Thursday, September 26, 2019

अंधारातून प्रकाशाकडे .........

अंधारातून प्रकाशाकडे .........

मी खूप वर्षांपूर्वी ही तेजस्वी गोष्ट रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचली होती आणि ती मनाच्या कुपीत कायमची झाली ....
तेरा चौदा वर्षांचा  अंध  मुलगा... डेविड हार्टमन (David Hartman)  आपल्या बाबांना मोठया उमेदीने विचारतो - बाबा .. एकदम मनापासून सांगा ... मी कधी डॉक्टर होऊ शकतो का? स्वभावाने बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले बाबा आतून हलतात ... एकदम गप्प होतात ...खोल विचारात पडतात ... काय सांगायचं आपल्या या अंध मुलाला ...  पण  या अतिशय उत्साही आणि उमद्या मुलाचा तेजोभंग कसा करायचा .... म्हणतात ..."A doctor, son? Well, you will never know unless you try, will you? डॉक्टर ...मुला .... नक्कीच ... प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? तू करशील ना ...
जन्मताच डोळ्यांच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन  जन्मलेला डेविड आठ वर्षांचा होतो तेव्हा त्याला पूर्ण अंधत्व येतं ...  तेव्हा पासूनच तो आपल्या बाबांना  ... मी हे करू शकतो का... ते करू शकतो का  ... अशा अनेक गोष्टी विचारत राहतो .... दहा वर्षांचा असताना तो बाबांना विचारतो ... बाबा... मी बेसबॉल खेळू शकतो का? वेल, चल .. प्रयत्न करूया ... "Well, let's try it and see,"... त्याच्या बाबांनी त्याला सुचवलं ... त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला ... बाबांनी तो बॉल जमिनीवरून फिरवत त्याच्या दिशेने सोडायला सुरवात केली ... डेविड ...हळू हळू  बॉलच्या गतीचा आवाज ओळखून तो बॉल पकडायला शिकला ... तो बॅटिंग शिकला ... गवतावरून फिरत येणाऱ्या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला ...काही काळाने प्राविण्य मिळवता झाला ..
Realm of Possibility? काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात ... या तत्वानुसार डेविडच्या कुटुंबाने दृढनिश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी करायला सुरवात केली... काही वेळा काहीच दिसत नसल्याने तो रडायचा आणि म्हणायचा "ममा .... मी काही करू शकत नाही ... " मग त्याची आई त्याला त्याला आपल्या कुशीत घेऊन म्हणायची ... माहित आहे रे ... डेविडची बहीण ... बार्बरा मात्र कठोर होती ... अर्थात त्याच्या चांगल्या साठी ... तो त्याचं ब्रेल घडयाळ जर पहिल्या मजल्यावरच्या खोलीत विसरला ... तर तो त्याच्या बहिणीला सांगायचा ... जरा आणून देतेस का ? .... ती त्याला म्हणायची ... तू जा आणि आण... तुला काय वाटतं ... कोणीतरी कायम तुझ्या दिमतीला असणारे का ?

तर अशा गोष्टींमुळे डेविड मोठा होऊ लागला आणि त्याला नक्की कळलं की अंधत्व ही ट्रॅजेडी नाहीये... आणि नक्कीच त्याला आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास बळावत गेला. १३व्या वर्षी त्याने आई बाबा आणि बहिणीला सांगून टाकलं की मला डॉक्टर व्हायचंय .... त्याने त्याच्या शिक्षणाचा मार्ग निश्चित केला ... आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरु केला त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव Havertown's High School मध्ये घातलं. सगळ्यांना  Realm of Possibility हे माहित आणि मान्य होतं ... तरीही डेविडची डॉक्टर ... त्यातही
मनोदोषचिकित्सक (Psychiatrist)  होणं ... त्या  Realm of Possibility च्या नक्कीच शक्यतेबाहेरचं होतं .. त्यांना वाटतं होतं की डेविड नक्कीच नादान महत्वाकांक्षा बाळगतोय ... कॉलेजमधले त्याच्या शिक्षकांनी देखील त्याला खूप सांगायचा प्रयत्न केला ... तू का नाही इतर विषय बघत जे तुझ्या पात्रतेला योग्य आहेत ... इतिहास ... वगैरे .. डेविड म्हणाला ... मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये .. मला दिसत नाहीये, खरं आहे ... पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व  असतातच . माझा दृढ विश्वास आहे की जे कोणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत .... ते खरं तर अपंग आहेत .. मी
Psychiatrist व्हायचं ठरवलंय कारण मला माझ्यावर ठाम विश्वास आहे .. आणि मी डॉक्टर झाल्यावर  माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकतो ..कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्याची भेट अत्यंत हुशार ... हिरवे डोळे असलेल्या चेरील Walker या मेडिकलच्याच विद्यार्थिनींशी झाली.. नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं ... १९७२च्या वसंत ऋतूत तो कॉलेजच्या चौथ्या वर्षात असतांना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले ... त्याने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केला ... एप्रिलमध्ये त्यातल्या आठ कॉलेजनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला ... २७ एप्रिलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजच्या नकाराचं पत्र मिळालं ... त्याला मनातून वाटतं होतं की हे कॉलेज त्याला नक्की प्रवेश देईल ... डेव्ह ... मनातून एकदम खचला आणि हताश झाला .... पण जे फिडाडेल्फीया मधलं दहावं कॉलेज होतं .. Temple University School ऑफ Medicine ...  Dr. M. Prince Brigham, असिस्टंट डीन आणि प्रवेशाचे मुख्य होते ... त्यांनी डेविडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं ... त्यांनी बोर्ड मिटिंग मध्ये सांगितलं की जर आपण ऑलम्पिकच्या समितीत असतो आणि शंबर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता ... तर आपण नक्कीच त्याला धावू दिलं असतं ... डेविडने अगोदरच खूप अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरीत्या करून स्वतःला सिद्ध केलंय ... आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया तो कुठपर्यंत जातो ... बोर्डच्या सदस्यांनी ते मान्य केलं ... दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या आईचा फोन आला .. 'तुला एक पत्र आलंय .. ज्याची तू खूप वाट बघत आहेस' .... तिचा आवाज भरून आला ... तिला बोलता येईना ... त्याच्या बहिणीने ... बार्बराने फोन घेतला ... आणि सांगितलं की तू तोडलंस .. You have done it ... आणि तिला देखील अश्रू आवरले नाहीत ... तुला  Temple University ने स्वीकारलंय ... आणि डेविड आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालायला लागला ... वाट नक्कीच बिकट होती आणि त्याला त्याची उत्तम कल्पना देखील होती ... पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप .. त्याचं ध्येय दिसत होतं

