लहानपणी शुभंकरोति, मनाचे श्लोक, रामरक्षा अशा गोष्टी आपण म्हणतच असतो. त्या नित्य पठनात असतात. कदाचित लहान वयात पाठ झाल्यामुळे त्या दीर्घकाळ लक्षातही राहतात. अर्थात हे पूर्वीचे अनुभव आहेत. आपण आता त्या संस्कारक्षम परिपाठाला कालबाह्य ठरविले आहे. काही गोष्टींवर धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा शिक्का मारून त्या बाजूला ठेवण्याची आपली एक नवीनच आधुनिक (?) जीवनशैली सुरू झाली आहे. बरे, आपण त्याला काही नवीन पर्याय शोधले काय, तर तसेही नाही. 27 नोव्हेंबरच्या लेखांकात आपण मनाचे श्लोक, गीता अशा गोष्टींचे लहानपणापासून पाठांतर असेल तर पुढे जीवनात विविध प्रसंगी त्या समृद्ध पाथेयाचा कसा उपयोग होतो, याचा थोडा विचार केला आहे. खरे तर मनाच्या श्लोकांचा फार आध्यात्मिक खोलात न शिरता अगदी लौकिक, व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरीही मनाला समर्थ करणारी ती उपासना आहे, हे कळल्याशिवाय राहात नाही. अर्थात प्रपंच आणि परमार्थ असा भेद समर्थांना मान्य नाही. जीवन एकात्म असतं. त्यामुळे असा भेद करताच येत नाही.
मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकांत समर्थ आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवतात. कोणत्या मार्गाने जायचं आहे, हे ते मनाला सुचवतात. ‘गमू पंथ आनंत या राघवाचा’ अशी आपल्या मनाला ते स्पष्ट सूचना देतात. हा मार्ग ‘आनंत’ आहे, म्हणजे काय? हा मार्ग व्यापकतेकडे, विशालतेकडे नेणारा आहे. ‘छोटे दिलसे कोई बडा नहीं हो सकता. टुटे दिलसे कोई खडा नहीं हो सकता।’
माणसांमध्ये विकासाच्या अनंत शक्यता असतात, हे कळले म्हणजे मन छोटेही राहात नाही आणि एखाद्या क्षुल्लक कारणामुळे खचतही नाही. अनंताच्या मार्गावर चालताना आपल्याच संकुचित सीमा तोडाव्या लागतात, मर्यादा ओलांडाव्या लागतात, झापडं काढावी लागतात, दृष्टिकोन व्यापक करावा लागतो. ‘अनंत’ या शब्दातच व्यापक होण्याची प्रक्रिया सामावलेली आहे. त्याकरिता राघवाचे विशाल रूप जाणून घेतल्याशिवाय संकुचित भाव नाहीसा होतच नाही. म्हणूनच रामाची विविध रूपं विभिन्न श्लोकांमधून मनावर ठसविण्याचा समर्थ प्रयत्न करतात. समर्थांचा राम कोदंडधारी आहे. त्याला पाहून काळही थरारतो. तो पूर्ण प्रतापी आहे, सर्वगुणी आहे, एखाद्या शिलेप्रमाणे जीवन झालेल्या निराश अहल्येमध्येही त्यांनी चैतन्य निर्माण केलं. तो दीनानाथ आहे, निर्भय आहे, ब्रिदाचे रक्षण करणारा आहे. विवेकी आहे. अनंत शब्द कळला नाही तर माणसं कर्मकांड, पूजा, विधीपर्यंतच मर्यादित राहतात. राघव मार्गावर चालताना हे भान आवश्यकच आहे.
हा मनासोबत सुरू असलेला संवाद आहे. ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या दुसर्या श्लोकात दोन महत्त्वाची सूत्रं आहेत. समर्थांनी मनाला अनेक श्लोकांमध्ये वारंवार ‘सज्जन’ म्हणूनच संबोधले आहे. आपण बाहेर काय दाखवतो यापेक्षा आपण आपल्याला मनातून काय समजतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ अल्बर्ट एलिस एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या एका पुस्तकात ते काय म्हणतात पहा, ‘‘स्वत:ला ‘चांगला माणूस’ समजा. (समर्थांच्या भाषेत सज्जन) कारण तुमच्या सुखी, कार्यक्षम जगण्याला ते उपकारक ठरतं. आणि तरीही समजून घ्या की, ते तुमचं मूल्यांकन चूक असू शकतं. कारण कधी कधी तुम्ही वाईट वागू शकता आणि वेगवेगळ्या स्थळी आणि काळी ते सुसंगत असेलच असे नाही. स्वयंमूल्याची समस्या त्यामुळे सोपी होते इतकेच. (आपले दोष, चुका, मनाच्या वाईट सवयी, नकारात्मक भावनांच्या आहारी जाणे, अशा अनेक दोषांची जाणीव समर्थही अनेक श्लोकांतून करून देतात.) स्वत:ला सांगत राहा की, मी एक चांगला माणूस आहे. माझं अस्तित्व मला समृद्ध करायचं आहे. माझं अस्तित्वच मला ‘चांगलं माणूसपण’ बहाल करतं. (देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी।)’’ (‘मन कराया प्रसन्न’ या अनुवादित पुस्तकातून. कंसातील मजकूर पुस्तकातील नाही.)
