Monday, April 8, 2019

ज्ञान-अज्ञान

मालक किंवा खरे सद्गुरू आपल्याला ज्ञान देत नसतातच, ज्ञान म्हणून आयुष्यभर गोळा केलेले पुस्तकी संदर्भ, पूर्वग्रह, अनाकलनीय रूढी परंपरा, स्वतःच्या इच्छा, ईर्षा, अपेक्षा, हावरेपणा सोबत काम, क्रोध, द्वेष, मत्सर, राग, लोभ इत्यादी षडविकार काढून घेतात ते.

तो ज्ञान नावाचा मूर्खपणा नाहीसा होऊन आपण रिक्त झालो कि मालक किंवा सद्गुरुकंडून आपोआप प्रेरणा वा स्वानुभव मिळून त्यातून ज्ञानाची उकल होत असतेच. काही वेगळं करावं नाही लागत त्यासाठी...

विश्वातल्या अचाट पसाऱ्यासमोर, त्यातील अंतर्बाह्य संबंधासमोर आपण फार किरकोळ आहोत, आपला बुद्धिवाद, आपले संदर्भ, त्यातून वाटणारी तार्किकता फार त्रोटक आहे हे अज्ञान आधी स्वीकारावचं लागत..

ज्यावेळी आपण कबूल करतो आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला खऱ्या ज्ञानाची आस आहे तेच गुरुकृपेच्या दृष्टीने आणि खऱ्या ज्ञानाच्या दिशेने उचलेलं पहिलं पाऊल ठरतं.

!! अवधुतचिंतन योगीराज राजाधिराज शंकरबाबा महाराज की जय !!

काटकसर


मंजिरी आणि राघव, नुकतच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्या कडेने मस्त  एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते. मंजिरीने त्याच्या कानात हळुच विचारलं, "राघव, तु टीप का नाही दिली त्या वेटरला." 
"का त्याने तुला मागितली होती का?" राघवने तिला मिश्कीलपणे प्रतिप्रश्न केला.
"तसं नाही रे, मी दोनतीन वेळा आॅब्जर्व केलं की तु कोणाला टीप देत नाही, कंजूस कुठला?."
राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा,अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती.
तीने चुलीवर पातेलं ठेऊन त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजुला टाकली. मंजिरी हे सगळं पहात होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं.

तिथून थोडंसं पुढे येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, "बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅग मध्ये थोडंसं पाणी विसळुन ते पण काढून घ्यायचे सांगते, किती हा कंजूसपणा." मंजिरीचा लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग, शेवटी असा नकळत बाहेर पडलाच.

राघवने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. फक्त पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याचा अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहवेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खनकावून बोललीच, "अरे, बघतोस काय शुंभा सारखा, बोल काहीतरी, किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा."

राघव चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाssडकन जोरात लावला. "अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज, माझा राग त्या दरवाज्यावर कशाला काढतेस." शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच.

"अरे हो, सॉरी हं. मला तर लक्षातच नाही आलं की, एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील." चढ्या आवाजात मंजिरी बोलली.
"पण तू का चिडचिड करतेय एवढी, उगाच स्वतःला त्रास, शांत हो जरा." राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला.

"चिडू नाहीतर काय करू, जाऊदे.....तूझ्या सारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहात तुम्ही सगळे" एवढं बोलून मंजिरी गप्प झाली.

"अग,हो... हो....हो... रागाच्या भरात, तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोहचलीस मंजू. शांत हो बघू तू पहिले." हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडीका होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली आणि अखेर बोलता झाला.

"मंजू मलाही प्रचंड चिड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अश्या वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट आर्धीच घ्यायची. काय तर म्हणे एवढ्याश्या लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही,  नव्या साबनाला कायम विरघळलेल्या साबनाचा तुकडा चिपकलेलाच असायचा.
दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच, त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब.
नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी पण..... दिवाळी.... फक्त दिवाळीलाच घेतले जायचे, त्यातपण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचं 'अरे ही तर दामल्यांची बँजोपार्टी दिसते.'
बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिम्लेटच्या गोळ्या पडायच्या. आम्हीपण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो त्यावेळी आपसूकच फुगा भेटायचा.
कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे 'ना पोटला ना ओठाला, फक्त पैश्याचा वाटोळा' ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही, हा पण त्यामुळे दात शाबुत राहिले तेवढं मात्र खरं.
एकदा कलर टिव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानातून घरी येई पर्यंत कलरच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये रूपांतर झालं होतं. बारावीत लुना मागितली होती तर अॅटलसची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ्फsss काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा ."  आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव, एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला.
मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलतांना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली.

