Tuesday, November 17, 2020

त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक मासात येणा-या पौर्णिमेच्या तिथीलात्रिपुरारी पौर्णिमाम्हणून संबोधले जाते. असं म्हणतात ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या पौर्णिमेलाकार्तिक पौर्णिमाअसे म्हणतात. याच दिवशीदेवदिवाळीहा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी ही केवळ पाच दिवसाची असून भाऊबीजेला संपते असे सर्वसाधारण मानले जाते. पण दिवाळी ही केवळ दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. ही कार्तिक पौर्णिमा का कशासाठी साजरी करतात असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो? तसेच या पौर्णिमेचे विशेष महत्व काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या पैकी बरेच जण उत्सुक असतील.

पौराणिक पार्श्वभूमी

त्रिपूर नावाचा एक असुर होता. प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वर्षे त्याने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला आणि तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते.

त्याने देवांच्या स्थापतीकडून म्हणजेच विश्‍वकर्म्याकडून अंतराळात तीन पुरे (नगरे) बांधून घेतली होती. त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले. लोखंड, तांबे आणि चांदीची ही नगरे सुंदर दिसत होती. ती त्याने आपल्या तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशा तीन पुत्रांना दिली. हे तिघे राक्षसपुत्र प्रजेचा आणि संपूर्ण विश्‍वाचा छळ करणारे होते. उत्पात माजवणे आणि त्रास देण्यात ते आपल्या बापापेक्षा पुढे होते. त्या नगरीला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला. अखेर देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही पुरे (नगरे) जाळून टाकली आणि त्रिपुरासूराचा वध केला. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने हिंदू धर्मात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिव पूजन केले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमा याच दिवशी शिवपुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला म्हणून या दिवशी कार्तिकेयाचीही पूजा केली जाते. या दिवशी कार्तिकेय यांचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे आणि ब्राह्मणांना दीपदान करावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. विष्णूचा मत्स्यावतारही याच दिवशी झाला.

देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध

त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे ही या तिथीला देवदिवाळी असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.

वैकुंठ चतुर्दशी

त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा हरिहर पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे.



त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सव

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. या दीपोत्सवालाच त्रिपूर पाजळणे असे म्हणतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण, शेवटी असुर ते असुरच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली.

कार्तिक महिन्यातील शुध्द वा शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि इतर राक्षसांचा देवादिकांनी वध केला. म्हणून दीपावलीपासून दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली. त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असे म्हणतात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

ज्या ज्या वेळी असुरशक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेशी संबंधित ह्या कथा अशाच प्रकारच्या आहेत. सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दैवी शक्ती कशा उपयोगी असतात याचे चित्रण या कथांमधून आढळते.

दसर्‍याला केले जाणारे रावण दहन, होळीला केले जाणारे होलिका राक्षसीचे दहन वा त्रिपुरारी पौर्णिमेचे त्रिपुरासूर दहन ह्या सर्व परंपरा दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केल्याच्या आनंदाचा भाग म्हणून साजर्‍या केल्या जातात. दुष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यांचा कशा प्रकारे विनाश होतो हे या कथांमधून दिसून येते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला असल्यामुळे शंकराच्या मंदिरासमोरील त्रिपूर वातींनी उजळला जातो. पूर्वी प्रत्येक मंदिरासमोर एक दीपमाळ असायची. आताही जुन्या मंदिरांमधून ती दिसून येते. या दीपमाळेमध्ये वाती लावून त्या उजळल्या जातात. दुष्टांचा -हास कशा प्रकारे होतो याची आठवण राहावी म्हणून या दीपमाळा उजळल्या जातात. दिवाळीनंतर येणारी ही पौर्णिमा असते. या दिवशी देवस्थानातील दीपमाळा उजळतात त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडण्याचीही प्रथा आपल्याकडे आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

दीपावली असो वा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून, भगवंताच्या अगाध सामर्थ्यावर अढळ, अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते.


तीर्थक्षेत्र वाई येथील दीपोत्सव

 













Photo Credit: Google/Respective Photographer


Sunday, August 23, 2020

अंतहीन...

*अंतहीन...*

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी *सटवाईनं* लिहून ठेवल्याप्रमाणे साठाव्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत.

आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. ऑफिसात सगळा स्टाफ त्यावर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या समारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता. 
       
एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की सुटीच्या दिवशी घरात त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वयंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे.
      
वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वयंपाकघर दिसे आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो, तेवढं घरी रहाणं जमत नाही ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.
        
*रिटायर्ड* झाल्यापासून तो कायम घरातच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सरून गेले होते, आणि जेव्हा हौस करायची वेळ होती, तेव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा *सुप्तसा रागही* असावा.
        
*गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं...*

वर्षानुवर्षाच्या त्याच्या सवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या. त्याच्या बद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. 
      
त्याने अंघोळ केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती. तो ऑफिसात जायचा तेव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे. पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता. हा आग्रह त्याला मान्यही होता. मात्र तिने *सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या,* असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं. 
      
तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही. ही जाणीव तिला बोचत असावी. खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेताना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी की काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला काडीचाही हातभार न लावणारा स्थितप्रज्ञ नवरा. तो समोर नसला की त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात शिरला तरी *‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये करतोस’* म्हणत ती त्याला झिडकारायची. हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. 

कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली. थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिॲक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली,

*‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्.’*

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं, 

*‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’*

तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली,

*‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’* 

तिचे शब्द ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, *‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य देखील  तुला मिळू दे. शतायुषी हो.’* 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. 

तिच्या मनांत तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता. त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं. वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते. हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते. त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की, तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे. 

आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरांत धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला. 
      
तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘वेळवारी असं मरण हवं’ हा प्रत्येकाचाच सूर होता.
       
तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता तर ही वेळ आली’ म्हणाले. आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चाललंय?’ वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या जगांत निघून गेले. 
      
आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता. 
      
तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.
       
असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला पण *‘सतत तुझंच कवतिक कसं  करायचं?’* म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.
      
नातू, नात लहान होते तोवर तिचे होते. मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच *‘काय आहे आजी?’* असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 
      
तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण *‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’* हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. *'तुझी  उपयोगिता संपायला आलीय'* याची जाणीव लोक आडून पाडून करून देऊ लागले आणि *नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.*

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासू साठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. *‘देवा, उचल मला’* म्हणून प्रार्थना करायची. *‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला’* म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आजकाल, मात्र तिने दिलेले *शाप* आणि त्याने दिलेले *आशीर्वाद*, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते. 

*‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता आणि ‘तू मात्र खूप जग. शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं....*