समर्थही मानसशास्त्राच्या भूमिकेतून विचार करतात, हे या उतार्यावरून स्पष्ट होते. कोणताही माणूस पूर्णपणे वाईट िंकवा पूर्णपणे चांगला नसतो. एखादे विशिष्ट वागणे म्हणजे संपूर्ण ‘मी’ नाही, हे समजून घ्यावे लागते. माणसात बदल करण्याची क्षमता असते. तो चांगला असतो म्हणूनच स्वत:ला बदलण्याचा विचार त्याच्या मनात येतो. म्हणूनच स्वत:ला सज्जन समजणे, म्हणजे प्रामाणिकपणे स्वत:ला स्वीकारणे आणि बदलाकरिता स्वत:ला तयार करणे. स्वत:ला सज्जन समजण्यात खोटेपणा नाही. दंभ, दांभिकता मुळातच असता कामा नये, असे समर्थ वारंवार बजावतात. तसेच स्वत:ला अतिचांगलं समजणं, मोठं समजणं अशा प्रकारचा अहंभावही त्यात नको. या अहंभावात न कळत माणूस दुसर्याला कनिष्ठ समजतो. हा अहंकार दु:खाचे कारण असतो. त्याचाही स्वत:च शोध घ्यायला समर्थ सांगतात. ‘अहंतागुणे सर्वही दु:ख होते’ ‘अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे’ अशा शब्दात मनाला ते प्रोत्साहित करतात. दुसरीकडे मनातच न्यूनगंड असेल, माणूस स्वत:लाच मनातून कमी लेखत असेल, वाईट समजत असेल तर बदलाची शक्यताच नाही. मनातून पराभूत होणं सर्वात घातक असतं. म्हणूनच ‘मना सज्जना’ असे संबोधून समर्थ आत्मविश्वास वाढवतात.
हीन, दीन, दुर्बळ, भयभीत असणं समर्थांना मान्यच नाही. ‘नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे’ भक्त दैन्यवाणा असूच शकत नाही. ‘हरिभक्त वीरभक्त विज्ञानराशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी।’ असेही ते म्हणतात. त्यांची भक्त संकल्पना, वीरतेशी, ज्ञानाशी, निश्चयाशी जोडलेली आहे.
‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या ओळीतील ‘सज्जना’ या पहिल्या सूत्राची आपण चर्चा केली. या श्लोकात ‘भक्तिपंथेचि जावे’ हे दुसरे महत्त्वाचे सूत्र समर्थ मनाला सांगतात. आजकाल आपण भक्ती शब्दाचा संबंध अंधश्रद्धेशी जोडतो आणि दुर्दैवाने भक्तीमध्ये असलेल्या ‘भावना’ या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. भक्ती हा भावनांचे नियमन करण्याचा सशक्त मार्ग आहे. कळते पण वळत नाही, असे आपण म्हणतो. या वळण्याचा संबंध भावनेशीच असतो. मनाची ओढ भावनेवरच अवलंबून असते. प्रबळ, उत्कट भावना असल्याशिवाय एखादी गोष्ट आपण पूर्णपणे झोकून देऊन करूच शकत नाही. यशस्वी होण्याच्या मार्गातल्या मुख्य अडचणी भावनांमुळेच निर्माण होतात. भावनाच माणसाला दुर्बळ करतात, हळव्या बनवतात, विचलित करतात. माणसामध्ये उत्क्रांतीच्या प्रवाहात अनेक प्रकारच्या भावना निर्माण झाल्या. त्यांच्या परिणामांवरून आज आपण नकारात्मक भावना व सकारात्मक भावना असा भेद करतो. जेव्हा आपण शुद्ध भक्तीचा मार्ग स्वीकारतो तेव्हा सकारात्मक भावनांचे पोषण करीत असतो.
