Thursday, August 9, 2018

आई म्हणोनी कोणी - यशवंत

आई ! म्हणोनी कोणी । आईस हाक मारी ।
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।

नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी ।
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी ! ।।

ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी ।
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी ।।

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई ।
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई ।।

वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही ।
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई ! ।।

वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही ।
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई ।।

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी ।
काढून ठेवलेला । घालील घास ओठी ।।

उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती ।
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ? ।।

तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती ।
सांगेल ना म्हणाया । आम्हा शुभं करोति ।।

ताईस या कशाची । जाणीव काही नाही ।
त्या सान बालिकेला । समजे न यात काही ।।

पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही ।
ऐकूनि घे परंतू । आम्हास नाहि आई ।।

सांगे तसे मुलीना । आम्हास नाहि आई ।
ते बोल येति कानी । आम्हास नाहि आई ।।

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे ।
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे ।।

गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे ।
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे ।।

वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे ।
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे ।।

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला ।
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला ।।

आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला ।
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला ।।

पंचारती जनांची । ना तोषवी मनाला ।
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेल ।।

येशील तू घराला । परतून केधवा गे ! ।
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे ।।

हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे ।
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे ।।

रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे ।
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे ।।

कवी: यशवंत (श्री. यशवंत दिनकर पेंढरकर)

No comments:

Post a Comment