सामान्य माणसाला --- अगदी १० वर्षाच्या मुलीला "गीतेचा भावार्थ" कसा समजवावा याचं उदाहरण-
आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड बासुंदीऐवजी मोदक केले होते --त्याचीही छान पावती दिली. मला फार प्रसन्न वाटत होतं कि पाहुणे आवडीने जेवताहेत !!
त्यांच्याबरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या. सासरे मी व पाहुणे त्यांच्या हातखंडा विषयावर ... "गीतासार .".. त्यावरची व्याख्यानं व इतर उपक्रम .. प्रवास इ.इ. गोष्टींबद्दल बोलत होतो पण मुली शांतपणे जेवत होत्या. मधेच त्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला पण त्या बोलायला बिचकताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काहीतरी विचारल्यावर माझ्या मुलीने सांगितलं कि काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात... त्यात मला काय कळणार.. म्हणून मी मधे बोलले नाही!!
ह्यावर पाहुणे छान हसले. तिला म्हणाले.." अगं, गीता कळायला खूप सोप्पी !! तुला न कळायला काय झालं? आत्ताचच उदाहरण घे - तुझ्या आईने आम्हाला सासर्यांनी जेवायला बोलावलंय हे कळल्यावर तत्परतेने आणि वेळेवर स्वैपाक केला, हो ना? बाळा, हाच कर्मयोग !! आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्यावेळी करणे !!
माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं ! पाहुणे पुढे म्हणाले, तुझ्या आईला स्वैपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल -तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून, पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलं, खरं ना?
मुलीला हे सगळं छान पटत होतं! नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं - हा गीतेतला ज्ञानयोग आहे बाळा !!
काकांचं बोलणं पटकन कळल्यामुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावसं वाटत होतं. मीही थक्क झाले.
मग काका म्हणाले, आता आणखी एक गंम्मत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते व प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून वाढत होती, आग्रह करत होती? हो ना?
हो, पण त्यात काय नवीन? .. मोकळेपणाने कन्या विचारती झाली.
अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग !!
समोर जर देण्यायोग्य कोणी असेल तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक, आनंदाने समोरच्याला द्यावे हेच तर भक्तियोगात सांगितलंय !!
गीतेतील कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे, विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर !
No comments:
Post a Comment