Monday, December 10, 2018

संधी

संधी हि नेहेमीच चालून येत असते, परंतू ती जरी चालून आली तरी ती थांबत नाही, तिला पकडावे लागते. जर पकडण्याचे टायमिंग जुळले तर आपण यशस्वी होतो.

आपल्या जीवनातही अनेक प्रसंग असेच येत राहतात, प्रत्येकाला जीवनात एक संधी मिळतेच ज्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण, अदभूत, करण्याची ती प्रेरणा असते. फार थोडे लोक अश्या मिळालेल्या संधीचे सोने करतात, व ते मोठे होतात. यशस्वी लोकांना विचारा, ते हेच सांगतील, काळाची गरज ओळखली, थोडा धोकाही पत्करला,  प्रवाह पार करून गेलो व अजून पुढची प्रगती करण्यासाठी नवीन बळ प्राप्त झाले. बहुसंख्य लोक ही संधी सोडतात म्हणून, उर्वरित आयुष्यात हालअपेष्टा सहन करतात. अयशस्वी लोक मात्र संधीला दूषणे देत राहतात, मात्र एकांतात हे मान्य करतात, मी चुकलो त्यामुळे असा राहिलो.

विधात्याने, मी म्हणतो, भिकाऱ्याला सुद्धा अशीच एक संधी दिलेली असते, परंतू ती कोणती व कशी साधायची हे न समजल्यामुळे त्याला या अवस्थेत उर्वरित आयुष्य काढावे लागते. बऱ्याच वेळेस एखादी संधी हुकली तर विधाता अजून  एखादी संधी पण देतोच, पण त्याचाही उपयोग केव्हा व कसा करायचा हे न उमगल्यामुळे उर्वरित जीवनात ससेहोलपट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीराज चौहान पेक्षा मुहम्मद घोरीला मी जास्त श्रेष्ठ मानतो, कारण पृथ्वीराज चौहानला इतके उदार होण्याची गरज न्हवती, पहिल्या वेळेस तो हरला तेव्हाच त्याला संपवला असता तर पुढचे रामायण घडलेच नसते.

होय, हे सर्व करण्यासाठी भाविष्यकाळाचा वेध घेता आला पाहिजे, उद्याच्या जगाला काय हवंय, हे ज्याला आज समजले, तो उद्याचा राजा होणार. धीरूभाई अंबानी, बिल गेट्स (विलियम हेनरी गेट्स), आपला झुकरबर्ग, असे अनेक आहेत. मानवाच्या प्रगतीतील अनेक वळणे जगाला नवीन दिशेला घेऊन गेली.

आदिमानवाने सर्वात प्रथम आगीचा शोध लावला, व जीवन थोडे सुकर झाले, मग चाकाचा शोध लागला, पुढे शस्त्रांचा शोध लावल्यामुळे स्वबचाव, व शिकार ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. दळणवळण हा विषय अनादिकालापासून मानवासाठी खूप महत्त्वाचा होता व आजही आहे. दोन पायावर चालणे, हि पहिली आणि एकमेव प्रगती शरीरात झाली, उर्वरित जलद प्रवास हा इतर वाहनांच्यामुळे होऊ लागला. घोडा हे वाहन मात्र जवळपास 5000 वर्ष जगात अग्रेसर रहिले, एकोणिसाव्या शतकापर्यंत घोडा हेच प्रमुख वाहन राहिले, ज्याला जेम्स वॉट ने निरूपयोगी ठरवले.

चहा करताना जेम्स ला वाफेचे महत्व समजले, या वाफेचा जेम्स वॉटने कसा उपयोग करायचा हे दाखवून दिल्याने, यांत्रिक युग सुरु झाले, पण त्यालाही काही मर्यादा आल्या, त्यामुळे रेल्वे इंजिनाशिवाय त्याचा फारसा वापर कुठेही झाला नाही. त्याच इंजिनात महत्वाचे फेरबदल करून, रुडॉल्फ डिझेल ने डिझेल इंजिनाचा शोध लावला. या शोधाने जग कोळशातून द्रवरूप इंधनाकडे वळले, जे साठवायला सोपे, कमी जागेत मावू शकले, अश्वशक्ती वाढली, इंजिनाचा आकार छोटा झाला, व वजन कमी झाले. आज दीडशे वर्षानंतरही रुडॉल्फने लावलेल्या इंजिनाच्या शोधात आमूलाग्र बदल झालेला नाही हे विशेष.  या शोधाचे सर्व हक्क ज्याला पेटंट म्हणतो, याची त्या काळात सोय असती व ते त्यांनी त्यावेळी घेतले असते तर आज रुडॉल्फ डिझेल हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणला गेला असता, दुर्दैव याला म्हणतात, हे इंजिन बनवताना आणि विविध प्रयोग करताना, हा जर्मन वैज्ञानिक कर्जबाजारी झाला, व त्याने बोटीतून उडीमारून आत्महत्या केली..... आज आदिवासी सोडले तर डिझेल नावाचे इंधन माहित नसणारा जगात कोणीही नसणार, पण इंधनाला कुणाचे नाव दिले गेले हे मात्र फार थोड्या लोकांना माहित आहे. तात्पर्य काय, शोध लावताना अनेक वेळा यश अपयशाला न घाबरता तोंड देणारा रुडॉल्फ आपला शोध कसा क्रांतिकारक होणार आहे हे पाहण्यासाठी थोडा धीर धरू शकला नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बरेच लोक असेच काहीतरी नाविन्यपूर्ण करताना, यश जवळ येत असता, धीर सोडतात, व अपयशाच्या खाईत लोटले जातात.

