Friday, July 13, 2018

वर्तमानातील प्रसन्न जगणे

विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, 'मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे ...'

'जाऊया की मग ... त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला..' असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो 'उद्या' आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय ... कितीतरी जणांचे 'उद्या' गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले.

पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती 'अभ्यास करत नाही चांगला, म्हणून रागवायचे मी त्याला ... आता ...?' 'नेहमी भांडायचो आम्ही ... माहेरी जाईन ... घटस्फोट देईन इतक्या थरपर्यंत जायची भांडणं, आता?' कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती ... नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो ... मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल ...

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग ...

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं ...

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत ... त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी ...

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?

शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?

Wednesday, July 4, 2018

जीवनेच्छा

जीवनेच्छा
=======

दुपारी पोटात चार घास कसेतरी ढकलून उषाताई चटईवर लवंडल्या. मुलबाळ नसलेल्या उषाताई यजमान देवाघरी गेल्यानंतर अगदीच उदास झाल्या होत्या. जगण्यातला त्यांचा सारा रसच निघून गेला होता. काहीतरी थोडेफार रांधायचे आणि आला दिवस ढकलायचा असे त्यांचे चालले होते. कधीतरीच घराबाहेर पडणाऱ्या उषाताईंना "कश्या आहात ?" असे कुणी विचारले कि त्या "अजून आहे बघा जिवंत ." असे निराश उत्तर देत असत.

त्या चटईवर पडून झोपेची आराधना करत असताना दारावर टकटक झाली. बराच वेळ त्यांनी लक्षच दिले नाही तिकडे. "दुपारच्या वेळी कोण आलंय कडमडायला ?" त्या मनाशीच पुटपुटल्या. पण टकटक काही थांबेना. तशी अनिच्छेने त्यांनी दार उघडले. दारात एक फाटक्या कपड्यातली आठ दहा वर्षाची पोर उभी होती. "आक्का, काहीतरी खायला दे ना. दोन तीन दिवस उपाशी आहे." पोर कळवळून म्हणाली. "काही नाहीये घरात. हो पुढे." असे म्हणत उषाताईंनी धाडकन दरवाजा बंद केला आणि परत येऊन चटईवर लवंडल्या.

संघ्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायला त्यांनी दार उघडले तर ती पोर तशीच बसून होती पायरीवर. उषाताई रागाने म्हणाल्या "तू अजून इथेच?" त्यावर पोर रडत म्हणाली "कुठे जाऊ? घरच नाहीये मला."

हे ऐकताच उषाताईंना दयाच आली तिची. "नाव काय तुझे? तुला आई बाबा कोणी नाहीये का?" त्यांनी प्रेमाने विचारले.

पोर रडत सांगू लागली "मी सुशी. मी आणि माझी माय, शेजारच्या झोपडपट्टीत राहायचो. आठ दिवसापूर्वी माझी माय गेली देवाघरी आणि झोपडीचे भाडे भरले नाही म्हणून मालकाने आज हाकलले झोपडीतून." सारे ऐकून उषाताईंना गलबलून आले. त्या पोरीला घरात घेत म्हणाल्या "आजच्या दिवस राहा माझ्या घरी. उद्या सोय लावते तुझी कोठेतरी."

उषाताई रात्रीचे जेवत नसत. "आता या पोरीसाठी काय करावे? घरात तर फक्त डाळ तांदूळ आहेत." मनाशी विचार करत त्यांनी खिचडी करायची ठरवली, आणि थोड्याच वेळात एका ताटात खिचडी व शेजारणीने दिलेले लोणचे घालून ताट सुशीला समोर ठेवले. "तू पण घे ना आक्का." सुशीला गोड आवाजात म्हणाली.
"मी रात्रीच जेवत नाही ग पोरी.तू खा."
"तू जेवलीस तरच मी जेवेन ."
सुशीच्या आग्रहाखातर त्याही बसल्या ताट घेऊन. आणि चक्क छान जेवण गेले कि त्यांना सुशी बरोबर गप्पा मारत.

जेवण होताच सुशीने मागचे सारे आवरले. उषाताईंनी तिला अंथरूण घालून दिले आणि त्याही जवळच गादी टाकून झोपल्या. मध्यरात्री कुठल्याश्या स्पर्शाने त्यांना जाग आली आणि डोळे उघडून बघतात तर काय...  झोपेत सुशी त्यांच्या कुशीत शिरली होती. त्या स्पर्शाने त्यां एकदम मोहोरून गेल्या. आईच्या मायेने त्यांनी सुशीलाला आणखी जवळ ओढून घेतले. सकाळी जाग येताच त्यांना जाणवले कि किती वर्षात आपण असे गाढ झोपलो न्हवतो. आज त्यांना अगदी प्रसन्न वाटत होते.

चहा करता करता त्यांनी मनाशीच काही विचार केला. सुशी उठताच, आतुरतेने त्यांनी विचारले "तुला माझ्याजवळ राहायला आवडेल? माझी मुलगी म्हणून." सुशीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि ती पळत येऊन त्यांना घट्ट बिलगली.

"चला पटकन आवरून वाण सामान घेऊन येते. सुशीलालाही दोन नवे फ्रॉक आणूयात." उषाताईंच्या अंगात एकदम उत्साह संचारला. जणू पावसाचे चार थेंब पडताच जमिनीखालील मृत बिया जीवनेच्छेने तरारून उठतात तश्या उठल्या उषाताई...

सौजन्य: अलका जतकर.

९०/१० तत्व


😇 ९०/ १० तत्व
===========

आपलं मानसशास्त्र वरून अज्ञात लेखकाचा वाचनीय लेख......

फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपल्या प्रतिक्रियावर अवलंबूनअसतं.

जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं.

उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला......    हे फक्त १०% झालं,मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं.

तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून गढूळ झाले.

आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

का ?

कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

उत्तर

तुम्ही स्वतः

कॉफीचं जे झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

काय करायला हवे होते ?

कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

फरक पहा....

दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?

• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका,
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा.
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.
चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?

तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?

९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?

• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?

• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
•  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात
😊 😊