सुरवातीलाच त्याला Anatomy च्या इंट्रोडक्टरी कोर्सेच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या .. हातात रबराचे ग्लोज घालून तो अनेक मोठे अवयव चाचपून ओळखायला लागला ... पण लहान अवयव विशेषतः nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोज काढावे लागले .. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधिर झाली ... हे सगळं चालू असताना डेविडने आपल्या घरात या विषयाला अनुसरुन असलेल्या अनेक विषयांची असंख्य पुस्तकं विकत घेतली ... घरची लायब्ररी अति समृद्ध करायला सुरवात केली ... या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिका विकत घेतल्या ... मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेविड आणि चेरीने लग्न केलं .. तिसऱ्या वर्षात असताना खरं आव्हान सुरु झालं ... युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये  रोग्यांना तपासणं ... त्यांना ट्रीटमेंट देणं सुरु झालं .. त्याला X-ray बघता येत नसल्याने तो कान ... डोळे ... तोंड आपल्या सहकार्यंवाचून तपासू शकत नसे ... त्याला ते X-ray चं वर्णन त्याचे सहकारी किंवा नर्स सांगेल त्याप्रमाणेच उपचार करावे लागत ... तो त्यांच्यावर अवलंबून होता ... पण डेविड अतिशय समर्थ माणूस होता .. त्याने Stethoscope आणि स्पर्श खूप विकसित केला ...

२७ मे १९७६ ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली ... त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली .. तो इतरांपेक्षा वेगळा नाहीये ... त्याला अगोदर नाही म्हणणारे प्रोफेसर्स देखील आले होते ... पदवीदान कार्यक्रमाला ... ते म्हणाले ...Devid is not normal ... he is super normal ... अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर झाला .... त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ झाला ... अनेक लोक त्याच्या जिद्दीवर ... त्याच्या अथक परिश्रमांवर ... दिगंत आत्मविश्वासावर भर भरून बोलले ... In presenting the founder's award to David, RFB President John Castles praised him "for exhibiting a triumph of the human spirit .. माणसाच्या अत्युच तेजाचं हे दर्शन आहे ... आपलं भाषण संपवताना ते पुढे म्हणाले ..... "With the example of Dr David Hartman before us, we feel renewed faith in the infinite possibilities of all people...डेविडच्या या उदाहरणाने आपल्याला नक्कीच एक नवीन विश्वास मिळालाय .... माणसाच्या काहीही गोष्ट मिळवायच्या अमर्याद शक्यतांचा .... " या अतिशय भारावलेल्या शब्दांनी सभागृहात आलेले सगळे लोक त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले ... These eloquent words brought a standing ovation for David ....

डेविडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं ... My Dad was right ..माझ्या बाबांचं बरोबर होतं ...  "You will never know unless you try"....प्रयत्न केल्या शिवाय तुला कळणार नाही ...

खरंच आपल्याकडे सगळं आणि तेही भरभरून आहे ... तरी आपण हे नाही ते नाही ... म्हणून सारखे रडत असतो ... डेविड सारखे लोक अक्षरशः आभाळाएवढे आहेत ... त्यांच्या या गोष्टीतून आपल्याला किती प्रेरणा मिळत्येय ... मला खूप आवडली ... नंतर मी त्याचे खूप रेफरन्स शोधले ... आणि अतिशय संक्षिप्तपणे ही गोष्ट तुम्हाला इथे सांगितली ....

(त्याने 'White Coat, White Cane' हे आत्मचरित्र लिहिलंय .... त्याच्यावर बहुतेक Journey from Darkness या शीर्षकाने एक डॉक्युमेंटरी किंवा टीव्ही शो केला गेलाय)

   
वाचाल तर वाचाल
📚📖📚📖📚📖📚

Tuesday, September 10, 2019

एक्झिट इंटरव्ह्य़ू

एक्झिट इंटरव्ह्य़ू

कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘तो’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते.

विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’

त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, ‘‘मी हे अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’

पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ त्याच्यासमोर ठेवत  म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ‘ऑनसाइट’ला पाठवता येईल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘कंपनीतल्या माझ्या आठ वर्षांत, जवळजवळ चार वर्ष मी ‘ऑनसाइट’ला होतो. ज्या देशांची नावंही कधी माहिती नव्हती असेही देश मी पाहून आलो. तेव्हा मला त्याचं काहीही आकर्षण नाही.’’

‘निगोसिएशन’साठी राखून ठेवलेल्या हुकमाच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हणल्यावर विषयाचा सांधा बदलत ती म्हणाली, ‘‘तू नोकरी सोडून ‘स्टार्ट-अप’ सुरू करणार असलास तर इतकंच सांगेन की, ‘लाखाचे बारा हजार करण्याचा’ यासारखा दुसरा उपाय नाही.’’ त्यावर नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहिती आहे.’’ ते ऐकून ती वैतागून म्हणाली, ‘‘मग नोकरी सोडल्यावर, तू करणार तरी काय आहेस?’’

‘‘मी वर्षभर तरी काहीही करणार नाहीये.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं ‘रुटीन’ बदलण्यासाठी, ‘लाइफस्टाइल’च्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि एक तारखेला ‘सॅलरी क्रेडिटेड’ मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वत:ला वेळ देणार आहे.’’

तिच्या कोणत्याच ‘लॉजिक’मध्ये त्याची ही उत्तरं बसत नव्हती; पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. त्या कुतूहलातूनच तिनं विचारलं, ‘‘हे एकदम असं अचानक का?’’ त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही; पण सांगतो.. हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाही. गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे. नेमकेपणाने सांगायचं झालं तर ज्या दिवशी ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’चं काय झालं ते पाहिलं.. त्याच दिवसापासून.’’

‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ हे शब्द कानावर पडताक्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी, फक्त बेचाळीस वर्षांच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला; पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हृदयरोगाची कोणतीही ‘मेडिकल हिस्ट्री’ नसतानाही असं झालं होतं. डॉक्टरांनी फक्त एका शब्दात कारण दिलं, ‘स्ट्रेस’. मग दोन दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी तीच ‘सपोर्ट स्टाफ’बरोबर गेली. तेव्हा संगणकामागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे ‘फॅमिली फोटो’ उपसून काढताना तिला जे वाटलं होतं, ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होतं. ती तिथं रडली नाही इतकंच. आज त्या सगळ्या आठवणी, पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या.

‘‘रोजचा तीन-तीन तासांचा प्रवास, प्रोजेक्टचा ताण, कायम तणावाखाली राहाणं.. का? आणि कशासाठी? हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय.’’ त्याच्या बोलण्यामुळे ती भानावर आली. आता तिला त्याचं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं; पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत. ती शांतपणे म्हणाली, ‘‘पण शेवटी व्यवहार कोणाला चुकला आहे?’’

‘‘खरं आहे. व्यवहार कोणालाच चुकलेला नाही. फक्त एकच माफक अपेक्षा आहे, की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये.’’ त्याच्या उत्तरावर ‘हं!’ असं अस्पष्टपणे ती पुटपुटली. त्याच्यासमोर नेमकी काय ‘ऑफर’ ठेवावी? याची गणितं तिच्या मनात वेगानं सुरू होती.

पण तिचा विचार पूर्ण होण्याआधी तोच म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपूर्वी आणखी एक गोष्ट घडली. एके दिवशी रात्री उशिरा, माझ्या मोठय़ा भावानं फोन करून मला त्याच्या घरी बोलावलं. त्याच्या घरी गेलो तर दादा-वहिनी डोक्याला हात लावून बसले होते. मी कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलाचं दप्तर माझ्यासमोर धरलं. त्या दप्तराच्या मागच्या कप्प्यात ‘पोर्नोग्राफी’चं मटेरियल खच्चून भरलं होतं. चित्रविचित्र पुस्तकं, स्टिकर्स आणि काय काय.. कदाचित ते कमी होतं म्हणून त्यात एक कंडोमचं पाकीटही होतं.’’

‘‘अरे बापरे!’’ अगदी नकळत ती पुटपुटली. आपली दोन्ही मुलं टीनएजर असताना आपल्याला त्यांची किती काळजी असायची.. हेही तिला आठवून गेलं; पण सर्वात वाईट गोष्ट ही होती की, दादा-वहिनी मला म्हणाले, की तूच त्याच्याशी बोल. तो आमच्याशी बोलतच नाही. घरातल्या कोणाशी मोकळेपणाने बोलत असेल तर ते फक्त तुझ्याशीच. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘कसं बोलणार? जन्मापासून तो पाळणाघरात आहे. तुमच्या करिअरच्या धावपळीत तो कधीच तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्यामुळेच आज त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नाही आहात. तसंही घरात जेव्हा असता, तेव्हाही दोघं मोबाइलवर आपापल्या ‘सोशल प्रोफाइल्स’ सांभाळण्यात दंग असता. तिथे सर्वात आधी फोटो-व्हिडीओ शेअर करण्यासाठी तुमची धडपड असते. त्या नादात तुमच्या घरातला संवाद पूर्णपणे संपलाय हे तुम्हाला जाणवतही नाही. तुमच्या घरातलं ते लॅव्हिश इटालियन मार्बल काय थंड पडेल.. इतकी तुमची नाती थंड झाली आहेत.’

