Monday, May 4, 2020

दुस-याचा विचार

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दो-याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुस-याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे, एकत्र कुटुंब असायचं, गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुस-यासाठी बंबात पाणी भरायचं, दुस-यानं तिस-या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली, आता दुस-याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुस-याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/ बिघडल्या तर आठवणीने आणणे. ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं, सगळी जवाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा, हे एक लहानसं युनिट समजा, देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही.(खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)

लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची, सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. थोडं थांबून आपल्या नंतर येणा-याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

©कांचन दीक्षित

‘ऋषी’ आणि ‘मुनी’ : नेमका फरक काय? जाणून घ्या.

ह्या ऋषि मुनींकडे प्रमुख पात्र विद्यार्जनासाठी जात असतात. अनेकदा आपल्याला ऋषी आणि मुनी हे एकच असतात असं वाटतं. पण धर्मशास्त्राच्या आधारावर बघायला गेलं तर ऋषी आणि मुनी ह्या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया.

धर्मशास्त्रानुसार मुनी म्हणजे तो व्यक्ती जो सदैव स्वतःचा शोध घेत असतो आणि आपला बहुतांश वेळा विचार करण्यात घालवत असतो. मुनी ही विचारवंत आणि तत्वज्ञाला प्रदान करण्यात आलेली उपाधी आहे. ते निसर्गाच्या संबंधातील उत्कट मानवी धाग्यांचा शोध घेत असतात. त्यांना ज्ञानाच्या कसोटीवर उच्च स्थान प्राप्त असते. त्यांनी अनंत काळ तपश्चर्या आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केलेले असते.

वेद हे ज्ञानाचा अगम्य असा स्रोत असून वेद म्हणजेच ज्ञान असा अर्थ पुर्वापार सांगण्यात आला आहे. संस्कृतमध्ये विद- अर्थात काही जाणून घेण्याची महत्वकांक्षा ह्या शब्दापासून वेद ह्या शब्दाची निर्मिती झाली आहे.

वेद हे अजस्त्र ज्ञानाचा स्रोत असून त्यात असंख्य ऋषी व मुनींचा उल्लेख आढळून येतो. परंतु वेद ज्यांच्या ध्यानी मनी नाही अशा लोकांना ऋषी व मुनी यांच्यातील फरक लक्षात येत नसतो. ऋषी मुनी कोण आहेत आणि त्यांच्यातील फरक काय, हे जाणून घेणे रोचक आहे.

खरंतर ऋषी मुनी ह्या दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते. मुनी हा ऋषी बनण्याचा एक टप्पा आहे. मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे, असं देखील नमूद करण्यात आलं आहे. मुनी हा असा मुनुष्य असतो सदैव आत्मचिंतन आणि साधनेत गुंग असतो. विश्वातील सूक्ष्म तत्वज्ञान व गूढाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

ऋषी मात्र एका बाजूला एक तपस्वी असतो जो अनेक सहस्त्रके तप करण्यात घालवतो व त्याला ज्ञानाच्या पातळीवर उच्च स्थान प्राप्त असते. तपश्चर्येच्या माध्यमातून ऋषींचं एकच लक्ष असतं ते म्हणजे आत्मनुभूती मिळवणे. ह्या सर्व प्रक्रियेत त्यांना त्यांच्या इष्ट देवतांकडून वरदान देखील प्राप्त होते. त्यांच्या तपस्येवर आणि त्यांच्या समर्पणावर देव प्रसन्न होत असतात.

ऋषी हे कवी असतात. शेकडो हजारो वर्षांच्या तपातून त्यांना जी ऊर्जा व ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान काव्यमय पद्धतीने समाजापर्यंत पोहचवण्याचे काम ऋषी करतात. त्यांच्या ह्या काव्य रचनांचे एकत्रिकरण वेदांमध्ये करण्यात आलेले आहे.

