"कुलकर्णी अहो कुलकर्णी" चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली तसं कुलकर्णींनी दार उघडलं.
"या या चव्हाण काका. कसं काय येणं केलंत?"
"अहो तुमच्या ओळखीचा कुणी घरगुती मेसवाला आहे जो घरी डबा पाठवू शकेल?"
"माझ्या परीचयाचा तर कुणी नाही.पण मंजूला माहित असेल. ती आता आंघोळीला गेलीये. तुम्ही या ना. आत बसा. येण्यातच आहे ती"
चव्हाण आत जाऊन बसले. कुलकर्णी आणि त्यांचा पंधरा वर्षांचा शेजार. पण आज ते पहिल्यांदाच त्यांच्या घरात बसले होते. त्यांनी घरभर नजर टाकली. त्यांच्या दोन मजली बंगल्याच्या मानाने खुप लहान असलं तरी चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं.
"का तुमचा डबेवाला आज येणार नाहिये का?"
कुलकर्णींनी विचारलं.
"अहो आज सकाळीच त्याचा फोन आला होता.त्याचा भाऊ वारला. गावी जातोय. त्यामुळे १३ दिवस डबा बंद राहील असं म्हंणाला."
तेवढ्यात कुलकर्णींची बायको, मंजू, बाहेर आली.. कुलकर्णींनी चव्हाणांची अडचण सांगितली.
"माझ्या ओळखीचा आहे पण तो रवीवारी डबे देत नाही"
"अरे रामा!"
"काका असं करा ना" कुलकर्णी म्हणाले "आज आमच्याकडेच जेवायला या. अनायसे आज मी पण घरीच आहे. सोबतच जेवू"
"नको नको" चव्हाण घाईघाईने म्हणाले. कुलकर्ण्यांच्या घरात जेवायच्या कल्पनेने त्यांच्या अंगावर काटा आला. "उगीच कशाला तुम्हांला त्रास. मी जाईन हाँटेलमध्ये जेवायला"
"अहो काका त्यात त्रास कसला?" मंजू म्हणाली" आमच्यासाठी मी स्वयंपाक करणारच आहे.असंही जास्तीच्या एकदोन माणसांचा स्वयंपाक आपण करतोच की.त्यामुळे तुमच्यासाठी वेगळं असं काही करावंच लागणार नाही"
"हो काका. एवढ्या वर्षात आमच्याकडे तुम्ही पहिल्यांदाच येताय तर याच जेवण करायला "कुलकर्णी आग्रहाने म्हणाले तसे चव्हाण क्षणभर चुप बसले. त्यांना नकार कसा द्यावा सुचेना. मग अनिच्छेनेच म्हणाले.
"बरं ठीक आहे. येतो मी बारा साडेबाराला. पण रात्री मी हाँटेललाच जाईन. आज रवीवार ना. आज आमचा वेगळा प्रोग्राम असतो"
तो प्रोग्राम काय असतो हे ओळखून कुलकर्णी हसले.
चव्हाण घरी आले ते मनाशी चरफडतच. खरंतर आज ते दुपारी मस्त दारु पिऊन, नाँनव्हेजचं जेवण करुन संध्याकाळपर्यंत ताणून देणार होते. पण या डबेवाल्याने दगा दिला. त्यात ते कुलकर्ण्याकडे जेवावं लागणार. रविवारची सगळी मजाच किरकिरी झाली होती.
त्यांच्या आँफिसमधल्या कुलकर्ण्याकडे एकदा ते जेवायला गेले होते. कसलं मिळमिळीत आणि बेचव जेवण ते! तेव्हापासून कुलकर्णी आडनावाच्या माणसाकडचं काहीही खायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं होतं.शेजारच्या कुलकर्णींचे बरेच नवनवीन पदार्थ घरी यायचे. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई त्यांना "अहो खुप छान आहे. खाऊन तर पहा" असे नेहमी म्हणायच्या पण चव्हाण साफ नकार द्यायचे.
चव्हाण असेही एकलकोंड्या स्वभावाचे. आपण बरे आणि आपलं काम बरं अशी त्यांची पाँलिसी. तसे ते पिढीजात श्रीमंत त्यात एका मोठ्या बँकेच्या जनरल मँनेजर पदावरुन ते निव्रुत्त झालेले. मानमरातब आणि पैसा दोन्हींनी ते सम्रुद्ध होते. काँलनीतील सर्वात आलिशान बंगला त्यांचाच होता. दोन्ही जुळी मुलं इंजीनियर झालेली. एक अमेरिकेत होता तर एक नेदरलँडमध्ये. दोन्ही सुनाही इंजीनियर. त्याही नोकरी करीत होत्या.चव्हाणांची पाचही बोटं तुपात होती. त्यांना या सर्व गोष्टींचा गर्व होता. काँलनीतल्या लोकांना ते तुच्छ समजत. अर्थातच कुणाच्याही घरी स्वतःहून जाणं त्यांना अपमानास्पद वाटायचं. त्याउलट सरस्वतीबाई होत्या. शेजारीपाजारी, काँलनीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी होत. अडीअडचणीला नातेवाईक नाही तर शेजारीच कामास येतात असं त्यांचं म्हणणं होतं. याउलट पैसा फेकला की सगळ्या अडचणी दुर होतात, सुखं पायाशी लोळण घेतात असं चव्हाणांचं ठाम मत होतं. मात्र मागच्या वर्षी सरस्वतीबाई कँन्सरने वारल्या आणि चव्हाणांच्या या मताला भगदाडं पडली. पैसा देऊनही स्वयंपाकाला आणि घरकामाला बाई मिळेना. घरातली छोटीछोटी कामं जी सरस्वतीबाई शेजारपाजारच्या मुलांना सांगून फुकटात करुन घ्यायच्या त्यासाठी पैसे देऊनही माणसं मिळेनात. चव्हाणांचा माणूसघाणा स्वभाव माहीत असल्याने शेजारपाजारचे त्यांच्याकडे फिरकत नसतं. आधीच एकलकोंडे असलेले चव्हाण आता तर जणू अज्ञातवासातच गेले होते.
साडेबारा झाले तसा चव्हाणांचा मोबाईल वाजला. 'जेवण तयार आहे. या जेवायला' कुलकर्णींनी सांगितलं. घराला कुलूप लावून चव्हाण निघाले खरे पण त्यांच्या अतिशय जीवावर आलं होतं. कुठून हो म्हंटलं असं त्यांना झालं होतं. डायनिंग टेबलवर बसतांनाही ते नाराजच होते. ताटामधल्या पदार्थांवर त्यांनी नजर टाकली. वाट्यांमधल्या कमी तेलाच्या भाज्या पाहून त्यांना सरस्वतीबाईंच्या मसालेदार, तेलाचा भरपुर तवंग असलेल्या भाज्यांची आठवण झाली आणि त्यांना त्या जेवणाचा तिटकारा वाटू लागला.