‘‘मग?’’ तिनं न राहवून विचारलं.

‘‘मग काय? मीच बोललो त्याच्याशी.. आता दर आठवडय़ाला त्याला भेटतो आणि मग आम्ही काही तरी ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करतो. गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल; पण मी त्या आणेन हे नक्की.’’

‘हं!’ असं अस्पष्टपणे ती म्हणाली. इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार? हाही प्रश्न होताच; पण त्याचं बोलणं संपलं नव्हतं.

तो म्हणाला, ‘‘दादाच्या घरी जे झालं ते माझ्या घरीही होऊ शकतं. कारण आमच्या दोघांचेही आई-वडील आपापल्या मूळ गावी आहेत. त्यात माझी बायकोही ‘आयटी’मध्येच आहे. त्यामुळे जास्त वेळ घराबाहेर कोण असतं आणि घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर कोण बसतं यात आमची नेहमी स्पर्धा असते. काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. त्यात माझ्या मुलीनं आणि तिच्या मित्रमत्रिणींनी एक ‘प्रोटेस्ट’ नावाचं विनोदी नाटक सादर केलं. नाटकाचा विषय होता की, आईवडील दिवसभर आपल्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसतात, त्यामुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याचा उपहासात्मक निषेध.’’

‘‘मुलं काही वेळा खूप खरं बोलून जातात.’’ तीही तिच्या अनुभवांना स्मरत म्हणाली; पण तो गंभीर होत म्हणाला, ‘‘मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत नाही का? ‘डेडलाइन्स’च्या नावाखाली खूप वर्ष पळतोय; पण आता दमलोय. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ. कधी कधी वाटतं की, या सगळ्याला काहीही शेवट नाही. मग अचानक ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ची आठवण होते तेव्हा उगाचच वाटून जातं की, आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील. दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं. मग दमल्यावर ‘रिलॅक्स’ होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा. तेव्हा एक तर ‘ऑनलाइन शॉपिंग’ करायचं, गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं. एकीकडे मला माझी ‘स्पेस’ पाहिजे म्हणून सगळ्यापासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपलं आभासी जग ‘लाइक’ करावं हा अट्टहास धरायचा. हा काय खेळ आहे? आणि त्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे.’’

त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली, ‘‘मग तू जरा ब्रेक घे. तुझ्या राहिलेल्या सुट्टय़ा आणि थोडी ‘अनपेड सुट्टी धरून सहा महिने विचार करण्यासाठी घे म्हणजे तुझी नोकरीही राहील.’’ तिच्या या ‘ऑफर’वर तो काही बोलणार तेवढय़ात कॉफी आली. मीटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीनमधली नसल्यामुळे ती पिण्यात एक वेगळीच मजा असायची. मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेनं वाट पाहायचा. त्यामुळे दोघांनीही कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रेमधूनच उचलले. एसीमुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला.

‘वा!’ असं म्हणत त्यानं कॉफीचा पहिला घोट घेतला. ‘‘ही मुलाखत आजच संपवण्याचं आपल्याला कोणतंही बंधन नाही. तू दोन दिवस विचार कर. आपण पुन्हा भेटू. बाकी काही नाही तर कॉफीचा आणखी एक राऊंड नक्की होईल.. काय?’’ तिच्या बोलण्याचा रोख त्याला समजला. कोणत्याही परिस्थितीत त्याला राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप ‘प्रेशर’ असेल हेही त्याला जाणवलं.

कॉफीचा घोट घेत तो म्हणाला, ‘‘आपण गप्पा मारायला, कॉफी प्यायला नक्की भेटू; पण मुलाखत आजच संपवू या. माझा निर्णय पक्का आहे.’’ पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली, ‘‘पण थोडा शांतपणे विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? नोकरी तर तू सहा महिन्यांनीही सोडू शकतोस. कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नसतं हेही तुला त्या दरम्यान जाणवेल.’’

कॉफी संपवून कप टेबलावर ठेवत तो म्हणाला, ‘‘पण या ऑफरमुळे माझा उद्देश साध्य होत नाही.’’

‘‘म्हणजे?’’ त्याचं बोलणं न समजून ती म्हणाली, ‘‘म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल, हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाहीत. मी कायम हाच विचार करत राहीन, की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे. कदाचित त्यामुळे नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत मी घेणारही नाही.’’

‘‘मला नाही वाटत तसं. जर तू पर्याय शोधायचं ठरवलं आहेस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच.’’ त्याचं म्हणणं खोडत ती म्हणाली. ते ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला, ‘‘मला माझा स्वभाव माहीत आहे. नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा ‘कम्फर्ट झोन’ सोडावाच लागेल. तसेही जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय सुरू करता येत नाहीत.’’

