गेल्या काही दिवसात ज्या लहान मुलांच्या पत्रिका पाहिल्या त्या चर्चेवरून असे आढळले की, मुलाची दृष्ट कशी काढावी याची माहिती या नवीन मातांना नाही. आपल्याकडे लहान मुलांना होणार्या "नजर लागणे" किंवा "दृष्ट लागणे" या गोष्टीसाठी पूर्वजांनी अत्यंत सोपी उपाययोजना सांगितली आहे. त्याचा अनुभव आपल्या सर्वांनी घेतलेला आहे.
पूर्वी घरात आजीबाई मुलीला, सुनेला नातवंडांची दृष्ट काढायला शिकवायच्या. आजी हे एक अजब व्यक्तिमत्व होतं. तिच्याकडे एक बटवा असे. ज्याला "आजीबाईचा बटवा" म्हणत. त्यात ज्येष्टीमध, वेखंड, सुंठीपासून अनेक औषधं असतं. लहानसहान गोष्टींसाठी प्राथमिक उपचार आजीबाई करत. आजीबाईंची ती पिढी आता वैकुंठात पोहोचलेय. आत्ताच्या आज्यांना नातवंडांपेक्षा टिव्ही सिरियलमध्ये जास्त रस. असो.
दृष्ट लागणे म्हणजे नेमके काय? तर आपल्याकडे असे मानले जाते की, लहान मुलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा लगेच परिणाम होतो. आजूबाजूला वावरणार्याला प्रत्येक माणसाची वृत्ती चांगली असते असे नव्हे. काही व्यक्तींना त्या मुलाच्या घराण्याबद्दल असूया असते, काहींना त्या मुलाच्या आई-वडिलांबद्दल असूया असते. ही अनेक कारणांमुळे असू शकते. जेव्हा हे मूल त्या व्यक्तीच्या संपर्कात येतं, तेव्हा त्या मुलाला पाहताच, ही असूया, द्वेष त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो आणि त्या मुलाकडे विषतुल्य दृष्टीने बघितले जाते, ज्याचा परिणाम त्या मुलावर होतो. याला दृष्ट लागणे असे म्हणतात.
काही वेळा घरात काही वास्तुदोष असतील, तर त्याचा परिणाम त्या मुलावर होतो. त्या घरात पूर्वी कुणाची हत्त्या झाली असेल, किंवा पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत एखाद्या निपुत्रिक विधवेला इस्टेटीसाठी छळ करून हाकलून दिलेले असेल, तर अशा व्यक्तींचे शाप त्या घराला असतात. अशा घरातल्या मुलांना कुठलेही आरोग्याचे वा अन्य कारण नसतांनाही, ती लहान मुले रात्री अस्वस्थ होऊन रडायला लागतात. हा प्रकार शनिवार, अमावास्या, अष्टमी या दिवशी जास्त होतो.
तसेच मुलाला जन्मत: राहु, शनी, केतु यापैकी ग्रहांची महादशा असेल किंवा शनिची साडेसाती असेल तरीसुद्धा अशा दशांमध्ये वा साडेसातीत त्याच्यावर असल्या लोकांच्या नजरेचा लगेच परिणाम होतो. मूल वेगळं वागायला लागतं, रात्री अपरात्री झोपेतून उठून रडायला लागतं, दिवसभर छान खेळणारी मुलं दिवेलागणीच्या वेळेस रडायला लागतात, काही मुलांना अनामिक भीती वाटायला लागते. काही विशिष्ठ व्यक्ती समोर आल्या की मुले रडायला लागतात, घाबरतात.
