दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार, असे मानले जाते. दहा हजार पायऱ्या चढून तिथे जाणं हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. भौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये ‘जुनागढ’ या शहरापासून गिरनार तळ पाच किमी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच १६ गावांपर्यंत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी- जगताने संपन्न, विविध औषधी-वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगीसिद्ध-महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेकजण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.
गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भवनाथ महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू-संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा-साधू स्नानाला उतरतात. अशी एक आख्यायिका आहे की त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजनी आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचालित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्रीशेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.
आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरू-शिष्य (नाथ परंपरा) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे ‘प्रसाद’ घेतला जाईल याकडे स्वत: श्रीशेरनाथ बापूंचा कटाक्ष असतो. लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि. मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्रीकाश्मिरी बापूंचा आश्रम आहे. श्रीकाश्मिरी बापूंचे वय अंदाजे दीडशे वर्षेच्या आसपास आहे, अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे. याही आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादाचे भोजन घ्यावे लागते. अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे.
गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त-भक्ताची इच्छा असतेच. सुमारे दहा हजार पायऱ्यांवर हे स्थान आहे. वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिक दृष्टय़ा चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाले आहेत. डोलीवाले एका व्यक्तीसाठी दहा हजार रुपये आकारतात. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर सुमारे २०० पायऱ्यांवर डावीकडे एक भैरवाची मूर्ती आढळून येते. पूर्वी एक सिद्ध श्रीलक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू-संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता. दोन हजार पायऱ्यांवर ‘वेलनाथ बाबा समाधी’ असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिद्ध स्थान आहे, असे सांगतात. वाटेत आजूबाजूला चहा-कॉफी- सरबत मिळण्याची दुकाने आहेत. दोन हजार २५० पायऱ्यांवर श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर ‘माली परब’ घाट येतो. तेथे एक रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. दोन हजार ६०० पायऱ्यांच्या आसपास राणकदेवी मातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांपाशी प्रसूती बाई (देवी)चे स्थान आहे. संतान प्राप्त झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, कालिमाता, वरुडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागा आहे. थोडा काळ येथे विश्रांती घेऊन यात्रेकरू पुढे मार्गस्थ होतात. सुमारे चार हजार पायऱ्यांवर जैन-मंदिर येते. मुख्य मंदिर ‘नेमिनाथाचे’ आहे. अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ हे २२ वे जैन तीथर्ंकर होय. या मंदिरातून थोडय़ा पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीथर्ंकर श्रीआदिनाथांची भव्य अणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन-दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुर-कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर ‘गौमुखी गंगा’ नावाचे स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. आणि डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. (काही ग्रामस्थ, भाविक, साधू-बैरागी या मार्गाने येतात अथवा जातात. या मार्गावर कुठल्याही प्रकारची दुकाने अथवा मदतीसाठी माणसे-डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.) गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायऱ्यांवर ‘अंबाजी टुंक’ येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळीपौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान, बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायऱ्या चढल्यावर ‘श्री गुरू गोरक्षनाथ टुंक’’ हे स्थान येते.
गिरनार पर्वतवरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून तीन हजार ६६६ फुटांवर हे स्थान येते. नवनाथ संप्रदायातील श्रीगोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे, अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरू गोरक्षनाथांची धुनी आहे. असे म्हणतात की याच स्थानावर गुरू गोरक्षनाथांनी चौऱ्यांशी सिद्धांना उपदेश केला. बाजूलाच एक पाप-पुण्याची खिडकी (बारी) आहे, म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या महंत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील ‘सेवा’ या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्चर्या करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. गोरखटुंकनंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायऱ्या उतरायला लागतात.
वाटेत श्रीगिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्रीगिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठय़ा कमानी दिसतात. एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायऱ्या चढल्यावर ‘दत्त टुंक’ आहे. चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी-वारा-पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. दहा बाय बारा चौ. फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात, असा समज आहे. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते तसेच आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुद्धा या शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षांपासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळेत ही धुनी प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. महंत अमृतगिरी बापू म्हणून एक सिद्ध होऊन गेले. त्यांनी या स्थानावर राहून भरपूर तप केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने येथे सकाळी आठ ते रात्री आठ अव्याहत अन्नछत्र चालू असते. इतक्या दुर्गम स्थानी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदान सेवा वृत्तीने देणाऱ्या कमंडलू स्थानाचा उपक्रम हा कौतुकास पात्र आहेच, पण अचंबित करणारा आहे. कमंडलू स्थानाची अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्तटुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी- (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान.
