◆ स्पर्श ◆
आज नेहमीप्रमाणे तो आजोबांना मॉलिश करावयास आला होता .
त्याचा आणि आजोबांचा वार ठरलेला होता . या गोष्टीला आता जवळजवळ तीन वर्षे झाली होती . दर मंगळवारी सकाळी आठ ला तो यायचा व आजोबांच्या सर्वांगाला खोबऱ्याच्या तेलाने मॉलिश करायचा . तेलात स्वतःच आणलेल्या दोन कापराच्या वड्या टाकायचा . आजोबांचे दुखरे पाय , टाच , तळवे यांची मनापासून काळजी घ्यायचा . त्यांच्या मणक्यावर एक नाजूक हात फिरवायचा . आजोबांशी दिलखुलास गप्पा मारायचा . अंग चोळत असताना त्यांना विचारायचा , " काका , दुखत असेल तर सांगा . कुठे अधिक दुखत असेल तर तेही सांगा . या वयात शरीरात रक्ताच्या लहान लहान गाठी होतात . अशा मालिशमुळे त्या मोकळ्या होतात व रक्तप्रवाह सुरळीत होतो . त्यामुळे तुम्हास ताजेतवाने वाटते . "
त्याच्या मालिशचे अनेक फायदे असतीलच . मात्र तो जे बोलायचा तेच आजोबांना खूप हवे असायचे. तो जो स्पर्श करायचा त्यामुळे आजोबांना तरतरी यायची . एक वेगळीच चेतना किंवा शिरशिरी पायापासून मेंदूपर्यंत जायची . त्यांची काळजी घेणाऱ्या आजी जाऊन आता पाच वर्षे झाली होती . या पाच वर्षात त्यांच्या अंगाला , शरीराला , पायांना , पाठीला , हातांना हा खुळा सोडून अन्य कोणी आपलेपणाने स्पर्श केलेला नव्हता . त्यानेसुद्धा या तीन वर्षात आजोबांशी मालिशच्या निमित्ताने जवळीक साधली होती . आता आजोबांची वासना ना पैशात होती , ना प्रॉपर्टीत होती . नातवंड वीस वर्षापेक्षा अधिक मोठे झाले असल्यामुळे आजोबांना किंचित टाळत असे . मुलगा आणि सुनबाई यांनी दिवसातून एखादा गोड शब्दाचा स्पर्श केला तर केला . अन्यथा खरा स्पर्श सोडाच, शब्दांच्या स्पर्शवाचून दिवस मावळायचा . खाण्याची काळजी स्वयंपाकवाली बाई तिला जशा सूचना असतील तशा घेत असे . तीच आजोबांना वेळेवर औषधांची आठवण करून देई व आजोबा औषधे घेत . एकदा आजोबा थोडे कण्हत होते . ते या कामवालीने ऐकले व आजोबांना विचारले , " काका , अंग दुखतेय काय ? "
"हो गं , पायाच्या पिंढऱ्या जरा अधिक दुखताहेत . सकाळी बागेत जाऊन आलो . तिथले नेहमीचे म्हणाले , कोणाकडून तरी चोळून घ्या . आता सांग , या घरात हे कसे शक्य आहे ? असो . गोळी घेईन . तू नको काळजी करू ."
" आजोबा , एक तेलाने अंग चोळणारा तिशीचा मुलगा आहे माझ्या माहितीचा . आमच्या भजनी मंडळात येतो व बायकांचे पाय चोळून देतो . दिसायला असा तसाच आहे . मात्र बोलायला खूप चांगला आहे . पैशासाठी हटून बसत नाही . जेवढे द्याल तेवढे घेतो . एकदा घेऊन येऊ का त्याला ? "
"थांब , आधी सूनबाईला विचारतो व नंतर बघू . उगीच तिच्या शब्दांनी कानाचे मालीश नको व्हायला . काय ?" आजोबा हसत बोलले .