"चला आता पासून तु पण या दामले घराण्यात सामील झालीस. पण तुला खरं सांगू मंजू, त्यांच्या ह्या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैश्याची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेता वेळी आली. कधी देव्हाराच्या मागे तर कधी साखरेच्या डब्ब्यात गुपचूप लपवलेल्या पैश्याची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड, लोणची विकून साठवलेल्या पैश्याची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली आणि पप्पांच्या फाटक्या बनियानची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळी पहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असतांना मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैश्याची मदत पडली नाही किंवा पडली असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळलंच नाही.
ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू ही शकलो नसतो. कधीकधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही, पण आज कळतं, त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल कळलं नसतं, आणि मोलच कळले नसते तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं." हे सांगतांना राघवचे डोळे पाण्याने डबडबले होते.

हे सगळं ऐकून मंजिरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्यांची कार घराच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमधेच बसून राहिले. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली  "सॉरी राघव, मला कळलं..... मम्मी पप्पांनीं जे सगळं केलं ते खरचं बरोबरच होतं, पण आता तुम्ही दोघे एवढं कमावता झालात, आता तरी साठवलेल्या पैश्याचा एन्जॉय घ्यावा आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय? एवढीच माझी अपेक्षा आहे."

राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपटत बोलला, "असं नाही गं.... त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या काटकसरीत टप्प्या-टप्प्याला करून घेतली, फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमधे तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त असलेल्या बेनटेक्सच्या बंगड्यांमधे. पप्पांना कधी जुन्या टूव्हीलरच्या खरेदीमधे तर मंडई मधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामधे. ते दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचलेल्या  पैश्याचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत." राघव एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राघवने स्पिकर ऑन केला.

राघव : "हा मम्मी बोल, पोहोचलात का?
राघवची मम्मी : "हो राघू आम्ही पोहचलो पंढरपुरात."
राघव: "बरा झालाना तुमचा प्रवास"
मम्मी: "अगदी व्यवस्थित. बघ फक्त दोनशे रुपयात पोहचलो."  फक्त दोनशे रुपये सांगताच राघव आवक झाला.
राघव: "दोनशे!!!! अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमधे बसवलं होतं, मग सातशेचे दोनशे कसं काय?"
मम्मी: "अरे राघू, तुला माहितेय ना तुझ्या म्हाताऱ्याला ए.सी.चा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून एस.टी.च्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला. तोही फक्त दोनशेत." राघव हसला आणि डोक्याला हाथ लावत बोलला." कशे गं तुम्ही"

मंजिरीचे डोळे मम्मीचे बोलणं ऐकून पाणावले आणि चेहऱ्यावर हलकसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत ती ही बोलती झाली, "लव यु सो मच मम्मी-पप्पा, काळजी घ्या आणि लवकर या, मिस यु बोथ, मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटतेय."

मम्मी: "अरे मंजू, थँक् यु बेटा, तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राघू आहे सध्या, आणि हो तुला सांगायचं विसरलेच."
मंजिरी: "काय मम्मी?"
मम्मी: "अग घरात तुम्ही दोघंच म्हणून...."  
'म्हणून' नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली.
मंजिरी: "म्हणून काय मम्मी?"
मम्मी:" म्हणून.... म्हणून काही नाही गं.... दुधावाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी." राघव आणि मंजिरी दोघं खदखदून हसु लागले.
मंजिरी: "ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा."
मम्मी:  "दोघेही अशेंच हसत रहा, चल आत्ता गजानन महाराजांच्या भक्तनिवासात पोहोचलो, मग करते नंतर कॉल"
मंजिरी : "ओके बाय"
राघव: "ओके बाय, काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची"
मम्मी: "हो आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे."

"पाहिलंस ना मंजू, कसे पोहचले त्यापेक्षा पैशे वाचण्याचा आनंदच त्यांना जास्त, एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करूनकरून ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्याछोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैश्यांचाच आनंद घेतात. त्यांनी झटकन फेकुन न देता विसळुन घेत एकएक थेंब थेंब करून सगळं साठवलं म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचलंय. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोहोचले. नाहीतर दारिद्र्य तर वाट पहातच होतं."

मंजिरीचा मम्मी-पप्पां विषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होता.
मंजिरी: "खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत, मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच."

जिते रहो, सदा दिल से अमीर रहो.

©✒मंगेश उषाकिरण अंबेकर.

Sunday, March 24, 2019

सुख !!


आज म्हणे वर्ल्ड हॅपिनेस डे ! खरंतर आपण सगळे रोज  हॅपीच असतो.  सुख हे कस्तुरी सारखं असतं. आपण दुःखी होतो कारण आपण आनंदात आहोत हे आपल्याला कळत नाही. मूळात सोयींसाठी पैसा लागतो सुख आजही स्वस्तच आहे. दिवसभरात 'बरं झालं'...' बरं वाटलं' असं  आपण जेव्हा कधी म्हणत असतो तेव्हा ते सुखच असतं. प्रत्येक लहान लहान गोष्टीत सुख आहे ....

चालण्याचा प्रचंड कंटाळा आला असताना अचानक मैत्रीण गाडीवर यावी अन् चल सोडते तुला म्हणावं...