अशा वेळेस सर्वप्रथम पेडिएट्रिशिअनकडे मुलाला घेऊन जावं आणि त्याची तपासणी करावी. काही वेळा जंत झाल्यामुळे मूल रडतं असतं, त्याच्या पोटात दुखत असतं पण त्याला नीट सांगता येत नाही. काही वेळा इतर काही शारीरिक त्रास असतील, कॉन्स्टिपेशन असेल तरीसुद्धा मूल रडतं. त्यामुळे सर्वप्रथम शारीरिक पातळीवर त्याला काही त्रास नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेकवेळा शारीरिक त्रास काही नसतो. डॉक्टर तपासतात. सीबीसी, इएसआर करायला सांगतात, कधी एसजीओटी, एसजीपीटी करून लिव्हरचा त्रास नाही ना हे पहिले जाते. पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी मूल रात्री रडायचं थांबत नाही.
अशा वेळेस त्या मुलाची दृष्ट जरूर काढावी. तसेच मुलाला काहीही होत नसेल तरीही त्याची दृष्ट काढावी. ती कशी हे सांगतो.
जन्मल्यापासून सहा महिन्यांपर्यंत रोज संध्याकाळी दिवेलागणीला फूल आणि पाणि यांनी दृष्ट काढावी. उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलाच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावेत. ते करत असतांना खालील मंत्र म्हणावा;-
"दृष्ट मिष्ट, आल्यागेल्याची, नात्या-गोत्याची, भूताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ-काताळाची, काळ्या माणसाची, गोर्या माणसाची, स्त्री पुरूषाची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची... दृष्ट दूर होवो.. "
असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घराबाहेर नेऊन टाकून द्यावे. आणि खालील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा.
वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरि: |
रक्षतु त्वरितोबालं मुंच मुंच कुमारकम् ||
सहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी आणि अष्टमी, पौर्णिमा व अमावास्येला मीठ मोहरीने दृष्ट काढावी. त्यासाठी मंत्र वरीलप्रमाणेच आहे. फक्त दोन्ही हातात मीठ मोहरी घेऊन सात वेळा मुलावरून उतरवून जमीनीवर बोटे मोडावीत.
तसेच दृष्ट काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव जी फोडणीसाठी वापरतात, ती गॅसवर गरम करत ठेवावी. दृष्ट काढेपर्यंत ती पूर्ण तापेल या हिशोबाने. दृष्ट काढल्यावर मीठ मोहरी त्या तापलेल्या लोखंडाच्या डावेत टाकावी. ते टाकल्यावर गॅसजवळ उभे राहू नये. मोहोरी तडतडते. डोळ्यात जायची शक्यता असते. त्यामुळे ते टाकून लगेच गॅस पासून दूर व्हावे. पाच मिनिटांनी ते जळल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्याचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा.
दृष्ट काढण्याच्या विविध पद्धती
दृष्ट काढण्यासाठी वापरल्या जाणार्या घटकांत रज-तमात्मक लहरी आकृष्ट करून त्या घनीभूत करून मग त्या उच्चाटन करण्याची क्षमता असावी लागते, तरच दृष्ट प्रभावी ठरू शकते. मुख्यत्वे मोहरी-मीठ, मीठ-लाल मिरच्या, मोहरी-मीठ-लाल मिरच्या, लिंबू आणि नारळ या घटकांचा वापर करून दृष्ट काढली जाते. बहुतांश दोन घटकांची संयोगिता ही कार्यातील वेगधारणा वाढवण्यासाठी वापरली जाते. मोहरी, मीठ, लाल मिरच्या आणि नारळ हे घटक त्यांच्या अंतःस्थ गुणधर्मांमुळे रज-तमात्मक लहरींना घनीभूत करून ठेवण्याचे सामथ्र्य दर्शवतात; म्हणून विशेषत्वाने हे घटक प्राधान्याने वापरले जातात.