"करा काका सुरुवात" कुलकर्णी म्हंटले तसा त्यांनी अनिच्छेनेच घास घेतला. त्यांना चव कळली नाही म्हणून त्यांनी दुसरा घास घेतला, मग तिसरा आणि त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी दुसऱ्या भाजीचीही चव घेतली. तिचीही चव सुरेख होती. पोळ्या तर इतक्या छान होत्या की त्यांच्याकडे पाहूनच भुक वाढत होती. कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं. स्वतःच्या नकळत ते जेवणावर तुटून पडले. "काका व्यवस्थित होऊ द्या" कुलकर्णी म्हणाले पण चव्हाणांचं लक्ष होतं कुठे! नेहमी ते दोन पोळ्या खायचे. आज पाच पोळ्या खाऊनही त्यांचं समाधान होईना. वरणभात, अळूच्या वड्या खाऊन त्यांनी श्रीखंडाची वाटी हातात घेतली. एक चमचा तोंडात टाकल्याबरोबर त्यांच्या तोंडातून "अप्रतिम" शब्द बाहेर निघून गेला.
"कुठून आणलंय श्रीखंड, मंजूताई?"
"कुठूनच नाही.घरी बनवलंय" मंजूताई हसत म्हणाल्या.
"काय? अशक्य! इतकं छान श्रीखंड घरी बनूच शकत नाही. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात इतकं स्वादिष्ट श्रीखंड खाल्लेलं नाही"
"अहो खरंच घरी बनवलंय. बरं जाऊ द्या. कसं वाटलं जेवण?" कुलकर्णींनी विचारलं.
"अप्रतिम! काहो मंजूताई कमी तेल, तिखट, मसाला वापरुनही तुमच्या भाज्या इतक्या टेस्टी होतात कशा" हा प्रश्न आहे की काँम्प्लिमेंट या गोंधळात मंजूताई फक्त हसल्या.
बैठकीत बसल्यावर पंधरा मिनीटांनी कुलकर्णीच्या मुलीने ग्लासभरुन ताक आणलं. व्वा काय चविष्ट ताक होतं. चव्हाणांनी परत एक ग्लास मागून घेतलं.
"काका संध्याकाळीही या ना इथेच जेवायला"
"नको नको. संध्याकाळी माझ्या एका मित्रासोबत हाँटेलमध्ये जायचा बेत आहे. त्याने नाही म्हंटलं तर जरुर येईन."
"हो बरोबर तुमचा "तो" स्पेशल प्रोग्राम असतो नाही का?" कुलकर्णी हसत म्हणाले.
चव्हाणांनी घरी येऊन मस्त झोप काढली. उठल्यावर चहा करुन घेतल्यावर त्यांना संध्याकाळच्या जेवणाची आठवण आली. 'उगीचच आपण कुलकर्ण्यांना रात्री हाँटेलमध्ये जाणार असल्याची थाप मारली.चांगले आग्रह करत होते आपल्याला'. चरफडून त्यांनी मोबाईल काढला. सगळ्या मित्रांना फोन केले. पण एकही जण तयार झाला नाही किंवा कुणीही त्यांना जेवायचं निमंत्रण दिलं नाही. त्यांनी स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली. खरं तर सरस्वतीबाई गेल्यापासून या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकट्याने रहाणं, जेवणं आणि झोपणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. पण काही इलाज नव्हता. मुलं अशी परदेशी जाऊन बसलेली. लहानपणापासूनच शिक्षणासाठी दूर राहिल्यामुळे त्यांना घराबद्दल कधीच ओढ वाटली नाही. त्यातच चव्हाणांच्या रुक्ष, माणूसघाण्या स्वभावामुळे बापाबद्दल त्यांना कधीही प्रेम वाटलं नाही. सातत्याने बाहेर असल्याने चव्हाणांच्या कोणत्याही कामास ती आली नाही. चव्हाणांनी आपलं कर्तव्य पुर्णपणे पार पाडलं पण मुलांना त्यांच्या कर्तव्याची कधी जाणीव झाली नाही. मुलं म्हणजे म्हातारपणीच्या काठ्या असं सगळे म्हणत. पण चव्हाणांच्या या काठ्या इतक्या दूर जाऊन बसल्या होत्या की त्यांच्यापर्यंत हात पोहोचणं अशक्य होतं. सरस्वतीबाई वारल्यावर चार दिवसांनी मुलं आली. तोपर्यंत सगळे क्रियाकर्म चव्हाणांनाच करावे लागले. पंधरा दिवसांनी सगळे विधी झाल्यावर चव्हाणांनी दोन्ही मुलांना विनंती केली की 'नोकऱ्या सोडून भारतात या. पुण्यामुंबईत तुम्हाला नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी माझी. म्हातारपणात नातवंडांचं सुख तुमच्या आईला मिळालं नाही, मला तरी मिळू द्या' पण मुलांना आता आपला देश आवडेनासा झाला होता. इथली गर्दी, घाणेरडेपणा, भ्रष्टाचार यांचा त्यांना तिटकारा वाटत होता. त्यांनी चव्हाणांना सपशेल नकार दिला. उलट एक मुलगा त्यांना अमेरिकेत घेऊन गेला. पण एका आठवड्यातच चव्हाण कंटाळले. सम्रुद्धी आहे पण जीवाभावाची माणसं कुठे आहेत? मुलगा, सून कामावर निघून गेल्यावर ते एकटेच बंगल्यात असायचे.आजुबाजुच्या बंगल्यात जणू रोबोट बसले आहेत असंच त्यांना वाटायचं. एक महिना कसाबसा काढल्यावर ते दुसऱ्या मुलाकडे नेदरलँडला गेले. एक महिना युरोप दौरा केल्यावर ते कंटाळून भारतात आले. इथेही त्यांचं एकसुरी आयुष्य सुरु झालं. कधीतरी नातेवाईकांच्या साखरपुडा, लग्नाला ते जायचे. तिथे ते रमायचे. त्यांना रहावसं वाटायचं. पण बिना बायकोच्या माणसाला अशा समारंभात काहीच किंमत नसते हे त्यांच्या लक्षात आलं होतं.