आपण स्वीकारलेल्या मार्गावर, ध्येयावर, आदर्शांवर आपली भक्ती असते, त्याच वेळी यशाच्या शक्यता निर्माण होतात. भक्तीमुळेच तन्मयता आणि एकाग्रता प्राप्त होते. भक्ती माणसाला खंबीर, अविचल बनवते. भक्तीमुळेच संकटांवर व अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य येते. जो विभक्त नाही, तो भक्त. भक्ती माणसाला ध्येयाशी जोडते. भक्तीमध्ये कोणत्या भावना असतात? भक्तीमध्ये असते प्रेम, तादात्म्यता, समर्पण, निरहंकारिता. आणि याच भावना यशाकरिता, आनंदाकरिता, विकासाकरिता आवश्यक असतात. अहंकारातच अनेक नकारात्मक भावनांचा उगम असतो. मत्सर, लोभ, क्रोध अशा भावनांची तीव्रता वाढली तर दु:ख, अशांती, अस्वस्थता, नैराश्य वाट्याला येते. यापासून दूर राहण्याचा सल्ला समर्थ पुन्हा पुन्हा देतात. सर्वोत्तम दासाकडून या गोष्टी अपेक्षितच नाहीत, हे मनाला ते सतत सांगत असतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनांचा पाठिंबा असल्याशिवाय विचारांचे रूपांतर कृतीत िंकवा वर्तनात होत नाही. आपल्या भावना, विचार आणि कृती यात विसंगती असते. हे ऐक्य साध्य करणे कोणत्याही उद्दिष्ट्यपूर्तीकरिता आवश्यक असते. भक्ती म्हणजे विचारांच्या मागे भावनेचे सामर्थ्य उभे करणे. समर्थ फक्त भक्तिपंथाचा सल्ला देऊन थांबत नाहीत. ‘जनी जाणता भक्त होऊनि राहे।’ असे म्हणून ते जाणता भक्त, ज्ञानी भक्त होण्याच्या मार्गाकडे मनाला नेतात. आणि ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ असा मापदंडही सांगतात. मनाच्या श्लोकात ‘विवेक’ हा शब्द सर्वाधिक वेळा आला आहे. विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा ते वारंवार पुनरुच्चार करतात. ‘धरा जानकीनायकाचा विवेकू’ ‘बोलण्यासारखे चाल बापा’ ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असे मनाला समर्थ सतत आवाहन करीत असतात. ‘जनी बोलण्यासारिखे आचरावे, क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे।’ अशा श्लोकांमधून विचार, भावना आणि कृती यांचे ऐक्य असलेला हा भक्तिपंथ आहे, हे स्पष्ट करतात. खरे तर या तीनही गोष्टींमध्ये एकत्रित तसेच वेगवेगळे बदल घडवून आणणे म्हणजेच ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा विचार करणे. आध्यात्मिक परिभाषा वापरली की, आपल्याला ते कठीण वाटायला लागते.
‘मना सज्जना....’ या ओळीत मनाच्या प्रशिक्षणाची ‘सज्जना’ आणि ‘भक्तिपंथेचि जावे’ ही दोन महत्त्वाची सूत्रे दिल्यानंतर सज्जन कोण, हेही समर्थ याच श्लोकात स्पष्ट करतात. ‘जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे।।’ जनी याचा अर्थ समाजात. कोणत्याही समाजात नीतिनियमांचे काही मापदंड प्रस्थापित झालेले असतात. सज्जनशक्तीच्या आधारावरच खरे म्हणजे सामाजिक जीवन चालत असते. समाजात जे िंनदनीय असते ते सर्व सोडून द्यावे आणि जे वंदनीय असते ते करावे. िंनदनीय गोष्टींकरिता समर्थ ‘सर्व’ शब्द वापरतात.
आपल्याला एखाद्या गोष्टींचा अपवाद करण्याची सवय असते. ‘चलता है’ हा आपला स्वभाव असतो. पण समर्थांचा सर्व गोष्टी सोडण्यावर कटाक्ष आहे. सज्जन माणसांचं समाजात अनुकरण होत असतं. वाईट गोष्टी माणसं सहजपणे स्वीकारतात. पण चांगल्या गोष्टींचे अनुकरण तितक्या सहजपणे होत नाही. सज्जनांनीच मापदंड पातळ करायला सुरुवात केली तर समाजावर त्याचे परिणाम होणारच आहेत. दुसरीकडे वंदनीय गोष्टींसाठी समर्थ ‘सर्व भावे’ असे विशेषण वापरतात. याचा अर्थ वंदनीय गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत. कायदा पाळावाच लागतो म्हणून पाळणं आणि मनापासून पाळणं, यात फरक आहे. वाहतूक नियमांच्या बाबतीत आपण पाहतोच. सज्जनांचा तो स्वभाव असला पाहिजे. सज्जन माणसांच्या अनेक गुणांविषयी वेगवेगळ्या श्लोकांमध्ये विभिन्न पद्धतीने समर्थ मनासोबत संवाद करतात.
मना सज्जना येक जीवी धरावे
जनी आपुले हित तूवा करावे।
रघुनायकावीण बोलो नको हो
सदा मानसी तो निजध्यास राहो।।
एक गोष्ट ते मनात पक्की धरून ठेवायला सांगतात. ते म्हणजे समाजात आपले हित तुला करून घेता आलेच पाहिजे. एकदा राघवमार्ग स्वीकारला आहे ना? मग आता अन्य गोष्टी बोलण्यात वेळ घालवू नको. अशानेच मग ध्येयाला अनेक फाटे फुटतात. मनात सदैव आपल्या ध्येयाचाच निजध्यास घे. सज्जन माणसाला आपले हित साधता आलेच नाही, तोच अपयशी झाला तर सज्जनपणाला अर्थ काय? अशाने सज्जनपणावरचा विश्वास उडणार नाही काय? हा श्लोक कितीतरी अर्थांची वलयं मनामध्ये निर्माण करतो. हेच मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचे अनेक पैलू आहेत. आणखी काही पैलूंचा विचार पुढील लेखांकात करू.
रवींद्र देशपांडे
8888803411
दैनिक तरुण भारत, नागपूर
No comments:
Post a Comment