एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला "आयुष्याची खरी किंमत काय असते हो?"
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस."
सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - "या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - "मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो." पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - "या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला. त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .
Thursday, March 21, 2019
आयुष्याची खरी किंमत
Tuesday, March 19, 2019
योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर
"तु नाष्ट्याला काय खाणार आहेस आज ... ?"
नेहमीच्या ठसक्यात तिने रोजचा सवाल केला ..
"काहीही कर ..."
दात घासता घासता त्याने अर्धवट बोबड्या आवाजात उत्तर दिलं .. नेहमीसारखंच ..
"पोहे ... ?"
त्याने नाक मुरडलं ...
"उपमा .. ?"
त्याने उगाचच खाकरत विरोध नोंदवला ...
"थालीपीठ .. ?"
"ए .. बरं काहीतरी कर ना ..."असं म्हणत त्याने टॉवेलला तोंड पुसलं ..
चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला झाला तेव्हा ती त्याच्यासमोर उभी होती ..
रखुमाई बनून .. !अर्थात कमरेवर हात ..
"तुला काहीच कसं चालत नाही रे .. ? रोज रोज फाईव्ह स्टार पदार्थ आणायचे कुठून ..."
तो काहीसा डिफेन्सिव्ह ...
"तसं नाही .. काहीतरी वेगळं हवं इतकंच ..."
आणि तिचा आवाज अजूनच चढला ...
"वेगळं म्हणजे काय .. ? मला नाही कळत ... तू सांग .. मी खायला करून घालते .."
मग बराच वेळ त्याला ही काही सुचलं नाही ..
पण तो कुरबुरत राहिला .. सकाळचं खाणं बेश्ट पाहिजे ..
अख्ख्या दिवसाचा मूड ठरतो त्यावर ...
आणि तिकडे तिचा पारा चढलेला ...
पट्टा सुरु ... सकाळची धावपळीची वेळ ...
पिंकू ची शाळा ... बाईची गडबड .. केरवारे ... लादी .. भांडी ..
आणि त्यात ह्याचे खाण्यापिण्याचे चोचले ...
पटकन खायचं .. मोकळं व्हायचं .. ते नाही ..
अंत पाहतो अगदी ...
आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ..
पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली ..
"मटकी आहे ... मिसळ करू ... ?"
तो एव्हाना किचनच्या दारात आलेला ...
डोळ्यात चमक ...
"चालेल ... पण तिखट कर हां..."
तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं ...
"हो, मीच शिरते आता त्याच्या आत ...म्हणजे होईल झणझणीत!"
तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला ... "अगं .. गोड होईल मग ती ..!"
आता तिचा हात थांबला .. तिने त्याच्याकडे पाहिलं ..
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला ,..
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली ...
तात्पर्य काय ...
संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी ...
म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..
🍃🌹🍃💞🍃🌹🍃
ते हरवलेले जादुई शब्द !!
तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे "काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!" आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.
कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर 'फूsss' असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे "काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते."
पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !
मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?
पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.
जखम 'फू' नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार 'फू' मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची
खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.
जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड 'ओपन वर्ल्ड' मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, उच्शृंखलता, दहशतवाद जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी "काही झाला नाही, उंदीर पळाला!", "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ." अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, "फू केलंय ना , मग बरं होईल हा ते" असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.
ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.
कितीही मोठे झालो तरी त्या 'बालिश' शब्दांचं मूल्य आता कळायला लागलं. . .
ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपला दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.
कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी ". . . . उंदीर पळाला!", "हाट रे. . . . " “फू. . ." हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या 'फु sss' ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . . त्याला त्याच्या विश्वासू माणसाकडून मिळालेली 'फू sss' नवसंजीवनी देऊन जाते.
जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:
"मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . "
- एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!🌷