Saturday, July 31, 2021

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम)

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. 

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल 

नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Friday, July 9, 2021

अशी कशी ग घुमी तु!!

प्रत्येक विवाहित पुरुषाने आवर्जून वाचावं, ही विनंती. . .
👇

*#अशी_कशी_ग_तू_घुमी* 

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकोत्याला जॉब करीत होते. तेही निघाले.

 मुलगी म्हणाली, "चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी".

 मात्र सुधीर नी नकार दिला... 

रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं...

पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला सीमा सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. सीमा होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. सुधीर नी कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल... 

"सीमा तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करत नाही ग. कस जगू मी सीमा "सुधीरला हुंदका अनावर झाला... 

सीमा चे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे सीमा सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. ... लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षत आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली... 

सुधीर नी डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली

थरथरत्या हातानी डायरी उघडली.... 

त्यानी डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे.सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणुन जगायचं ठरविले.. 
 बरंच काही लिहिलं होत.. तो पान  पलटवत होता...

दि...... 

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,"आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या ".
तर म्हणाले, "मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चाल... तू खा मी तुला सोडतो हॉटेलला".

अरे, हे काय बोलणं झालं... मला काय खायला जायची हौस होती.... 

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो... नवऱ्याने गिफ्ट दिलं ... फार हेवा वाटायचा... कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर चिडचिड आणि भांडण.... 

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले...... 

दि....
 माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ. थांबा थोडा वेळ. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत, हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खुप अपमानित वाटले, खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागल.. हीच मन दुखावलं हे ज्ञानीही नसत... मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते... आणि परत कधी ठेचं लागली तर कप्पा उघडून बघते... फार त्रास होतो तेव्हा.. 

दि,.... 

आज मी पडद्याचे कापडं आणले... खुप ओरडले.. 

कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का   वगैरे वगैरे... काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंद चांगली नाही... तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात... इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत... त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही.... 

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. रमेश ला खुप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की सीमा इतकी दुःखी आहे. सीमाच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले.... बहुतेक शेवटचे 

दि.... 
आज खुप डावा हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते.... तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि.... 

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली... डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली...

यांना फोन लावला... म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे... 

 अँजिओग्राफी केली....95 टक्के ब्लॉकेज... डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल... 

घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले.....हे बाहेरगावावरून आलेले होते. 

घरी येताना औषध आणायला विसरले.... खुप थकवा आला होता... 

म्हटलं, थोडी औषधं आणून देता का? 

'आताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः,परत कपडे बदलवू, परत जाऊ "
.
"खुप चिडचिड आणि बडबड केली "

"असू द्या, मी घेईल उद्या "

"अग, पण काय झालंय.... काय सांगितलं डॉक्टरांनी "

"काही नाही, सगळं ठीक आहे "

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही... साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा, मुलगी सेटल आहे... रोजची लहान सहान बाबीवरून कटकट... आता मी थकली... हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात........ 

डायरीचे शेवटचेच पान होते. 

सुधीर नी डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले... सीमा चा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे....

सीमा, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना... तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही.. मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होत आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही..... 

का वागली तू अशी सीमा ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू? सीमा मी तुला समजूच शकलो नाही... आणि तू मला समजून घेतलं नाही.... 

मी तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही... मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही... तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही.... पण सीमा, अग एकदा बोलायचं होत ग.. व्यक्त व्हायच होत... भांडलो असतो कदाचित... परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलं ही असत... नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसत लागलं.... सीमा, *अशी कशी ग घुमी तु!!*

