आज म्हणे वर्ल्ड हॅपिनेस डे ! खरंतर आपण सगळे रोज हॅपीच असतो. सुख हे कस्तुरी सारखं असतं. आपण दुःखी होतो कारण आपण आनंदात आहोत हे आपल्याला कळत नाही. मूळात सोयींसाठी पैसा लागतो सुख आजही स्वस्तच आहे. दिवसभरात 'बरं झालं'...' बरं वाटलं' असं आपण जेव्हा कधी म्हणत असतो तेव्हा ते सुखच असतं. प्रत्येक लहान लहान गोष्टीत सुख आहे ....
चालण्याचा प्रचंड कंटाळा आला असताना अचानक मैत्रीण गाडीवर यावी अन् चल सोडते तुला म्हणावं...
वांग्याचं भरीत, दही -भाकरी- ठेचा अशा फक्कड बेतावर शेतात बसून ताव मारणं ...
आवडती गाणी कंटाळा येईतो ऐकणं...
आपल्या माणसांचा गोतावळा बघून नात्याची श्रीमंती जाणवणं ...
एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करणं...
लहान होऊन रस्त्याच्या कडेला साठलेल्या पावसाच्या पाण्यात उडी मारणं...
रक्ताचे रिपोर्टस् नाॅर्मल आहेत हे रुग्णाला सांगितल्यावर त्याचा चिंतामुक्त चेहरा पाहणं...
मृदगंध दरवळत असताना एकटंच बसून चहाचा आस्वाद घेणं ...
आपल्याला पाहिजे तसा फोटो निघणं...
खिडकीतून पाहिल्यावर निरभ्र आकाश किंवा पौर्णिमेचा चंद्र दिसणं...
छानशी कवितांची मैफिल रंगणं...
मैत्रीणीच्या कौतुक सोहळ्याला हजर राहून तिचा आनंद टिपणं...
लहान बाळ दुडूदुडू पळताना बघणं ...
गप्पा रंगात आलेल्या असताना बाबांना टाळी देऊन हसणं...
चहात बुडालेलं बिस्किट वाचवण्यात यश मिळवणं...
कुणाची तरी सहज आठवण येणं आणि नेमकी ती व्यक्ती भेटणं ...
अंदाजापेक्षा हाॅटेलचं बिल कमी येणं...
आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं...
निरर्थक तात्विक गप्पा मारणाऱ्या मैत्रिणीला रात्रभर ऐकत राहणं...
अंगणात चांदणं बघत झोपणं...
आईला आयता चहा हातात दिल्यावर तिचा खुललेला चेहरा बघणं...
सणावाराला आप्तेष्टांनी भरलेलं घर दंग्यानं दणाणून सोडणं...
निसर्गात भटकंती करणं...
जुन्या फोटोज् चे अल्बम न्याहाळत बसणं...
नेहमी हाऊसफुल असणार्या नाटकाची तिकिटं लगेच मिळणं...
कुठल्याही प्लॅन शिवाय पिकनिकला जाणं...
जमेल तशी समाजसेवा करणं...
भरपूर लाड पुरवणारं आजोळ असणं...
पोटभर झोप होईपर्यंत सगळ्या चिंता बाजूला ठेवून मस्त ताणून देणं ...
खर्च केलेल्या पैशाचा हिशोब लागणं...
सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या आजोबांकडून गोष्टी ऐकणं...
गझलेला 'क्या बात' म्हणत दाद देणं...
आजीकडून डोक्याला तेल लावून घेणं...
जुन्या पर्समध्ये १० रुपयांचं लख्ख नाणं सापडणं...
गर्दीने भरलेल्या बस मध्ये थकलेल्या काकांना स्वतःची जागा देणं...
दिवाळीला फराळाचा घरभर भरुन राहिलेला सुवास घेणं ...
पावसात मनसोक्त भिजणं...
घरी पोहचल्यावर फोन कर असं कुणी काळजीनं सांगणं...
पहाटे अंगणात प्राजक्ताचा सडा दिसणं...
ताईने कौतुकाने आपल्यासाठी केलेला पदार्थ आवडीनं संपवणं...
दुधावरली साय किंवा फ्रिजमधलं चाॅकलेट चोरुन खाणं...
अनेकदा ऐकलेले आपल्या बालपणीचे किस्से मामा कडून पुन्हा पुन्हा ऐकणं...
आपल्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट होणं...
समुद्रकिनारी बसून सुर्यास्त बघणं...
अचानक रात्री १२ वाजता मैत्रीणींचा घोळका घेऊन गाडीवर चक्कर मारुन येणं...
कुंडीत लावलेल्या मोगर्याच्या रोपट्याला दोन शुभ्र कळ्या येणं...
आपण केलेल्या कामाचं कौतुक होणं...
शतपावली करणार्या दादासोबत जागतिक राजकारण वगैरे विषयांवर चर्चा करणं...
पहिल्या कमाईतून आई - बाबांना भेटवस्तू घेणं...
गाणं गुणगुणत घर आवरणं...
जुना मित्र अनेक वर्षांनी भेटणं...
अशी अगणित सुख आपल्याला रोज विविध रुपानं भेटतात. सुख कशात आहे तर ते मानण्यात आहे! आपली सुखाची कल्पना जरा adjust केली की कळतं ते भरभरुन आहे. तुज आहे तुजपाशी हे उमगलं की आयुष्याचा सोहळा साजरा करता येतो. आनंद हा प्रवास आहे...आनंदयात्री होता आलं पाहिजे.
आपण "Hide & Seek " साठी हटून न बसता “Happy Happy" मध्ये समाधान मानायला शिकू तेव्हा सुखाचा हा 'लपंडाव' संपेल..!!
- डाॅ. सायली कुलकर्णी