 *त्यामुळे एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा...*

पश्चात्ताप


नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको - मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला. हाँलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटलं. लग्न लागायला फक्त पंधरा मिनिटं बाकी असतांना उपस्थिती एवढी कमी कशी?त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणूकीत गेल्यामुळे हाँल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हाँलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं.
"तुम्हांला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाहिये." नरेश जरा अवघडून बोलला, 
"काय राव नरेश मला ओळखलं नाही?अरे मी सुनिल भागवत. आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं?"
नरेशच्या डोक्यात ट्युब पेटली, 
"हो हो आठवलं.अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण! अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस?आपण तर एकाच वयाचे असू ना?"
"यार किती वर्षांनी भेटतोहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास?" सुनीलने त्याला आलिंगन दिलं "चल बसून निवांत बोलूया. लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे."
दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला "बघ यार! सुनील, या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही. उशीराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला?"
"जाऊ दे रे. हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना,  मित्रमंडळींना नाचण्याचा. करु दे त्यांना भरपूर एंजॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एंजॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का?आणि बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर्ड झालोय. तुझं काय?अजून करतोच आहेस का नोकरी?"
"नाही रे. मीसुध्दा रिटायर झालोय. पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर्ड होतांनाही शिक्षकच होतास का?"
" शेवटची दोन वर्ष हेडमास्तर होतो. म्हणजे तसा शिक्षकच!"
" तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दँटस् ए व्हेरी बोअरिंग जाँब. त्यात काही थ्रिल नाही, चँलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत. मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येतंय. दारु पिणं काय! विद्यार्थीनींवर बलात्कार काय!बापरे! या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र पार बदनाम करुन टाकलंय."
सुनील चिडला नाही. हसून म्हणाला
"शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करुन घेतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारीत्र्यहिन  शिक्षकच आले असतील. त्यातून वीसपंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणूका आहेत, वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरव्हिजन आहे, पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं नाही. बरं मला एक सांग, तू कुठल्यातरी सरकारी खात्यात होतास ना?"
" हो मी सुपर क्लास वन आँफिसर होतो. खरं तर एक मामुली क्लार्क म्हणून मी नोकरी ची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लासवन आँफिसर झालो." नरेश अभिमानाने म्हणाला, "आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करुन घेणं किती अवघड आणि चँलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत"
" वा खुप छान. पण मलाही तेच म्हणायचंय. तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का?"
" अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणंघेणं नसतं."
" शिक्षकांचीही तीच परीस्थीती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पुर्ण शिक्षण क्षेत्राला
काळीमा फासतात. त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्दयावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आपली किंमत कळते."
" पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे. माझ्याकडे बघ. मला नोकरीत असतांना किती मानमरातब मिळायचा. शिवाय माझा पगार, वरची कमाईही भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे, आलिशान गाडी आहे. मुंबई पुण्यात लक्झरीयस फ्लँट आहेत. दोन्ही मुलं बंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रग्गड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय. तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे?"
नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं.तो हलकसं हसला आणि म्हणाला
" या अगोदरही फाँरेनला कुठे गेला होतास?"
नरेशने नकारार्थी मान हलवली
"जमलंच नाही रे. कामात खुप बिझी असायचो. क्लास वन आँफिसरला वेळ कुठून असणार?"
सुनीलने स्मित केलं, 
" नरेश मी एकवीस देशात फिरुन आलोय."
" काय्य!!!काय सांगतोस?" आ वासून नरेश त्याच्याकडे पाहू लागला, 
"हो नरेश. तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परीषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय. मागच्याच महिन्यात मी कोरीयाला जाऊन आलो."
नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरुन तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं.
" बरं मला एक सांग भारतात तू कुठंकुठं जाऊन आलाहेस." सुनीलने विचारलं
" महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरु असं ठरवलं होतं"
" तुला काही आजारबिजार आहेत?"
"आहेत ना.बीपी आणि डायबेटीस. कोलँस्ट्रोलही वाढलंय. कारे असं का विचारतोस?" आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरुन हात फिरवत नरेशने विचारलं. 
"नरेश, अरे! आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीसा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? उत्तराखंडमधल्या व्हँली आँफ फ्लाँवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेला तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस. ही प्रेक्षणीय स्थळ पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत. नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहिसा झालेला असतो."
नरेश चिडून म्हणाला
"मला एवढं लेक्चर देतो आहेस. तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का?"
सुनील हसला, 
" नरेश शिक्षकी पेशा मी जाणूबुजून स्विकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं. त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्नं पहात होतो. घरच्या गरीबीमुळे ते शक्य नव्हतं. पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित, विज्ञान हे माझे आवडते विषय. त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खुप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खुप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करुन मी अख्खा भारत पालथा घातला. या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं. सायकल काढली. ग्रुप जमा केला. सायकलने नेपाळला जाऊन आलो."
"बापरे नेपाळला?" नरेश थक्क होऊन म्हणाला, 
"नुसतं नेपाळच नाही तर, गोवा, लडाख, अरुणाचल, मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो. युरोपलाही जाणार होतो पण पैशांअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहीत भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय.राँक क्लायंबिंग, रँपलिंग, व्हँली क्राँसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहित होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत  नाहीत म्हणून मी तारुण्याचा पुरेपुर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मँनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतो. त्यामुळे मँनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले. अर्थात मी ते मनावर घेतलं नाही. मी माझ्या पध्दतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो. तू ' *जिंदगी ना मिलेगी दोबारा* ' हा पिक्चर बघितलाय?"
"नाही."
" जरुर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल."
" पण कारे इतकं सगळं करत असतांना तुझं घरादाराकडे दुर्लक्ष होत असेल?" नरेशने विचारलं.
"अजिबात नाही. कारण मी या गोष्टी सुट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही. घर, परीवार, छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरुन जगलो. संगीताचीही मला आवड होती. माझा आवाज चांगला नव्हता. त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्यं शिकलो. बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन ही वाद्यं वाजवण्यात पारंगत झालो."
" पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?" नरेशने विचारलं
"आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप, फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात. मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं. अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी. मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं."
नरेशला आपलं आयुष्य आठवलं. नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं. अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं. हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही. निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल. तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.
" मीही आता ठरवलंय. उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं." नरेश म्हणाला "आताशी तर आपण साठी गाठलीये. अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला!"
" तसं झालं तर सोन्याहून पिवळं.पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो."
सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला
" डोंट वरी यार. तुही काही लवकर मरत नाहीस. आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी. बरं ते जाऊ दे. तुझी मुलं काय करताहेत? लग्नं झाली असतील ना त्यांची?"
"हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत."
नरेशचा चेहरा पडला. वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.
"घरबीर बांधलंस की नाही?"त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं
" हो तर!तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे. मुलगा चांगला कमावतोय. तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना! तुझी कार मात्र झकास आहे हं"
"तू केव्हा पाहिलीस?" नरेश आनंदाने फुलून म्हणाला, 
"मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो."
"अच्छा!लग्न लागल्यावर चल. तुम्हांला गाडीतून घरी सोडतो."
"अरे मी आणलीये ना माझी गाडी. तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे. माझं काम भागतंय तिने"
नरेशचा चेहरा पडला. "अरेच्चा!आपण  कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत. मग आपण एवढा गर्व का करतोय?" त्याच्या मनात विचार आला.
तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली. अर्ध्या तासात लग्न लागलं. सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते. तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते. सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला. त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली "हे आमचे भागवत सर. यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं. शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं" तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.
सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला. त्याला आठवलं. निवृत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती. ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.

नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं. आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं. आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला. म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली. आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते. हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला. एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला. या वयातही संगीत आपल्याला आवडतं, आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता. व.पु.काळे, चेतन भगत, पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली. स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र असं तो आजपर्यंत मानत होता. पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला. एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली. सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं. आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला. सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं.

  सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते. ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं. आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.

     टुरला दोन दिवस बाकी होते. तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता. जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले. चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली. कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला. पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला. त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले. सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं. घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता. अँब्युलन्स बोलवण्यात आली. त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं. ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.
"कसं वाटतंय?" त्याच्या बायकोने मीराने विचारलं. त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं. उजवा गुडघा भयंकर दुखत होता.
"मला काय झालं होतं?" खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं.
"तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता. त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय.त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे."
" मग करुन टाका. आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय."
डाँक्टर हसले
"साँरी मिस्टर नरेश. यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर. तुमची शुगर आणि बी. पी. जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही. आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत. ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल. माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही."
नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.
" जाऊ द्या. तुम्ही अगोदर बरे व्हा. मग बघू कुठे जायचं ते" ती त्याला समजावत म्हणाली " जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल!"
नरेश काही बोलला नाही. पण त्याला समजून चुकलं होतं. त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं. नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील. त्यात आनंद, उत्साह यांचा अभाव असेल. जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं. आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता. खरंच होतं ते!आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या. 'अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात' असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं. क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.

अज्ञात लेखकास सादर समर्पित

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Saturday, July 25, 2020

!!! दैवी जीवनाचे १८ नियम !!!

देह सोपवावा प्रारब्धावर।
मन गुतंवावे सद्गुरू चरणावर!!
             
शांत, समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात.

हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे तंतोतंत पालन व्हावे लागते. हे अठरा नियम रक्तात व आचरणात भिनले असता ईश्वरी कृपेचा वर्षाव होतो .

१) सतत श्वाच्छोश्वासांवर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात परमेश्वराचे नामस्मरण करावे. योग्य वेळ येताच कोणीतरी पुढील मार्ग दाखविणारा भेटतो. ही योग्य वेळ येईपर्यंत सोऽहम् साधना, नामस्मरण, स्तोत्रपठण व एकाग्र चित्ताने करण्याचा प्रयत्न करावा.

