Sunday, January 19, 2020

वराहमिहीर ऋषींची प्राचीन भूगर्भातील जल संशोधन पद्धत

वराहमिहीर ऋषींची प्राचीन भूगर्भातील जल संशोधन पद्धत 

सध्याच्या काळात पाण्याची किती भयंकर समस्या निर्माण होत चाललेली आहे ह्याचा अंदाज आपणा सर्वांनाच आहे.पावसाचा थेंब न्‌ थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या परिस्थीतीवर मार्ग काढत असताना अनेक जण बोअर किंवा विहीरीचा पर्याय आवलंबतात. पण ह्यातील प्रत्येक बोअर किंवा विहिरीचा प्रयोग भूगर्भातील जल साठयाचा अचूक अंदाज न आल्यामुळे यशस्वी होत नाही. 


पण भूगर्भातील जल साठ्याचा अचूक अंदाज कसा घेयचा आणि विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यास तो खडक सुरुंग न लावता कसा फोडायचा ह्याविषयी वराहमिहीर ऋषींनी आपल्या बृहत्संहिता लिखित ग्रंथातील "उदकार्गल" अध्यायात सविस्तर वर्णन केलेलं आहे. 

वराहमिहीर ऋषींचा भूगर्भातील जल संशोधन सिद्धांत एवढा जबरदस्त आहे की, ह्याचा प्रत्यक्षात अनुभव १९८१ मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्या वेळी दिसून आला. हाच सिद्धांत वापरून तिरुपतीच्या श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठाने इस्रो आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या मदतीने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत एकूण १५० विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. 

वराहमिहीर ऋषी बृहत्संहिता मधील "उदकार्गल" अध्यायात जल संशोधन सिद्धांताबद्दल लिहताना म्हणतात.. 

पुंसां यथाङ्गेषु शिरास्त्तयैव क्षितावपि प्रोन्नतनिम्नसंस्थाः।

अर्थात : ज्याप्रमाणे मानवी शरीरात असंख्य नाड्या असतात त्याचप्रमाणे भूगर्भामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या कमी जास्त उंचीवर असंख्य नाड्या असतात. 

एकेन वर्णेन रसेन चाम्भश्चयुतं नभस्तो वसुधाविशेषात्।
नानारसत्वं बहुवर्णतां च गतं परी यं क्षितितुल्यमेव।।

अर्थात : आकाशातून पडणार पावसाचं पाणी हे एकाच चवीचं असत. परंतु जमिनीच्या गुणधर्मानुसार ते वेगळ्या वेगळ्या चवीचे होते. त्याची परीक्षा जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. अर्थात ज्याप्रमाणे जमीन त्याप्रमाणे पाणी. 

पुरहूतानलमयनिर्ऋतिवरुणपवनेन्दुशङ्करा देवाः।
विज्ञातव्याः क्रमशः प्राच्याद्यानां दिशां पतयः।।3।।

अर्थात : क्रमानुसार आठ दिशांचे आठ अधिपती आहेत. पूर्व-इंद्र, पश्‍चिम-वरुण, दक्षिण-यम, उत्तर-सोम,आग्नेय -अग्नी,नैर्ऋत्य-निर्मदती, वायव्य - वायू आणि ईशान्य-शिव. 

दिक्पतिसंज्ञाश्च शिरा नवमी मध्ये महाशिरानाम्नी।
एताभ्योSन्याः शता शो विनसृता नामभिः प्रथिताः।।4।।

अर्थात : ह्या आठ दिशांच्या अधिपतींच्या नावाने आठ जलशिरा भूगर्भात असतात .आणि मध्यभागी एक जलशिरा असते तिला महाशिर म्हंटले जाते. तसेच ह्या शिरांपासून अनेक शेकडो जलशिरा निघतात ज्या आपापल्या नावाने प्रख्यात आहेत. 

पातालादूर्ध्वशिरा शुभाश्चतुर्दिक्षु संस्थिता याश्च।
कोणदिगुत्था न शुभाः शिरानिमित्तान्यतो वक्ष्ये।।5।।

अर्थात : खालून वरच्या दिशेने वाहणारी जलशिरा हि सगळ्यात उत्कृष्ट असते. तसेच पूर्व, पश्चिम , दक्षिण आणि उत्तर दिशेला वाहणाऱ्या भूगर्भातील जलशिरा शुभ असतात. 