कामवाली देखील हसली व तिने मान डोलावली . रात्री जेवताना आजोबांनी मुलांसमोर व सुनेसमोर हे सर्व सांगितले . मुलाचे म्हणणे पडले की रिक्षातून फिजिओथेरपिस्टकडे जाऊन या . सूनबाईना बहुतेक फिजिओथेरपिस्टचा खर्च माहीत असावा . त्यामुळे तिने नवऱ्याला गप्प केले , " अहो , बाबांची खोली तशी बाजूलाच आहे . येऊ दे ना तो माणूस . तसा तो शेवंताच्या ओळखीचा आहे आणि पैशासाठी आसुसलेला नाही असे दिसतेय . बाबा कांही दिवस त्याच्याकडून चोळून घेऊ देत व नंतर नाही गुण आला तर दवाखान्याचे बघू ना ."
चला , घरच्या हिटलरकडून हिरवा कंदील तर मिळाला . आजोबांना बरे वाटले . आता कोणी माणूस घरी येऊन त्यांच्याशी फक्त बोलणार नव्हता तर आपुलकीने हात हातात घेणार होता . भले , घेईना का थोडे पैसे ; पण स्पर्श विकत मिळणार होता . आजोबा सुखावले . दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामवालीला सांगितले की त्या मालिश करणाऱ्या माणसाला एकदा घेऊन तरी ये , म्हणून . दुसऱ्याच दिवशी तो सावळा , कपडे साधे , उंचीला असेल सव्वापाच फूट , चेहऱ्याने ओबडधोबड , त्यामुळे दिसायला असा तसाच , मुद्दाम म्हणून कोणी जवळ बोलावणार नाही असा हा तरुण तिच्याबरोबर घरी आला . तिने त्याची आजोबांशी ओळख करून दिली . " आजोबा , हा बाबू , मालिश चांगले करतो व बोलतो पण गोड ." आजोबा हसले व म्हणाले , " बाबू , माझे पाय व पिंढऱ्या खूप दुखताहेत रे . जरा चोळून देतोस ? आणि हो , पैसे किती घेणार आधीच सांग ."
" काका , मी सेवा म्हणून हे काम करतो . कोणाकडे इतकेच असे मागत नाही . तुम्ही द्याल तेवढे आनंदाने घेतो . जर नसतील पैसे तर काळजी करू नका . मी चोळतो तुमचे पाय. आणि तीन दिवस जर चोळून घ्याल तर हे पाय दुखायचेही थांबतील . हां , मला तुमच्याकडील खोबरेल तेल मात्र लागेल . " बाबूचा आश्वासक व निर्लेप आवाज ऐकून आजोबा खुश झाले . हा मुलगा गुणी आहे हे त्यांनी त्याच्या आवाजावरून ओळखले .
आजोबांकडे तेलाची बाटली होतीच . त्यांनी ती पटकन बाबूला दिली . " काका , एक वाटीही लागेल हो ." शेवंता तिथे होतीच . तिने किचनमधली वापरात नसलेली एक वाटी बाबूला आणून दिली व ती तिच्या कामाला गेली . बाबूने चमचाभर तेल वाटीत घेतले व त्यात स्वतःकडील कापराच्या दोन छोट्या वड्या घातल्या . तेलात त्या चांगल्या घोळल्या व तो आजोबांकडे वळला . "काका , या खुर्चीवर बसा बघू . तुमची विजार गुडघ्याच्या वर घ्या व आरामात बसा . मी पायावर कुठे कुठे दाब देईन . दुखले तर लगेच मला सांगा ." आणि बाबूने आजोबासमोर बसकण मांडून त्यांचा पाय हातात घेतला सुद्धा . कितीतरी दिवसांनी कोणा परक्याचा स्पर्श त्यांच्या पायाला होत होता . तो स्पर्श झाला व कांही हव्याहव्याशा गोड झिणझिण्या आजोबांच्या मेंदूत संक्रमित झाल्या . त्यांच्या हातापायावरील केस किंचित उभे राहिले . "आजोबा , मुळीच घाबरू नका . मी खूप जोराने नाही दाबणार ", बाबू बोलला . आजोबा बाबूच्या भोळेपणावर फक्त हसले . त्याला कसे सांगणार की त्यांचे पाय अशा आपलेपणाच्या स्पर्शाला किती दिवसापासून आसुसले होते ते !