कमंडलू स्थानापासून पुढे पायवाटेने गेल्यास अतिशय दुर्गम, निर्जन ठिकाणे आहेत. त्यामध्ये महाकाली खप्पर, अनुसूया टेकडी, पांडवगुंफा, कपिलधारा, अघोरी गुंफा या स्थानांचा प्रामुख्याने समावेश होतो. कृपया एकटय़ा-दुकटय़ाने या स्थानी जाण्याचा कुणी अट्टहास करू नये व गेल्यास कुणी स्थानिक माहीतगार व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हितकारक आहे.
परत येताना आहे त्या मार्गावरून येणे उत्तम, पण गौमुखी गंगा मंदिरापासून जी मागे उल्लेख केलेली वाट आहे त्या वाटेवरून आल्यास शेषावन मार्गे भवनाथ मंदिरापाशी (गिरनार तलेठी) पोहचता येते. वाटेमध्ये आनंद गुंफा, महाकाली गुंफा, सेवादास आश्रम-सीतावन-शेषावन-भरतवन- जांबुवंत गुंफा अशी अनेक स्थाने बघत बघत भवनाथ मंदिरापाशी पोहचता येथे. या मार्गावर यात्रेकरूंसाठी कुठलीही सोय नाही. तसेच अंदाजे एक हजार पायऱ्या अधिक आहेत. अशा या स्थानावर जाऊन येणे, तेथील वातावरण अनुभवणे व्हावे. आयुष्यात किमान एकदातरी ही गिरनार यात्रा प्रत्येक दत्तभक्तांच्या नशिबी यावी, हाच या लेखनाचा उद्देश.
. ।। जय गिरनारी ।।
⛰गिरनार - मुचकुन्द गुफा ⛰
जूनागढ़ कडून गिरनार तलेटी कड़े जाताना तलेटीच्या अलीकडे उजव्या बाजूला दामोदर कुंड लागते।या दामोदर कुंड पासून जवळच श्री मुचकुंद ऋषि गुफा आहे।
पुराण काळात मुचकुंद नावाचा राजा होऊन गेला।देव-दानव युद्धात मुचकुंद राजा देवांच्या बाजूने युद्ध करत होते।हे युद्ध खुप काळ चालले होते।शेवटी या युद्धात देवांचा विजय झाला।या युद्धात मुचकुंद राजाने अविश्रान्त अविरत कामगिरी बजावली।देवाने मुचकुंद राजाची खुप प्रशंसा केली व वर मागण्यास सांगितले।राजाने वर मागितला की मी अविश्रान्त लढलो आहे तेव्हा मला विना अडथळा निद्रा पाहिजे।आणि जो कोणी माझी निद्राभंग करेल त्याच्या कड़े मी पाहिल्यास तो भस्मसात होईल।देवाने असा वर दिला।राजा मुचकुंद गिरनार जवळ असलेल्या एका गुफेत अविरत निद्रेत लिन झाला।
भगवान श्रीकृष्णावर कालयवन चाल करून आला।कालयवन कुठल्याही युद्धात हरणार नाही व मृत्यु येणार नाही असा त्यास वर होता।या दोघांचे युद्ध सुरु होते।श्रीकृष्णाने अचानक युद्धातुन पळ काढला।कालयवनला वाटले श्रीकृष्ण घाबरून पळत आहे।तो त्याच्या मागे लागला।श्रीकृष्णाला ही मुचकुंद राजाची सर्व कथा माहीत होती।तो या गुफेत आला व मुचकुंदावर आपला शेला पांघरला आणि स्वतः लपुन बसला।कालयवन यांनाच श्रीकृष्ण समजला आणि उन्मादाने त्याने लाथ मारली।त्या लाथेच्या प्रहाराने मुचकुंद ऋषिची निद्रा भंग झाली।त्यांना अतिशय क्रोध आला।त्यांनी रागाने कालयवन कड़े बघितले आणि कालयवन आगीत भस्मसात झाला।श्रीकृष्णाने अतिशय चतुराईने आपल्या बलाढ्य शत्रूचा काटा काढला।मुचकुंद ऋषिचा राग शांत झाल्यावर भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर गेले व सर्व कथा सांगितली।हेच मुचकुंद पुढे ऋषि म्हणून प्रसिद्ध झाले।या गुफेत श्रीकृष्णाने शिवलिंग प्रतिष्ठापित केले।त्याचे नाव नीलकंठ महादेव।
ही गुफा आजही गिरनार मध्ये अस्तित्वात आहे।फक्त याचे स्वरूप बदलले आहे।समोरच्या बाजूला मुचकुंद महादेव मंदिर आहे तर आतल्या बाजूला श्रीकृष्णाने स्थापन केलेले नीलकंठ महादेव मंदिर आहे।गुफेत माता अन्नपूर्णाचे पण स्थान आहे।गुफेत काही मुर्त्या आहेत त्यात एक यमराजाची पण एक मूर्ती आहे।गुफेत वाकुन जावे लागते पण आत गेल्यावर गुफा मोठी आहे।उभे राहून फिरू शकतो।बाहेरच्या बाजूला एक छोटा हौद आहे त्यात न बुड़णारा एक दगड आहे।
. 🏔 गिरनार-कमंडलू कुंड 🏔
गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती।त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला।सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले।हा दुष्काळ बरेच दिवस होता।शेवटी माता अनसूयेला हे बघवेना व त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या।दत्तगुरु तपस्येत लिन होते।मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले।खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले।एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला।तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला।
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे।आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे।दर सोमवारी सकाळी 6 वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात।कापूर, रॉकेल,काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते।हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो।त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात।लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो।मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात।
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते।मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते।महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत।इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत।
