Thursday, September 27, 2018

कशी आहेस???

कशी आहेस???

ती clinic मध्ये माझ्यासमोर खिन्न होऊन बसली होती..सुंदर चेहरा म्लान झालेला, डोळे काठोकाठ भरून आलेले,कधीही झरु लागतील असे..

गेल्या काही वर्षांपासून चांगली ओळखत होते तिला मी. ती हायस्कूल मध्ये होती तेव्हा पासून.. मस्त उत्साही, तारुण्याच्या गोडव्याने रसरसलेली, स्वतः वरच जीव जडलेली आणि म्हणूनच सर्वांना हवीहवीशी असलेली. हसतमुख, हुशार,कलासक्त, संवेदनशील आणि मनस्वी,..

सर्वांना आपली वाटणारी.. काहींना तर फारच आपली .. त्यातच तो होता.. तिला साजेसाच.. छान मैत्री होती दोघांची.. अकरावी बारावी ला एकच क्लास होता त्यामुळे क्लास, कॉलेज मिळून बराच वेळ सोबत असायचे दोघं.. एकमेकांना जपायचे, समजून घ्यायचे, आधार द्यायचे..गम्मत म्हणजे त्यांचे नाते इतके गोड इतके लोभस वाटायचे की आसपास चे सगळेच त्यात विरघळून गेलेले, केव्हाही त्यांच्या मदतीला तत्पर.. दोघांचे एकमेकांसोबत असणे इतके सहज होते की दोघांच्या घरी सुद्धा कुठलीच नाराजी, तक्रार नव्हती..
आणि या गोड गुलाबी नात्याची परिणती अटळपणे जी व्हायची तीच झाली..

दोघं शिक्षण पूर्ण करून नोकरी धंद्याला लागले.त्याने डॉक्टर होऊन आईबाबां चा वारसा चालवायला घेतला आणि ती तिच्या मनस्वी स्वभावाला अनुसरून चित्रकार झाली.. दोघांचे लग्न हा त्यांच्यात भावनेने गुंतलेल्या अनेक आप्त स्वकियांचा कौतुकाचा सोहळा होता. त्यांच्या नात्या चे लग्नात रूपांतर झालेले पाहून सर्वांनाच मनापासून आनंद आणि समाधान वाटले.

हळू हळू ती दोघेही नवीन संसारात रुळु लागली..तो मुळातच हुशार आणि त्याच्या विद्येत पारंगत असल्याने हृदयरोग तज्ञ म्हणून त्याचे चांगले नाव होऊ लागले.. ती ही घर, सणवार, नातीगोती सगळं प्रेमाने सांभाळत स्वतःची कला जोपासू लागली.. सासर च्या घराच्या भिंतींही तिच्या पेंटिंग्ज दिमाखाने मिरवू लागल्या..मधून मधून तिच्या पेंटिंग्ज बद्दल छापून येई, प्रदर्शन असे , विकली पण जायची..

पण अलीकडे दोघेही त्यांच्या त्यांच्या व्यापात गर्क झाल्याने कुठेतरी नकळतच एक अंतर आले होते आणि ह्याच जाणिवेने बेचैन होऊन ती माझ्याकडे आपले मन मोकळं करायला आली होती.
"मला ना खूप काळजी वाटतेय,तो खूप परका वाटू लागलाय अलीकडे.." ती

"असं कशा वरून वाटतं तुला? "मी

"कशावरून असं नाही सांगता येत पण त्याचं वागणं
बदललय आताशा.. कधी पण बघावं तर स्वतः तच दंग असतो.. मी आसपास असले तरी जशी काही अदृश्य असल्यासारखा वागतो" ती..

"त्याचे व्यावसायिक काम वाढले असेल ना?? दमत पण असेल बराच"मी

"मग मी काय घरात आरामात लोळत असते का?? घरचं, बाहेरचं सगळं करता करता पिट्ट्या पडतो माझा,पण त्याला काय त्याचं?? कॉलेज मध्ये असताना असा नव्हता तो,किती जपायचा मला,पण आता मोठ्ठा डॉक्टर झालाय ना?? आता ते फी देणारे पेशंट त्याचे देव झालेत, इथे मला काही दुखलं तर साधं कशी आहेस पण विचारत नाही परवा कांदा चिरताना माझं बोट कापलं गेलं तर खुशाल त्याच्या हॉस्पिटल मधल्या सिस्टर ला ड्रेसिंग करायला सांगून  निघून गेला"
बोलता बोलता तिची दुखरी नस जणू सापडली होती मला..
डॉक्टर असलेला इतरांशी आपुलकीने वागणारा सहचर आपली साधी विचारपूस देखील करत नाही ,आपल्याला गृहीत धरतो हे तिचे शल्य होते..

पुढे त्याच्यासोबत झालेल्या सेशन मध्ये त्याने मोकळेपणी आपली चूक मान्य केली तिच्यावरचं त्याचं प्रेम तसच होत फक्त ते व्यक्त करायलाच विसरत चालला होता तो..आणि हे जाणवल्यावर तो पुन्हा जपायला लागला तिला, त्याच्या प्रेमळ आधाराने तीही पुन्हा हसरी बोलकी झाली..

तात्पर्य:
तुम्हाला जर आपल्या पत्नीला, मैत्रिणीला,आईला, बहिणीला किंवा मुली ला तुमचे त्यांच्या वर असलेले प्रेम त्यांनी जाणवून घ्यावे असे वाटत असेल तर लक्षात ठेऊन दिवसातून दोनदा तिला जरूर विचारा "कशी आहेस?"...(आणि उत्तरादाखल ती जे ही बोलेल, सांगेल ते आत्मीयतेने फक्त ऐकुन घ्या,कृपा करून कुठलाही सल्ला देऊ नका) ..प्रत्येक स्त्रीची हि खूप मूलभूत गरज असते, त्यांना आवडते असे विचारलेले "कशी आहेस" आणि तेवढच पुरतं तिला खूष व्हायला आणि मग ती ही तुमच्यावर तिचे प्रेम भरभरून उधळू लागते..

#संवादिनी
©डॉ. स्वाती बारपांडे

No comments:

Post a Comment