भूगर्भात पाणी कुठे, कुठे सापडू शकते याचा विचार या जलशिरांवरून वराहमिहिर ऋषींनी  केला आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर ज्या स्थानावर बांधले आहे त्याच्या भूपृष्ठाखाली खालून वरच्या दिशेला वाहणारी जलशिरा आहे. ज्या विहिरीला तळातून वर येणारे झरे आहेत, ती विहीर नेहमी जलाने समृद्ध व परिपूर्ण भरलेली असते. ती कधीही आटत नाही.

भूगर्भातील जलशिरा ओळखण्याचे ज्ञान :-

१.यदि वेतसोSम्बुरहिते देशे हस्तैस्त्रिभिस्ततः पश्चात्।
सार्धे पुरुषे तोयं वहति शिरा पश्चिमा तत्र।।

अर्थात : निर्जल आणि कोरड्या भागात वेताचे झाड किंवा बेट असेल तर त्या झाडापासून पश्चिम दिशेला तीन हात दूर आणि दीड पुरुष खोल पाणी असते. तिथून पश्चिम जलशिरा वाहत असते. 

चिह् नमपि चार्ध पुरुषे मंडूकः पाण्डूरोSथ मृत्पीता।
पुटभेदकश्च तस्मिन् पाषाणो भवति तोपनधः।।

अर्थात : खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते. 

२. जम्ब्वाश्चोदगधस्तौस्त्रभिः शिराधो नरद्वये पूर्वा।
मृल्लोहगन्धिका पाण्डुराय पुरुषेSत्र मण्डूकः।।

अर्थात : निर्जल भागात जांभळाच झाड असेल तर त्या झाडापासून उत्तर दिशेला तीन हाताच्या दुरीवर दोन पुरुष खोल पूर्व दिशेला तोंड असणारी जलशिरा असते.खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढऱ्याशा रंगाची निस्तेज माती व  बेडूक सापडतो.

जम्बूवृक्षस्य प्राग्वल्मीको यदि भवेत्समीपस्थः।
स्माद्दक्षिणपाशर्वे सलिलं पुरुषद्वये स्वादु।।9।।

अर्धपुरुषे च मत्स्यः परावतसन्निभश्च पाषाणः।
भद्भवति चात्र नीला दीर्घ कालं बहु च तोयम्।।10।।

पश्चादुदुम्बरस्य त्रिभिरेव करैर्नद्वये सार्धे।
पुरुषे सितोSहिरश्माञ्जनोपमोSधः शिरा सुजला।।11।।

अर्थात : त्या जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला दोन पुरुष खोल गोड पाणी असत. खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर कबुतराच्या रंगाचा दगड किंवा निळसर रंगाची माती निदर्शनास आली तर त्याच जागी पाच पुरुष खोल गेल्यावर गोड्या पाण्याची अखंड वाहणारी जलशिरा सापडते अर्थात झरा सापडतो. तसेच निर्जल भागात औदुंबराच्या झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला अडीच पुरुष खोल जलशिरा असते. इथे खोदताना एक पुरुष खोल गेल्यावर काजळासारख्या रंगाचा काळा खडक निदर्शनास आला तर त्याखाली खूप मोठी पाण्याची जलशिरा असते. 

३. उदगर्जुनस्य दृश्यो वल्मीको यदि ततोSर्जुनाद्धस्तैः।।
त्रिभिरम्बु भवति पुरुषैस्त्रियभिरर्धसमन्वितैः पश्चात्।।12।।

श्वेता गोधार्धनरे पुरुषे मृद्धूसरा ततः कृष्णा।
पीता सिता ससिकता ततो जलं निर्दिशेदमितम्।।13।।

अर्थात : अर्जुनाच्या झाडापासून तीन हात दूरवर उत्तर दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोदल्यावर फिक्कट  रंगाची माती, त्यानंतर काळजी माती,पिवळट रंगाची , रेती मिश्रित पांढरट रंगाची माती निदर्शनास येते. त्याखाली जलशिरा असते. 

४. निर्गुण्डयां दक्षिणेन कथितकरैः।
पुरुषद्वये सपादे स्वादु जलं भवति चाशोष्यम्।।14।।

अर्थात : निर्गुंडीच्या झाडापासून तीन हाथ दुरीवर दक्षिण दिशेला सव्वा दोन पुरुष खोदल्यावर कधीही न आटणारा पाण्याचा झरा सापडतो. 

५. पूर्वेण यदि बदर्या वल्मीको दृश्यते जलं पश्चात्।
पुरुषैस्त्रिभिरोदेश्यं श्वेता गृहगोधिकार्धनरे।।16।।

अर्थात : बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागत. 

