणा काय झालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी । बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥
जीवा कर्मयोगे जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मनाचे श्लोक - ४
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूची शोधूनी पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां राखणा काय झालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी । बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥
जीवा कर्मयोगे जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मनाचे श्लोक - ५
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
मनाचे श्लोक - ६
बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बाले मना राघवेवीण काही । मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मनाचे श्लोक - ७
मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणाकारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
घूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
मनाचे श्लोक - ८
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
मनाचे श्लोक - ९
असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
विकिकरणअवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥
मनाचे श्लोक - १०
मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवी धरावे । जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो । सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मनाचे श्लोक - ११
मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा । सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
मनाचे श्लोक - १२
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥
मनाचे श्लोक - १३
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला । अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥
मना राम कल्पतरू कालधेनू । निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥
मनाचे श्लोक - १४
उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे । तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥
मनाचे श्लोक - १५
नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
मनाचे श्लोक - १६
जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥
मनाचे श्लोक - १७
नव्हे कर्म ता धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
करी काम निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥
अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
मना पावना भावना राघवाची । धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते । तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥
मनाचे श्लोक - १८
मुखी राम विश्राम तेथेचि आहे । सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥
मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥
बहू चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥
न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी । बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥
मनाचे श्लोक - १९
नको वीट मानू रघूनायकाचा । अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा । करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥
अती आदरे सर्वही नामघोषे । गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे । निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥
जगी पाहता देव हा अन्नदाता । तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥
तिन्ही कोप जाळू शके कोप येता । निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥
अजामेळ पापी वदे पुत्रकामे । तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी । मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥
मनाचे श्लोक - २०
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥
मुखी नाम नीही तया मुक्ति कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥
हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवी देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥
जगी धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥
यथासांग रे कर्म तेही घडेना । घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना । फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥
मनाचे श्लोक - २१
जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥
अती लीनता सर्वभावे स्वभावे । जना सज्जनालागि संतोषवावे ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥
हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥
क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥
विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥
मनाचे श्लोक - २२
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभूती जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥
मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥
मनाचे श्लोक - २३
हिताकारणे बोलणे सत्य आहे । हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥
जनीं सांगता ऐकता जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥
जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥
तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे । क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥
मनाचे श्लोक - २४
बहू शापिता कष्टला अंबऋषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥
धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे । कृपा भाकिता दीघली भेटि जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥
गजेदू महासंकटी वास पाहे । तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥
मनाचे श्लोक - २५
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनि तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तया कारणे वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥
अहल्येसतीलागी आरण्यपंथे । कुडावा पुढे देव बंदी तयाते ॥
बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥
तये द्रौपदीकारणे लागवेगे । त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥
अनाथां दिनींकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥
मनाचे श्लोक - २६
जनांकारणे देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥
जगी धन्य तो राममूखे निवाला । कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥
मना वासना वासुदेवी वसो दे । मना वासना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥
गतीकारणे संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥
मनाचे श्लोक - २७
भजावा जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विनेकू ॥ १३१ ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥
हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी । जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥
नसे गर्व आंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥
धरी रे मना संगती सज्जनीची । जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥
मनाचे श्लोक - २८
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले । जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥
पुढे पाहता सर्वही कोंदलेसे । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गाठी पडेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाही । गुणे गोविले जाहले दुःख देही ॥
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
---