त्याच्या बोलण्यातलं तथ्य तिला जाणवलं. तेवढय़ात तोच पुढे म्हणाला, ‘‘मला पूर्ण कल्पना आहे, की माझा हा निर्णय कदाचित व्यवहाराच्या कसोटय़ांवर चुकीचा ठरेल; पण एक नक्की आहे, आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते. नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं. खूप गोष्टी विखुरल्या गेल्यात. त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी कधी येणारही नाहीत हे मला माहीत आहे; पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे. नोकरी नसल्यावर काय? ही भीतीही आहे; पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचं आहे. कदाचित अपयशही येईल.. पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल. हा ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’ माझ्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासाचा ‘एंट्री पॉइंट’ आहे. तेव्हा मला वाटतं, आपण इथेच थांबू या.’’

आता काहीही ‘ऑफर’ दिली तरी त्याला फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याला म्हणाली, ‘‘सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो; पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात. ऑल द बेस्ट.’’ एवढं बोलून तिनं शेक-हँड करण्यासाठी हात पुढे केला. ‘‘थँक यू’’ म्हणत त्याने तिला शेक-हँड केला आणि तो तिथून बाहेर पडला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहात राहिली.. आणि बहुतेक पहिल्यांदाच, आपली बोलणी यशस्वी झाली नाहीत, याचं तिला मनापासून समाधान वाटलं.

Monday, September 9, 2019

◆ स्पर्श ◆

◆ स्पर्श ◆

आज नेहमीप्रमाणे तो आजोबांना मॉलिश करावयास आला होता .

त्याचा आणि आजोबांचा वार ठरलेला होता . या गोष्टीला आता जवळजवळ तीन वर्षे झाली होती . दर मंगळवारी सकाळी आठ ला तो यायचा व आजोबांच्या सर्वांगाला खोबऱ्याच्या तेलाने मॉलिश करायचा . तेलात स्वतःच आणलेल्या दोन कापराच्या वड्या टाकायचा . आजोबांचे दुखरे पाय , टाच , तळवे यांची मनापासून काळजी घ्यायचा . त्यांच्या मणक्यावर एक नाजूक हात फिरवायचा . आजोबांशी दिलखुलास गप्पा मारायचा . अंग चोळत असताना त्यांना विचारायचा , " काका , दुखत असेल तर सांगा . कुठे अधिक दुखत असेल तर तेही सांगा . या वयात शरीरात रक्ताच्या लहान लहान गाठी होतात . अशा मालिशमुळे त्या मोकळ्या होतात व रक्तप्रवाह सुरळीत होतो . त्यामुळे तुम्हास ताजेतवाने वाटते . "

त्याच्या मालिशचे अनेक फायदे असतीलच . मात्र तो जे बोलायचा तेच आजोबांना खूप हवे असायचे. तो जो स्पर्श करायचा त्यामुळे आजोबांना तरतरी यायची . एक वेगळीच चेतना किंवा शिरशिरी पायापासून मेंदूपर्यंत जायची . त्यांची काळजी घेणाऱ्या आजी जाऊन आता पाच वर्षे झाली होती . या पाच वर्षात त्यांच्या अंगाला , शरीराला , पायांना , पाठीला , हातांना हा खुळा सोडून अन्य कोणी आपलेपणाने  स्पर्श केलेला नव्हता . त्यानेसुद्धा या तीन वर्षात आजोबांशी मालिशच्या निमित्ताने जवळीक साधली होती . आता आजोबांची वासना ना पैशात होती , ना प्रॉपर्टीत होती . नातवंड वीस वर्षापेक्षा अधिक मोठे झाले असल्यामुळे आजोबांना किंचित टाळत असे . मुलगा आणि सुनबाई यांनी दिवसातून एखादा गोड शब्दाचा स्पर्श केला तर केला . अन्यथा खरा स्पर्श सोडाच, शब्दांच्या स्पर्शवाचून दिवस मावळायचा . खाण्याची काळजी स्वयंपाकवाली बाई तिला जशा सूचना असतील तशा घेत असे . तीच आजोबांना वेळेवर औषधांची आठवण करून देई व आजोबा औषधे घेत . एकदा आजोबा थोडे कण्हत होते . ते या कामवालीने ऐकले व आजोबांना विचारले , " काका , अंग दुखतेय काय ? "

"हो गं , पायाच्या पिंढऱ्या जरा अधिक दुखताहेत . सकाळी बागेत जाऊन आलो . तिथले नेहमीचे म्हणाले , कोणाकडून तरी चोळून घ्या . आता सांग , या घरात हे कसे शक्य आहे ? असो . गोळी घेईन . तू नको काळजी करू ."

" आजोबा , एक तेलाने अंग चोळणारा तिशीचा मुलगा आहे माझ्या माहितीचा . आमच्या भजनी मंडळात येतो व बायकांचे पाय चोळून देतो . दिसायला असा तसाच आहे . मात्र बोलायला खूप चांगला आहे . पैशासाठी हटून बसत नाही . जेवढे द्याल तेवढे घेतो . एकदा घेऊन येऊ का त्याला ? "

"थांब , आधी सूनबाईला विचारतो व नंतर बघू . उगीच तिच्या शब्दांनी कानाचे मालीश नको व्हायला . काय ?" आजोबा हसत बोलले .