त्या दिवशी बाबूने आजोबांना चांगला पाऊण तास दिला . त्यांच्या पायाचे तळवे , बोटे , वरच्या नसा इत्यादी त्याने हळुवारपणे दाबल्या व बोटांनी दोन्ही पायांना समदिशेने मालिश केले . वरच्या नसा बोटाने दाबून दुखते किंवा काय हे तो आजोबांना विचारी . नंतर त्याने घोट्याचे मालीश केले . पिंढरी व लवणीचे मालीश करताना मात्र आजोबा दुखल्याचा आवाज काढू लागले . बाबूने दोन्ही हातानी समप्रमाणात नाजूक जोर देऊन दोन्ही पायांचे चांगले वीस मिनिटे मालीश केले . नंतर दोन्ही गुडघे हळुवारपणे गोलाकार मालिश करून स्वतःचे समाधान करून घेतले . सर्व झाल्यावर त्याने तळव्याच्या वेगवेगळ्या जागी पाचपाचदा प्रेशर देऊन त्या त्या पॉईंटचे मालीश केले व जाता जाता सर्व बोटांना अंगठ्याच्या चिमटीत पकडून कांही वेळा दाबले . आजोबांच्या चेहऱ्यावर स्वर्गसुख स्वर्गसुख म्हणून जे कांही असते ते हेच असावे असा भास जाणवत होता .
हे सर्व चालू असताना बाबूची तोंडाची टकळी आणि आजोबांचे माहिती काढणारे प्रश्न चालूच होते . आजोबांनी एवढेच लक्षात ठेवले की बाबूचे अद्याप लग्न झालेले नाही , तो मोठ्या भावाकडे रहातो व खातो , मिळालेले पैसे तो त्याच्या वहिनीला देतो . वहिनीने सध्या त्याला एक जुनी सायकल दिली आहे . तो गावातील मोठ्या बागेत जातो व तिथे कांही लोक त्याच्याकडून दहा-वीस रुपयात मालीश करून घेतात . त्यातील दोघातिघांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांचे हाताचे , पायाचे , मानेचे देखील मालीश तो करतो . त्यातील एकीने त्याला तिच्या भजनी मंडळात नेले होते . तिथेही तो स्त्रियांच्या पायाचे व गुडघ्याचे मालीश करतो . तिथेच त्याची व शेवंताची ओळख झालेली होती . तो चौदा पंधरा वर्षांचा असताना त्याचे वडील गेले . ते मालीश करणारे म्हणून प्रसिद्ध होते . त्यांचा वसा त्याला जसा कांही वारस्यात मिळालेला असावा . तो चौथीच्या वर शिकू शकला नाही . भोळा भोळा म्हणून तो सांगकाम्याचेच काम करी . वीस वर्षांचा झाल्यानंतर त्याने कधीतरी मोठ्या बागेत एकाला मालीश करताना पाहिले व हे काम आपण खूप चांगले करू शकू असे त्याच्या लक्षात आले . बागेतील फुकट्यानी त्याला वापरून घेतले . त्यातले कांही चांगले निघाले व त्याला दोन पैसे भेटू लागले . आता भावाच्या घरी त्याचे बरे चालले आहे असे तो म्हणतो .
आजोबांना बाबू खूप आवडला . खुश होऊन त्यांनी त्याला पन्नास रुपये दिले . बाबूचा चेहरादेखील उजळला . त्याने आजोबांना सांगितले , " काका , आणखी दोन दिवस मालीश करून घ्या . तुमचे पाय दुखायचे थांबतील बघा ." आणि आजोबांनी त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा यायला सांगितले .
