Thursday, September 27, 2018

प्रारब्ध

!|प्रारब्धशुद्धी||

आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.

||संचित||

मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला 'संचित' असे म्हणतात.

||प्रारब्ध||

संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते.

||क्रियामाण||

या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात 'क्रियामाण'.
आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.

||दान||

आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे.  सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे. धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.

||निरपेक्षता||

अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.....

ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||
अथवा
देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक ||

10 ते 99 चा पाढा मांडण्याची सोपी पध्दत

10 ते 99 चा पाढा मांडण्याची सोपी पध्दत. हे आम्हाला शाळेत कधी शिकवले नव्हते, की दोन आकडी संख्येचा पाढा इतका सोपा आहे ते.

उदाहरणा दाखल आपण खालील अंक घेवू.

*87*

प्रथम 8 चा पाढा लिहा, त्याच्या शेजारी 7 चा.

  8            7                    87
16         14    (16+1)    174
24         21    (24+2)    261
32         28    (32+2)    348
40         35    (40+3)    435
48         42    (48+4)    522
56         49    (56+4)    609
64         56    (64+5)    696
72         63    (72+6)    783
80         70    (80+7)    870

आता  38 चा पाहू.

  3         8                   38
  6       16   (6+1)      76
  9       24   (9+2)    114
12       32   (12+3)  152
15       40   (15+4)  190
18       48   (18+4)  228
21       56   (21+5)  266
24       64   (24+6)  304
27       72   (27+7)  342
30       80   (30+8)  380
33       88   (33+8)  418
36       96   (36+9)  456

आता    92

    9         2                     92
  18         4                  184
  27         6                  276
  36         8                  368
  45       10      (45+1)460
  54       12      (54+1)552
  63       14      (63+1)644
  72       16      (72+1)736
  81       18      (81+1)828
  90       20      (90+2)920
  99       22      (99+1)1012
108       24      (108+2)1104

अशा पध्दतीने आपण10 ते 99 पर्यंत पाढे सहज लिहू शकतो.

आहे की नाही मजेशीर. मुलांना, मोठ्यांना ही *वेदिक गणिताची* माहिती पाठवा!!..

ड्रिम लाईफ


  काही लोक आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एंजॉय करतात,तर काही लोकांना आयुष्य यातनामय, वेदनादायी, शापासारखं वाटु लागतं?

आपल्याला सुखी व्हायचं असतं, म्हणजे नेमकं काय बरं हवं असतं? आपल्याला प्रामुख्याने चार गोष्टी हव्या असतात, पैसा, आरोग्य, आजुबाजुला सतत प्रेम करणारी माणसं आणि सदा आनंदी, प्रफुल्लीत, प्रसन्न मन!..
बस!, ह्या चार गोष्टी आयुष्यात मनसोक्त मिळवणं, हीच आपली ‘ड्रिम लाईफ’.

अमेरीकेत एक माणुस आहे, मागच्या चौपन्न वर्षांपासुन, तो लोकांना, आपल्या स्वप्नातली लाईफ प्रत्यक्षात कशी आणायची, याचे धडे देतो. आपल्या पुस्तकांसाठी आणि व्याख्यानांसाठी तो जगप्रसिद्ध आहे, ‘ब्रायन ट्रेसी’ त्याचं नाव!... त्याने सांगीतलेल्या टिप्स जीवनात वापरल्यामुळे, आतापर्यंत लाखो लोकांच्या जीवन सुखी आणि आनंदी झालयं. ‘ड्रिम लाईफ’ प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने दिलेल्या सात टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