६. बिल्वोदुम्बरयोगे विहाय हस्तत्रयं तु याम्पेन।
पुरुषैस्त्रिभिरम्बु भवेत् कृष्णोSर्धनरे च मण्डूकः।।18।।

अर्थात : बेल आणि औदुंबराच झाड जिथे एकत्र असेल तिथून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागत आणि खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर काळ्या रंगाचा बेडूक सुद्धा सापडतो. 

६. आसन्नो वल्मीको दक्षिणपार्श्वे विभीतकस्य यदि।
अध्यर्धे तस्य शिरा पुरुषे ज्ञेया दिशि प्राच्याम्।।24।।

अर्थात : बेहड्याच्या झाडाजवळ पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर दीड  पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

तस्यैव पश्चिमायां दिशि वल्मीको यदा भवेद्धस्ते।
तत्रोदग्भवति शिरा चतुर्भिरर्धाधिकैः पुरुषैः।।25।।

अर्थात : बेहड्याच्या झाडापासून पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर उत्तर दिशेला साडे चार पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

७. वृक्षस्येका  शाखा यदि विनता भवति पाण्डुरा वा स्यात् । 
विज्ञातव्यं शाखातले जलं त्रिपुरुषं खात्वा ॥५५॥ 

अर्थात : ज्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात किंवा जमिनीकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची पान पिवळी पडलेली असतात त्या फाद्यांच्या बरोबर खाली तीन पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

८. फलकुसुमविकारो यस्य तस्य पूर्वे शिरा त्रिभिहस्तैः। 
 भवति पुरुषश्चतुभिः पाषाणोऽधः क्षितिः पीता ।।५६।।

अर्थात : ज्या झाडांच्या फुलांना आणि फळांना रोग लागत असेल त्या झाडापासून तीन हात लांबीवर पूर्व दिशेला चार पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यास तो खडक फोडण्या संदर्भातील सिद्धांत 

१. भेदं यदा नैति शिला तदानीं पालाशकाष्ठैः सह तिन्दुकानाम् ।
 प्रज्वालयित्वानलमग्निवर्णा सुधाम्बुसिक्ता प्रविदारमेति ।।११२।।

अर्थात : विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यावर तो खडक फुटत नसेल तर त्यावर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो.

२. तोयं शृतं मोक्षकभस्मना वा यत्सप्तकृत्वः परिषेचनं तत् । 
कार्य शरक्षारयुतं शिलायाः प्रस्फोटनं वह्निवितापितायाः।।११३।।

अर्थात : मोखा झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिसळावी . हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि तापलेल्या  खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो. 

३. नम्बं पत्रं त्वक् च नालं तिलानां सापामार्ग तिन्दुकं स्याद्गुडूची। 
गोमूत्रेण स्रावितः क्षार एषां षट्कृत्वोऽतस्तापितो भिद्यतेऽश्मा।।११५।।

अर्थात : लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा), तिंदुक आणि अमृतवेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी  खडक तापवावा.

ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या ऋषीमुनींचा  भूगर्भातील जलसंशोधनाचा दृष्टिकोन सुद्धा किती महान होता. आज जर हे जलसंशोधन सिद्धांत गरजू लोकांपर्यंत पोहचले आणि त्यांनी उपयोगात आणले तर भविष्यात निर्माण होणारी पाण्याची समस्या आणि त्यावर होणारा अफाट खर्च नक्कीच वाचू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विहीर खोदताना खडक लागल्यावर सध्या ते सुरुंग लावून फोडले जातात. पण ह्यामुळे होणारे दुष्परिणाम किती भयंकर आसू शकतात ह्याचा विचार सध्याचा काळात केला जात नाही. ज्याप्रमाणे जलशिरा सांगितलेल्या आहेत त्यावरून एक अंदाज येऊ शकतो सुरुंगामुळे निर्माण होणाऱ्या हादऱ्याने त्यांची किती प्रमाणात दिशा बदलत असेल. त्यापेक्षा सुरुंग न लावता ह्यामध्ये सांगितलेल्या उपायोजना करून नक्कीच फायदा होऊ शकतो. 

तसेच विहीर किंवा बोअर मारताना प्रत्येक वेळी त्याभागात अनुभवी जलसंशोधन करणारी व्यक्ती उपलब्ध आसू शकत नसेल तर ह्या सिद्धांताचा उपयोग करून योग्य ठिकाणी जलशिरा पकडून विहीर किंवा बोअर मारल्यास त्याचा नक्की भविष्यात उपयोग होऊ शकेल. 