वेदांचा अनुसार ऋषींचे चार प्रकार पडतात:-

१) राजर्षी: तब्बल १००० वर्ष राज्यकारभार करणाऱ्या राजे आपली गडगंज संपत्ती व ऐश्वर्य याचा त्याग करून संन्यास स्वीकारून साधना व तपश्चर्येचा मार्ग स्विकारतात त्यावेळी त्यांना राजर्षी म्हणून ओळखले जाते.

२) देवर्षी: देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात. त्यांना भविष्याचं संपूर्ण ज्ञान असतं व त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यांचावर आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे दायित्व असते. नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात.

३) महर्षी: ही एका अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषिला प्राप्त होणारी उपाधी आहे. ब्रम्हर्षी ह्या सर्वोच्च स्थानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावलं अंतरावर असलेल्या लोकांना ही उपाधी मिळते. महर्षी हे असंख्य सहस्त्रकं तपोसाधना केल्यानंतर प्राप्त होणारे मोठे स्थान आहे.
केवळ एका अधर्मी कृत्यामुळे व मनाचा ताबा गमवल्यामुळे महर्षी पद गणावण्याचा धोका असतो, त्यामुळे महर्षी हे फार काटेकोर नियमांचे पालन करतात. ह्यात सर्वात चांगलं उदाहरण विश्वामित्र असून आपल्या राज वैभवाचा त्याग करून तब्बल ३००० वर्ष तपश्चर्या करून त्यांनी महर्षी होण्याचा मान मिळवला होता.

४) ब्रम्हर्षी: हे ज्ञानाच्या क्षेत्रातील परमोच्च स्थान समजलं जातं. एक ऋषी म्हणून गाठायचं सर्वोच्च स्थान म्हणजे ब्रम्हऋषीपद होय. ब्रम्हर्षी हा एक असा साधू असतो ज्याने तपश्चर्या करून आपल्या आयुष्यातील परमोच्च ज्ञानाची व आध्यात्मिक शक्तीची प्राप्त केली असते. ब्रम्हर्षी हे आत्मज्ञानी असतात. वशिष्ठ व विश्वामित्र ह्या दोन रामायण कालीन ऋषींना ब्रम्हर्षी पदाची प्राप्ती झाली होती.

मुनी ही ऋषी बनण्याची पहिली पायरी असते आणि ब्रम्हर्षी पद हे सर्वोच्च ज्ञान प्राप्तीचा बिंदू असते. प्रत्येक व्यक्ती मुनी पदा पासून आत्मज्ञान प्राप्ती करून ऋषी पदांची प्राप्ती करत असतो.

(Copy Paste)

Sunday, January 19, 2020

वराहमिहीर ऋषींची प्राचीन भूगर्भातील जल संशोधन पद्धत

वराहमिहीर ऋषींची प्राचीन भूगर्भातील जल संशोधन पद्धत 

सध्याच्या काळात पाण्याची किती भयंकर समस्या निर्माण होत चाललेली आहे ह्याचा अंदाज आपणा सर्वांनाच आहे.पावसाचा थेंब न्‌ थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या परिस्थीतीवर मार्ग काढत असताना अनेक जण बोअर किंवा विहीरीचा पर्याय आवलंबतात. पण ह्यातील प्रत्येक बोअर किंवा विहिरीचा प्रयोग भूगर्भातील जल साठयाचा अचूक अंदाज न आल्यामुळे यशस्वी होत नाही. 


पण भूगर्भातील जल साठ्याचा अचूक अंदाज कसा घेयचा आणि विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यास तो खडक सुरुंग न लावता कसा फोडायचा ह्याविषयी वराहमिहीर ऋषींनी आपल्या बृहत्संहिता लिखित ग्रंथातील "उदकार्गल" अध्यायात सविस्तर वर्णन केलेलं आहे. 

वराहमिहीर ऋषींचा भूगर्भातील जल संशोधन सिद्धांत एवढा जबरदस्त आहे की, ह्याचा प्रत्यक्षात अनुभव १९८१ मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्या वेळी दिसून आला. हाच सिद्धांत वापरून तिरुपतीच्या श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठाने इस्रो आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या मदतीने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत एकूण १५० विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. 