१) भविष्याचा वेध घ्या – कोणतेही स्वप्न पुर्ण करण्यासाठी पहीली पायरी कोणती असते? प्लान बनवणे, मोठ्ठे निर्णय घेणं, किंवा चांगली टीम बांधणं, ही ती पहीली पायरी नसते, तर सर्वात पहीली पायरी असते, ती म्हणजे स्वप्ने डोळ्यासमोर आणणे.
मोठ्ठी स्वप्ने पहायला खरचं हिंमत लागते, हे खुप सोपं असुनही खुप कमी लोकं करतात,
आठवुन बघा, तुम्ही अनुभवलं असेल, तुमचं एखादं भव्य-दिव्य स्वप्न असेल, आणि एखाद्या साधारण कुवतीच्या माणसाला ते सांगीतलं, तर तो आपल्या बोलण्याला हसण्यावरी नेतो. कारण त्यांची स्वप्नं पाहण्याची क्षमताही मर्यादीत असते, आणि ही मर्यादाच त्यांचा मुख्य शत्रु असते.
ब्रायन ट्रेसी म्हणतात, स्वप्ने पहा, शक्य तितके मोठे स्वप्न पहा, त्यासाठी त्यांनी सांगीतलेली टेक्निक म्हणजे, भविष्याचा वेध घ्या, तुमचं आजपासुन पाच वर्ष पुढचं आयुष्य कसं असेल त्याची कल्पना करा. तुमच्या ‘परफेक्ट लाईफ’चं चित्र बारीकसारीक गोष्टींसह रंगवा, तेव्हा तुम्ही कसे असाल, कसे दिसाल, तुमचं उत्पन्न, संपत्ती किती असेल?, तुमचं आरोग्य, तुमची लाईफस्टाईल कशी असेल? याची उत्तरं स्वतःला विचारा. पैसा, आरोग्य, प्रेमळ नातेसंबंध आणि आत्मिक समाधान यांच्याबाबत जितक्या चांगल्या, आकर्षक कल्पना तुम्ही रंगवाल, तितकी लवकर तुमची स्वप्ने पुर्ण होणार आहेत. 

२) मी करतो, म्हणा – ‘जादव मोलाई पयांग’, हा मुलगा सोळा वर्षांचा असताना, १९८३ मध्ये त्याच्या राज्यात, आसाममध्ये भयंकर महाप्रचंड असा पुर आला होता, मोलाईच्या डोळ्यासमोर, भलमोठं, जंगल वाहुन गेलं होतं आणि फक्त दलदल असलेली, ओसाड जमीन शिल्लक राहीली होती, झाडं आणि हिरवळ नसल्यामुळे, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे प्राणी अचानक गायब झाले होते, मोलाईने सभोवतालच्या लोकांना सांगीतलं, आपण पुन्हा इथे झाडं लावुया, नाहीतर एके दिवशी आपणही असेच गायब होवु, तेव्हा लोक त्याच्यावर हसले, त्याने वनविभागाला झाडे लावण्यासंबंधी पाठपुरावा केला, त्याच्या तगाद्याला कंटाळुन, वनविभागाने त्याला उलट सुचवलं की तुम्ही स्वतःच हे काम केलं तर आमची हरकत नाही, आणि ते उत्तर ऐकुन मोलाई स्वस्थ बसला नाही,
सोळा वर्षांचा मोलाई, हातामध्ये कुदळ, फावडी घेऊन एकटाच निघाला, झाडे लावायला, आणि कित्येक वर्ष, त्या दलदलीत न थकता, अविरत तो झाड लावत राहीला, गेली तीस वर्ष त्याचा हा उद्योग सुरु होता, आतापर्यंत दोनशे हेक्टर म्हणजे तब्बल तेराशे पन्नास एकर परीसरावर झाडे लावण्यात तो यशस्वी झालाय. त्याने लावलेल्या झाडांचं आता अभयारण्य झालयं, शेकडो प्रकारचे प्राणी, जसं की बंगाल टायगर, म्हणजे वाघ, फक्त भारतात आढळणारे अतिदुर्मिळ गेंडे, विविध प्रकारची हरणं, चितळ, हत्ती, ससे आज तिथे आनंदाने जगतात. फक्त एका माणसाच्या दृढनिश्चयाने आणि कृतीने काय होवु शकतं, ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या जंगलला शासनानं मोलाईचं जंगल असं नाव देऊन त्याचा गौरव केलाय.
मोलाईने कोणालाही दोष दिला नाही, त्याने कुदळ उचलली आणि कामाला लागला, आपल्या आयुष्यातल्या अडचणींसाठी आपण कुणाला न कुणाला दोष देतो, सरकार, नातेवाईक, भागीदार, परिस्थिती यांना दोष देवुन आपण स्वतःची सुटका करुन घेतो, आणि ही वृत्तीच आपला घात करते.