कामवाली देखील हसली व तिने मान डोलावली . रात्री जेवताना आजोबांनी मुलांसमोर व सुनेसमोर हे सर्व सांगितले . मुलाचे म्हणणे पडले की रिक्षातून फिजिओथेरपिस्टकडे जाऊन या . सूनबाईना बहुतेक फिजिओथेरपिस्टचा खर्च माहीत असावा . त्यामुळे तिने नवऱ्याला गप्प केले , " अहो , बाबांची खोली तशी बाजूलाच आहे . येऊ दे ना तो माणूस . तसा तो शेवंताच्या ओळखीचा आहे आणि पैशासाठी आसुसलेला नाही असे दिसतेय . बाबा कांही दिवस त्याच्याकडून चोळून घेऊ देत व नंतर नाही गुण आला तर दवाखान्याचे बघू ना ."

चला , घरच्या हिटलरकडून हिरवा कंदील तर मिळाला . आजोबांना बरे वाटले . आता कोणी माणूस घरी येऊन त्यांच्याशी फक्त बोलणार नव्हता तर आपुलकीने हात हातात घेणार होता . भले , घेईना का थोडे पैसे ; पण स्पर्श विकत मिळणार होता . आजोबा सुखावले . दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामवालीला सांगितले की त्या मालिश करणाऱ्या माणसाला एकदा घेऊन तरी ये , म्हणून . दुसऱ्याच दिवशी तो सावळा , कपडे साधे , उंचीला असेल सव्वापाच फूट , चेहऱ्याने ओबडधोबड , त्यामुळे दिसायला असा तसाच , मुद्दाम म्हणून कोणी जवळ बोलावणार नाही असा हा तरुण तिच्याबरोबर घरी आला . तिने त्याची आजोबांशी ओळख करून दिली . " आजोबा , हा बाबू , मालिश चांगले करतो व बोलतो पण गोड ." आजोबा हसले व म्हणाले , " बाबू , माझे पाय व पिंढऱ्या खूप दुखताहेत रे . जरा चोळून देतोस ? आणि हो , पैसे किती घेणार आधीच सांग ."
" काका , मी सेवा म्हणून हे काम करतो . कोणाकडे इतकेच असे मागत नाही . तुम्ही द्याल तेवढे आनंदाने घेतो . जर नसतील पैसे तर काळजी करू नका . मी चोळतो तुमचे पाय. आणि तीन दिवस जर चोळून घ्याल तर हे पाय दुखायचेही थांबतील . हां , मला तुमच्याकडील खोबरेल तेल मात्र लागेल . " बाबूचा आश्वासक व निर्लेप आवाज ऐकून आजोबा खुश झाले . हा मुलगा गुणी आहे हे त्यांनी त्याच्या आवाजावरून ओळखले .

आजोबांकडे तेलाची बाटली होतीच . त्यांनी ती पटकन बाबूला दिली . " काका , एक वाटीही लागेल हो ." शेवंता तिथे होतीच . तिने किचनमधली वापरात नसलेली एक वाटी बाबूला आणून दिली व ती तिच्या कामाला गेली . बाबूने चमचाभर तेल वाटीत घेतले व त्यात स्वतःकडील कापराच्या दोन छोट्या वड्या घातल्या . तेलात त्या चांगल्या घोळल्या व तो आजोबांकडे वळला  . "काका , या खुर्चीवर बसा बघू . तुमची विजार गुडघ्याच्या वर घ्या व आरामात बसा . मी पायावर कुठे कुठे दाब देईन . दुखले तर लगेच मला सांगा ." आणि बाबूने आजोबासमोर बसकण मांडून त्यांचा पाय हातात घेतला सुद्धा . कितीतरी दिवसांनी कोणा परक्याचा स्पर्श त्यांच्या पायाला होत होता . तो स्पर्श झाला व कांही हव्याहव्याशा गोड झिणझिण्या आजोबांच्या मेंदूत संक्रमित झाल्या . त्यांच्या हातापायावरील केस किंचित उभे राहिले . "आजोबा , मुळीच घाबरू नका . मी खूप जोराने नाही दाबणार ", बाबू बोलला . आजोबा बाबूच्या भोळेपणावर फक्त हसले . त्याला कसे सांगणार की त्यांचे पाय अशा आपलेपणाच्या स्पर्शाला किती दिवसापासून आसुसले होते ते !

त्या दिवशी बाबूने आजोबांना चांगला पाऊण तास दिला . त्यांच्या पायाचे तळवे , बोटे , वरच्या नसा इत्यादी त्याने हळुवारपणे दाबल्या व बोटांनी दोन्ही पायांना समदिशेने मालिश केले . वरच्या नसा बोटाने दाबून दुखते किंवा काय हे तो आजोबांना विचारी . नंतर त्याने घोट्याचे मालीश केले . पिंढरी व  लवणीचे मालीश करताना मात्र आजोबा दुखल्याचा आवाज काढू लागले . बाबूने दोन्ही हातानी समप्रमाणात नाजूक जोर देऊन दोन्ही पायांचे चांगले वीस मिनिटे मालीश केले . नंतर दोन्ही गुडघे हळुवारपणे गोलाकार मालिश करून स्वतःचे समाधान करून घेतले . सर्व झाल्यावर त्याने तळव्याच्या वेगवेगळ्या जागी पाचपाचदा प्रेशर देऊन त्या त्या पॉईंटचे मालीश केले व जाता जाता सर्व बोटांना अंगठ्याच्या चिमटीत पकडून कांही वेळा दाबले . आजोबांच्या चेहऱ्यावर स्वर्गसुख स्वर्गसुख म्हणून जे कांही असते ते हेच असावे असा भास जाणवत होता .