तीन दिवसांच्या चोळण्याने आजोबांचे पाय खरोखरच दुखायचे थांबले . त्यांनी तसे मुलाला व सुनेला सांगितले . हेही सांगितले की आता ते आठवड्यातून एकदा दर मंगळवारी त्याच्याकडून अंग मालीश करून घेतील . मुलाला नको म्हणायचे कांही कारण नव्हते व आजोबा सुनेकडुन पैसे घेत नव्हते . त्यामुळे बाबूचा मंगळवारचा फेरा नेहमीसाठी सुरू झाला . आता आजोबा त्यांच्या गरजेनुसार बाबूकडून पाय , पाठ , मान इत्यादी सर्व तेलाने रगडून घेऊ लागले . बाबूही त्यांच्यासाठी तासभर देऊ लागला . हा एक तास आजोबांसाठी स्वर्गीय अनुभव असे हे मात्र खरे ! बाबूला दोन पैसे मिळावेत म्हणून आजोबा दर रविवारी त्यांच्या छोट्या बागेत त्याला बोलवत व मित्रांना किरकोळ मालिश करावयास लावीत . आजोबांचे मित्र बाबूला कधी दहा , कधी वीस रुपये देत . आजोबांनी सर्वाना सांगितले होते की बाबू घरी येऊनही मालिश करेल . मात्र अर्ध्या तासाचे पन्नास रुपये देत चला . बाबूला त्यामुळे भरपूर काम मिळे . बाबू त्यामुळे आजोबांवर खुश होता . तो कधी कधी आजोबांच्या मुलाचे देखील संपूर्ण बॉडी मसाज करीत असे . दिवाळीच्या दोन दिवस आधी तो मुलाचे , नातवाचे व आजोबांचे स्पेशल मालिश करे . आजोबा त्याला नवीन कपडे देत . तो आता घरातील सर्वाना हवाहवासा झालेला होता . एकदा आजोबांचा नातू सायकलवरून एका खड्यात घसरला . त्याला बऱ्यापैकी मुका मार लागला . दवाखान्यात बाबूने त्याची छान काळजी घेतली . घरातील सगळे आता बाबूवर विश्वास ठेवून घरचा मेंबर मानू लागले होते . दर मंगळवारच्या आजोबांच्या मसाजचे काम न चुकता बाबू करी . बांबूच्या हजेरीत ते खरोखर तृप्त असल्यासारखे दिसत . घरचे सर्वजण बाबूला 'आजोबांचा बाबू' असे म्हणून चिडवायचा प्रयत्न करीत . पण बाबूला तो बहुमान वाटे . असे हे जगावेगळे नाते तयार झाले होते.
आज मंगळावर होता व नेहमीप्रमाणे बाबू आजोबांना मालिश करावयास आला होता . मात्र बंगल्यातील वातावरण नेहमीचे नव्हते . सगळे शांत व गंभीर होते . आजोबांचा नातू मुसमुसत होता . सूनबाईंची आणि मुलाची आजोबांच्या खोलीत ये-जा चालू होती . शेवंताने बाबूस सांगितले की डॉक्टर आले आहेत व आजोबांना तपासत आहेत . ती नेहमीप्रमाणे आजोबांना चहा-बिस्किटे घेऊन गेली . मात्र आजोबा उठले नव्हते . "काका , उठा . तुमचा चहा आणलाय ." अशी तिने जोरदार हाळी देखील दिली . मात्र काकांनी ना ओ दिली ना कूस बदलली . ती घाबरली व आपल्या मालकिणीला तिने धावत जाऊन सांगितले . सुनबाई व मुलगा लगबघीने तिथे आले खरे , आजोबांची कांहीच हालचाल त्यांना दिसेना . दोघेही घाबरले . आपल्या फॅमिली डॉक्टरना त्यांनी बोलावून घेतले . यात अर्धा तास गेलाच . नातूही उठला . आता त्याला सगळे समजत होते . तो मुसमुसु लागला. बाबू तिथे पोहोचला , त्याने दोन-तीन मिनिटात वस्तुस्थिती समजून घेतली . त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. तेवढयात डॉक्टरसाहेब बाहेर आले व त्यांनी सर्व संपल्याचे सांगितले . मृत्यू घरी झालेला असल्याने कदाचित पीएम करावे लागेल असेही ते बोलले व निघून गेले .