३) थोडं अधिक (फोर्टी प्लस फॉर्मुला) – इतरांपेक्षा थोडं अधिक आयुष्य हवं असेल तर इतरांपेक्षा थोडे अधिक कष्ट करावेच लागतात. बहुतांश लोकांच्या आयुष्यात एक सुरक्षित त्रिकोण असतो, आठ त्रिक चोवीस, म्हणजे आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास झोप,….मज्जानि लाईफ….
सामान्य लोकं, आठवड्यातले, चाळीस तास काम करतात, तर ध्येयासाठी झपाटलेले लोकं, आयुष्याची काही वर्षं, आठवड्यातुन सत्तर-ऐंशी, गरज पडल्यास एकशे दहा तास देखील काम करतात, म्हणजे सुट्टी न घेता, रोज बारा-चौदा तास काम.

आणि हेच लोक, रोटी, कपड्याच्या चक्रव्ह्युवातुन लवकर बाहेर पडतात, भरघोस उत्पनाचे स्त्रोत उभे करुन लवकर सेट होतात, पुढे आयुष्याचा खरा आनंद अनुभवतात, अगदी काही महीने सुट्टी घेवुन जगभर भटकंती करायचं स्वातंत्र्यदेखील मिळवतात.

जर का संपुर्ण आयुष्य, मनाजोगती धमाल करण्यात घालवायचं असेल तर काही वर्ष कष्ट करायची तयारी ठेवायलाच हवी.

४) आयुष्यभर शिकत रहा – सामान्य लोकांचं शिक्षण हे कॉलेजमधुन बाहेर पडल्यावर संपतं, आणि ते एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत राहतात, तर यशस्वी लोकांना माहीत असतं की खरं शिक्षण कॉलेज संपल्यावर सुरु होतं, ते सतत काहीनाकाही नवीन शिकत राहतात, यांना शिकण्यासाठी आयुष्य कमी पडतं. आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात, सतत नवनवीन शिक्षण आवश्यक झालयं.

दोनशे वर्षापुर्वी, ज्याच्याकडे जमीने जास्त तो जास्त श्रीमंत मानला जायचा, शंभर वर्षापुर्वी औद्योगिक क्रांती झाली, ज्याच्याकडे कारखाने आणि कामगार जास्त त्याला श्रीमंत मानलं जाऊ लागलं, आता माहीतीचं युग आहे, ज्याच्याकडे जास्त, नॉलेज आहे, त्यालाच आज किंमत आहे.
म्हणुनच श्रीमंत लोक सतत काहीनाकाही वाचत असतात, ऐकत असतात, व्हिडीओ पाहतात, ज्यामुळे योग्य वेळी योग्य संधी आल्यास तीचं सोनं करता येईल.

म्हणुन लेखकाचा आग्रह आहे, रोज कमीत कमी अर्धा ते एक तास काहीतरी नवीन शिकण्यात व्यतित करा.

५) प्रामाणिकपणाची शक्ती – समजा, तुमचे दोन मित्र आहेत, एक सच्चा, एक लुच्चा…तुम्हाला कोणासोबत वेळ घालवायला आवडेल? खोटं बोलणारी, खोटं वागणारी लोकं कोणालाचं आवडत नाहीत, मैत्रीत अशा लोकांना स्थान नाही, तर व्यवहारात कसं असेल? ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, लोकांना अशाच लोकांसोबत व्यवहार करायला आवडते. त्याच्याकडुनच वस्तु किंवा सेवा खरेदी केली जाते. प्रामाणिक माणुस मग तो कोणत्याही वयाचा, जातीचा किंवा धर्माचा असला तरी त्याच्याकडेच ग्राहकांची रीघ असते.