एकदा त्यांच्या आँफिसच्या शिपायाच्या एकसष्ठीला त्यांना बोलावण्यात आलं होतं.शिपायाच्या मुलांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता.चव्हाण कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिपायाची मुलंमुली, सुना, जावई आणि नातवंडं यांचं गोकुळ पाहून चव्हाणांचे डोळे भरुन आले. शिपायाच्या नशीबाबद्दल त्यांना असुया तर वाटलीच पण त्यापेक्षाही जास्त स्वतःची किंव आली.
विमनस्क अवस्थेत ते घरी आले. त्यांचं एवढं मोठं,मुलं आणि त्यांच्या परीवारासाठी बांधलेलं घर आता त्यांना भुतबंगला वाटू लागलं. मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. डाँक्टरांनी मना केलेलं असतांनाही त्यांनी दारुची बाटली काढली आणि १५ मिनिटात संपवली. रात्री एक वाजता त्यांना जाग आली ती जीव घाबराघुबरा झाल्याने. छातीत डाव्या बाजुला जीवघेण्या कळा येत होत्या. ए.सी.सुरु असतांनाही अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. आपण आता मरणार हे त्यांना कळून चुकलं. कसाबसा त्यांनी फोन उचलला. नशीबाने त्यांच्या मित्राने तो ताबडतोब उचलला. "मी मरतोय.लगेच ये" एवढंच कसंबसं बोलून ते बेशुध्द पडले.
सकाळी जाग आली तेव्हा ते हाँस्पिटलमध्ये होते. मित्र आणि त्याचा मुलगा शेजारी उभे होते.
"बरं झालं आम्ही लवकर पोहोचलो. तुला हार्ट अटँक आला होता. मिलींदने ताबडतोब हालचाल करुन तुला अँडमिट केलं. तो स्वतःही डाँक्टर असल्याने इथल्या डाँक्टरांनी लगेच अँक्शन घेतल्या. नाऊ यु आर आऊट आँफ डेंजर" मित्र त्याच्या मुलाकडे अभिमानाने पहात म्हणाले. चव्हाणांनी हात जोडून त्याला नमस्कार केला.
तेव्हापासून चव्हाणांवर आहारविहाराची बंधनं आली. सुरुवातीला त्यांनी ती पाळली. पण जगून तरी काय करायचंय? आयुष्याचे उरलेले दिवस मजा मारुन घेऊ या विचाराने त्यांनी ती बंधन धुडकावून लावली.
विचाराविचारात आठ कधी वाजले ते त्यांना कळलं नाही. जड अतःकरणाने ते उठले. कुठेतरी जाऊन दोन घास पोटात टाकावे लागणार होते. त्यांनी लाईट बंद करुन दार लावलं तेवढ्यात फोन वाजला.
"काका मग तुम्ही मित्राबरोबर जाताय का जेवायला?"कुलकर्णी विचारत होते.
"नाही ते कँन्सल झालं.मी एकटाच..."
"अहो मग या ना इकडे. काही नाही फक्त खिचडी केलीये. या मी वाट बघतो"
"बरं आलोच" आनंदाने चव्हाणांच्या हातातला मोबाईल पडता पडता वाचला.
साधीच खिचडी पण अप्रतिम चव होती. सोबत कढी आणि तळलेले पापड.
"मंजूताई फार छान स्वयंपाक करता तुम्ही. असं वाटतं माझ्या डबेवाल्याला बंद करुन तुमचाच डबा सुरु करावा"चव्हाण हसताहसता मनातलं बोलून गेले.
"चालेल ना काका. मला काही प्राँब्लेम नाही." मंजूताई हसत म्हणाल्या.
"पण तुम्हांला त्याचे पैसे घ्यावे लागतील"
"अहो काका तुमचं जेवण ते काय!नको नको. काही पैसे द्यायची गरज नाही" मंजूताई निग्रहाने म्हणाल्या.
"अहो मी माझ्या डबेवाल्याला देतोच ना! तेवढेच तुम्हांला देत जाईन. हिशोबाला क्लियर असावं त्याने संबंध चांगले रहातात. काय हो कुलकर्णी?"
"काका तुमच्या समाधानासाठी द्या. आम्ही तुम्हांला कधी मागणार नाही" कुलकर्णी म्हणाले.
जेवण झाल्यावर चव्हाण म्हणाले.
"चला जेवण छान झालं.आता माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीम. चला व्हा तयार"
"अहो आजोबा मी आता चिकू शेक करणार होते" कुलकर्ण्यांची मुलगी म्हणाली.
"राहू दे बेटा तो. चला माझ्या गाडीत बसा"
रात्री चव्हाण परतले ते खुप त्रुप्त आणि समाधानी होऊन !आज त्यांना लगेच खुप शांत झोप लागली.
सकाळी ते उठले ताजेतवाने होऊन. त्यांना एकदम आठवलं त्यांनी रात्री रोजच्याप्रमाणे अँसिडिटीची गोळी घेतली नव्हती.विशेष म्हणजे त्यांना काहीच त्रास होत नव्हता. कुलकर्णीबाईंचा डबा लावून घ्यायचा निर्णय घेतला ते छानच झालं याचा त्यांना आनंद वाटला.
सात आठ दिवसांनी कुलकर्णी चव्हाणांना भेटायला आले.
"काका आमच्या गावंची दोन मुलं युपीएससीच्या कोर्सेससाठी इथे येताहेत. त्यांना शांत जागा हवी आहे. मी माझ्याच घरी ठेवून घेणार होतो. पण माझं घर पडतं लहान आणि त्यांच्यासाठी वेगळी रुम नाहीये माझ्याकडे. तुमच्या बंगल्यातील एखादी रुम देऊ शकाल का त्यांना? आमच्याच समाजाची मुलं आहेत. तुम्हांला त्रास देणार नाहीत याची जबाबदारी माझी. त्रास झाला तर सांगा मी त्यांची दुसरीकडे व्यवस्था करेन. आणि हो तुम्हाला ते भाडं पण देतील. वाटल्यास तसा करार करुन घेऊ"
चव्हाणांनी विचार केला.असंही ते एकटं राहून कंटाळले होते. या मुलांमुळे त्यांना रात्रंदिवसाची सोबत मिळणार होती.
"मला काही हरकत नाही.चार बेडरुमचा बंगला आहे आपला. एक रुम त्यांना देवू.
आणि भाड्याची काही गरज नाही. अहो आहे तो पैसा संपत नाहीये. परत वरुन भाडं कशाला?
"असं नाही काका. हिशोबाला चोख असावं असं तुम्हीच त्यादिवशी म्हणालात ना!"
चव्हाण हसले.
