Sunday, March 24, 2019

सुख !!


आज म्हणे वर्ल्ड हॅपिनेस डे ! खरंतर आपण सगळे रोज  हॅपीच असतो.  सुख हे कस्तुरी सारखं असतं. आपण दुःखी होतो कारण आपण आनंदात आहोत हे आपल्याला कळत नाही. मूळात सोयींसाठी पैसा लागतो सुख आजही स्वस्तच आहे. दिवसभरात 'बरं झालं'...' बरं वाटलं' असं  आपण जेव्हा कधी म्हणत असतो तेव्हा ते सुखच असतं. प्रत्येक लहान लहान गोष्टीत सुख आहे ....

चालण्याचा प्रचंड कंटाळा आला असताना अचानक मैत्रीण गाडीवर यावी अन् चल सोडते तुला म्हणावं...

वांग्याचं भरीत, दही -भाकरी- ठेचा अशा फक्कड बेतावर शेतात बसून ताव मारणं ...

आवडती गाणी कंटाळा येईतो ऐकणं...

आपल्या माणसांचा गोतावळा बघून नात्याची श्रीमंती जाणवणं ...

एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करणं...

लहान होऊन रस्त्याच्या कडेला साठलेल्या पावसाच्या पाण्यात उडी मारणं...

रक्ताचे रिपोर्टस् नाॅर्मल आहेत हे  रुग्णाला सांगितल्यावर त्याचा चिंतामुक्त चेहरा पाहणं...

मृदगंध दरवळत असताना एकटंच बसून चहाचा आस्वाद घेणं ...

आपल्याला पाहिजे तसा फोटो निघणं...

खिडकीतून पाहिल्यावर निरभ्र आकाश किंवा पौर्णिमेचा चंद्र दिसणं...

छानशी कवितांची मैफिल रंगणं...

मैत्रीणीच्या कौतुक सोहळ्याला हजर राहून तिचा आनंद टिपणं...

लहान बाळ दुडूदुडू पळताना बघणं ...

गप्पा रंगात आलेल्या असताना बाबांना टाळी देऊन हसणं...

चहात बुडालेलं बिस्किट वाचवण्यात यश मिळवणं...

कुणाची तरी सहज आठवण येणं आणि नेमकी ती व्यक्ती भेटणं ...

अंदाजापेक्षा हाॅटेलचं बिल कमी येणं...

आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं...

निरर्थक तात्विक गप्पा मारणाऱ्या मैत्रिणीला रात्रभर ऐकत राहणं...

अंगणात चांदणं बघत झोपणं...

आईला आयता चहा हातात दिल्यावर तिचा खुललेला चेहरा बघणं...

सणावाराला आप्तेष्टांनी भरलेलं घर दंग्यानं दणाणून सोडणं...

निसर्गात भटकंती करणं...

जुन्या फोटोज् चे अल्बम न्याहाळत बसणं...

नेहमी हाऊसफुल असणार्‍या नाटकाची तिकिटं लगेच मिळणं...

कुठल्याही प्लॅन शिवाय पिकनिकला जाणं...

जमेल तशी समाजसेवा करणं...

भरपूर लाड पुरवणारं आजोळ असणं...

पोटभर झोप होईपर्यंत सगळ्या चिंता बाजूला ठेवून मस्त ताणून देणं ...

खर्च केलेल्या पैशाचा हिशोब लागणं...

सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या आजोबांकडून गोष्टी ऐकणं...

गझलेला 'क्या बात' म्हणत दाद देणं...

आजीकडून डोक्याला तेल लावून घेणं...

जुन्या पर्समध्ये १० रुपयांचं लख्ख नाणं सापडणं...

गर्दीने भरलेल्या बस मध्ये थकलेल्या काकांना स्वतःची जागा देणं...

दिवाळीला फराळाचा घरभर भरुन राहिलेला सुवास घेणं ...

पावसात मनसोक्त भिजणं...

घरी पोहचल्यावर फोन कर असं कुणी काळजीनं सांगणं...

पहाटे अंगणात प्राजक्ताचा सडा दिसणं...

ताईने कौतुकाने आपल्यासाठी केलेला पदार्थ आवडीनं संपवणं...

दुधावरली साय किंवा फ्रिजमधलं चाॅकलेट चोरुन खाणं...

अनेकदा ऐकलेले आपल्या बालपणीचे किस्से मामा कडून पुन्हा पुन्हा ऐकणं...