हे सर्व चालू असताना बाबूची तोंडाची टकळी आणि आजोबांचे माहिती काढणारे प्रश्न चालूच होते . आजोबांनी एवढेच लक्षात ठेवले की बाबूचे अद्याप लग्न झालेले नाही , तो मोठ्या भावाकडे रहातो व खातो , मिळालेले पैसे तो त्याच्या वहिनीला देतो . वहिनीने सध्या त्याला एक जुनी सायकल दिली आहे . तो गावातील मोठ्या बागेत जातो व तिथे कांही लोक त्याच्याकडून दहा-वीस रुपयात मालीश करून घेतात . त्यातील दोघातिघांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांचे हाताचे , पायाचे , मानेचे देखील मालीश तो करतो . त्यातील एकीने त्याला तिच्या भजनी मंडळात नेले होते . तिथेही तो स्त्रियांच्या पायाचे व गुडघ्याचे मालीश करतो . तिथेच त्याची व शेवंताची ओळख झालेली होती . तो चौदा पंधरा वर्षांचा असताना त्याचे वडील गेले . ते मालीश करणारे म्हणून प्रसिद्ध होते . त्यांचा वसा त्याला जसा कांही वारस्यात मिळालेला असावा . तो चौथीच्या वर शिकू शकला नाही . भोळा भोळा म्हणून तो सांगकाम्याचेच काम करी . वीस वर्षांचा झाल्यानंतर त्याने कधीतरी मोठ्या बागेत एकाला मालीश करताना पाहिले व हे काम आपण खूप चांगले करू शकू असे त्याच्या लक्षात आले . बागेतील फुकट्यानी त्याला वापरून घेतले . त्यातले कांही चांगले निघाले व त्याला दोन पैसे भेटू लागले . आता भावाच्या घरी त्याचे बरे चालले आहे असे तो म्हणतो .

आजोबांना बाबू खूप आवडला . खुश होऊन त्यांनी त्याला पन्नास रुपये दिले . बाबूचा चेहरादेखील उजळला . त्याने आजोबांना सांगितले , " काका , आणखी दोन दिवस मालीश करून घ्या . तुमचे पाय दुखायचे थांबतील बघा ." आणि आजोबांनी त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा यायला सांगितले .

तीन दिवसांच्या चोळण्याने आजोबांचे पाय खरोखरच दुखायचे थांबले . त्यांनी तसे मुलाला व सुनेला सांगितले . हेही सांगितले की आता ते आठवड्यातून एकदा दर मंगळवारी त्याच्याकडून अंग मालीश करून घेतील . मुलाला नको म्हणायचे कांही कारण नव्हते व आजोबा सुनेकडुन पैसे घेत नव्हते . त्यामुळे बाबूचा मंगळवारचा फेरा नेहमीसाठी सुरू झाला . आता आजोबा त्यांच्या गरजेनुसार बाबूकडून पाय , पाठ , मान इत्यादी सर्व तेलाने रगडून घेऊ लागले . बाबूही त्यांच्यासाठी तासभर देऊ लागला . हा एक तास आजोबांसाठी स्वर्गीय अनुभव असे हे मात्र खरे ! बाबूला दोन पैसे मिळावेत म्हणून आजोबा दर रविवारी त्यांच्या छोट्या बागेत त्याला बोलवत व मित्रांना किरकोळ मालिश करावयास लावीत . आजोबांचे मित्र बाबूला कधी दहा , कधी वीस रुपये देत . आजोबांनी सर्वाना सांगितले होते की बाबू घरी येऊनही मालिश करेल . मात्र अर्ध्या तासाचे पन्नास रुपये देत चला . बाबूला त्यामुळे भरपूर काम मिळे . बाबू त्यामुळे आजोबांवर खुश होता . तो कधी कधी आजोबांच्या मुलाचे देखील संपूर्ण बॉडी मसाज करीत असे . दिवाळीच्या दोन दिवस आधी तो मुलाचे , नातवाचे व आजोबांचे स्पेशल मालिश करे . आजोबा त्याला नवीन कपडे देत . तो आता घरातील सर्वाना हवाहवासा झालेला होता . एकदा आजोबांचा नातू सायकलवरून एका खड्यात घसरला . त्याला बऱ्यापैकी मुका मार लागला . दवाखान्यात बाबूने त्याची छान काळजी घेतली . घरातील सगळे आता बाबूवर विश्वास ठेवून घरचा मेंबर मानू लागले होते . दर मंगळवारच्या आजोबांच्या मसाजचे काम न चुकता बाबू करी . बांबूच्या हजेरीत ते खरोखर तृप्त असल्यासारखे दिसत . घरचे सर्वजण बाबूला 'आजोबांचा बाबू' असे म्हणून चिडवायचा प्रयत्न करीत . पण बाबूला तो बहुमान वाटे . असे हे जगावेगळे नाते तयार झाले होते.