#दुर्मिळ_झाडे_व_प्रजाती 
#भुजल

Thursday, September 26, 2019

अंधारातून प्रकाशाकडे .........

अंधारातून प्रकाशाकडे .........

मी खूप वर्षांपूर्वी ही तेजस्वी गोष्ट रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचली होती आणि ती मनाच्या कुपीत कायमची झाली ....
तेरा चौदा वर्षांचा  अंध  मुलगा... डेविड हार्टमन (David Hartman)  आपल्या बाबांना मोठया उमेदीने विचारतो - बाबा .. एकदम मनापासून सांगा ... मी कधी डॉक्टर होऊ शकतो का? स्वभावाने बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले बाबा आतून हलतात ... एकदम गप्प होतात ...खोल विचारात पडतात ... काय सांगायचं आपल्या या अंध मुलाला ...  पण  या अतिशय उत्साही आणि उमद्या मुलाचा तेजोभंग कसा करायचा .... म्हणतात ..."A doctor, son? Well, you will never know unless you try, will you? डॉक्टर ...मुला .... नक्कीच ... प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? तू करशील ना ...
जन्मताच डोळ्यांच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन  जन्मलेला डेविड आठ वर्षांचा होतो तेव्हा त्याला पूर्ण अंधत्व येतं ...  तेव्हा पासूनच तो आपल्या बाबांना  ... मी हे करू शकतो का... ते करू शकतो का  ... अशा अनेक गोष्टी विचारत राहतो .... दहा वर्षांचा असताना तो बाबांना विचारतो ... बाबा... मी बेसबॉल खेळू शकतो का? वेल, चल .. प्रयत्न करूया ... "Well, let's try it and see,"... त्याच्या बाबांनी त्याला सुचवलं ... त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला ... बाबांनी तो बॉल जमिनीवरून फिरवत त्याच्या दिशेने सोडायला सुरवात केली ... डेविड ...हळू हळू  बॉलच्या गतीचा आवाज ओळखून तो बॉल पकडायला शिकला ... तो बॅटिंग शिकला ... गवतावरून फिरत येणाऱ्या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला ...काही काळाने प्राविण्य मिळवता झाला ..
Realm of Possibility? काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात ... या तत्वानुसार डेविडच्या कुटुंबाने दृढनिश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी करायला सुरवात केली... काही वेळा काहीच दिसत नसल्याने तो रडायचा आणि म्हणायचा "ममा .... मी काही करू शकत नाही ... " मग त्याची आई त्याला त्याला आपल्या कुशीत घेऊन म्हणायची ... माहित आहे रे ... डेविडची बहीण ... बार्बरा मात्र कठोर होती ... अर्थात त्याच्या चांगल्या साठी ... तो त्याचं ब्रेल घडयाळ जर पहिल्या मजल्यावरच्या खोलीत विसरला ... तर तो त्याच्या बहिणीला सांगायचा ... जरा आणून देतेस का ? .... ती त्याला म्हणायची ... तू जा आणि आण... तुला काय वाटतं ... कोणीतरी कायम तुझ्या दिमतीला असणारे का ?