आश्रमाच्या वतीने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अखंड अन्नदान चालू असते।चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात।10000 पायऱ्यावर चहा,पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे।प्रचंड वारा, कडक ऊन,धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात।अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे।सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे।पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते।त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो।आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा।'दान' हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत।आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर,साखर,दूध असे वर घेऊन जावे,तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी।
कमंडलू कुंड,धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे।वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात।
एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हीच इच्छा।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री क्षेत्र गिरनार
स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.
गिरनार पवित्र डोंगर
दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!
१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.
श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.
ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.
लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरीबापूंचा आश्रम आहे. श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे १५० वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे, याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने पवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते, त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. डोलीवाले एका व्यक्तीसाठी ५,००० ते ११,००० रूपये घेतात. सुमारे २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. २,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात.
२,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला माली परब घाट येतो. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे.
२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कला-कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौ-मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते, येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.
गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४,८०० पायऱ्यावर अंबाजी टुंक येते. ५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहात नाही.मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो. पुढे ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते.
श्री गोरक्षनाथ गुहा
साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे" दत्तमहाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्षशिखर उंचावर आहे. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे. आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्ष नाथांची अखंडधुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिध्दांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता. बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी (बारी) आहे. म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे.
या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्रीसोमनाथ हे पाहतात. त्यांचा दत्त संप्रदायातील "सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे.गोरक्ष टुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी १,००० ते १,५०० पायऱ्या उतरायला लागतात.
श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात. त्यांना श्री गिरनारी बापू "प्रसाद" म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात.
थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे.
डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १,००० पायऱ्या चढल्यावर गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे.१० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे.बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे.
येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा ३ वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते.
भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते. ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुध्दा शिखरापासून खाली असतात.उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात.
इथे ५,००० वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रकट होते.
त्या अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते.
या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे (म्हणजेच रविवारी मध्यरात्री) २.००-२.३०च्या दरम्यानच पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो.येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.
जय गिरनारी
⛰गिरनार - मुचकुन्द गुफा ⛰ , 🏔 गिरनार-कमंडलू कुंड 🏔 श्री गोरक्षनाथ गुहा ह्याविषयी जी माहिती दिली आहे तिथपासून शेवट पर्यंत पोस्ट स्वतंत्र बनवून पुन्हा अपलोड कराल का ? म्हणजे दोन भागात चांगले वाटेल - जय गिरनारी !
ReplyDelete⛰गिरनार - मुचकुन्द गुफा ⛰ ह्याविषयी जी माहिती दिली आहे तिथपासून शेवट पर्यंत पोस्ट स्वतंत्र बनवून पुन्हा अपलोड कराल का ? म्हणजे दोन भागात चांगले वाटेल - जय गिरनारी
ReplyDelete