सचिन तेंडुलकर नाही का नर्व्हस नाईन्टीचा कित्तेक वेळा शिकार झाला? शेअर मार्केट मध्ये अनेक लोक असेच घाबरून पैसे घालवतात, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. संधी व काळाची वाट पहा, आलेली संधी मात्र सोडू नका.

सौजन्य: विजय लिमये, नागपूर (9326040204)

Monday, December 3, 2018

क्षमाशिल कोण?

🙎 आई की मुलं 👫

आईचा वाढदिवस असतो. घरी खूप पाहुणे येणार असतात. त्यांच्या स्वागतासाठी गडबड चालू असते. काचेच्या वस्तूंनी टेबल सजविलेले असते. आईची गडबड पाहून चार-पाच वर्षांचा मुलगा मदत करायचा प्रयत्न करत असतो; पण काम उरकण्याच्या नादात आई मुलाकडे दुर्लक्ष करीत असते. "जा बागेत जाऊन खेळ,'' आई मुलाला सांगते. मुलगा थोड्या वेळाने बागेतून धावत आई..आई करत घरात घुसतो. नेमकी त्याचवेळी आई हातात काचेच्या ग्लासचा ट्रे घेऊन निघालेली असते. मुलगा आईला धडकतो. ट्रे खाली पडून सर्व वस्तू फुटतात. सर्वत्र काचा होतात.

काम वाढले आणि चांगला सेट फुटला म्हणून आई चिडते. मुलाला खूप बोलते. मुलाला आपली चूक कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. हिरमुसून तो खोलीत जातो.

कामाच्या नादात, पाहुण्यांच्या सरबराईत मुलगा खोलीत जाऊन बसला आहे, तेच आई विसरते.

पाहुणे गेल्यावर स्वतःचे ताट वाढून घेताना तिला मुलाची आठवण येते. माझं बाळ जेवलंच नाही म्हणून ती त्याला शोधू लागते. मुलगा खोलीत झोपलेला असतो. रडून रडून अश्रू गालावर सुकलेले असतात. आईला वाईट वाटते, ती त्याला जवळ घेते. मुलगा झोपेतच हातातील फूल तिच्यापुढे करतो आणि पुटपुटतो "हॅपी बर्थ डे ममा!''

गोष्ट वाचली आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं.

मुलं आपल्यावर किती प्रेम करतात आणि आपण त्यांना नेहमीच किती वाईट बोलतो, हे लक्षात येऊन अपराधी वाटायला लागलं. अनेकदा गोष्ट अगदी क्षुल्लक असते; पण आपण त्याचा बाऊ करतो.

अनेकदा कामे करताना मुले चुका करतात, एखादा निरोप देताना घोळ घालतात; केव्हातरी खोटं बोलतात, त्यांना आवडली म्हणून लोकांची वस्तू उचलून आणतात; अगदी राग आला तर मोठ्यांना उलट मारतातही.

यामध्ये अंतर्यामी हेतू वाईट नसतो; तर त्या त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात. आपल्याला वाटणाऱ्या त्यांच्या वागण्यातल्या चुका असतात. पण खरे तर ते त्यांचे शिकणे असते. आपल्याला त्या चुकांपुरतेच बोलायचे असते, पण आपल्याकडून "वेंधळाच आहेस, आयुष्यात कधी सुधारणार नाहीस, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा जगात सापडणार नाही; जन्माला आला आहेस तेच मला छळायला,' आदी चुकीची वाक्‍ये जातात.

इतकी वाईट वाक्‍ये ऐकूनही थोड्या वेळातच मूल सर्व काही विसरते आणि आपल्याला येऊन बिलगते. गळ्यात हात टाकते- जसे काही घडलेच नाही.

जर घडलेल्या घटनेवरच शांतपणे आपण मुलाशी बोललो तर पुढे अनेक चुका टळतील. मुले खऱ्या अर्थाने शहाणी होतील.

खरंच विचार करू या, आपण जे वाईट शब्द मुलांना बोलतो ते आपण आपले मित्र, मैत्रिणी, बहीण-भाऊ, नवरा-बायको यांना वापरले तर आपले संबंध कायमचे संपतील, नाही का?

तात्पर्य : आपली मुले आपल्यापेक्षा महान आहेत. कारण ती लहान वयातच आपल्याला क्षमा करायला शिकली आहेत._

ही क्षमाशीलता आपण शिकू या का?