सोप्या शब्दात, लेखक सांगतो, की तुमचं यश केवढं? तर इतर लोक तुमच्यावर जेवढा भरवसा ठेवतात, तेवढं!...
भरवसा टिकवण्याचा एकच उपाय आहे, नेहमी खरे बोलणे, कितीही बिकट प्रसंग असु दे, खोटे बोलायचे नाही. खरे बोलण्याने, लोक सन्मान देतात, सोबत काम करण्याच्या संधी देतात.

६) वेग वाढवा – अमेझॉनने एक रिसर्च केला, एका सेकंदाने जर त्यांची वेबसाईट स्लो झाली तर त्यांना वर्षाला दिड अरब डॉलरचं नुकसान होवु शकतं, गुगल जर पाव सेकंद स्लो झालं तरी ते वर्षाला ऐंशी लाख ग्राहक गमावेल. ह्या दोन उदाहरणांवरुन लक्षात येतं की आज आपण किती फास्ट जगात राहतोय.
एकविसाव्या नव्या शतकाचं नवं चलन आहे, ते म्हणजे वेळ. म्हणुन स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेची कदर करायला हवी. टंगळमंगळ करणार्‍या लोकांना वेळेची किंमत कळत नाही. जे वेळेला महत्व देत नाहीत, त्यांना जग महत्व देत नाही.
कोणतही काम, एकाग्र होवुन, जलदगतीने करण्याचा सराव असणारे लोक, समाजात, जास्त लोकप्रिय असतात.

७) चांगली संगत – जीवनातला पंच्याऐंशी टक्के आनंद हा त्या लोकांमूळे किंवा मित्रांमुळे मिळतो, ज्या लोकांना तुम्ही घरात किंवा कामाच्या ठिकाणी, भेटता, मनमुराद हसता, मनातलं हितगुज करता, यातुन एक उर्जा मिळते, आयुष्यात, जितके जास्त असे प्रेमाचे, नातेसंबंध असतील, तुमची प्रगती तितकी जास्त होते.
कुठल्याही व्यवसाय मैत्रीपुर्ण संबध बनवल्यानेच भरभराटीला येतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही अशा व्यक्ती नेहमी भेटतील, ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी तयार असतील, लेखक सांगतो, अशा व्यक्तींसोबत मैत्री करा. भविष्यात त्यांची तुम्हाला नक्की मदत होईल.
आनंदी जीवन जगण्याचा अजुन एक उपाय म्हणजे “मागु नका, द्या!” प्रत्येक ठिकाणी, स्वतःचा फायदा बघण्यापेक्षा, मी दुसर्‍याच्या कामी कसा येवु शकतो?, असा विचार केल्याने आपोआप समृद्धीची गुफा, आपल्यासाठी दार उघडते. 

ह्या सात मार्गांचा वापर करुन ब्रायन ट्रेसीने सुशिक्षीत बेरोजगार ते अब्जाधीश असा थक्क करणारा प्रवास केला. असाच प्रवास तुमच्याही वाट्याला येवो, अशा ट्रक भरुन शुभेच्छा!..

(थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन)

लेख आवडल्यास मनमोकळेपणाने कमेंट करा, आपल्या मित्रांचे भले होईल असे वाटल्यास शेअर करा. तुमचा प्रत्येक लाईक मला अजुन छान छान लेख लिहायला प्रोत्साहन देतो.

कशी आहेस???

कशी आहेस???

ती clinic मध्ये माझ्यासमोर खिन्न होऊन बसली होती..सुंदर चेहरा म्लान झालेला, डोळे काठोकाठ भरून आलेले,कधीही झरु लागतील असे..

