Tuesday, November 17, 2020

त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक मासात येणा-या पौर्णिमेच्या तिथीलात्रिपुरारी पौर्णिमाम्हणून संबोधले जाते. असं म्हणतात ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या पौर्णिमेलाकार्तिक पौर्णिमाअसे म्हणतात. याच दिवशीदेवदिवाळीहा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी ही केवळ पाच दिवसाची असून भाऊबीजेला संपते असे सर्वसाधारण मानले जाते. पण दिवाळी ही केवळ दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. ही कार्तिक पौर्णिमा का कशासाठी साजरी करतात असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो? तसेच या पौर्णिमेचे विशेष महत्व काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या पैकी बरेच जण उत्सुक असतील.

पौराणिक पार्श्वभूमी

त्रिपूर नावाचा एक असुर होता. प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वर्षे त्याने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला आणि तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते.

त्याने देवांच्या स्थापतीकडून म्हणजेच विश्‍वकर्म्याकडून अंतराळात तीन पुरे (नगरे) बांधून घेतली होती. त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले. लोखंड, तांबे आणि चांदीची ही नगरे सुंदर दिसत होती. ती त्याने आपल्या तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशा तीन पुत्रांना दिली. हे तिघे राक्षसपुत्र प्रजेचा आणि संपूर्ण विश्‍वाचा छळ करणारे होते. उत्पात माजवणे आणि त्रास देण्यात ते आपल्या बापापेक्षा पुढे होते. त्या नगरीला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला. अखेर देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही पुरे (नगरे) जाळून टाकली आणि त्रिपुरासूराचा वध केला. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने हिंदू धर्मात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिव पूजन केले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमा याच दिवशी शिवपुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला म्हणून या दिवशी कार्तिकेयाचीही पूजा केली जाते. या दिवशी कार्तिकेय यांचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे आणि ब्राह्मणांना दीपदान करावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. विष्णूचा मत्स्यावतारही याच दिवशी झाला.

देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध

त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे ही या तिथीला देवदिवाळी असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.

वैकुंठ चतुर्दशी

त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा हरिहर पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे.



त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सव

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. या दीपोत्सवालाच त्रिपूर पाजळणे असे म्हणतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण, शेवटी असुर ते असुरच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली.

कार्तिक महिन्यातील शुध्द वा शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि इतर राक्षसांचा देवादिकांनी वध केला. म्हणून दीपावलीपासून दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली. त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असे म्हणतात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

ज्या ज्या वेळी असुरशक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेशी संबंधित ह्या कथा अशाच प्रकारच्या आहेत. सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दैवी शक्ती कशा उपयोगी असतात याचे चित्रण या कथांमधून आढळते.

दसर्‍याला केले जाणारे रावण दहन, होळीला केले जाणारे होलिका राक्षसीचे दहन वा त्रिपुरारी पौर्णिमेचे त्रिपुरासूर दहन ह्या सर्व परंपरा दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केल्याच्या आनंदाचा भाग म्हणून साजर्‍या केल्या जातात. दुष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यांचा कशा प्रकारे विनाश होतो हे या कथांमधून दिसून येते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला असल्यामुळे शंकराच्या मंदिरासमोरील त्रिपूर वातींनी उजळला जातो. पूर्वी प्रत्येक मंदिरासमोर एक दीपमाळ असायची. आताही जुन्या मंदिरांमधून ती दिसून येते. या दीपमाळेमध्ये वाती लावून त्या उजळल्या जातात. दुष्टांचा -हास कशा प्रकारे होतो याची आठवण राहावी म्हणून या दीपमाळा उजळल्या जातात. दिवाळीनंतर येणारी ही पौर्णिमा असते. या दिवशी देवस्थानातील दीपमाळा उजळतात त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडण्याचीही प्रथा आपल्याकडे आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

दीपावली असो वा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून, भगवंताच्या अगाध सामर्थ्यावर अढळ, अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते.


तीर्थक्षेत्र वाई येथील दीपोत्सव

 













Photo Credit: Google/Respective Photographer