२) सतत दान करत राहावे. दानाने संपत्ती वाढते. दानाने पाप फिटते. दानाने शांती समाधान प्राप्त होते. दानाने अध्यात्मात प्रगती होते.

३) प्राप्त परिस्थितीत समाधानात राहण्यास शिकावे. समाधानात राहण्याची कला साध्य झाली असता कठीण परिस्थितीवर मात करता येते.

४) पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख, दुःख, लाभ, हानी, जय, अपजय, आरोग्य, अनारोग्य, यश, अपयश या गोष्टी प्राप्त होत असतात. दान व ईश्वरभक्ती या दोन गोष्टींनी यातील नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो. म्हणजे दु:ख, हानी, अपयश व अनारोग्य इत्यादी गोष्टींवर विजय मिळविता येतो. यासाठी सतत सत्कर्म करत राहावे.

५) स्वत: आनंदात राहावे, इतरांना आनंद देत राहावे, इतरांच्या उपयोगी पडत राहावे. तुमचा प्रत्येक परोपकार ईश्वराकडे नोंद होत असतो व आपल्याला आनंद प्राप्त होत असतो.

६) आहार, निद्रा, भय व मैथुन या गोष्टी प्राणीही करतात. त्यांचेही कुटुंब असते. समूह जीवन असते व त्यांनाही चिंता, काळजी असतात. मनुष्यात व प्राण्यात फरक इतकाच की मनुष्य परोपकार, दान व ईश्वरभक्ती करून परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त करू शकतो. हे भाग्य प्राण्यांना प्राप्त होत नाही. परंतु पूर्वजन्मातील सत्कर्मामुळे जे प्राणी सत्पुरुषांच्या सहवासात राहतात, त्या प्राण्यांना मरणोपरांत मनुष्य जन्म प्राप्त होतो.

७) नि:स्वार्थ असणे, परोपकारी असणे, प्रेमळ असणे हे ईश्वरीकृपेचे लक्षण समजावे.
 
८) सर्व येथे राहणार | काही न येई बरोबर ||
सत्कर्म आणि सदाचार | हेचि जीवाचे सांगाती ||
शाश्वत आणि अशाश्वत गोष्टी समजण्याचा प्रयत्न करावा.

९) एकाच आसनावर स्थिर बसून श्वासावर लक्ष ठेवून दररोज थोडावेळ ध्यान करावे. हळूहळू वेळ वाढवत जावे. तीन तासापर्यंत अशाप्रकारे ईश्वर चिंतन जमले की साधक ही अवस्था प्राप्त होते.

१०) मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा. कसलाही विचार न करता बराच वेळ राहता आले, की प्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मनात कुठलीही कल्पना अथवा विचार उठू देऊ नये. हे व्यवस्थितरीत्या जमू लागले, की सिद्ध साधक अशी अवस्था प्राप्त होते.

११) खूप खोल व दीर्घ श्वास घ्यावा व सावकाश सोडावा. असे बराच वेळ करत बसावे. असे केल्याने मन निर्विचार होऊ लागते. मन एकाग्र होते व हळूहळू निर्विकल्प समाधी लागू होते जर भाग्य खूपच अपवित्र असेल तर शुद्धिकरणासाठी सद्गुरू सेवा करणे आवश्यक आहे. 
अध्यात्मात प्रगती होऊ देणे व प्रगती होऊ नये म्हणून आपलेच प्रारब्ध अशा प्रकारचे खेळ खेळत असते. प्रारब्धाच्या या प्रकारावर लक्ष ठेवून ह्यावर मात करण्यासाठी सद्गुरू ची नियमित सेवा करावी लागते. तसेच सिद्धपुरुषांच्या कृपेने विहंगम मार्ग प्राप्त होतो व निर्विकल्प समाधी लागते. गुरु अथवा सिद्धपुरुषाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा शिष्याची तयारी होते तेव्हा गुरु आपोआप भेटत असतो. म्हणून सद्गुणांची कास धरा म्हणजे सिद्धपुरुषांनी कृपा करावी एवढी पात्रता येईल व निर्विकल्प समाधीचा मार्ग सापडेल. पुष्कळ वेळा असेही घडते की एखादा करुणासागर सिद्धपुरुष भक्तांना आपणहून भेटतो. परंतु भक्तांची पूर्वकर्मे जर दूषित असतील किंवा घराण्याचे प्रारब्ध जर खूपच अशुद्ध असेल तर ते अशुद्ध प्रारब्ध सत्पुरुषाची सेवा करू देत नाही किंवा सतपुरुषाबरोबर अहंकाराने वागण्याची दुर्बुद्धी देते व शेकडो जन्मानंतर आलेली संधी भक्त गमावतो. एकदा का अशी संधी गमावली की पुढचे शेकडो जन्म ईश्वराचे फटके खाण्यात जातात.
 