गेल्या काही वर्षांपासून चांगली ओळखत होते तिला मी. ती हायस्कूल मध्ये होती तेव्हा पासून.. मस्त उत्साही, तारुण्याच्या गोडव्याने रसरसलेली, स्वतः वरच जीव जडलेली आणि म्हणूनच सर्वांना हवीहवीशी असलेली. हसतमुख, हुशार,कलासक्त, संवेदनशील आणि मनस्वी,..

सर्वांना आपली वाटणारी.. काहींना तर फारच आपली .. त्यातच तो होता.. तिला साजेसाच.. छान मैत्री होती दोघांची.. अकरावी बारावी ला एकच क्लास होता त्यामुळे क्लास, कॉलेज मिळून बराच वेळ सोबत असायचे दोघं.. एकमेकांना जपायचे, समजून घ्यायचे, आधार द्यायचे..गम्मत म्हणजे त्यांचे नाते इतके गोड इतके लोभस वाटायचे की आसपास चे सगळेच त्यात विरघळून गेलेले, केव्हाही त्यांच्या मदतीला तत्पर.. दोघांचे एकमेकांसोबत असणे इतके सहज होते की दोघांच्या घरी सुद्धा कुठलीच नाराजी, तक्रार नव्हती..
आणि या गोड गुलाबी नात्याची परिणती अटळपणे जी व्हायची तीच झाली..

दोघं शिक्षण पूर्ण करून नोकरी धंद्याला लागले.त्याने डॉक्टर होऊन आईबाबां चा वारसा चालवायला घेतला आणि ती तिच्या मनस्वी स्वभावाला अनुसरून चित्रकार झाली.. दोघांचे लग्न हा त्यांच्यात भावनेने गुंतलेल्या अनेक आप्त स्वकियांचा कौतुकाचा सोहळा होता. त्यांच्या नात्या चे लग्नात रूपांतर झालेले पाहून सर्वांनाच मनापासून आनंद आणि समाधान वाटले.

हळू हळू ती दोघेही नवीन संसारात रुळु लागली..तो मुळातच हुशार आणि त्याच्या विद्येत पारंगत असल्याने हृदयरोग तज्ञ म्हणून त्याचे चांगले नाव होऊ लागले.. ती ही घर, सणवार, नातीगोती सगळं प्रेमाने सांभाळत स्वतःची कला जोपासू लागली.. सासर च्या घराच्या भिंतींही तिच्या पेंटिंग्ज दिमाखाने मिरवू लागल्या..मधून मधून तिच्या पेंटिंग्ज बद्दल छापून येई, प्रदर्शन असे , विकली पण जायची..

पण अलीकडे दोघेही त्यांच्या त्यांच्या व्यापात गर्क झाल्याने कुठेतरी नकळतच एक अंतर आले होते आणि ह्याच जाणिवेने बेचैन होऊन ती माझ्याकडे आपले मन मोकळं करायला आली होती.
"मला ना खूप काळजी वाटतेय,तो खूप परका वाटू लागलाय अलीकडे.." ती

"असं कशा वरून वाटतं तुला? "मी

"कशावरून असं नाही सांगता येत पण त्याचं वागणं
बदललय आताशा.. कधी पण बघावं तर स्वतः तच दंग असतो.. मी आसपास असले तरी जशी काही अदृश्य असल्यासारखा वागतो" ती..

"त्याचे व्यावसायिक काम वाढले असेल ना?? दमत पण असेल बराच"मी

"मग मी काय घरात आरामात लोळत असते का?? घरचं, बाहेरचं सगळं करता करता पिट्ट्या पडतो माझा,पण त्याला काय त्याचं?? कॉलेज मध्ये असताना असा नव्हता तो,किती जपायचा मला,पण आता मोठ्ठा डॉक्टर झालाय ना?? आता ते फी देणारे पेशंट त्याचे देव झालेत, इथे मला काही दुखलं तर साधं कशी आहेस पण विचारत नाही परवा कांदा चिरताना माझं बोट कापलं गेलं तर खुशाल त्याच्या हॉस्पिटल मधल्या सिस्टर ला ड्रेसिंग करायला सांगून  निघून गेला"
बोलता बोलता तिची दुखरी नस जणू सापडली होती मला..
डॉक्टर असलेला इतरांशी आपुलकीने वागणारा सहचर आपली साधी विचारपूस देखील करत नाही ,आपल्याला गृहीत धरतो हे तिचे शल्य होते..