"बरं बरं. बोलावून घ्या त्यांना" मुलं आली. दोन्ही मुलं चव्हाणांना सभ्य वाटली. दोघंही सकाळी आठ वाजताच क्लासेसला जायची. एकला परत यायची. जेवण झालं की तीन वाजता परत क्लासला गेली की सात वाजताच परतायची. चव्हाणांना त्यांचा काहीच त्रास नव्हता. उलट चहा प्यायला आणि जेवायला त्यांना कंपनी मिळत होती. कुलकर्णींकडून आता एकाऐवजी तिघांचं जेवण येत होतं.
एक दिवस त्यातल्या एकाने देवघराकडे पाहून त्यांना विचारलं.
"काका देवघरात खुप धुळ साचलीये. तुम्ही पुजा नाही करत?"
"करतो कधीतरी मुड झाला तर. तुझ्या काकूला फार देवाचं वेड होतं. हट्टाने एवढं मोठं देवघर बनवून घेतलं. काय ट्रेजडी आहे बघ! ती देवदेव करायची तर देवाने तिला लवकर उचललं. नातवंडांचं सुख काही तिला लाभू दिलं नाही. मी नास्तिक. तर मला असं एकाकी जीवन जगायला लावतोय. मला पाटावर बसताही येत नाहीरे. कशीतरी उभ्याने करतो पुजा."
"काका प्राक्तन देवांनाही चुकलं नाहिये. आपण तर सामान्य माणसं! तुम्हांला बसायला त्रास होत असेल तर मी पुजा केलेली चालेल तुम्हांला?"
"अरे चालेल काय? पळेल. उद्यापासून तूच करत जा. आवडेल मला" चव्हाण आनंदाने म्हणाले.
दुसऱ्या दिवसापासून घरात फुलं आणि उदबत्तीचा सुवास दरवळू लागला. घंटीच्या आवाजाने घराला जाग येऊ लागली. देवघरातले देव हसू लागले. देवघराकडे क्वचितच फिरकणारे चव्हाण रोज देवाला नमस्कार करु लागले. गुरुवारी नारळ, पेढ्याचा नैवेद्य दाखवू लागले.
"काका आमच्या मित्रांनाही क्लासेससाठी इथं यायचंय. आपल्या दोन बेडरुम रिकाम्याच असतात. जमेल का त्यांना द्यायला?" एक दिवस दोघातला एक मुलगा चव्हाणांना विचारु लागला. चव्हाण विचारत पडले. तेवढ्यात दुसरा म्हणाला
"खरं तर काका आपल्या बेडरुम इतक्या मोठया आहेत की एका रुममध्ये चार बेड सहज मावू शकतील.बघा मुलांनाही सोयीस्कर होईल आणि तुम्हालाही भाडं मिळेल."
तो योग्यच म्हणत होता.असं केलं तर त्यांना घरबसल्या वीसपंचवीस हजार मिळणार होते.चव्हाणांकडे पैशाची काही कमी नव्हती. कमी होती ती माणसांची. त्यांनी निर्णय घेतला.
"ठिक आहे. मुलं मिळत असतील तर नवीन बेडची व्यवस्था करु आपण."
पुढच्याच आठवड्यात आणखी दहा मुलं घरात दाखल झाली. भुतांचं घर वाटणारा चव्हाणांचा बंगला माणसांनी गजबजून गेला. आलेली सर्व मुलं सभ्य होती. एका ध्येयाने झपाटलेली होती. चव्हाणांना त्यांचा त्रास तर नव्हताच उलट मदतच व्हायची. दुध आणणं, सकाळ संध्याकाळ चहा करणं, पंखे पुसणं, दर रवीवारी टाँयलेट साफ करणं, घरातली किरकोळ दुरुस्ती करणं, चव्हाणांची अँक्टिव्हा पंक्चर किंवा खराब झाली तर दुरुस्त करुन आणणं इत्यादी कामं मुलंच करत होती.
चव्हाणांचं काम कमी झालं पण कुलकर्णी बाईंचं वाढलं.तीनाच्या ऐवजी तेरा जणांचे डबे त्यांना करावे लागत. चव्हाणांच्या घरातल्या मुलांनी कुलकर्णी बाईंच्या स्वादिष्ट जेवणाची त्यांच्या मित्रांमध्ये तारीफ केली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेस सोडून कुलकर्णीबाईंकडे डबे सुरु केले. थोड्याच दिवसात कुलकर्णीबाईंना आपल्या घरात मेस सुरु करावी लागली. ही मेसही लगेचच फुल्ल झाली.ते पाहून चव्हाण एक दिवस कुलकर्णींना म्हणाले.
"मंजूताईंची मेस चांगलीच जोरदार चालतेय.तुम्ही गच्चीवर एखादा हाँल का नाही बांधून घेत.४०-५० लोकांची चांगली सोय होईल तिथे"
"अहो काका माझ्याही मनात तोच विचार चालू आहे.पण कर्ज मिळेल असं वाटत नाही. याच घराचं कर्ज अजून फिटलं नाहीये. त्यात माझी खाजगी नोकरी. कर्ज द्यायला बँका कटकटी करतात"
"किती खर्च येणार आहे हाँल बांधायला?"
"बिल्डरने मला ५ ते ७ लाख रुपयांचं बजेट दिलंय. पण ते ८ लाखापर्यंत जाईल असं वाटतंय".
"मी देतो तुम्हाला आठ लाख रुपये"
कुलकर्णी त्यांच्याकडे पहातच राहीले.
"अहो असं काय बघताय? मी खरंच तुम्हाला आठ लाख द्यायला तयार आहे"
"खुप खुप धन्यवाद काका" कुलकर्णी आनंदून म्हणाले. "पण किती दिवसात परत करायचे आणि व्याज किती द्यायचं?"
"अहो व्याज मागायला मी काय बँक आहे? नो इंटरेस्ट अँड टेक युअर ओन टाईम. मला घाई नाही."
"ठिक आहे काका मी पाच वर्षात तुमचे पैसे फेडेन आणि व्याज म्हणून एक लाख जास्त देईन"
चव्हाण जोरात हसले. कितीतरी नातेवाईकांना त्यांनी बायकोच्या म्हणण्यावरुन लाखो रुपये दिले होते.त्यातले फारच कमी परत मिळाले होते. कुलकर्णी म्हणजे भलतंच इमानदार प्रकरण दिसत होतं.
चव्हाणांनी एकरकमी ८ लाख कुलकर्णींना दिले. काम सुरु झालं आणि अवघ्या ३ महिन्यात पुर्णही झालं. मंजूताईंची मेस जोरदार सुरु झाली. कुलकर्णी कुटूंबाला आता फुरसत मिळेनाशी झाली. चव्हाणांचा डबा मात्र नियमित सुरु होता. विशेष म्हणजे कुलकर्णींनी कधीही त्याचे पैसे मागितले नाहीत. चव्हाण स्वतःच नेऊन द्यायचे.