१. मीठ आणि मोहरी यांच्या साहाय्याने दृष्ट काढण्याची पद्धत
पद्धत :
मीठ आणि मोहरी एकत्र करावी. मिठाचे प्रमाण जास्त आणि मोहरीचे प्रमाण अल्प असावे.पाच बोटे जुळवून त्यात मावेल एवढी मीठ-मोहरी दोन्ही हातांत घेऊन हातांच्या मुठी कराव्यात.वळलेल्या मुठी खालच्या म्हणजेच भूमीच्या दिशेने करून हातांची स्थिती ‘फुली’च्या आकारासारखी करून उभे रहावे.त्यानंतर दृष्ट काढणार्या व्यक्तीने तिचे हात खालून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने फिरवावेत.दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्यांवर जाळावी.
२. मीठ आणि मोहरी एकत्र का वापरतात ?
मीठ आणि मोहरी यांच्या साहाय्याने दृष्ट काढली असता स्थूलदेहावरील रज-तमात्मक आवरण मिठाच्या साहाय्याने खेचले जाऊन ते मोहरीमध्ये वेगवान लहरींच्या साहाय्याने घनीभूत होऊन नंतर अग्नीच्या साहाय्याने जाळून नष्ट केले जाते. स्थूलदेहावरील आवरण निघाल्यामुळे दृष्ट काढल्यानंतर शरिराला हलकेपणा येतो, तसेच शरिराच्या बधीरतेचे प्रमाणही उणावते.
३. मिठाचा वापर करण्याचे महत्त्व
शुष्क मिठाचा गुणधर्म वायूच्या साहाय्याने रज-तम गुणाला घनीभूत करण्याचा आहे. पाण्यात विरघळलेले मीठ हे संपर्कजन्यतेच्या स्तरावर अधिक उपयुक्त आहे. मिठाभोवती असणारा आद्र्रतादर्शक वायूकोष हा देहावर आलेले काळ्या शक्तीचे रज-तमात्मक आवरण खेचून घेण्यात अग्रेसर असतो. मीठ हातात घेऊन ओवाळण्याच्या प्रक्रियेतून कार्यरत होणार्या रजोगुणी लहरींच्या स्पर्शाने मिठाभोवती असणारा आद्र्रताजन्य वायूकोष कार्यमान होतो आणि त्याच्या संपर्कात असलेल्या जिवाच्या देहावरील रज-तमात्मक आवरण खेचून घेऊन त्याला आपल्या कोषात घनीभूत किंवा बद्ध करून ठेवतो. त्यानंतर या मिठातील आद्र्रताजन्य कोष अग्नीच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतो आणि अशा प्रकारे त्यातील रज-तमात्मक लहरींचे विघटन होण्यास साहाय्य होते. दृष्टीच्या प्रक्रियेत मिठातील आद्र्रताजन्य कोष हा मुख्यतः विघटन करण्याच्या प्रक्रियेपर्यंत रज-तमात्मक लहरींचे एकत्रित वहन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
साध्या मिठाच्या तुलनेत खडे मीठ वापरणे का योग्य ?
साध्या मिठावर केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे त्याचे वाईट स्पंदने खेचून घेण्याचे प्रमाण खडे मिठापेक्षा अल्प होते.
खडे मीठ हे खड्यांच्या रूपात असल्याने वाईट स्पंदने धरून ठेवण्याची त्याची क्षमता ही साध्या मिठापेक्षा अधिक असते.
४. दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्यांवर जाळण्याचे महत्व
अग्नी हा जसा विघटनाला पूरक आहे, तसा तो त्या त्या ठिकाणी घनीभूत असणार्या ऊर्जेच्या साठ्याला उद्दिपना देणाराही आहे. त्यामुळे मीठ आणि मोहरी यांनी आकृष्ट केलेल्या काळ्या लहरी अग्नीच्या स्पर्शाने प्रवाही बनून त्यातील तेजात भस्म होतात. तेव्हा विघटनात्मक प्रक्रियेच्या वेळी काळ्या शक्तीच्या तीव्रतेच्या प्रमाणात दुर्गंध सुटतो.
वैशिष्ट्य : मीठ आणि मोहरी अग्नीच्या स्पर्शाने लगेचच काळ्या शक्तीचे खेचलेले आवरण त्यागतात.
