Wednesday, June 19, 2019

मनाची श्रीमंती !!!

शाळेने पत्रक काढलं - यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्या वर्गातला तो ज्ञानेश्वर आहे नं, तो सर्वात गरीब आहे. आम्ही सगळे त्याला माऊली म्हणतो. त्याची स्थिती फार खराब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
"सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फाटलाय. त्याने शिवलाय; पण फाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पँट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली. पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. ज्ञानेश्वर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, ज्ञानेश्वर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परिच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........."
वह्यांचे गठ्ठे आणायला ज्ञानेश्वर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......
असा ज्ञानेश्वर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो...... अरेरे!...
मी खूप कमी पडतोय. ज्ञानेश्वर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या ज्ञानेश्वरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत ज्ञानेश्वरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? ज्ञानेश्वर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात ज्ञानेश्वरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत ज्ञानेश्वरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि ज्ञानेश्वरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकले-- 'ज्ञानेश्वर पावसे, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस'.
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर- ज्ञानेश्वर पावसेच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. ज्ञानेश्वरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून ज्ञानेश्वरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी ज्ञानेश्वर उभा दिसला.
त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... "सर, रागवू नका; पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका."अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?"चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव... !!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी...... मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा..... ?
"सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण.... ?"
"सर,विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, "ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी सेकंडहँड वापरतोय... खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?
सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर... सर,सांगा ना, मी गरीब कसा?"
ज्ञानेश्वर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरंय ज्ञानेश्वर. पण तुला या पैशाने मदतच......."
"सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फी देतीये म्हटल्यावर, मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. कॉन्ट्रेक्टर बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...
मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....
म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु. ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........ सर, आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्याऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?"
"सर, तेवढी फुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो."
अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
"ज्ञानेश्वर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."
"म्हणूनच म्हणतो सर...... !"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
"सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाऊ द्या. मी अब्राहम लिंकन यांचं चरित्र वाचलं, हेलन केलर, विवेकानंद, आइन्स्टाईन यांचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर..... प्लीज..... !"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा ज्ञानेश्वर पावसे स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परिश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत !!!

====================
बांधवानो फक्त स्वतः मनाचा श्रीमंत, कर्तव्य दक्ष, नम्र, विनयशील व्यक्ती, स्वच्छ इच्छाशक्तीवर कसलाही विजय संपादन करू शकतो.
****************************
लेख एकदम मस्त, छान आहे. प्रत्येक पालकाने घरी आपल्या मुलांना मुद्दाम वाचायला (वाचून) दाखवावे.....

Tuesday, June 11, 2019

"ऋणानुबंध"


गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्याला गेले होते. या आजींना दोन मुलगे, पैकी एक डाॅक्टर (अस्थीरोगतज्ञ) आणि दुसरा चार्टर्ड अकाऊंटंट. दोन्ही मुलगे सुना व उच्चशिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हाॅटेल मधे थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात जी आजींची जीवनकहाणी आम्हा उपस्थितीतां समोर मांडली आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात ते ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी वाहिले.

आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुलगे दोन वर्षांचे असताना आजींवर वैधव्याची कु-हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रीत हा दर्जा मिळाला. "आम्ही तीन खाणारी तोंडे पोसतो" असे उद्गार ऐकवले जाऊ लागले. सांगली जवळच्या छोट्या खेड्यात पंचवीस माणसांच्या कुटुंबा साठी राब-राब राबून पहाटे पाच ते रात्री आकरा वाजे पर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशीबात आले.

एक दिवस मुले पाच वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. दोन दिवस चुलतबहिणी कडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वैंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नू.म.वि. शाळेत घातले. मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही.

आजी डेक्कन वर डाॅ. बापट यांच्या घरी स्वैपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीची होती व हे डाॅक्टर पतीपत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यात आऊटहाऊस मधे रहायला जागा दिली. आजींच्या रहाण्याची सोय झाली सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला.

दोन्ही मुले अतिशय हुशार. चौथी व सातवीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्ती मुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. "माझी मुले उच्चशिक्षित झालीच पाहिजेत" हा आजींनी ध्यास घेतला होता. दहावीला मुलांनी मेरिटलिस्ट मधे नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला.

मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन Greencard Holder झाली आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि Problem म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही. Knee-Replacement Operation, Spinal cord Operation सारखी मोठी Operations होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डाॅक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्याच्या सहकार्यां बरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुस-या मुलाने पण दर वेळी खूप मदत केली.

आजींच्या सोहळ्याला बापट पतीपत्नी आले होते पण स्वतः श्री.बापट तर Wheel Chair वरून आले होते.

आता शेवटी असे समजले की आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठ्ठा बंगला बांधला आहे त्या मधे वरच्या दोन खोल्यां मधे त्या दोन्ही मुलांनी बापट पतीपत्नी यांना आणले. आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उतकृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे.आजींची नातवंडे बापट पतीपत्नी यांना पण "आजीआजोबा" असेच म्हणतात. सकाळ संध्याकाळ वरती ताजा स्वैपाक जातो. बापट काकाकाकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत. याला मी "ऋणानुबंध" इतकेच नाव देऊ शकते......

मन रिचार्ज.... रिचार्ज ....

मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.

रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.
सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज 'लो बॅटरी'..
चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना...

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”

“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.

“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणी चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो. इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”

पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

“मनाचे चार्जिंग,हे काय नवीन..”

“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, अँप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतू, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते  ते मनाकडे.”

“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलाच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.

माझें धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरतरं वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली.
किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.
बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.
एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!”

“दोस्ता...” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.
क्लास वरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार”

“नको..तू हरला तर मला बरे वाटणार नाही..”

“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”

बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.

मुलाने स्पोर्टीगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.

आता काय करायचे...?

अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणी लगेच परत आली.

“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले.बॅग मध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे,पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गमंत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पिटारा उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!
आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात... अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वताःचे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो.
चटकन आरशात पाहिले.

“अरे..! फारसा फरक पडला नाही”

उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली.तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते.बराच वेळ पाहत राहिलो.
मन गलबलून आले.खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.

काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले,'कसं असतं ना आपलं मन..?
अचानक आनंदून जाते..
क्षणात गहिवरते, हळवे होते..
एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.'

या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.
“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”

“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”

समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”

मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.
लग्न पुन्हा एन्जॉय केलं.

“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचा तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलीटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेला. उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”

डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.

“थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो.

मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरलो होतो. रुटीनसोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”

“मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

“चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो”

तेव्हा जोरात ठसका लागला.

“मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय” बायकोने चिमटा काढलाच.
           
CP
सस्नेह विनंती.. लेख आवडल्यास जरूर शेअर करा.