श्रावण महिन्यात लागोपाठ तीन सुट्या आल्या. मुलांनी नेहमीप्रमाणे घरी न जाता नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सापुतारा अशा ट्रिपचा बेत आखला. आदल्या रात्री ते चव्हाणांना म्हणाले.
"काका तुम्हीही चला ना आमच्याबरोबर"
"अरे तरुण पोरांमध्ये हा म्हातारा कशाला हवा? तुम्ही जा. एंजॉय करा"
"काका आमचे वडील असते तर त्यांना न्यावंच लागलं असतं ना? बरं कुलकर्णी काकांना विचारु का?"
"विचारा. ते आले तर येतो"
मुलांनी कुलकर्णींना विचारलं. मेसलाही सुटी असल्याने त्यांचं पुर्ण कुटुंबच तयार झालं.
एक बस ठरवली गेली. तीन दिवस सगळ्यांनी खुप धुम केली. हिरवा, डोळ्यांना सुखावणारा निसर्ग, थंड वातावरण त्याला मंदिरांची धार्मिक जोड, चव्हाण खुप खुष झाले. सरस्वतीबाई अनेक यात्रांना जात. त्या चव्हाणांना सोबत चलायचा आग्रहही करायच्या. पण चव्हाणांना फिरण्याची जराही आवड नव्हती. असं भटकण्यापेक्षा मित्रांसोबत चिकन तंदुरी खात, दारु पित सुटी घालवायला त्यांना आवडायचं. आज मात्र आयुष्याचा खरा आनंद आपण आपल्याच कर्माने उपभोगू शकलो नाही याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली.
3 सप्टेंबरला चव्हाणांचा वाढदिवस. एरवी त्यांनी कधी साजरा केला नाही. पण आज मात्र त्यांना कशी कुणास ठाऊक सकाळीच त्याची आठवण झाली. चहा झाल्यावर त्यांनी एका मुलाला पैसे दिले आणि सांगितलं "हाँटेलमधून सगळ्यांसाठी मिसळ आणि जिलेबी घेऊन ये. शेजारच्या कुलकर्णींनाही नेऊन दे. म्हणावं आज माझा वाढदिवस आहे."
"वा वा अभिनंदन काका" सगळ्या मुलांनी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले. थोड्यावेळाने कुलकर्णी कुटूंबाने येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
" काका अगोदर माहीत असतं तर काही गिफ्ट तरी आणता आलं असतं" कुलकर्णी म्हणाले.
"आता या वयात आम्हांला कशाला हवं गिफ्ट? अहो तुमचं प्रेम हेच आमचं गिफ्ट" चव्हाण गहिवरुन म्हणाले.
"बरं काका आज माझ्या एका मित्राचाही वाढदिवस आहे. त्याने तुम्हांलाही बोलावलंय. तुम्ही त्याला ओळखत नाही. पण चला. तेवढाच चेंज. नाही का!"
"हो चालेल. तुम्ही सोबत असल्यावर आम्हांला कसला प्राँब्लेम!"
संध्याकाळी ते निघाले तेव्हा मुलंही कुठंतरी निघाली होती.
"काय कुठे निघालात?" चव्हाणांनी विचारलं.
"एका पार्टीला चाललोय काका"
"रात्री लवकर या"
"हो काका"
कुलकर्णीच्या परीवारासोबत ते एका हाँटेलजवळ आले. जसे ते हाँलमध्ये शिरले सगळे बसलेले उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. काँलनीतले बरेच जण त्यात दिसत होते. चव्हाणांना काही उलगडा होईना. कुलकर्णींनी त्यांचा हात धरला आणि त्यांना स्टेजकडे नेलं. स्टेज मागच्या भिंतीवर बरीच सजावट केली होती आणि त्यावर लिहिलं होतं "हँपी बर्थडे डियर चव्हाण काका"
"हे काय कुलकर्णी? कुणाचा वाढदिवस...?" चव्हाणांनी आश्चर्यचकीत होऊन विचारलं.
"अहो तुमचाच!तुमचा वाढदिवस नाहिये का!"
"अहो पण मला काहीच कल्पना न देता..."
" साँरी काका पण तुम्हांला सांगितलं असतं तर तुम्ही नाही म्हंटला असतात म्हणून...चला केक कापा"
तेवढ्यात त्यांच्याकडे रहाणारी मुलंही तिथे पोहोचली आणि सर्वांनी "हँपी बर्थडे टू चव्हाण काका" म्हणायला सुरुवात केली. चव्हाणांना गहिवरुन आलं. आजपर्यंत त्यांचा वाढदिवस इतका जोरदार कधीही साजरा झाला नव्हता. भरलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी केक कापला. त्याचे तुकडे त्यांनी कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराला भरवले. मुलं पुढे झाली त्यांनी चव्हाणांना केक खाऊ घातला. शेजारी उभ्या असलेल्या कुलकर्णींना चव्हाणांनी घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
कुलकर्णींनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
"आज सकाळीच चव्हाणकाकांचा वाढदिवस आहे हे त्यांच्याकडूनच कळलं. काकांची मुलं दूर परदेशात रहातात. अशावेळी काकांचा वाढदिवस आपण नाही साजरा करायचा तर कुणी करायचा! थोडी घाई झाली. त्यामुळे जसं जमलं तसं गोड मानून घ्या. काकांना आपण त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. काकांकडे रहाणाऱ्या मुलांनी मला खुप मदत केली. त्यांचा मी खुप आभारी आहे"
चव्हाण बोलायला उभे राहिले पण भावनातिरेकाने त्यांना बोलता येईना.
"मला काय बोलावं तेच कळत नाही इतकं मला गहिवरुन येतंय. अहो माझ्या मुलांनी, नातेवाईकांनी कधी माझा वाढदिवस साजरा केला नाही. कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत आणि तुम्ही..... तुम्ही माझे ना नात्याचे ना गोत्याचे... तुम्ही माझा वाढदिवस आणि तोही इतक्या जोरात साजरा करताय... माझा खरा परीवार आणि खरे नातेवाईक तर तुम्हीच आहात... खुप खुप धन्यवाद..."पुढे न बोलता आल्याने त्यांनी माईक ठेवून दिला.कुलकर्णींनी त्यांना जवळ घेतलं.
रात्री जेवण करुन चव्हाण घरी परतले तेव्हा खुप आनंदी होते. गाडीभरुन आलेले गिफ्ट्स मुलांनी घरात आणले. मुलांनी सांगितलं की वाढदिवस साजरा करायची कल्पना कुलकर्णींची होती. सगळा खर्चही त्यांनीच केला होता.