५. दृष्ट लागल्याचे प्रमाण किती आहे, हे कसे ओळखावे ?
दृष्ट लागलेली नसणे
दृष्ट लागलेलीच नसेल, तर मीठ आणि मोहरी यांचाच जळल्याचा वास येतो. तो दुर्गंधविरहित असतो.
मंद दृष्ट
कधी कधी मुळीच दुर्गंध येत नाही, त्या वेळी मोहरी आणि मीठ यांनी खेचलेल्या रज-तमात्मक लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने ते अग्नीत लगेचच भस्मसात होते. त्यामुळे तीव्र दृष्ट लागण्याच्या प्रमाणात वायूमंडलात स्थुलातून जाणवणारा तीव्र दुर्गंध निर्माण होत नसल्याने दुर्गंध येण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. त्या वेळी मंद प्रमाणात दृष्ट लागलेली असते.
तीव्र दृष्ट
दुर्गंधाचे प्रमाण अधिक असेल, त्या वेळी तीव्र प्रमाणात दृष्ट लागलेली असते.
सूचना : वरील सूत्रात (मुद्यात) दिल्याप्रमाणे दृष्ट लागलेलीच नसेल, तर मीठ आणि मोहरी जाळल्यावर दुर्गंध येणार नाही. याचा अर्थ ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नाही’, असा होतो; परंतु यानंतरही व्यक्तीला स्थुलातून त्रासाची लक्षणे जाणवतच राहिली, तर ‘दृष्ट निघालीच नाही’, असे समजावे आणि एक-एक घंट्याने (तासाने) दृष्ट काढत रहावी. तरीही दृष्ट निघत नसेल, तर दृष्ट काढण्यासाठी पुढच्या टप्प्याचे घटक उदा. नारळ वापरून पहावे. एवढे करूनही त्रास गेला नाही, तर त्याविषयी अध्यात्मातील जाणकार व्यक्तीला किंवा उन्नतांना विचारावे. ते सांगतील त्यानुसार आध्यात्मिक उपाय करावेत.
(सौजन्य आणि संदर्भ: धोंडोपंत ब्लॉगस्पॉट)
================================
१. दृष्ट काढून घेणारी व्यक्ती उपस्थित असतांना करावयाच्या कृती:
दृष्ट शक्यतो सायंकाळी काढावी. त्रास दूर होण्यासाठी ती वेळ अधिक चांगली असते; कारण त्या वेळी वाईट शक्तीचे सहजतेने प्रकटीकरण होऊन तो त्रास दृष्ट काढण्यासाठी उपयोगात येणाऱ्या घटकामध्ये खेचून घेता येतो. तीव्र त्रास असल्यास तीन-चार वेळा सलग किंवा प्रत्येक घंट्याने (तासाने) किंवा दिवसातून तीन-चार वेळा दृष्ट काढावी.
अ. ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, तिला पाटावर बसवावे.
आ. दृष्ट काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना कराव्यात.
दृष्ट लागलेल्या व्यक्तीने उपास्यदेवतेला करावयाची प्रार्थना
‘दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकामध्ये माझ्या शरिरातील, तसेच शरिराबाहेरील त्रासदायक स्पंदने खेचली जाऊन त्यांचा समूळ नाश होऊ दे.’
दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने उपास्यदेवतेला करावयाची प्रार्थना
‘दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकामध्ये दृष्ट लागलेल्या जिवाच्या देहातील आणि देहाबाहेरील त्रासदायक स्पंदने खेचून जाऊन त्यांचा समूळ नाश होऊ दे. दृष्ट काढत असतांना तुझ्या कृपेचे संरक्षक–कवच माझ्याभोवती निर्माण राहू दे.’
