मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्यशीला चव्हाण यांची रेल्वे प्रवासात पर्स चोरणारा एक उच्च विद्याविभूषित आय. टी. इंजिनीअर, एम. बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण असलेला निघाल्याचे वाचनात आले. समजा हा इंजिनीअर एखाद्या इंटरव्ह्य़ूला गेला आणि समोरच्यांनी त्याला विचारले की, काही अनुभव आहे का? त्यावर हा अगदी शानसे सांगणार- ‘मुख्यमंत्र्यांच्या मिसेसची पर्स चोरण्याचा अनुभव आहे’. आणि असे सांगताच तात्काळ ‘सिलेक्ट’ होणार! कारण सगळीकडे चोरांचाच बाजार आहे. खरं तर चोरी हा विषय अभ्यासक्रमात असावा. तसेही, डॉक्टरेट मिळविणारे काहीजण प्रबंध चोरण्यात पटाईत असतात; तेव्हा ‘चौर्यकर्मपारंगत’ अशीसुद्धा एखादी डिग्री असावी. सुरेश कलमाडी, ए. राजा, कनिमोळी, शशी थरूर.. इत्यादींना तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले जावे. ‘आदर्श’ सोसायटी न पाडता तेथे जागतिक दर्जाचे ‘चौर्यकर्म विद्यापीठ’ स्थापन केले जावे. यासाठी विलासराव, अशोकराव यासारख्यांनी पुढाकार घ्यावा. या विद्यालयातून पदवी मिळालेल्यास सरळ मंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमले जावे. टॅक्स चोरी एक्स्पर्ट, घोटाळा एक्स्पर्ट, भूखंड एक्स्पर्ट.. असे कोर्स सुरू करावेत. त्यांना प्रॅक्टिकल/ सेमिनार/ प्रोजेक्ट आणि मंत्रालयाच्या विविध मजल्यांवर जाण्याची मुभा असावी. चौर्यस्पर्धा परीक्षा घेतल्या जाव्यात. त्यामध्ये हस्तलाघव दाखविणाऱ्याला थेट दुसऱ्या वर्षांला बिनबोभाट प्रवेश दिला जावा!
एकदा असे विद्यापीठ काढले की, मग सुशिक्षित चोरांना अर्थार्जनासाठी विविध क्षेत्रे खुली होतील. कुणी ‘कोहचाडे कोचिंग क्लासेस’ काढतील. कलमाडी इन्स्टिटय़ूटमधील पदवीधरांना चोरी हमखास जमते, अशी ‘कोहिनूर’ टाइप जाहिरातसुद्धा ते देऊ शकतील. भुरटय़ा चोरांसाठी रात्रीची शाळा सुरू करता येईल. कचेरीतील बाबू लोकांसाठी पार्टटाइम क्लासेस सुरू करता येतील. चोरी करणे या देशाचा आनुवंशिक गुण आहे. अगदी द्वापार युगात बालकृष्णाने माखनचोरी करून, मैया मोरी मै नही माखन खायोऽऽ असे सांगून ठेवले आहे. देवेंद्र इंद्र तर कोणाच्याही घरात घुसून आपले हस्तलाघव दाखविण्यात पटाईतच असल्याचे पुराणात दाखले आहेत. त्यामुळे चोरी या कलेला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. २६ कलांच्या यादीत चोरीचा अंतर्भाव करून खुद्द इतिहासकारांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आपण काही नवीन करतो अशातला भाग नाही.
या गुणांचा वापर करून आतासुद्धा मोठमोठे लोक गब्बर झाले आहेत. त्यांनी आपल्या घराची नावे बदलली पाहिजे. चौर्यश्री, चौर्यकृपा, चौर्याशीष, चौर्य अपार्टमेंट, चोर सहनिवास, वगैरे नावे घातली पाहिजेत. आताचे काही लोक त्रिनाम पद्धती वापरतात. उदा. देवराव झिंगराजी हागोडे (पाटील) वगैरे वगैरे. तशा पद्धतीने आडनावाच्या पुढे (चोर) (कंसात) लावण्याची पद्धत पुढे आली पाहिजे. जे लोक चोरी करण्यास असमर्थ आहेत, अशांना वाळीत टाकले पाहिजे. आणि बिच्चारे असे लोक खरोखरच वाळीत टाकल्यागत आज गरिबीत जीवन जगताहेत. कारण या बिच्चाऱ्यांना चोरी करणे पाप आहे असे शिकविले गेले, अचौर्य शिकविले गेले, आदीन्नादाना वेरमणी सिक्ख्व्वापद समादियामी (मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो) असे शील शिकविले आहे. हे लोक चोरी कसे करू शकतील? चोर बनण्यासाठी निर्ढावलेले मन पाहिजे. दुसऱ्याला त्रास देऊन आनंद घेण्याची प्रवृत्ती पाहिजे. दुसऱ्याचे लुबाडण्याची वृत्ती पाहिजे. रातोरात इंजिनीअरिंग कॉलेजेस, मेडिकल, फार्मसी, सायन्स कॉलेज काढणारे, ५० लाखांची कार घेणारे, नोकरीला लागताच बंगला बांधणारे.. आजूबाजूला दिसले की त्यांनी नक्कीच कुठेतरी मोठ्ठा हात मारला- हे जाणून घ्यावे. कारण इमानेइतबारे नोकरी करणारा टू रूम किचनच्या पुढे जाऊच शकत नाही.....
------------
Source:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=176523:2011-08-12-19-56-12&catid=155:2009-08-10-09-09-46&Itemid=168
------------
Source:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=176523:2011-08-12-19-56-12&catid=155:2009-08-10-09-09-46&Itemid=168
No comments:
Post a Comment