तर अशा गोष्टींमुळे डेविड मोठा होऊ लागला आणि त्याला नक्की कळलं की अंधत्व ही ट्रॅजेडी नाहीये... आणि नक्कीच त्याला आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास बळावत गेला. १३व्या वर्षी त्याने आई बाबा आणि बहिणीला सांगून टाकलं की मला डॉक्टर व्हायचंय .... त्याने त्याच्या शिक्षणाचा मार्ग निश्चित केला ... आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरु केला त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव Havertown's High School मध्ये घातलं. सगळ्यांना  Realm of Possibility हे माहित आणि मान्य होतं ... तरीही डेविडची डॉक्टर ... त्यातही
मनोदोषचिकित्सक (Psychiatrist)  होणं ... त्या  Realm of Possibility च्या नक्कीच शक्यतेबाहेरचं होतं .. त्यांना वाटतं होतं की डेविड नक्कीच नादान महत्वाकांक्षा बाळगतोय ... कॉलेजमधले त्याच्या शिक्षकांनी देखील त्याला खूप सांगायचा प्रयत्न केला ... तू का नाही इतर विषय बघत जे तुझ्या पात्रतेला योग्य आहेत ... इतिहास ... वगैरे .. डेविड म्हणाला ... मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये .. मला दिसत नाहीये, खरं आहे ... पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व  असतातच . माझा दृढ विश्वास आहे की जे कोणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत .... ते खरं तर अपंग आहेत .. मी
Psychiatrist व्हायचं ठरवलंय कारण मला माझ्यावर ठाम विश्वास आहे .. आणि मी डॉक्टर झाल्यावर  माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकतो ..कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्याची भेट अत्यंत हुशार ... हिरवे डोळे असलेल्या चेरील Walker या मेडिकलच्याच विद्यार्थिनींशी झाली.. नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं ... १९७२च्या वसंत ऋतूत तो कॉलेजच्या चौथ्या वर्षात असतांना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले ... त्याने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केला ... एप्रिलमध्ये त्यातल्या आठ कॉलेजनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला ... २७ एप्रिलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजच्या नकाराचं पत्र मिळालं ... त्याला मनातून वाटतं होतं की हे कॉलेज त्याला नक्की प्रवेश देईल ... डेव्ह ... मनातून एकदम खचला आणि हताश झाला .... पण जे फिडाडेल्फीया मधलं दहावं कॉलेज होतं .. Temple University School ऑफ Medicine ...  Dr. M. Prince Brigham, असिस्टंट डीन आणि प्रवेशाचे मुख्य होते ... त्यांनी डेविडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं ... त्यांनी बोर्ड मिटिंग मध्ये सांगितलं की जर आपण ऑलम्पिकच्या समितीत असतो आणि शंबर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता ... तर आपण नक्कीच त्याला धावू दिलं असतं ... डेविडने अगोदरच खूप अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरीत्या करून स्वतःला सिद्ध केलंय ... आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया तो कुठपर्यंत जातो ... बोर्डच्या सदस्यांनी ते मान्य केलं ... दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या आईचा फोन आला .. 'तुला एक पत्र आलंय .. ज्याची तू खूप वाट बघत आहेस' .... तिचा आवाज भरून आला ... तिला बोलता येईना ... त्याच्या बहिणीने ... बार्बराने फोन घेतला ... आणि सांगितलं की तू तोडलंस .. You have done it ... आणि तिला देखील अश्रू आवरले नाहीत ... तुला  Temple University ने स्वीकारलंय ... आणि डेविड आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालायला लागला ... वाट नक्कीच बिकट होती आणि त्याला त्याची उत्तम कल्पना देखील होती ... पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप .. त्याचं ध्येय दिसत होतं

सुरवातीलाच त्याला Anatomy च्या इंट्रोडक्टरी कोर्सेच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या .. हातात रबराचे ग्लोज घालून तो अनेक मोठे अवयव चाचपून ओळखायला लागला ... पण लहान अवयव विशेषतः nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोज काढावे लागले .. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधिर झाली ... हे सगळं चालू असताना डेविडने आपल्या घरात या विषयाला अनुसरुन असलेल्या अनेक विषयांची असंख्य पुस्तकं विकत घेतली ... घरची लायब्ररी अति समृद्ध करायला सुरवात केली ... या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिका विकत घेतल्या ... मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेविड आणि चेरीने लग्न केलं .. तिसऱ्या वर्षात असताना खरं आव्हान सुरु झालं ... युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये  रोग्यांना तपासणं ... त्यांना ट्रीटमेंट देणं सुरु झालं .. त्याला X-ray बघता येत नसल्याने तो कान ... डोळे ... तोंड आपल्या सहकार्यंवाचून तपासू शकत नसे ... त्याला ते X-ray चं वर्णन त्याचे सहकारी किंवा नर्स सांगेल त्याप्रमाणेच उपचार करावे लागत ... तो त्यांच्यावर अवलंबून होता ... पण डेविड अतिशय समर्थ माणूस होता .. त्याने Stethoscope आणि स्पर्श खूप विकसित केला ...

२७ मे १९७६ ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली ... त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली .. तो इतरांपेक्षा वेगळा नाहीये ... त्याला अगोदर नाही म्हणणारे प्रोफेसर्स देखील आले होते ... पदवीदान कार्यक्रमाला ... ते म्हणाले ...Devid is not normal ... he is super normal ... अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर झाला .... त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ झाला ... अनेक लोक त्याच्या जिद्दीवर ... त्याच्या अथक परिश्रमांवर ... दिगंत आत्मविश्वासावर भर भरून बोलले ... In presenting the founder's award to David, RFB President John Castles praised him "for exhibiting a triumph of the human spirit .. माणसाच्या अत्युच तेजाचं हे दर्शन आहे ... आपलं भाषण संपवताना ते पुढे म्हणाले ..... "With the example of Dr David Hartman before us, we feel renewed faith in the infinite possibilities of all people...डेविडच्या या उदाहरणाने आपल्याला नक्कीच एक नवीन विश्वास मिळालाय .... माणसाच्या काहीही गोष्ट मिळवायच्या अमर्याद शक्यतांचा .... " या अतिशय भारावलेल्या शब्दांनी सभागृहात आलेले सगळे लोक त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले ... These eloquent words brought a standing ovation for David ....

डेविडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं ... My Dad was right ..माझ्या बाबांचं बरोबर होतं ...  "You will never know unless you try"....प्रयत्न केल्या शिवाय तुला कळणार नाही ...

खरंच आपल्याकडे सगळं आणि तेही भरभरून आहे ... तरी आपण हे नाही ते नाही ... म्हणून सारखे रडत असतो ... डेविड सारखे लोक अक्षरशः आभाळाएवढे आहेत ... त्यांच्या या गोष्टीतून आपल्याला किती प्रेरणा मिळत्येय ... मला खूप आवडली ... नंतर मी त्याचे खूप रेफरन्स शोधले ... आणि अतिशय संक्षिप्तपणे ही गोष्ट तुम्हाला इथे सांगितली ....

(त्याने 'White Coat, White Cane' हे आत्मचरित्र लिहिलंय .... त्याच्यावर बहुतेक Journey from Darkness या शीर्षकाने एक डॉक्युमेंटरी किंवा टीव्ही शो केला गेलाय)

   
वाचाल तर वाचाल
📚📖📚📖📚📖📚

Tuesday, September 10, 2019

एक्झिट इंटरव्ह्य़ू

एक्झिट इंटरव्ह्य़ू

कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘तो’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते.

विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’

त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, ‘‘मी हे अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’

पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ त्याच्यासमोर ठेवत  म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ‘ऑनसाइट’ला पाठवता येईल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘कंपनीतल्या माझ्या आठ वर्षांत, जवळजवळ चार वर्ष मी ‘ऑनसाइट’ला होतो. ज्या देशांची नावंही कधी माहिती नव्हती असेही देश मी पाहून आलो. तेव्हा मला त्याचं काहीही आकर्षण नाही.’’

‘निगोसिएशन’साठी राखून ठेवलेल्या हुकमाच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हणल्यावर विषयाचा सांधा बदलत ती म्हणाली, ‘‘तू नोकरी सोडून ‘स्टार्ट-अप’ सुरू करणार असलास तर इतकंच सांगेन की, ‘लाखाचे बारा हजार करण्याचा’ यासारखा दुसरा उपाय नाही.’’ त्यावर नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहिती आहे.’’ ते ऐकून ती वैतागून म्हणाली, ‘‘मग नोकरी सोडल्यावर, तू करणार तरी काय आहेस?’’

‘‘मी वर्षभर तरी काहीही करणार नाहीये.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं ‘रुटीन’ बदलण्यासाठी, ‘लाइफस्टाइल’च्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि एक तारखेला ‘सॅलरी क्रेडिटेड’ मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वत:ला वेळ देणार आहे.’’

तिच्या कोणत्याच ‘लॉजिक’मध्ये त्याची ही उत्तरं बसत नव्हती; पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. त्या कुतूहलातूनच तिनं विचारलं, ‘‘हे एकदम असं अचानक का?’’ त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही; पण सांगतो.. हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाही. गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे. नेमकेपणाने सांगायचं झालं तर ज्या दिवशी ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’चं काय झालं ते पाहिलं.. त्याच दिवसापासून.’’

‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ हे शब्द कानावर पडताक्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी, फक्त बेचाळीस वर्षांच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला; पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हृदयरोगाची कोणतीही ‘मेडिकल हिस्ट्री’ नसतानाही असं झालं होतं. डॉक्टरांनी फक्त एका शब्दात कारण दिलं, ‘स्ट्रेस’. मग दोन दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी तीच ‘सपोर्ट स्टाफ’बरोबर गेली. तेव्हा संगणकामागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे ‘फॅमिली फोटो’ उपसून काढताना तिला जे वाटलं होतं, ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होतं. ती तिथं रडली नाही इतकंच. आज त्या सगळ्या आठवणी, पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या.