सर्वजण शोकग्रस्त होते . आजोबांच्या मुलाने बाबूच्या रडणाऱ्या चेहऱ्याला पाहिले व तो बाबूच्याच खांद्यावर ऑक्साबोक्सी रडू लागला . आता त्याचे सांत्वन करण्याचे काम भोळ्या बाबूला करावे लागले . बाबू त्याचे डोळे पुसू लागला . अचानक त्याला काय वाटले कोणास ठाऊक ? तो मुलाला म्हणाला , " दादा, मी मालिश करण्यासाठी आलो होतो . काका जिवंत आहेत किंवा नाहीत मला माहित नाही . पण मी अजूनही मालिश करू शकतो ना ? दादा , हे शेवटचे मालिश समजा . समजा एक तासापूर्वीच काका आपणास सोडून गेले असतील तर त्यांना माहीत होते की आज मंगळवार आहे व मी मालिशसाठी निश्चित येणार . दादा , मी काकांचे मालिश करू ? "
मुलगा बाबूच्या तोंडाकडे बघतच राहिला . त्याला काय वाटले कोणास ठाऊक ? बोलला ," अरे , माझ्याएवढाच तुझाही हक्क आहे बाबांवर . जा . खुशाल मालिश कर . पण रडू नकोस . नेहमी करतोस तसेच कर .," आणि बाबूने ती नेहमीची खोबरेल तेलाची वाटी उचलली . आपल्या जवळील कापुराच्या दोन वड्या त्यात खलल्या. आणि बोलला , " काका , मी आलोय . चला, पायांना मालिश करूया ." बाबूनेच त्यांचा पायजमा गुडघ्याच्या वर घेतला व तळव्यांना किंचित तेल लावले . पायांच्या नसानांही थोडे तेल लावले व नेहमीप्रमाणे तिथे हळू हळू चोळू लागला . पायाच्या पिंढऱ्यानाही त्याने किंचित तेल लावले व खालून वर एकसारखा जोर देऊन सावकाश मालिश करू लागला . "काका , दुखत नाही ना ?" मध्येच तो बोलला . ऐकणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी गोळा झाले . मात्र बाबूची जशी कांही तंद्री लागली होती . बाबूने आजोबांचे हात हातात घेतले व हाताने नेहमीप्रमाणे बोटाकडून खांद्याकडे जोर देऊन चोळू लागला . बोटांना व हाताच्या मागच्या बाजूच्या नसाना त्याने हळुवार मालिश केले . आता त्याने पुन्हा गुडघा व मांडीला किंचित चोळले आणि पायाच्या तळव्याच्या प्रेशर पॉईंटना गोलाकार चोळून तिथे जोर देऊ लागला . "काका , तुमची मान आणि मणका आता ठीक आहेत ना ? " बाबूने हलकेच विचारले व उत्तरासाठी जसे कांही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला . त्याला आजोबांचे डोळे किंचित हलताहेत असे वाटले . " काका , उघडा डोळे आणि थोडे पालथे पडा बघू . आज मला तुमच्या पाठीलादेखील थोडे मालिश करू दे ." आजोबांनी खरेच डोळे उघडले होते . बघणाऱ्या कोणाचाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .
आजोबांनी कूस बदलली आणि पोटावर झोपले. बाबू आपल्याच तंद्रीत होता . त्याने आजोबांच्या पाठीला व मानेला हळुवार तेलाचा हात लावला व कांहीबाही बडबडत मालिश करू लागला . त्याचा स्पर्श आजोबांसाठी संजीवनी देणारा संजीवक झालेला होता . मुलगा, सुनबाई, नातू आणि शेवंता यांचे डोळे पाण्याने डबडबले होते . त्यांना ना आजोबा दिसत होते , ना बाबू . एका अघटीताचे ते साक्षीदार होते !
🙏🙏
आनंद बावणे . इचलकरंजी.
No comments:
Post a Comment