इ. ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, तिने पाटावर बसायची आणि दोन्ही हात ठेवण्याची स्थिती :
ई. दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने करायच्या कृती
• मीठ-मोहरी, मीठ-मोहरी-लाल मिरच्या, लिंबू, नारळ इत्यादी विविध घटक दृष्ट काढण्यासाठी वापरतात. ज्या घटकाने दृष्ट काढायची आहे, तो घटक दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या समोर हातात धरावा.
• ‘आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता- खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत दृष्ट काढायचा घटक त्रास असलेल्या व्यक्तीवरून सर्वसाधारणतः ३ वेळा ओवाळावा. घटक ओवाळण्याची पद्धत त्या त्या घटकानुसार थोडी निराळी असते.
• दृष्ट काढायचा घटक ओवाळतांना प्रत्येक वेळी भूमीला हात टेकवावेत. असे केल्याने व्यक्तीतील त्रासदायक स्पंदने घटकामध्ये खेचून येऊन मग भूमीत विसर्जित होण्यास साहाय्य होते.
• व्यक्तीला त्रास जास्त असल्यास घटक तीनपेक्षा जास्त वेळा ओवाळावा. बहुतेक वेळा मांत्रिक ३, ५, ७ किंवा ९ अशी विषम आकड्यांची करणी करतात; म्हणून शक्यतो विषम संख्येत घटक ओवाळावा.
• कधी २-३ वेळा दृष्ट काढूनही त्रास अल्प होत नाही. वरिष्ठ वाईट शक्तींचा त्रास असल्यास असे होते. अशा वेळी दृष्ट काढतांना दृष्ट काढायचा घटक त्रास असलेल्या व्यक्तीच्या पुढून ओवाळून झाल्यानंतर तिच्या पाठीमागूनही ओवाळावा. नेहमीची भुते असल्यास पुढून ओवाळले, तरी पुरे असते. मोठ्या वाईट शक्ती शरिराच्या पाठीमागे स्थाने करतात. त्यामुळे दृष्ट काढतांना दोन्हींकडून ओवाळायला हवे.
• दृष्ट काढून झाल्यानंतर ती घेऊन जातांना मागे वळून पाहू नये.
उ. दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणारा आणि ज्याची दृष्ट काढली तो, यांनी कोणाशीही न बोलता मनात १५-२० मिनिटे नामजप करत पुढील कर्म करावे.
ऊ. दृष्ट काढणाऱ्याने ज्या घटकाने दृष्ट काढली असेल, त्या घटकात खेचून आलेली त्रासदायक शक्ती नष्ट करण्याची पद्धत त्या त्या घटकानुसार निरनिराळी आहे, उदा. मिरच्या आणि लिंबू जाळावे, तर नारळ मारुतीच्या देवळात फोडावा किंवा पाण्यात विसर्जित करावा.
ए. दृष्ट काढणारा आणि ज्याची दृष्ट काढली तो, यांनी हात-पाय धुवावेत, अंगावर गोमूत्र किंवा विभूतीयुक्त पाणी शिंपडावे, देवाचे किंवा गुरूंचे स्मरण करून आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून विभूती लावावी आणि आपल्या पुढच्या कर्मांना आरंभ करावा.दृष्ट काढून घेणारी व्यक्ती
उपस्थित नसतांना करावयाच्या कृती
काही वेळा रुग्ण (आजारी) व्यक्ती दृष्ट काढण्याच्या ठिकाणी येऊ शकत नसेल किंवा एखादी व्यक्ती दूरदेशी असेल, तर त्या व्यक्तीची पुढे दिलेल्या पद्धतींप्रमाणे दृष्ट काढावी.
व्यक्तीचे छायाचित्र ठेवून त्यावरून दृष्ट काढणे
व्यक्तीचे नाव कागदावर लिहून त्या कागदावरून दृष्ट काढणे
व्यक्तीचे नाव उच्चारून दृष्ट काढणे
वरीलप्रमाणे दृष्ट काढण्याची सर्वसाधारण पद्धत नेहमी आपण जशी दृष्ट काढतो तशीच आहे.
No comments:
Post a Comment