पुढे त्याच्यासोबत झालेल्या सेशन मध्ये त्याने मोकळेपणी आपली चूक मान्य केली तिच्यावरचं त्याचं प्रेम तसच होत फक्त ते व्यक्त करायलाच विसरत चालला होता तो..आणि हे जाणवल्यावर तो पुन्हा जपायला लागला तिला, त्याच्या प्रेमळ आधाराने तीही पुन्हा हसरी बोलकी झाली..

तात्पर्य:
तुम्हाला जर आपल्या पत्नीला, मैत्रिणीला,आईला, बहिणीला किंवा मुली ला तुमचे त्यांच्या वर असलेले प्रेम त्यांनी जाणवून घ्यावे असे वाटत असेल तर लक्षात ठेऊन दिवसातून दोनदा तिला जरूर विचारा "कशी आहेस?"...(आणि उत्तरादाखल ती जे ही बोलेल, सांगेल ते आत्मीयतेने फक्त ऐकुन घ्या,कृपा करून कुठलाही सल्ला देऊ नका) ..प्रत्येक स्त्रीची हि खूप मूलभूत गरज असते, त्यांना आवडते असे विचारलेले "कशी आहेस" आणि तेवढच पुरतं तिला खूष व्हायला आणि मग ती ही तुमच्यावर तिचे प्रेम भरभरून उधळू लागते..

#संवादिनी
©डॉ. स्वाती बारपांडे

चित्त स्थैर्यकर दत्त स्तोत्र

*चंचल चित्त स्थिर करणारे दत्तात्रेय स्तोत्र.*

संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.

*🔅चित्त स्थैर्यकर दत्त स्तोत्र 🔅*

अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते l
सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।। १।।

शरणागतदीनार्ततारकाsखिलकारक l
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।२।।

सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज l
सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।३।।

स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः l
भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।४।।

सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः l
योsभीष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।५।।

य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः l
स्थिरचित्त: स भगवत्कृपापात्रं भविष्यति ll

*ll इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं चित्तस्थैर्यकर श्रीदत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् ll*

*विवरण :-*

कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवायचे तर आपले मन एकाग्र व शांत असणे अत्यंत गरजेचे आहे. मनात येणारे नानाविध विचार नियंत्रणात आणणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अनावश्यक विचार मनात येऊच नयेत असे वाटते. त्यासाठी काही प्रयत्न करावा तर तेच विचार पुन्हा पुन्हा मनावर दुप्पट जोराने आक्रमण करतात. मग मात्र साधकाची दयनीय अवस्था होते. आपण प्रयत्न जरूर करतो, परंतु मानवी प्रयत्नांना देखील मर्यादा आहेतच. शेवटी मन आनंदी आणी शांत व्हायला दैवी कृपा देखील असायला लागते. दैवी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प.प.स्वामी महाराजांनी साधकांना हा स्तोत्ररूपी उपाय दिला आहे. ब्रम्हा, विष्णू आणी महेश या विश्वाची उत्पत्ती (निर्मिती), स्थिती (संरक्षण) आणी लय सांभाळणाऱ्या त्रिदेवतांचे एकरूप असलेल्या प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचीच या आर्त स्तोत्रातून प्रार्थना केली आहे. "हे भगवान दत्तात्रेया, माझे अत्यंत चंचल असणारे चित्त स्थिर करावे" अशी ही प्रार्थना आहे. साधकांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये ह्या प्रार्थनेचा अवश्य समावेश करावा व स्वामी महाराजांनी रचलेल्या ह्या अदभूत रचनेचा आनंद घ्यावा व आपले आयुष्य सुखी करावे.

*ll जयती वासुदेवो यति: ll*