🍁🍂🍁🍂🍁🍂

CP

Tuesday, June 22, 2021

*🌹पिशवीभर आनंद!*🌹

*🌹पिशवीभर आनंद!*🌹 

शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका माॅलमध्ये एक प्रौढ दांपत्य खरेदीला आले होते. 
खरं तर आता दोघेच असतात घरी, 
फारशा वस्तू लागत नाहीत पण थोडा वेळ जाईल, कंटाळवाण्या रूटिनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता. 
शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे.  
सवयीने एक ट्राॅली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. 
त्याचवेळी,  त्यांचे लक्ष आजूबाजूच्या खरेदीकरता आलेल्या लोकांवर होते. 
त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दांपत्याने. 
ते दोघे खरेदीत मश्गुल झाले होते.  
आवडलेली एखादी वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत, माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही हे ठरवत होते.  
एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असे जाणवले की किंचीत नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते. 
ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपले आणि आपसात एकमेकाकडे बघून हसले  ज्येष्ठ दांपत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले. 
एकेक रूपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावे लागायचे असे ते दिवस होते.
काय वाटले कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान नवरा बायकोकडे चालत गेले. 
"नमस्कार,  आपण ओळखत नाही एकमेकांना. माझ्याकडे या माॅलचे दोन हजार रुपयांचे एक फ्री कुपन आहे. 
त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे, आम्हाला काही खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कुपन दिले तर चालेल का? " 
समोरून सहाजिकच प्रश्न आला, 
"त्या बदल्यात आम्हाला किती पैसे भरावे लागतील?" 
"दोन हजारापर्यंत काहीच नाही, 
त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील. 
"ज्येष्ठ जोडप्यातल्या नव-याने  शंका समाधान केले. 
तरूण दांपत्याला आश्चर्य वाटले. त्यातली बायको म्हणाली ," 
आम्हालाच का देताय हे तुमचे कुपन? " 
"मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार.. 
कारण  मगासपासून आम्ही तुम्हाला बघतोय, आमचे सुरूवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे! 
हे पहा, तुम्हाला फसवायचा, त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला. 
या बदल्यात  तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईसक्रीम शाॅप आहे तिथे भेटू, चालेल?" 
ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला. 
तरूण जोडप्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते कुपन घेऊन ते खरेदीकरता वळले ज्येष्ठ जोडपे कॅश काऊंटरच्या दिशेने निघाले. 
तरूण जोडप्याची चर्चा सुरू झाली, काय घ्यावे? 
त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडलीच होती. 
ती दोन हजारात नसती आली, मग कपडे वाळत टाकायचा स्टँड तो ही महाग होता. 
बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, "सरळ वाण सामान घेऊन जाऊ.."
त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, "तेवढं आपण दोघे आरामात कमावतो, आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही." 
नव-याला लगेच पटली ही कल्पना. 
दोघांनी पटपट यादी करायला सुरूवात केली. 
मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचे लेखन साहित्य,  चाॅकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन, डाव, मसाले असे बरेच काही घेताना ते सतत बेरजा करत होते. 
दोघांना मजा आली खरेदी करताना.  
कॅश काऊंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आले एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूनी भरून गेली होती. 
दोघं आनंदी चेह-याने बाहेर आले. 
समोर ते दांपत्य होतेच. 
चौघे आईसक्रीम शाॅपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईसक्रीम खाताखाता ज्येष्ठ दांपत्यातला नवरा म्हणाला," पोरांनो,  ऐकाल माझे?" 
दोघे कान टवकारून ऐकू लागले. 
"आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला. 
जर महाग गोष्ट घेतली असतीत तर एकच आली असती, पण बघा आज तुमच्या पिशवीत लहानलहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत..
आणि *जन्मभराच्या आठवणीदेखील. आपले आयुष्य असंच आहे एक महागाची मोठी गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे*? 

*मोठी ध्येय असावीत पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निसटू देऊ नका*.. 
साॅरी बरं का, एकदम प्रवचनच दिले मी तुम्हाला" असे म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघालेदेखील. 
तरूण जोडप्याला "धन्यवाद" म्हणायचा वेळही न देता. 
ते दोघे भानावर आले तेव्हा त्यांना जाणवले ," अरे ते दोघे उतरले बघ.." 
बायको म्हणाली पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते.." उतरले ग ते ! साध थँक्यू पण म्हटले नाही आपण..." नवरा म्हणाला. 
"आपली परिस्थिती सुधारली ना की *असाच पिशवीभर आनंद देऊ कोणा अपरिचिताला*..आपोआप थँक्यू पोचतील त्यांना,  काळजी नको करू." बायकोने नव-याला आश्वस्त केले. 
त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण. 
तो 'पिशवीभर आनंद'  घेऊन आपल्या घराकडे ते आनंदाने निघाले..

✍️अनघा किल्लेदार
पुणे.