‘‘रोजचा तीन-तीन तासांचा प्रवास, प्रोजेक्टचा ताण, कायम तणावाखाली राहाणं.. का? आणि कशासाठी? हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय.’’ त्याच्या बोलण्यामुळे ती भानावर आली. आता तिला त्याचं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं; पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत. ती शांतपणे म्हणाली, ‘‘पण शेवटी व्यवहार कोणाला चुकला आहे?’’

‘‘खरं आहे. व्यवहार कोणालाच चुकलेला नाही. फक्त एकच माफक अपेक्षा आहे, की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये.’’ त्याच्या उत्तरावर ‘हं!’ असं अस्पष्टपणे ती पुटपुटली. त्याच्यासमोर नेमकी काय ‘ऑफर’ ठेवावी? याची गणितं तिच्या मनात वेगानं सुरू होती.

पण तिचा विचार पूर्ण होण्याआधी तोच म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपूर्वी आणखी एक गोष्ट घडली. एके दिवशी रात्री उशिरा, माझ्या मोठय़ा भावानं फोन करून मला त्याच्या घरी बोलावलं. त्याच्या घरी गेलो तर दादा-वहिनी डोक्याला हात लावून बसले होते. मी कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलाचं दप्तर माझ्यासमोर धरलं. त्या दप्तराच्या मागच्या कप्प्यात ‘पोर्नोग्राफी’चं मटेरियल खच्चून भरलं होतं. चित्रविचित्र पुस्तकं, स्टिकर्स आणि काय काय.. कदाचित ते कमी होतं म्हणून त्यात एक कंडोमचं पाकीटही होतं.’’

‘‘अरे बापरे!’’ अगदी नकळत ती पुटपुटली. आपली दोन्ही मुलं टीनएजर असताना आपल्याला त्यांची किती काळजी असायची.. हेही तिला आठवून गेलं; पण सर्वात वाईट गोष्ट ही होती की, दादा-वहिनी मला म्हणाले, की तूच त्याच्याशी बोल. तो आमच्याशी बोलतच नाही. घरातल्या कोणाशी मोकळेपणाने बोलत असेल तर ते फक्त तुझ्याशीच. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘कसं बोलणार? जन्मापासून तो पाळणाघरात आहे. तुमच्या करिअरच्या धावपळीत तो कधीच तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्यामुळेच आज त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नाही आहात. तसंही घरात जेव्हा असता, तेव्हाही दोघं मोबाइलवर आपापल्या ‘सोशल प्रोफाइल्स’ सांभाळण्यात दंग असता. तिथे सर्वात आधी फोटो-व्हिडीओ शेअर करण्यासाठी तुमची धडपड असते. त्या नादात तुमच्या घरातला संवाद पूर्णपणे संपलाय हे तुम्हाला जाणवतही नाही. तुमच्या घरातलं ते लॅव्हिश इटालियन मार्बल काय थंड पडेल.. इतकी तुमची नाती थंड झाली आहेत.’

‘‘मग?’’ तिनं न राहवून विचारलं.

‘‘मग काय? मीच बोललो त्याच्याशी.. आता दर आठवडय़ाला त्याला भेटतो आणि मग आम्ही काही तरी ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करतो. गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल; पण मी त्या आणेन हे नक्की.’’

‘हं!’ असं अस्पष्टपणे ती म्हणाली. इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार? हाही प्रश्न होताच; पण त्याचं बोलणं संपलं नव्हतं.

तो म्हणाला, ‘‘दादाच्या घरी जे झालं ते माझ्या घरीही होऊ शकतं. कारण आमच्या दोघांचेही आई-वडील आपापल्या मूळ गावी आहेत. त्यात माझी बायकोही ‘आयटी’मध्येच आहे. त्यामुळे जास्त वेळ घराबाहेर कोण असतं आणि घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर कोण बसतं यात आमची नेहमी स्पर्धा असते. काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. त्यात माझ्या मुलीनं आणि तिच्या मित्रमत्रिणींनी एक ‘प्रोटेस्ट’ नावाचं विनोदी नाटक सादर केलं. नाटकाचा विषय होता की, आईवडील दिवसभर आपल्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसतात, त्यामुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याचा उपहासात्मक निषेध.’’