आज मंगळावर होता व नेहमीप्रमाणे बाबू आजोबांना मालिश करावयास आला होता . मात्र बंगल्यातील वातावरण नेहमीचे नव्हते . सगळे शांत व गंभीर होते . आजोबांचा नातू मुसमुसत होता . सूनबाईंची आणि मुलाची आजोबांच्या खोलीत ये-जा चालू होती . शेवंताने बाबूस सांगितले की डॉक्टर आले आहेत व आजोबांना तपासत आहेत . ती नेहमीप्रमाणे आजोबांना चहा-बिस्किटे घेऊन गेली . मात्र आजोबा उठले नव्हते . "काका , उठा . तुमचा चहा आणलाय ." अशी तिने जोरदार हाळी देखील दिली . मात्र काकांनी ना ओ दिली ना कूस बदलली . ती घाबरली व आपल्या मालकिणीला तिने धावत जाऊन सांगितले . सुनबाई व मुलगा लगबघीने तिथे आले खरे , आजोबांची कांहीच हालचाल त्यांना दिसेना . दोघेही घाबरले . आपल्या फॅमिली डॉक्टरना त्यांनी बोलावून घेतले . यात अर्धा तास गेलाच . नातूही उठला . आता त्याला सगळे समजत होते . तो मुसमुसु लागला. बाबू तिथे पोहोचला , त्याने दोन-तीन मिनिटात वस्तुस्थिती समजून घेतली . त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. तेवढयात डॉक्टरसाहेब बाहेर आले व त्यांनी सर्व संपल्याचे सांगितले . मृत्यू घरी झालेला असल्याने कदाचित पीएम करावे लागेल असेही ते बोलले व निघून गेले .

सर्वजण शोकग्रस्त होते . आजोबांच्या मुलाने बाबूच्या रडणाऱ्या चेहऱ्याला पाहिले व तो बाबूच्याच खांद्यावर ऑक्साबोक्सी रडू लागला . आता त्याचे सांत्वन करण्याचे काम भोळ्या बाबूला करावे लागले . बाबू त्याचे डोळे पुसू लागला . अचानक त्याला काय वाटले कोणास ठाऊक ? तो मुलाला म्हणाला , " दादा, मी मालिश करण्यासाठी आलो होतो . काका जिवंत आहेत किंवा नाहीत मला माहित नाही . पण मी अजूनही मालिश करू शकतो ना ? दादा , हे शेवटचे मालिश समजा . समजा एक तासापूर्वीच काका आपणास सोडून गेले असतील तर त्यांना माहीत होते की आज मंगळवार आहे व मी मालिशसाठी निश्चित येणार . दादा , मी काकांचे मालिश करू ? "

मुलगा बाबूच्या तोंडाकडे बघतच राहिला . त्याला काय वाटले कोणास ठाऊक ? बोलला ," अरे , माझ्याएवढाच तुझाही हक्क आहे बाबांवर . जा . खुशाल मालिश कर . पण रडू नकोस . नेहमी करतोस तसेच कर .,"  आणि बाबूने ती नेहमीची खोबरेल तेलाची वाटी उचलली . आपल्या जवळील कापुराच्या दोन वड्या त्यात खलल्या. आणि बोलला , " काका , मी आलोय . चला,  पायांना मालिश करूया ." बाबूनेच त्यांचा पायजमा गुडघ्याच्या वर घेतला व तळव्यांना किंचित तेल लावले . पायांच्या नसानांही थोडे तेल लावले व नेहमीप्रमाणे तिथे हळू हळू चोळू लागला . पायाच्या पिंढऱ्यानाही त्याने किंचित तेल लावले व खालून वर एकसारखा जोर देऊन सावकाश मालिश करू लागला . "काका , दुखत नाही ना ?" मध्येच तो बोलला . ऐकणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी गोळा झाले . मात्र बाबूची जशी कांही तंद्री लागली होती . बाबूने आजोबांचे हात हातात घेतले व हाताने नेहमीप्रमाणे बोटाकडून खांद्याकडे जोर देऊन चोळू लागला .  बोटांना व हाताच्या मागच्या बाजूच्या नसाना त्याने हळुवार मालिश केले . आता त्याने पुन्हा गुडघा व मांडीला किंचित चोळले आणि पायाच्या तळव्याच्या प्रेशर पॉईंटना गोलाकार चोळून तिथे जोर देऊ लागला . "काका , तुमची मान आणि मणका आता ठीक आहेत ना ? " बाबूने हलकेच विचारले व उत्तरासाठी जसे कांही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला . त्याला आजोबांचे डोळे किंचित हलताहेत असे वाटले . " काका , उघडा डोळे आणि थोडे पालथे पडा बघू . आज मला तुमच्या पाठीलादेखील थोडे मालिश करू दे ." आजोबांनी खरेच डोळे उघडले होते . बघणाऱ्या कोणाचाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .

आजोबांनी कूस बदलली आणि पोटावर झोपले. बाबू आपल्याच तंद्रीत होता . त्याने आजोबांच्या पाठीला व मानेला हळुवार तेलाचा हात लावला व कांहीबाही बडबडत मालिश करू लागला . त्याचा स्पर्श आजोबांसाठी संजीवनी देणारा संजीवक झालेला होता . मुलगा, सुनबाई, नातू आणि शेवंता यांचे डोळे पाण्याने डबडबले होते . त्यांना ना आजोबा दिसत होते , ना बाबू . एका अघटीताचे ते साक्षीदार होते !

🙏🙏

आनंद बावणे . इचलकरंजी.