दुसऱ्या दिवशी आलेले सगळे गिफ्ट्स चव्हाणांनी मुलांना वाटून दिले. कुलकर्णींनी दिलेलं सुटचं कापड फक्त त्यांनी स्वतःसाठी ठेवलं.
त्या दिवसानंतर चव्हाण अमुलाग्र बदलले. कुणीही मदत मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही हे त्यांनी ठरवून घेतलं. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते वर्गणी मागायला आले. चव्हाणांनी झटक्यात ११ हजार काढून दिले. कधीही १०१ रुपयापेक्षा जास्त वर्गणी न देणाऱ्या चव्हाणांकडून इतके पैसे मिळालेले पाहून कार्यकर्ते आश्चर्यचकीतच झाले. गणेशोत्सवात झालेल्या कार्यक्रमात चव्हाणांना चीफ गेस्टचा मान मिळाला. गणपती गेले नवरात्र आलं. कार्यकर्त्यांनी चव्हाणांनाच मंडळाचा अध्यक्ष बनवून टाकलं. वर्गणी मागितली तर चव्हाणांनी सांगितलं "वर्गणी देणार नाही पण भंडाऱ्याचा जो ३०-४० हजार खर्च येईल तो मी करेन" कार्यकर्ते खुष झाले.
रात्रीचा दांडिया सुरु झाला. नवरात्रात कधीही बाहेर न पडणारे चव्हाण तरुण पोरांबरोबर जमेल तसा दांडिया खेळू लागले. शेवटच्या दिवशी बक्षीसांचं वाटप चव्हाणांच्या हस्ते झालं.
सात दिवसांवर दिवाळी आली आणि चव्हाणांकडे पेईंग गेस्ट म्हणून रहाणारी मुलं आपापल्या घरी निघून गेली. घर उदास वाटू लागलं. चव्हाण दिवाळीत एकटं रहाण्याच्या कल्पनेने अस्वस्थ झाले.
न रहावून त्यांनी अमेरिकेत रहाणाऱ्या मुलाला फोन केला. दिवाळीत भारतात येण्याचे प्लँन्स आहे का विचारलं. तो म्हणाला "पप्पा मी इथल्या महाराष्ट्र मंडळाचा नुकताच सेक्रेटरी झालोय. दिवाळीत बऱ्याच जणांचे पेरेंट्स इथे येणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही खुप प्रोग्राम अँरेंज केलेत. मी तुम्हालाही विचारणार होतो. पण तुम्हांला अमेरिका आवडत नाही म्हणून नाही विचारलं"
"ठिक आहे मी परेशला विचारतो"
"अहो परेशही माझ्याकडेच येणार आहे. त्याला मुलगी झाल्याचं त्याने तुम्हांला कळवलं का?"
चव्हाणांना धक्का बसला. परेश त्यांचा लाडका मुलगा. काय नव्हतं केलं त्यांनी त्याच्यासाठी. १५ वर्षांचा होईपर्यत तो खुप अशक्त होता. सारखा आजारी पडायचा. बऱ्याचदा दवाखान्यात अँडमीट व्हायचा. अनेक रात्री चव्हाणांनी त्याच्यासाठी जागून काढल्या होत्या.
"नाही बुवा त्याने मला काही कळवलं नाही" मोठ्या दुःखाने चव्हाण म्हणाले.
"विसरला असेल बहुतेक"
चव्हाणांनी नातवांची चौकशी केली.
"मजेत आहेत पण इंडियात जायला नाही म्हणतात. अहो त्यांचा जन्म इथला, संस्कार इथले, कसं आवडेल त्यांना इंडियासारख्या बँकवर्ड कंट्रीत यायला"
चव्हाणांना पुढचं ऐकवेना. थोडंसं बोलून त्यांनी फोन बंद केला.
२-३ दिवसांनी कुलकर्णींचा मुलगा आकाशकंदिल आणि लायटिंगच्या माळा घेऊन आला.
"आजोबा कुठं लावायचं हे? बाबांनी पाठवलंय."
"अरे या घरात मी एकटाच रहातो. माझ्या घरातही आहे हे तरी मी लावत नाही. घेऊन जा ते" मुलगा परत निघाला तसं त्यांनी त्याला थांबवलं
"बरं चल लावून दे. तुझ्या बाबांना वाईट वाटेल."
मुलाने लाईटींग आणि आकाशकंदील लावून दिला.
संध्याकाळी कुलकर्णी त्यांना भेटायला आले.
"काका तुमची मुलं किंवा नातेवाईक दिवाळीसाठी येणार आहेत का?"
"नाहीतर! काहो?"
"मग चला सामान पँक करा. तुम्हाला आमच्याकडे दिवाळी साजरी करायची आहे. आठवडाभर तुम्ही आमच्याकडेच रहायचंय"
चव्हाण कुलकर्णींकडे पहातच राहिले.
"अहो तुमच्या परीवारात मी बाहेरचा माणूस कशाला?"
" काय काका अजूनही तुम्ही बाहेरचेच आहात का?आम्ही तर तुम्हांला आमचाच एक सदस्य समजतो. ते काही नाही. संध्याकाळी मी तुम्हांला घ्यायला येतोय"
चव्हाणांचे डोळे भरुन आले. इतका आपलेपणा तर त्यांचे नातेवाईकसुध्दा दाखवत नव्हते.
चव्हाणांची दिवाळी मजेत गेली. कुलकर्णी कुटुंब इतकं चांगलं वागलं की त्यांना अजिबात परकेपणा जाणवला नाही. पाडव्याला मंजूताईंनी चव्हाणांना ओवाळलं. 'वडिलांच्या जागी तुम्हीच आहात' असं म्हंटल्यावर चव्हाण गहिवरले.
गप्पा सुरु झाल्यावर चव्हाण कुलकर्णींना म्हणाले.
"तुमच्या मुलांना कधीही परदेशी पाठवू नका नोकरी करायला. बघताय ना माझे काय हाल होताहेत ते!"
"अहो काका पण आपल्या देशात नोकऱ्या मिळत नाहीत. सगळीकडे नुसता भ्रष्टाचार. मुलांच्या गुणांचं चीज होत नाही, अगदी कमी पगारावर काम करावं लागतं. काही ठिकाणी अक्षरशः पिळवणूक असते. काय करायचं त्या मुलांनी? परदेशात तसं होत नाही. तुमच्यात मेरीट असेल तर चांगले जाँब्स् मिळतात, पगारही भरपुर मिळतो. अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. आता प्रश्न आईवडिलांना सांभाळण्याचा, तर तीन मुलं असूनही आईवडिलांना सांभाळणार कोण यावरुन भांडणारी आणि सरतेशेवटी त्यांना व्रुध्दाश्रमात ठेवणारी असंख्य मुलं आपल्या देशातही आहेतच ना?