वराहमिहीर ऋषी बृहत्संहिता मधील "उदकार्गल" अध्यायात जल संशोधन सिद्धांताबद्दल लिहताना म्हणतात.. 

पुंसां यथाङ्गेषु शिरास्त्तयैव क्षितावपि प्रोन्नतनिम्नसंस्थाः।

अर्थात : ज्याप्रमाणे मानवी शरीरात असंख्य नाड्या असतात त्याचप्रमाणे भूगर्भामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या कमी जास्त उंचीवर असंख्य नाड्या असतात. 

एकेन वर्णेन रसेन चाम्भश्चयुतं नभस्तो वसुधाविशेषात्।
नानारसत्वं बहुवर्णतां च गतं परी यं क्षितितुल्यमेव।।

अर्थात : आकाशातून पडणार पावसाचं पाणी हे एकाच चवीचं असत. परंतु जमिनीच्या गुणधर्मानुसार ते वेगळ्या वेगळ्या चवीचे होते. त्याची परीक्षा जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. अर्थात ज्याप्रमाणे जमीन त्याप्रमाणे पाणी. 

पुरहूतानलमयनिर्ऋतिवरुणपवनेन्दुशङ्करा देवाः।
विज्ञातव्याः क्रमशः प्राच्याद्यानां दिशां पतयः।।3।।

अर्थात : क्रमानुसार आठ दिशांचे आठ अधिपती आहेत. पूर्व-इंद्र, पश्‍चिम-वरुण, दक्षिण-यम, उत्तर-सोम,आग्नेय -अग्नी,नैर्ऋत्य-निर्मदती, वायव्य - वायू आणि ईशान्य-शिव. 

दिक्पतिसंज्ञाश्च शिरा नवमी मध्ये महाशिरानाम्नी।
एताभ्योSन्याः शता शो विनसृता नामभिः प्रथिताः।।4।।

अर्थात : ह्या आठ दिशांच्या अधिपतींच्या नावाने आठ जलशिरा भूगर्भात असतात .आणि मध्यभागी एक जलशिरा असते तिला महाशिर म्हंटले जाते. तसेच ह्या शिरांपासून अनेक शेकडो जलशिरा निघतात ज्या आपापल्या नावाने प्रख्यात आहेत. 

पातालादूर्ध्वशिरा शुभाश्चतुर्दिक्षु संस्थिता याश्च।
कोणदिगुत्था न शुभाः शिरानिमित्तान्यतो वक्ष्ये।।5।।

अर्थात : खालून वरच्या दिशेने वाहणारी जलशिरा हि सगळ्यात उत्कृष्ट असते. तसेच पूर्व, पश्चिम , दक्षिण आणि उत्तर दिशेला वाहणाऱ्या भूगर्भातील जलशिरा शुभ असतात. 

भूगर्भात पाणी कुठे, कुठे सापडू शकते याचा विचार या जलशिरांवरून वराहमिहिर ऋषींनी  केला आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर ज्या स्थानावर बांधले आहे त्याच्या भूपृष्ठाखाली खालून वरच्या दिशेला वाहणारी जलशिरा आहे. ज्या विहिरीला तळातून वर येणारे झरे आहेत, ती विहीर नेहमी जलाने समृद्ध व परिपूर्ण भरलेली असते. ती कधीही आटत नाही.

भूगर्भातील जलशिरा ओळखण्याचे ज्ञान :-

१.यदि वेतसोSम्बुरहिते देशे हस्तैस्त्रिभिस्ततः पश्चात्।
सार्धे पुरुषे तोयं वहति शिरा पश्चिमा तत्र।।

अर्थात : निर्जल आणि कोरड्या भागात वेताचे झाड किंवा बेट असेल तर त्या झाडापासून पश्चिम दिशेला तीन हात दूर आणि दीड पुरुष खोल पाणी असते. तिथून पश्चिम जलशिरा वाहत असते. 

चिह् नमपि चार्ध पुरुषे मंडूकः पाण्डूरोSथ मृत्पीता।
पुटभेदकश्च तस्मिन् पाषाणो भवति तोपनधः।।

अर्थात : खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते. 

