Sunday, November 11, 2018

आयुष्याचे धडे

जीवन हे  तुम्हाला रोजच्या रोज काहींना काही धडे शिकवत असते.पण त्याकडे ध्यान मात्र पाहिजे.अशाच एका दौऱ्यावर असताना मी एका खेड्यात गेले होते.संध्याकाळ ची वेळ होती.
मी एका मित्राच्या... नीरवच्या घरी उतरले होते.त्याचे आजोबा त्या परिसरातील अत्यंत प्रथितयश लेखक होते.त्यांच्या हयातीत त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले होते. त्याची आजी नेहमीच या सन्मानांविषयी भरभरून बोलायची.

नीरव मला एका बाजूला घेऊन म्हणाला, "सॉरी, माझी आजी अजूनही भूतकाळात रमते. माझे आजोबा त्या काळातील कितीही मोठे लेखक असले, तरी आज ते विस्मृतीच्या पडद्या आड गेलेले आहेत. आज त्यांचं नाव कुणालाही आठवत नाही. पण आजीच्या लक्षातच येत नाही."

त्यावर मी त्याला म्हणाले, "तुझी आजी ज्या पुरस्कारांबद्दल व मानचिन्हां विषयी बोलत होती, ते मला दाखवशील का ?" मला तो वरच्या मजल्यावरील एका खोलीत घेऊन गेला. खोली उघडून आम्ही आत पाऊल टाकलं, तर ती धुळीने गच्च भरलेली होती. तिथे कित्येक जुने ग्रंथ, पुरस्कार  मेडल्स व कप होते. एका खोक्यात घड्या करून ठेवलेल्या असंख्य शाली होत्या.

नीरव म्हणाला, "आजोबा हयात असताना रोज त्यांना भेटायला कितीतरी लोक यायचे. आता त्यांचे समकालीन सर्वच्या सर्व मरण पावले आहेत. आमच्याकडे जुन्या फोटोंचे इतके अल्बम आहेत की त्यातील मंडळी आम्हांला ओळखू सुद्धा येत नाहीत ! आमच्याकडे इतकी पुस्तके आहेत, ती एखाद्या वाचनालयाला भेट द्यावीत, तर त्याला आजी तयार होत नाही. आजोबांच्या या एवढ्या पुरस्कारांचे करायचे तरी काय ? ते ठेवायचे तरी पंचाईत आणि फेकायचे तरी पंचाईत !

मी राहतो मुंबईला.  तिथं माझा एक छोटासा टू बेडरूमचा फ्लॅट आहे. एक खोली मुलांची व एक आमची. आमच्या घराण्याचा मी एकटाच वारसदार आहे. आजीचं म्हणणं असं की या सर्व वस्तू मी जतन करून ठेवाव्यात. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, एखादी व्यक्ती आपल्या हयातीत खूप काही गोष्टी, सामान-सुमान गोळा करून ठेवते.पण ती व्यक्ती मरण पावल्यानंतर पुढच्या पिढीला त्या गोष्टींमध्ये काहीच स्वारस्य नसते. मी माझ्या आजोबांचा फार तर एखादा फोटो ठेवू शकेन आणि पुस्तकांपैकी काही पुस्तके. माझ्या मुलांना मातृभाषेतून व्यवस्थित बोलता येत असले तरी त्यांना त्या भाषेत  लिहिता-वाचता येणार नाही. त्यामुळे आजोबांच्या इतक्या मोठ्या ग्रंथभांडाराचा कोणालाही, काहीही उपयोग नाही. माझ्या आजोबांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पुस्तके एखाद्या वाचनालयास भेट देण्याची परवानगी आजीने दिली असती तर निदान त्यांच्या पिढीतील कोणीतरी ती वाचली तरी असती. आता त्या पुस्तकांचा आजच्या काळाशी काहीच संबंध उरलेला नाही."

अचानक मला जाणीव झाली की मला यातून मोठा धडा शिकायला मिळतोय.आपण जर खूप सामान-सुमान, वस्तू साठवून ठेवल्या, तर पुढच्या पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो. ओझं वाटू शकते. आपल्या हयातीतच आपण, आपला हा हव्यास कमी केला पाहिजे. एका-एका गोष्टीचा स्वतःच्या हातांनी विनियोग केला पाहिजे.

ही खूप मोठी शिकवण मी तात्काळ अंमलात आणायला सुरुवात केली....
आजकाल माझ्या उपयोगाची नसलेली एकही वस्तू मी घरात ठेवत नाही,
लगेचच ती देऊन टाकते !

(सुधा मूर्ती यांच्या "आयुष्याचे धडे गिरवताना " या मेहता पब्लिकेशन हाऊस ने प्रकाशित केलेल्या, लीना सोहोनी अनुवादित, पुस्तकातील एक अनुभव - साभार )

No comments:

Post a Comment