"आणि सगळी मुलं तशी नसतात. माझे चुलत भाऊ आजही जाँईंट फँमिलीत रहातात. आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात" मंजूताई म्हणाल्या.
"हो ना. माझा मामेभाऊ बघा ना. मामामामी सतत आजारी असतात पण तरीही तो सांभाळतोच की त्यांना! शेवटी मुलांवरचे आपले संस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं नशीब यावर सगळं अवलंबून आहे. आता तुम्हांला अमेरिका आणि नेदरलँड आवडलं नाही म्हणून. नाहीतर तुमची मुलंही तुम्हांला सांभाळायला तयार होतीच ना?" कुलकर्णींनी विचारलं
चव्हाण चुप बसले. कुठेतरी मनात त्यांना ते पटत होतं पण मुलांबाबतची मनातली अढी काही कमी झाली नाही.
दिवाळी संपली. काँलनीतल्या रहिवाशांमध्ये मिसळू लागल्याने आता चव्हाणांना रोज फराळाची बोलावणी येऊ लागली. चव्हाणही आढेवेढे न घेता जाऊ लागले.
डिसेंबरमध्ये त्यांच्या साडूच्या मुलाचं मुंबईत लग्न होतं. चव्हाणांना सात दिवस अगोदर पासूनच निमंत्रण होतं. पहिल्यांदाच कुठलाही बहाणा न सांगता ते मुंबईला गेले. बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळाल्याने रोज मसालेदार नाँनव्हेज आणि सोबतीला दारु यावर चव्हाणांनी आडवा हात मारला. त्रुप्त होऊन ते घरी परतले ते हायपर अँसििडिटी घेऊनच.
७-८ दिवसांनी रात्री एक वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आपल्याला अटँक येतोय हे मागच्या अनुभवावरुन त्यांना कळून आलं. शेजारच्या खोलीतल्या मुलांना त्यांनी हाक मारली. मुलं धावत आली. एकाने कुलकर्णींना फोन लावला. चव्हाणांची अवस्था पाहून कुलकर्णींनी ताबडतोब त्यांना गाडीत बसवलं आणि ते त्यांना घेऊन हाँस्पिटलला गेले. तोपर्यंत चव्हाण बेशुध्द झाले होते. डाँक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सकाळी चव्हाण शुध्दीवर आले. त्यांची एंजीओग्राफी करण्यात आली. सकाळी ११ वाजता डाँक्टरांनी कुलकर्णींना बोलावून घेतलं.
"प्रकरण फार गंभीर आहे.यांची ताबडतोब बायपास करणं आवश्यक आहे. पुणे किंवा मुंबई यापैकी तुम्हांला जिथं सोयीस्कर होईल तिथे घेऊन जा. अर्थात तेही धोक्याचंच आहे पण त्याला ईलाज नाही"
"मला फक्त एक दिवस द्या. पैशांची जुळवाजुळव करावी लागेल" कुलकर्णी म्हणाले.
खरं तर चव्हाणांकडे पैशांची कमतरता नाहिये हे कुलकर्णींना माहित होतं पण या अवस्थेत त्यांना पैसे मागणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. घरी येऊन त्यांनी बायकोशी सल्लामसलत केली. मंजूताईंनी मंगळसूत्र सोडून सगळे दागिने काढून दिले. कुलकर्णी मग काँलनीत फिरले. "आता ताबडतोब तुम्हांला जेवढी जमेल तेवढी मदत करा. तुमचे पैसे परत मिळण्याची गँरंटी माझी" असं बोलून त्यांनी जवळजवळ सगळ्यांकडून पैसे घेऊन त्यांनी सगळ्यांना कच्च्या पावत्या दिल्या.संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे दहा लाख जमा झाले. पुण्याकडे निघतानिघता त्यांनी चव्हाणांच्या मोबाईलवरुन त्यांच्या मुलांचे फोन नंबर घेतले.फोन करुन त्यांना सर्व कल्पना दिली.
चव्हाणांची बायपास सर्जरी यशस्वी झाली. पंधरा दिवस कुलकर्णी आणि चव्हाणांच्या घरात रहाणारी दोन मुलं हाँस्पिटललाच राहिली.
चव्हाण म्रुत्युच्या दारावर जाऊन घरी परतले. सगळा खर्च कुलकर्णी, त्यांचे मित्र आणि काँलनीतल्या रहिवाशांनी केल्याचं त्यांना कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या सर्जरीच्या खर्चासाठी कुलकर्णीबाईंनी आपले दागिने मोडले याचं त्यांना जास्तच वाईट वाटलं. त्यांनी ताबडतोब चेकवर सह्या करुन कुलकर्णींना सगळ्यांचे पैसे फेडायला सांगितले.
कुलकर्णींच्या १५ दिवस बिनपगारी रजा झाल्या होत्या त्याचेही पैसे चव्हाणांनी त्यांना देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत.
अमेरिका आणि नेदरलँडवरुन त्यांच्या मुलांनी फोन करुन त्यांची चौकशी केली. चव्हाण त्यांच्याशी बोलले खरे पण ही मुलं अजून आपल्याला भेटायला आली नाहीत याचा त्यांना राग आला.
आपल्या आयुष्याचं आता काही खरं नाही याची चव्हाणांना जाणीव झाली होती. मरण्याअगोदर एवढ्या मोठ्या प्राँपर्टीची विल्हेवाट लावणं आवश्यक होतं. ते वकीलाकडे पोहोचले. म्रुत्युपत्र करण्याची इच्छा त्याला सांगितली.
"सांगा साहेब मी लिहून घेतो." वकील म्हणाले.
"व्रुध्दाश्रमाला दहा लाख, अनाथ मुलांच्या संस्थेला पाच लाख, युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या गरीब मुलांसाठी पाच लाख शिष्यवृत्ती, मुंबईतला फ्लँट विकून त्याची येणारी रक्कम, जी साधारण दोनतीन कोटीच्या आसपास असेल ती अंध, अपंग मुलांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. पुण्यातले दोन आणि नाशिकमधले दोन फ्लँट आणि गावातले चार प्लाँट विकून जे आठ दहा कोटी येतील त्याचं एक नाट्यगृह माझ्या पत्नीच्या नावाने बांधण्यात यावं. याची पुर्ण जबाबदारी माझे शेजारी कुलकर्णी यांना देण्यात यावी."