२. जम्ब्वाश्चोदगधस्तौस्त्रभिः शिराधो नरद्वये पूर्वा।
मृल्लोहगन्धिका पाण्डुराय पुरुषेSत्र मण्डूकः।।

अर्थात : निर्जल भागात जांभळाच झाड असेल तर त्या झाडापासून उत्तर दिशेला तीन हाताच्या दुरीवर दोन पुरुष खोल पूर्व दिशेला तोंड असणारी जलशिरा असते.खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढऱ्याशा रंगाची निस्तेज माती व  बेडूक सापडतो.

जम्बूवृक्षस्य प्राग्वल्मीको यदि भवेत्समीपस्थः।
स्माद्दक्षिणपाशर्वे सलिलं पुरुषद्वये स्वादु।।9।।

अर्धपुरुषे च मत्स्यः परावतसन्निभश्च पाषाणः।
भद्भवति चात्र नीला दीर्घ कालं बहु च तोयम्।।10।।

पश्चादुदुम्बरस्य त्रिभिरेव करैर्नद्वये सार्धे।
पुरुषे सितोSहिरश्माञ्जनोपमोSधः शिरा सुजला।।11।।

अर्थात : त्या जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला दोन पुरुष खोल गोड पाणी असत. खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर कबुतराच्या रंगाचा दगड किंवा निळसर रंगाची माती निदर्शनास आली तर त्याच जागी पाच पुरुष खोल गेल्यावर गोड्या पाण्याची अखंड वाहणारी जलशिरा सापडते अर्थात झरा सापडतो. तसेच निर्जल भागात औदुंबराच्या झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला अडीच पुरुष खोल जलशिरा असते. इथे खोदताना एक पुरुष खोल गेल्यावर काजळासारख्या रंगाचा काळा खडक निदर्शनास आला तर त्याखाली खूप मोठी पाण्याची जलशिरा असते. 

३. उदगर्जुनस्य दृश्यो वल्मीको यदि ततोSर्जुनाद्धस्तैः।।
त्रिभिरम्बु भवति पुरुषैस्त्रियभिरर्धसमन्वितैः पश्चात्।।12।।

श्वेता गोधार्धनरे पुरुषे मृद्धूसरा ततः कृष्णा।
पीता सिता ससिकता ततो जलं निर्दिशेदमितम्।।13।।

अर्थात : अर्जुनाच्या झाडापासून तीन हात दूरवर उत्तर दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोदल्यावर फिक्कट  रंगाची माती, त्यानंतर काळजी माती,पिवळट रंगाची , रेती मिश्रित पांढरट रंगाची माती निदर्शनास येते. त्याखाली जलशिरा असते. 

४. निर्गुण्डयां दक्षिणेन कथितकरैः।
पुरुषद्वये सपादे स्वादु जलं भवति चाशोष्यम्।।14।।

अर्थात : निर्गुंडीच्या झाडापासून तीन हाथ दुरीवर दक्षिण दिशेला सव्वा दोन पुरुष खोदल्यावर कधीही न आटणारा पाण्याचा झरा सापडतो. 

५. पूर्वेण यदि बदर्या वल्मीको दृश्यते जलं पश्चात्।
पुरुषैस्त्रिभिरोदेश्यं श्वेता गृहगोधिकार्धनरे।।16।।

अर्थात : बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागत. 

६. बिल्वोदुम्बरयोगे विहाय हस्तत्रयं तु याम्पेन।
पुरुषैस्त्रिभिरम्बु भवेत् कृष्णोSर्धनरे च मण्डूकः।।18।।

अर्थात : बेल आणि औदुंबराच झाड जिथे एकत्र असेल तिथून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागत आणि खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर काळ्या रंगाचा बेडूक सुद्धा सापडतो. 