आपल्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट होणं...

समुद्रकिनारी बसून सुर्यास्त बघणं...

अचानक रात्री १२ वाजता मैत्रीणींचा घोळका घेऊन गाडीवर चक्कर मारुन येणं...

कुंडीत लावलेल्या मोगर्‍याच्या रोपट्याला दोन शुभ्र कळ्या येणं...

आपण केलेल्या कामाचं कौतुक होणं...

शतपावली करणार्‍या दादासोबत जागतिक राजकारण वगैरे विषयांवर चर्चा करणं...

पहिल्या कमाईतून आई - बाबांना भेटवस्तू घेणं...

गाणं गुणगुणत घर आवरणं...

जुना मित्र अनेक वर्षांनी भेटणं...

अशी अगणित सुख आपल्याला रोज विविध रुपानं भेटतात. सुख कशात आहे तर ते मानण्यात आहे! आपली सुखाची कल्पना जरा adjust केली की कळतं ते भरभरुन आहे. तुज आहे तुजपाशी हे उमगलं की आयुष्याचा सोहळा साजरा करता येतो. आनंद हा प्रवास आहे...आनंदयात्री होता आलं पाहिजे.

आपण "Hide & Seek " साठी हटून न बसता “Happy Happy" मध्ये समाधान मानायला शिकू तेव्हा सुखाचा हा 'लपंडाव' संपेल..!!

- डाॅ. सायली कुलकर्णी

Thursday, March 21, 2019

आयुष्याची खरी किंमत

एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला "आयुष्याची खरी  किंमत काय असते हो?"
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस."
सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - "या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - "मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो." पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - "या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला.
थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला. त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .

Tuesday, March 19, 2019

योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर

"तु नाष्ट्याला काय खाणार आहेस आज ... ?"

नेहमीच्या ठसक्यात तिने रोजचा सवाल केला ..

"काहीही कर ..."

दात घासता घासता त्याने अर्धवट बोबड्या आवाजात उत्तर दिलं .. नेहमीसारखंच ..

"पोहे ... ?"

त्याने नाक मुरडलं ...

"उपमा .. ?"

त्याने उगाचच खाकरत विरोध नोंदवला ...

"थालीपीठ ..  ?"

"ए .. बरं काहीतरी कर ना ..."असं म्हणत त्याने टॉवेलला तोंड पुसलं ..

चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला झाला तेव्हा ती त्याच्यासमोर उभी होती ..
रखुमाई बनून .. !अर्थात कमरेवर हात ..

"तुला काहीच कसं चालत नाही रे .. ? रोज रोज फाईव्ह स्टार पदार्थ आणायचे कुठून ..."

तो काहीसा डिफेन्सिव्ह ...
"तसं नाही .. काहीतरी वेगळं हवं इतकंच ..."

आणि तिचा आवाज अजूनच चढला ...
"वेगळं म्हणजे काय .. ? मला नाही कळत ... तू सांग .. मी खायला करून घालते  .."

मग बराच वेळ त्याला ही काही सुचलं नाही ..
पण तो कुरबुरत राहिला .. सकाळचं खाणं बेश्ट पाहिजे ..
अख्ख्या दिवसाचा मूड ठरतो त्यावर ...

आणि तिकडे तिचा पारा चढलेला ...
पट्टा सुरु ... सकाळची धावपळीची वेळ ...
पिंकू ची शाळा ... बाईची गडबड .. केरवारे ... लादी .. भांडी ..
आणि त्यात ह्याचे खाण्यापिण्याचे चोचले ...
पटकन खायचं .. मोकळं व्हायचं .. ते नाही ..
अंत पाहतो अगदी ... 

आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ..
पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली ..

"मटकी आहे ... मिसळ करू ... ?"

तो एव्हाना किचनच्या दारात आलेला ...
डोळ्यात चमक ...

"चालेल  ... पण तिखट कर हां..."

तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं ...

"हो, मीच शिरते आता त्याच्या आत ...म्हणजे होईल झणझणीत!"

तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला ... "अगं .. गोड होईल मग ती ..!"

आता तिचा हात थांबला .. तिने त्याच्याकडे पाहिलं ..
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला  ,..
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली ...

तात्पर्य काय ...
संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी ...
म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..

🍃🌹🍃💞🍃🌹🍃