"तुम्ही रहाता तो बंगला कोणत्या मुलाच्या नावावर करणार आहात?" वकीलांनी विचारलं
"नाही तो बंगला माझे शेजारी कुलकर्णी यांच्या नावावर मी करणार आहे"
"काय्य्य? शेजाऱ्यांच्या नावावर? अहो साहेब, नाही मुलांच्या ,नातेवाईकांच्या नावावर तर करा. असं काय केलं त्यांनी तुमच्यासाठी?"
"अहो साहेब आज मी तुमच्यासमोर बसलो आहे ते केवळ तो माणूस आणि त्याच्या कुटूंबामुळे. माझी मुलं आणि नातेवाईकांनी मला कधीच प्रेम दिलं नाही. पण या माणसाने मला कायम वडिलांसारखी वागणूक दिली. त्याच्या कुटूंबानेही मला खुप प्रेम दिलं. मला कधी एकटं वाटू दिलं नाही. ते नसते तर मी कधीचाच मरुन गेलो असतो. माझी बायपास झाली. १५ दिवस हलला नाही तो माणूस माझ्यापासून. त्याच्या बायकोने माझ्यासाठी आपले दागिने मोडले. आजकाल कोण करतं हो एवढं परक्या माणसासाठी? तो ना माझ्या जातीचा ना पातीचा पण त्याने जे केलं त्याला तोड नाही. त्याचे उपकार मी कधीच विसरु शकत नाही. हा बंगला तर शुल्लक गोष्ट आहे." बोलताबोलता चव्हाणांना गहिवरुन आलं.
"चव्हाण साहेब कशावरुन तुमच्या प्राँपर्टीसाठी त्यांनी हे केलं नसेल?"
"वकीलसाहेब माझी ९९% लाकडं मसणात गेली आहेत. मला माणसांची पारख नाही असं तुम्हाला म्हणायचं की काय?"
वकीलसाहेब चपापले.
"कुलकर्णींच्या पुर्वजांनी आपल्याच काय बाकीच्या समाजाचा किती छळ केला हे विसरलात का चव्हाण साहेब?"
"खड्ड्यात घाला तो भुतकाळ" चव्हाण संतापाने म्हणाले "सुरुवातीला मला तेच वाटायचं. फार उशीरा मला सोन्यासारख्या शेजाऱ्यांची ओळख पटली. पण ठिक आहे देर आये दुरुस्त आये"
"गावाकडे तुमचं शेत आहे ना? त्याचं काय?"
"ते मुलांच्या नावावर करा. भारतातल्या खेड्यातले लोक कसं जीवन जगतात आणि शेती करणं किती अवघड आहे हे त्यांना त्यामुळे कळेल. त्या २०० एकर शेतावर जी माणसं जगताहेत त्यांना तसंच जगू द्यावं असं मला वाटतंय. पण तो निर्णय मुलांनी घ्यावा"
"ठिक आहे. मी बनवून ठेवतो. मग तुम्हांला सह्या करायला बोलावतो. समाधानी होऊन चव्हाण घरी परतले. संध्याकाळी कुलकर्णी घरी आले.
"काका एका व्यापारी मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी मला अमेरिकेत जायची संधी आलीये. तुमच्या मुलाचा पत्ता द्या. जमलं तर भेटेन म्हणतो"
"पत्ता देतो पण ती दोघं नवराबायको नोकरी करतात. त्यांच्याकडून चांगल्या पाहूणचाराची अपेक्षा ठेवू नका"
"छे छे! मी फक्त एक तासासाठी भेटायला जाणार आहे"
कुलकर्णी अमेरिकेत जाऊन आले. चव्हाणांच्या मुलाशी चांगल्या गप्पा झाल्या असं सांगत होते.
एक महिन्याने त्यांच्या मुलाचा अमेरिकेतून फोन आला.
"पप्पा एक आनंदाची गोष्ट सांगतो. मी आणि परेश कुटूंबासहीत भारतात येतोय. पुण्यात मला नोकरी मिळालीय आणि परेश तिथे एक इंडस्ट्री सुरु करतोय. कोथरुडला आम्ही एक बंगला खरेदी केलाय. त्यात आपण सगळे एकत्र राहू."
"काय सांगतोस काय?" चव्हाण आश्चर्य आणि आनंदाने ओरडले." अरे पण एवढा मोठा डिसीजन तुम्ही कसा काय घेतलात?"
"अहो मागच्या महिन्यात ते तुमचे शेजारी कुलकर्णी आले होते. त्यांनी आम्हांला खुप समजावलं. योगायोगाने परेशही त्यावेळी इथेच होता. तुमच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसात तरी नातवंडांचं सुख त्यांना मिळू द्या असा त्यांनी आग्रह धरला. आम्हांलाही ते पटलं. शिवाय आता मुलं मोठी होताहेत. त्यांच्यावर भारतीय संस्कार व्हावेत असंही आम्हांला वाटू लागलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला"
चव्हाणांना आनंदाने उड्या माराव्या असं वाटू लागलं.
"आणि पप्पा तुम्हांला वाटलं तर सगळी प्राँपर्टी कशी डिस्पोज करायची ते तुम्ही ठरवा. आम्हांला त्यातला एक रुपयासुध्दा नको. आम्ही तुमच्यासाठी कधीच काही केलं नाही. तुमच्या आजारपणात, जेव्हा तुम्हांला आमची खुप गरज होती तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत नव्हतो. आमचा तुमच्या संपत्तीवर काहीही हक्क नाहिये."
चव्हाणांना एकदम हायसं वाटलं.मुलांनी प्राँपर्टीसाठी तर हा निर्णय घेतला नाही ही त्यांना मघापासून छळणारी शंका फोल ठरली.
त्यांना एकदम आपल्या म्रुत्युपत्राची आठवण झाली. त्यांनी लगेच वकीलांना फोन केला.
"वकीलसाहेब मुलं भारतात परत येताहेत. मी पुण्याकडे त्यांच्याकडे रहायला जाणार आहे. आता आपल्याला म्रुत्युपत्रात काही बदल करावा लागणार आहे"
"कुलकर्णींना बंगला द्यायचा निर्णय तुम्ही बदलला की काय?" वकीलांनी हसत विचारलं
"अजिबात नाही. उलट तो अजून पक्का झालाय.कारण त्यांच्यामुळेच या चांगल्या घटना घडल्या आहेत.माझ्या नातवांसाठी मी काही ठेवू इच्छितो.आणि हो कुलकर्णींच्या मुलीच्या लग्नासाठी पाच लाख आणि मुलाच्या शिक्षणासाठी पाच लाख अँड करा. शेवटी तीही माझीच नातवंड आहेत नाही का?"
*© दीपक तांबोळी*
9503011250