६. आसन्नो वल्मीको दक्षिणपार्श्वे विभीतकस्य यदि।
अध्यर्धे तस्य शिरा पुरुषे ज्ञेया दिशि प्राच्याम्।।24।।

अर्थात : बेहड्याच्या झाडाजवळ पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर दीड  पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

तस्यैव पश्चिमायां दिशि वल्मीको यदा भवेद्धस्ते।
तत्रोदग्भवति शिरा चतुर्भिरर्धाधिकैः पुरुषैः।।25।।

अर्थात : बेहड्याच्या झाडापासून पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर उत्तर दिशेला साडे चार पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

७. वृक्षस्येका  शाखा यदि विनता भवति पाण्डुरा वा स्यात् । 
विज्ञातव्यं शाखातले जलं त्रिपुरुषं खात्वा ॥५५॥ 

अर्थात : ज्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात किंवा जमिनीकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची पान पिवळी पडलेली असतात त्या फाद्यांच्या बरोबर खाली तीन पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

८. फलकुसुमविकारो यस्य तस्य पूर्वे शिरा त्रिभिहस्तैः। 
 भवति पुरुषश्चतुभिः पाषाणोऽधः क्षितिः पीता ।।५६।।

अर्थात : ज्या झाडांच्या फुलांना आणि फळांना रोग लागत असेल त्या झाडापासून तीन हात लांबीवर पूर्व दिशेला चार पुरुष खोदल्यावर पाणी लागत. 

विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यास तो खडक फोडण्या संदर्भातील सिद्धांत 

१. भेदं यदा नैति शिला तदानीं पालाशकाष्ठैः सह तिन्दुकानाम् ।
 प्रज्वालयित्वानलमग्निवर्णा सुधाम्बुसिक्ता प्रविदारमेति ।।११२।।

अर्थात : विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यावर तो खडक फुटत नसेल तर त्यावर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो.

२. तोयं शृतं मोक्षकभस्मना वा यत्सप्तकृत्वः परिषेचनं तत् । 
कार्य शरक्षारयुतं शिलायाः प्रस्फोटनं वह्निवितापितायाः।।११३।।

अर्थात : मोखा झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिसळावी . हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि तापलेल्या  खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो. 

३. नम्बं पत्रं त्वक् च नालं तिलानां सापामार्ग तिन्दुकं स्याद्गुडूची। 
गोमूत्रेण स्रावितः क्षार एषां षट्कृत्वोऽतस्तापितो भिद्यतेऽश्मा।।११५।।

अर्थात : लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा), तिंदुक आणि अमृतवेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी  खडक तापवावा.

ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या ऋषीमुनींचा  भूगर्भातील जलसंशोधनाचा दृष्टिकोन सुद्धा किती महान होता. आज जर हे जलसंशोधन सिद्धांत गरजू लोकांपर्यंत पोहचले आणि त्यांनी उपयोगात आणले तर भविष्यात निर्माण होणारी पाण्याची समस्या आणि त्यावर होणारा अफाट खर्च नक्कीच वाचू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विहीर खोदताना खडक लागल्यावर सध्या ते सुरुंग लावून फोडले जातात. पण ह्यामुळे होणारे दुष्परिणाम किती भयंकर आसू शकतात ह्याचा विचार सध्याचा काळात केला जात नाही. ज्याप्रमाणे जलशिरा सांगितलेल्या आहेत त्यावरून एक अंदाज येऊ शकतो सुरुंगामुळे निर्माण होणाऱ्या हादऱ्याने त्यांची किती प्रमाणात दिशा बदलत असेल. त्यापेक्षा सुरुंग न लावता ह्यामध्ये सांगितलेल्या उपायोजना करून नक्कीच फायदा होऊ शकतो. 

तसेच विहीर किंवा बोअर मारताना प्रत्येक वेळी त्याभागात अनुभवी जलसंशोधन करणारी व्यक्ती उपलब्ध आसू शकत नसेल तर ह्या सिद्धांताचा उपयोग करून योग्य ठिकाणी जलशिरा पकडून विहीर किंवा बोअर मारल्यास त्याचा नक्की भविष्यात उपयोग होऊ शकेल. 

#दुर्मिळ_झाडे_व_प्रजाती 
#भुजल