१२) सिद्धपुरुषा बरोबर आत एक व बाहेर एक असे कधीही वागू नये असे वागल्याने वातावरणातील देव-देवता नाराज होतात. देव - देवता अशा भक्तांची साथ सोडून देतात. वातावरणातील दुष्ट शक्ती अशा भक्तांच्या मन, बुद्धीवर ताबा मिळवितात. मग या भक्ताच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की त्याची सर्व पुण्याई नष्ट होऊन जाते. त्याला काहीही चांगले दिसत नाही. सर्वत्र दोष, दुर्गुण त्याला दिसू लागतात. पराकोटीच्या सज्जनां मध्ये सुद्धा त्याला दोष दिसू लागतात. त्यांना नावे ठेवण्यात त्याला आसुरी आनंद प्राप्त होतो. अशी माणसे मग सत्पुरुषांबरोबर व सज्जनांबरोबर आत एक व बाहेर एक अशा पद्धतीने वागू लागतात व खूप कष्टाने मिळवलेली पुण्याई नष्ट करतात. यावरून एक गोष्ट लक्षात येईल, की मनाचा सरळपणा हा एक अत्यंत बहुमूल्य सद्गुण असून, हा सद्गुण ज्याच्याकडे आहे अशी माणसे अत्यंत सात्त्विक व खूप पुण्यवान असतात.

१३) मनुष्य जन्म म्हणजे ईश्वरप्राप्तीचे प्रवेशद्वार असून, या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा मानवाने प्रयत्न करावयास हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास हवी.
 
१४) सद्गुणांनी मनुष्य देव बनतो. देवाला बाहेर शोधू नका. सद्गुणांची कास धरा आणि सत्कर्म करा देव तुमच्या हृदयात येऊन राहील.

१५) अनुलोम वीलोम प्राणायाम करा, या प्राणायामाने शरीर व मन शुद्ध होण्यास मदत होते. आहार सात्त्विक हलका व पचेल असा असावा. अमली पदार्थांचे सेवन नये. दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, ईश्वरभक्ती या सद्गुणांनी मानव महामानव बनतो. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठीच ईश्वराने आत्म्याला मानवाचा जन्म दिलेला असतो.
 
१७) पृथ्वी हे एक विश्वविद्यालय असून मानवता शिकण्यासाठी विविध योनीतील आत्म्यांना ईश्वर मानवरूपामध्ये जन्म देतो व पृथ्वीवर शिकण्यासाठी पाठवितो. येथे जे शिकत नाहीत त्यांना भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते. येथे जे अहंकाराने वागतात, स्वार्थाने वागतात, दुष्टपणा करतात अशा सर्वांना खूप कडक शिक्षा होत असतात.
 
१८) सत्ता, संपत्ती व प्रसिद्धी यांच्या मागे माणसे धावत असतात. परंतु याच गोष्टी अशांती, अस्थिरता व भिती निर्माण करतात. या गोष्टी मानवाला ईश्वरापासून दूर नेतात. माणसाने थोडे दूर रहावे. यांच्या मागून धावून मागून धावणारी माणसे  स्वत:चे इतके नुकसान करतात हजारो वर्षांनंतरसुद्धा हे नुकसान भरून येत नाही. 

वरील अठरा नियमांचे जे लोक श्रद्धेने पालन करतील ते इहलोकी व परलोकी सुखी होतील.

तर हे आहेत ते अठरा नियम. वाचा त्यावर विचार करा. पटले तर स्वीकार करा. जसे मी तुम्हांला सांगितले तसे तुम्ही सुद्धा इतरांना सांगा.

|| शुभं भवतु ||

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. 