‘‘मुलं काही वेळा खूप खरं बोलून जातात.’’ तीही तिच्या अनुभवांना स्मरत म्हणाली; पण तो गंभीर होत म्हणाला, ‘‘मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत नाही का? ‘डेडलाइन्स’च्या नावाखाली खूप वर्ष पळतोय; पण आता दमलोय. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ. कधी कधी वाटतं की, या सगळ्याला काहीही शेवट नाही. मग अचानक ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ची आठवण होते तेव्हा उगाचच वाटून जातं की, आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील. दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं. मग दमल्यावर ‘रिलॅक्स’ होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा. तेव्हा एक तर ‘ऑनलाइन शॉपिंग’ करायचं, गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं. एकीकडे मला माझी ‘स्पेस’ पाहिजे म्हणून सगळ्यापासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपलं आभासी जग ‘लाइक’ करावं हा अट्टहास धरायचा. हा काय खेळ आहे? आणि त्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे.’’

त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली, ‘‘मग तू जरा ब्रेक घे. तुझ्या राहिलेल्या सुट्टय़ा आणि थोडी ‘अनपेड सुट्टी धरून सहा महिने विचार करण्यासाठी घे म्हणजे तुझी नोकरीही राहील.’’ तिच्या या ‘ऑफर’वर तो काही बोलणार तेवढय़ात कॉफी आली. मीटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीनमधली नसल्यामुळे ती पिण्यात एक वेगळीच मजा असायची. मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेनं वाट पाहायचा. त्यामुळे दोघांनीही कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रेमधूनच उचलले. एसीमुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला.

‘वा!’ असं म्हणत त्यानं कॉफीचा पहिला घोट घेतला. ‘‘ही मुलाखत आजच संपवण्याचं आपल्याला कोणतंही बंधन नाही. तू दोन दिवस विचार कर. आपण पुन्हा भेटू. बाकी काही नाही तर कॉफीचा आणखी एक राऊंड नक्की होईल.. काय?’’ तिच्या बोलण्याचा रोख त्याला समजला. कोणत्याही परिस्थितीत त्याला राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप ‘प्रेशर’ असेल हेही त्याला जाणवलं.

कॉफीचा घोट घेत तो म्हणाला, ‘‘आपण गप्पा मारायला, कॉफी प्यायला नक्की भेटू; पण मुलाखत आजच संपवू या. माझा निर्णय पक्का आहे.’’ पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली, ‘‘पण थोडा शांतपणे विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? नोकरी तर तू सहा महिन्यांनीही सोडू शकतोस. कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नसतं हेही तुला त्या दरम्यान जाणवेल.’’

कॉफी संपवून कप टेबलावर ठेवत तो म्हणाला, ‘‘पण या ऑफरमुळे माझा उद्देश साध्य होत नाही.’’

‘‘म्हणजे?’’ त्याचं बोलणं न समजून ती म्हणाली, ‘‘म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल, हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाहीत. मी कायम हाच विचार करत राहीन, की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे. कदाचित त्यामुळे नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत मी घेणारही नाही.’’

‘‘मला नाही वाटत तसं. जर तू पर्याय शोधायचं ठरवलं आहेस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच.’’ त्याचं म्हणणं खोडत ती म्हणाली. ते ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला, ‘‘मला माझा स्वभाव माहीत आहे. नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा ‘कम्फर्ट झोन’ सोडावाच लागेल. तसेही जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय सुरू करता येत नाहीत.’’

त्याच्या बोलण्यातलं तथ्य तिला जाणवलं. तेवढय़ात तोच पुढे म्हणाला, ‘‘मला पूर्ण कल्पना आहे, की माझा हा निर्णय कदाचित व्यवहाराच्या कसोटय़ांवर चुकीचा ठरेल; पण एक नक्की आहे, आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते. नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं. खूप गोष्टी विखुरल्या गेल्यात. त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी कधी येणारही नाहीत हे मला माहीत आहे; पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे. नोकरी नसल्यावर काय? ही भीतीही आहे; पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचं आहे. कदाचित अपयशही येईल.. पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल. हा ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’ माझ्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासाचा ‘एंट्री पॉइंट’ आहे. तेव्हा मला वाटतं, आपण इथेच थांबू या.’’

आता काहीही ‘ऑफर’ दिली तरी त्याला फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याला म्हणाली, ‘‘सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो; पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात. ऑल द बेस्ट.’’ एवढं बोलून तिनं शेक-हँड करण्यासाठी हात पुढे केला. ‘‘थँक यू’’ म्हणत त्याने तिला शेक-हँड केला आणि तो तिथून बाहेर पडला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहात राहिली.. आणि बहुतेक पहिल्यांदाच, आपली बोलणी यशस्वी झाली नाहीत, याचं तिला मनापासून समाधान वाटलं.