वांग्याचं भरीत, दही -भाकरी- ठेचा अशा फक्कड बेतावर शेतात बसून ताव मारणं ...

आवडती गाणी कंटाळा येईतो ऐकणं...

आपल्या माणसांचा गोतावळा बघून नात्याची श्रीमंती जाणवणं ...

एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करणं...

लहान होऊन रस्त्याच्या कडेला साठलेल्या पावसाच्या पाण्यात उडी मारणं...

रक्ताचे रिपोर्टस् नाॅर्मल आहेत हे  रुग्णाला सांगितल्यावर त्याचा चिंतामुक्त चेहरा पाहणं...

मृदगंध दरवळत असताना एकटंच बसून चहाचा आस्वाद घेणं ...

आपल्याला पाहिजे तसा फोटो निघणं...

खिडकीतून पाहिल्यावर निरभ्र आकाश किंवा पौर्णिमेचा चंद्र दिसणं...

छानशी कवितांची मैफिल रंगणं...

मैत्रीणीच्या कौतुक सोहळ्याला हजर राहून तिचा आनंद टिपणं...

लहान बाळ दुडूदुडू पळताना बघणं ...

गप्पा रंगात आलेल्या असताना बाबांना टाळी देऊन हसणं...

चहात बुडालेलं बिस्किट वाचवण्यात यश मिळवणं...

कुणाची तरी सहज आठवण येणं आणि नेमकी ती व्यक्ती भेटणं ...

अंदाजापेक्षा हाॅटेलचं बिल कमी येणं...

आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं...

निरर्थक तात्विक गप्पा मारणाऱ्या मैत्रिणीला रात्रभर ऐकत राहणं...

अंगणात चांदणं बघत झोपणं...

आईला आयता चहा हातात दिल्यावर तिचा खुललेला चेहरा बघणं...

सणावाराला आप्तेष्टांनी भरलेलं घर दंग्यानं दणाणून सोडणं...

निसर्गात भटकंती करणं...

जुन्या फोटोज् चे अल्बम न्याहाळत बसणं...

नेहमी हाऊसफुल असणार्‍या नाटकाची तिकिटं लगेच मिळणं...

कुठल्याही प्लॅन शिवाय पिकनिकला जाणं...

जमेल तशी समाजसेवा करणं...

भरपूर लाड पुरवणारं आजोळ असणं...

पोटभर झोप होईपर्यंत सगळ्या चिंता बाजूला ठेवून मस्त ताणून देणं ...

खर्च केलेल्या पैशाचा हिशोब लागणं...

सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या आजोबांकडून गोष्टी ऐकणं...

गझलेला 'क्या बात' म्हणत दाद देणं...

आजीकडून डोक्याला तेल लावून घेणं...

जुन्या पर्समध्ये १० रुपयांचं लख्ख नाणं सापडणं...

गर्दीने भरलेल्या बस मध्ये थकलेल्या काकांना स्वतःची जागा देणं...

दिवाळीला फराळाचा घरभर भरुन राहिलेला सुवास घेणं ...

पावसात मनसोक्त भिजणं...

घरी पोहचल्यावर फोन कर असं कुणी काळजीनं सांगणं...

पहाटे अंगणात प्राजक्ताचा सडा दिसणं...

ताईने कौतुकाने आपल्यासाठी केलेला पदार्थ आवडीनं संपवणं...

दुधावरली साय किंवा फ्रिजमधलं चाॅकलेट चोरुन खाणं...

अनेकदा ऐकलेले आपल्या बालपणीचे किस्से मामा कडून पुन्हा पुन्हा ऐकणं...

आपल्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट होणं...

समुद्रकिनारी बसून सुर्यास्त बघणं...

अचानक रात्री १२ वाजता मैत्रीणींचा घोळका घेऊन गाडीवर चक्कर मारुन येणं...

कुंडीत लावलेल्या मोगर्‍याच्या रोपट्याला दोन शुभ्र कळ्या येणं...

आपण केलेल्या कामाचं कौतुक होणं...

शतपावली करणार्‍या दादासोबत जागतिक राजकारण वगैरे विषयांवर चर्चा करणं...

पहिल्या कमाईतून आई - बाबांना भेटवस्तू घेणं...

गाणं गुणगुणत घर आवरणं...

जुना मित्र अनेक वर्षांनी भेटणं...

अशी अगणित सुख आपल्याला रोज विविध रुपानं भेटतात. सुख कशात आहे तर ते मानण्यात आहे! आपली सुखाची कल्पना जरा adjust केली की कळतं ते भरभरुन आहे. तुज आहे तुजपाशी हे उमगलं की आयुष्याचा सोहळा साजरा करता येतो. आनंद हा प्रवास आहे...आनंदयात्री होता आलं पाहिजे.

आपण "Hide & Seek " साठी हटून न बसता “Happy Happy" मध्ये समाधान मानायला शिकू तेव्हा सुखाचा हा 'लपंडाव' संपेल..!!

- डाॅ. सायली कुलकर्णी