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन.

दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. 


जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. 

म्हणजेच...
 
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 

म्हणजेच... 

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. 

बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. 

बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. 

म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. 

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना ...

म्हणजेच जिवती पुजन 

जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

-------

(फेसबुक पेज वरून साभार)

Friday, June 19, 2020

'ग्रीन टाय'

प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी सत्यकथा 👍🏼

'ग्रीन टाय'

"सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने भारतीय समाज मन अक्षरशः ढवळून निघालं आहे. कलावंत देखील याला अपवाद ठरले नसते तर नवलच. चित्रकार सुनील काळे यांच्या मनात देखील आत्महत्येचे विचार आले होते. पण त्यातून ते बाहेर पडले पण सुशांतसिंहच्या आत्महत्येने त्यांना लिहीतं केलं. आणि १५ जूनच्या सायंकाळी त्यांनी 'चिन्ह'च्या आर्टिस्ट ग्रुपवर सदर लेख पोस्ट केला. तोच लेख त्यांनी त्याचवेळी त्यांच्या फेसबुकवर देखील पोस्ट केला. अपेक्षे पेक्षाही अधिक वाचकांच्या त्या लेखावर प्रतिक्रिया आल्या. काळे सांगत होते त्यांना तर तब्ब्ल ५०-६० फोन आले. म्हणाले, 'अनेक वाचक तर अक्षरशः धाय मोकलून रडतात. काही क्षण सुचेनासं होतं.' म्हटलं हे सारे अनुभव चौराहासाठी लिहून काढा. ते सिद्धहस्त लेखक आहे. ते सारे लिहीतीलच आणि इथं पोस्ट देखील करतील, पण त्या आधी वाचूया त्यांचा मूळ लेख !"

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक, सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात... आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते... एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्ततेत खोलवर रुतत जातो. काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात... असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे.... माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते.

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले. त्याकाळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात....

मला वाई, पाचगणी, महाबळेश्वर चा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणी मध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरी चे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायिक रित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली ...

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला पुढे पाचगणी क्लब, टेबल लँड वरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो. प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे जवळपास 200 प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातील निसर्ग चित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली...  आणि पूर्ण देखील केली... आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली.

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची, सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले, ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवतांच्या व काट्याकुट्यां मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती.

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो. त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो मला कशाचेही भान राहिले नव्हते कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो आणि... अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली माझे डोळे पुसले माझे सांत्वन केले आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा. मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा चालताना देखील धावत धावत चालायचा... आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले... आणि मला म्हणाला इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार... 

तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची) फार आवश्यकता आहे जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार... 

जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्च मधला येशु तुला कधीही माफ करणार नाही.

फक्त एक महिना तु या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही ....

पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही .. 

मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही, अशी मी विनंती त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला 
मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर... तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब ...

तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तु का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे. शिवाय तु जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे.

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे... असे मी ठरवले.

दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो.

प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले.
वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता ती सगळी मुले आणि मुली माझ्या भोवती जमा झाली त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता...

शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग, नवीन तास, नव्या ओळखी नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोली भोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलीमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही...

एक शाळेचे नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो ...

हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती... 

आयझॅकने दिलेली ग्रीन टाय. 

अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.

सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते मुलं देखील नव नवीन गोष्टी शिकत होती त्याच बरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्ग चित्रे नव्याने रेखाटू लागलो. त्याकाळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .

माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले नवा स्टुडिओ बांधला.

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी 80 टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे .

ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय. 

मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तते मध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो त्याने आता लग्नही केलेले आहे. फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली, बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन  टाय .... कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात. काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात, काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात त्यानां मार्ग सापडत नसतो अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात...

ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली, व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.

जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी, सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी, सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.

असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा...

तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दुर व्हावा....

म्हणून खूप खूप शुभेच्छा !

तर अशी आहे माझी ग्रीन टाय ची आठवण..... 

मला सतत प्रेरणा देणारी........

सुनील काळे
9423966486